दीक्षित अथवा दीक्षारहित । जो जो हंसदास निश्चित । साधारण उपायाचें कृत्य । अल्पसें बोलिजे ॥१॥
मुख्य गुरुपदीं आवडी । हंसदास्यत्वाची गोडी । वेदांतश्रवणीं श्रध्दा गाढी । तोचि एक हंसदास ॥२॥
प्रपंचीं चित्त उदास थोर । परमार्थाचा अति आदर । मननें पाहे सारासार । तोचि एक हंसदास ॥३॥
मी माझें त्यागुनि दुरी । ब्रह्मैक्यता अभिन्नता वरी । द्वैतभावासी परती सारी । तोचि हंस तत्वतां ॥४॥
मीपणादि देहांत वहिलें । सर्व गुरुचरणीं समर्पिलें । अर्पण करी जें जें केलें । तोचि हंस तत्वतां ॥५॥
निंदा द्वेष सहसा न करी । मत्सरचि नाहीं किमपि अंतरीं । एक गुरु सर्वांभूतिं निर्धारी । तोचि हंस तत्वतां ॥६॥
कोणी निंदी कीं करी छळण । त्यासी गुरुरुप पाहे आपण । अपकारिया उपकार करी पूर्ण । तोचि० ॥७॥
विहित कर्म करितसे । परी अंतरीं फलेच्छा नसे । परमार्थमार्गीं मन विश्वासे । तोचि० ॥८॥
पाषांडमती कदा न पडे । संसारपांगीं कदाहि न सांपडे । संतसंगासीच मन जडे । तोचि० ॥९॥
कामक्रोधासी परते केले । लोभासी तो उभेंचि चिरिलें । मद मत्सरासी भडकाविलें । तोचि० ॥१०॥
दंभ घातला पायातळीं । कुभावाची नरडी पिळी । आशेची तो खांदिली मुळी । तोचि० ॥११॥
दुराग्रहावरी उठावला । तृष्णेचा तरी घातचि केला । असूयेचा घोटचि भरिला । तोचि० ॥१२॥
देह बुध्दीसी सुबुध्दीनें दवडी । स्वसुखग्रहणें सुखदु :ख तोडी । कल्पनेचे दांत पाडी । तोचि० ॥१३॥
देहसुखासी अंगचि नेदी । आला प्रसंग तरी संपादी । परी अभिमान उठतां छेदी । तोचि० ॥१४॥
माझें तुझें उठतां मनीं । निर्दाळितसे तयालागुनी । सदा सावध अनुसंधानीं । तोचि० ॥१५॥
विक्षेपासी पाडी आसडोनी । विपरीत भावासी धरिलें चरणीं । वासनेची केली धुळधाणी । तोचि० ॥१६॥
विषयसुख देशधडी केलें । वैराग्यें इहपरहि त्यागिलें । इंद्रियांचें मडगें मोडिलें । तोचि० ॥१७॥
संशयावरी उठावला । अज्ञानाचा घोटचि भरिला । भवसिंधु हा थापें मारिला । तोचि० ॥१८॥
मायेचें केलें निसंतान । अद्वैतचि जाला अभिन्न । बंधमोक्षा परते सारिलें जाण । तोचि० ॥१९॥
केलें जन्माचें सार्थक । निर्भयत्व पावला एक । गुरुरुप जाला निश्चयात्मक । तोचि एक हंस तत्वतां ॥२०॥
येणें रीती जीवन्मुक्ति । पावला अभेदज्ञानसंपत्ति । तो हंसरुपचि निश्चिती । हंसदास नव्हे तो ॥२१॥
देह प्रारब्धीं टाकिला । स्वप्नवत पाहे सर्व क्रियेला । तिही अवस्थेमाजींहि तयाला । उत्थानचि नसे ॥२२॥
तया कासयासी बहिर्दीक्षा । कासया माला धारण रुद्राक्षा । जेणें सिध्दांतासह पूर्व पक्षा । बिंदुलें घातलें ॥२३॥
तो दीक्षित अथवा अदीक्षित । तो अदंडी किंवा योगदंडयुक्त । वस्त्र तयाचें श्वेत कीं रक्त । परी तो एकरुप ॥२४॥
भस्मलेपन कीं स्नान करो । अथवा उगाचि धरणीं संचरो । गृहस्थाश्रमीं कीं मठचि धरो । परी तो एकरुप ॥२५॥
तो ब्रह्मचारी कीं वनीं वसो । अथवा प्रपंचींच सर्वदा असो । कीं संन्यास करोनि जगीं विलासो । परी तो० ॥२६॥
त्यागी भोगी कीं कर्माकर्मी । जप तप कीं भ्रष्ट अधर्मी । दिगंवर किंवा स्वकीयधर्मी । परि तो० ॥२७॥
परी ऐसी स्थिति यावयासी । साधकें प्रवर्तावें दिननिशीं । दीक्षित किंवा अदीक्षितासी । सांगणें इतुकें ॥२८॥
सद्रुहंसांची प्रार्थना करावी । उदास वृत्तीनें करुणा भाकावी । येर कोणतीच अपेक्षा नसावी । कवणेही काळीं ॥२९॥
अहा सद्रुर कां मज उपेक्षिलें । मज पासोनि कोणतें अंतर पडिलें । जरी अंतर तरी शिक्षा करुनि वहिलें । ज्ञानपात्र करी ॥३०॥
मज तें अभिन्नज्ञान द्यावें । तरी येर चिन्ह ते बाणती बरवे । ऐसिये रीती गुरुंसी आळवावें । अनेक करुणावचनें ॥३१॥
सर्व त्यागुनी अनन्य गुरुसी । त्यावरी कृपा होईल अल्प दिवसीं । तों काळ सोडूं नये साधनासी । उभयांचे बोलल्यापरी ॥३२॥
दीक्षित अथवा अदीक्षित । वोलिल्या रीती होईल रत । तयाची अंतरशुध्दि होऊनि त्वरित । ज्ञान प्राप्त होय ॥३३॥
गुरुहंसें चिमणिया बाळाचे । कर्णी सांगितलें जें जें साचें । तें तेंचि बोलिलें असे वाचें । बोबडिया बोली ॥३४॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । हंसदासाचरण निगुती । षष्ठ प्रकरणीं ॥६॥