अध्याय बत्तीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


मी तुज सांगितलें हित ॥ परी तूं नायकसी उन्मत्त ॥ कुळक्षय जाहला समस्त ॥ तुजही रघुनाथ वधील पैं ॥५१॥

ऐसें बिभीषण बोलत ॥ रावण जाहला क्रोधयुक्त ॥ करकरां खाऊनि दांत ॥ श्वासोच्छ्वास टाकीतसे ॥५२॥

तुज राखीतसे सौमित्र ॥ तरी त्यासी करीन चूर ॥ माझा इंद्रजित विजयी पुत्र ॥ येणेंचि गिळिला निकुंभिले ॥५३॥

अतिकायाऐसें निधान ॥ येणेंचि गिळिलें न लागतां क्षण ॥ तरी या सौमित्राचा आजि प्राण ॥ समरांगणीं घेईन मी ॥५४॥

ऐसें बोलोनि लंकापति ॥ धगधगित काढिली शक्ती ॥ गवसणी काढितांचि जगतीं ॥ तेज अद्भुत पसरलें ॥५५॥

कीं प्रळायाग्नीची शिखा प्रबळ ॥ किंवा कृतांतजिव्हा तेजाळ ॥ कीं ती प्रळयमेघांतील ॥ मुख्य चपळा निवडीली ॥५७॥

कीं सप्तकोटि -मंत्रतेज पाहीं ॥ एकवटलें शक्तीचें ठायीं ॥ ते मयें दशग्रीव जांवई ॥ म्हणोनि उचित दीधली ॥५८॥

ते मयशक्ति काढून पाहीं ॥ कधी कोणावर घातली नाहीं ॥ ते सौमित्रावरी ते समयीं ॥ रावण प्रेरिता जाहला ॥५९॥

न्यासासहित जपोनि मंत्र ॥ सोडोनी दिधली सत्वर ॥ नवखंडधरित्री अंबर ॥ तडाडलें ते काळीं ॥६०॥

सहस्र विजा कडकडती ॥ तैसी अनिवार धांवे शक्ति ॥ भयें व्यापिला सरितापति ॥ आंग टाकों पाहती दिग्गज ॥६१॥

देव विमानें पळविती ॥ गिरिकंदरीं वानर दडती ॥ एक मूर्च्छा येऊनि पडती ॥ न उठती मागुती ॥६२॥

दोनी दळें भयातुर ॥ पळों लागले महावीर ॥ तों ब्रह्मांडासी देणार धीर ॥ रुद्रावतार धांविन्नला ॥६३॥

मारुती बळिया जगजेठी ॥ तेणें धरिली वाममुष्टी ॥ मोडावी तों उठाउठीं ॥ दिव्य स्त्रीरूप जाहली ॥६४॥

मग ते म्हणे मारुतीसी ॥ ब्रह्मचारी तूं म्हणविसी ॥ परस्त्रियेसीं कां झोंबसी ॥ सोडी वेगेसी जाऊं दे ॥६५॥

मी रावणकन्या साचार ॥ आजि वरीन सौमित्र वीर ॥ सोडीं जाऊंदे सत्वर ॥ मुहूर्तवेळा जातसे ॥६६॥

मारुति योगी इंद्रयजित ॥ स्त्री म्हणोनि सोडिली अकस्मात ॥ तंव ती जाहली पूर्ववत ॥ प्रळय करीत चालली ॥६७॥

वानरदळीं मांडला आकांत ॥ देव जाहले भयभीत ॥ म्हणती मयशक्ति अद्भुत ॥ कोणावरी पडेल हे ॥६८॥

तंव लक्ष्मण लक्षित ॥ मनोवेगें शक्ति येत ॥ ते छेदावया सुमित्रासुत ॥ बाण आकर्ण ओढीतसे ॥६९॥

जैसी चपळा ये कडकडोनी ॥ तैसी हृदयीं बैसे येउनी ॥ वक्षस्थळ चूर्ण करूनी ॥ जाय निघूनि पृष्ठिद्वारें ॥७०॥

पृथ्वी फोडूनि शक्ति गेली ॥ पाताळोदकीं ते विझाली ॥ असो सौमित्राची तनु पडली ॥ भूमीवरी निचेष्टित ॥७१॥

मृत्तिकाघट जेवीं होय चूर्ण ॥ फणस पडे पवनें विदारून ॥ तैसा सुमित्रानंदन ॥ छिन्नभिन्न जाहला ॥७२॥

मग एकचि जाहला हाहाकार ॥ देव गजबजले समग्र ॥ रणीं पडला सौमित्र ॥ वानरदळ शोकर करी ॥७३॥

तंव हांक फोडी बिभीषण ॥ गजबजले सुग्रीव रघुनंदन ॥ सौमित्राजवळी धांवोन ॥ येते जाहले ते काळीं ॥७४॥

अंगद नळ नीळ जांबुवंत ॥ सुषेण शरभ गवय हनुमंत ॥ धांविन्नले वानर समस्त ॥ हृदय पिटीत ते काळीं ॥७५॥

एकचि वर्तला आकांत ॥ मिळाले सौमित्रा वेष्टित ॥ निकट बैसोनि रघुनाथ ॥ पाहता जाहला ते काळीं ॥७६॥

तो हृदय विदारिलें अत्यंत ॥ पृष्ठिद्वारें वाहे रक्त ॥ नासिकासी जों लाविला हस्त ॥ तों श्वासोछ्वास राहिला ॥७७॥

आरक्त जाहले हस्त नयन ॥ बाण तैसाचि ओडिला आकर्ण ॥ कानाडीसहित लक्ष्मण ॥ निचेष्टित पडिलासे ॥७८॥

प्राण न दिसे अणुमात्र ॥ ऐसें देखोनि राजीवनेत्र ॥ वक्षःस्थळ पिटोनि शरीर ॥ भूमीवरी टाकिलें ॥७९॥

सवें बिभीषणें सांवरून ॥ बैसविला सीतारमण ॥ सौमित्रा मांडीवरी घेऊन ॥ राम बैसला ते काळीं ॥८०॥

मुखावरी ठेवून मुख ॥ शोक करी अयोध्यानायक ॥ म्हणे प्राणसखया गोष्ट एक ॥ मजसी बोलें एकदां ॥८१॥

बारे नेत्र उघडून ॥ पाहें मजकडे विलोकून ॥ तूं सुकुमार बाळ पूर्ण ॥ भरिलें त्रिभुवन प्रतापें ॥८२॥

चतुर्दश वर्षे वनवासी ॥ बारे फळें पुरविली आम्हांसी ॥ म्यां मारिलें उपवासी ॥ एक दिवशीं पुसिलें नाहीं ॥८३॥

तोचि राग धरूनि मनी ॥ सखया जातोसी रुसोनी ॥ मी आपुला प्राण त्यजूनी ॥ येईन तुजसमागमें ॥८४॥

मी अयोध्येसी जातां जाण ॥ सुत्रित्रा पुसेल मजलागून ॥ तीतें काय सांगो वचन ॥ नेत्र उघडून पाहें पां ॥८५॥

त्रिभुवन जिंकिलें इंद्रजितें ॥ जो नावरे कोणातें ॥ तो रावणी तुवां शरपंथें ॥ जर्जर करूनि मारिला ॥८६॥

तुज देव चिंतिती कल्याण ॥ आजि समरीं केलें शयन ॥ तुजलागीं भरत शत्रुघ्न ॥ त्यजितील प्राण सौमित्रा ॥८७॥

ऐसा शोक करितां रघुवीर ॥ जाहला एकचि हाहाकार ॥ तंव तो रावणानुज ॥ भक्त थोर ॥ बोलता जाहला ते काळीं ॥८८॥

शत्रु समोर उभा रणीं ॥ शोक करितां जी ये क्षणीं ॥ हा क्षात्रधर्म चापपाणी ॥ सहसा नव्हे विचारिजे ॥८९॥

वैरी उभा असे समोर ॥ त्यासी पराभवावा सत्वर ॥ मग सौमित्राचा विचार ॥ कळेल तैसा करावा ॥९०॥

नरवीरश्रेष्ठा रघुनंदना ॥ सर्वथा भय नाहीं लक्ष्मणा ॥ शरधारीं छेदी रावणा ॥ म्हणोनि चापबाण दिधले ॥९१॥

उभा राहिला रणरंगधीर ॥ जो राक्षसकुळवैश्वानर ॥ कीं ग्रासावया ब्रह्मांड समग्र ॥ कृतांत क्षोभला कल्पांती ॥९२॥

चाप टणत्कारिलें ते वेळीं ॥ झणत्कारिल्यां घंटा सकळी ॥ उर्वीसह शेष डळमळी ॥ गजबजलीं सप्त पाताळें ॥९३॥

क्रोध श्रीरामाचा देखोन ॥ गज सिंह शार्दूल भूतगण ॥ गतप्राण बहुत होऊन ॥ काननामाजी पडियेले ॥९४॥

दशरथींचें हृदयांत ॥ क्रोधसागर हेलावत ॥ वज्रठाण मांडी रघुनाथ ॥ जें कृतांत पाहूं न शके ॥९५॥

रावणासी म्हणे रघुनंदन ॥ सौमित्रावरी शक्ति टाकून ॥ कोठें जासी तूं पळून ॥ करीन चूर्ण बाणघातें ॥९६॥

सौमित्र पडिला म्हणवून ॥ संतोषें दशमुख वारण ॥ त्यावरी रामपंचानन ॥ सरसावोनि धांविन्नला ॥९७॥

भातां शर भरले सबळ ॥ जैसें शेषमुखीं हाळाहळ ॥ कीं समुद्रामाजी वडवानळ ॥ मेघीं चपळा जयापरी ॥९८॥

ते शर सोडीत रघुपती ॥ एका शराचे कोटी होती ॥ तटतटां तुटोनि पडती ॥ राक्षसशिरें ते काळीं ॥९९॥

बिळीं निघतां विखार ॥ तैसें रावणासी रुपती शर ॥ कीं पिच्छें पसरी मयूर ॥ कीं तृणांकुर पर्वतीं ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP