अध्याय बत्तीसावा - श्लोक २०० ते २६४

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


कडकडूनि निघे चपळा ॥ तैसा ऊर्ध्वपंथें बाण गेला ॥ पर्वतासहित बाणीं खिळिला ॥ हनुमंताचा हस्त पैं ॥१॥

महागजासी पर्वतपात ॥ तैसा भूमीवरी हनुमंत ॥ कोसळला रामस्मरण करित ॥ आरंबळत पडियेला ॥२॥

रामनामस्मरणाचा ध्वनि ऐकून ॥ धांवोनि आला कैकयीनंदन ॥ तों महापर्वत घेऊन ॥ वानर अद्भुत पडियेला ॥३॥

भरत प्रेमें बोले वचन ॥ सखया तूं कोणाचा कोण ॥ मज स्नेह उपजे तुज देखोन ॥ रामनाम जपतोसी ॥४॥

हाहाकार करी वायुनंदन ॥ म्हणे आतां कैसा वांचेल लक्ष्मण ॥ प्राण त्यजील रघुनंदन ॥ सूर्योदय होतांचि ॥५॥

ऐसें आक्रोशें बोले हनुमंत ॥ भूमी तनु टाकी भरत ॥ म्हणे प्राणसखया सांग यथार्थ ॥ वार्ता विपरीत बोलसी ॥६॥

तयासी पुसे हनुमंत ॥ येरू म्हणे मी रामाचा दास भरत ॥ मारुति म्हणे केला अनर्थ ॥ रावणाहूनि आगळा तूं ॥७॥

मग भरतासी वर्तमान सकळ ॥ सांगे अंजनीचा बाळ ॥ दशमुखाचे शक्तीनें विकळ ॥ वीर सौमित्र पडियेला ॥८॥

त्यासी जीववावया निश्चित ॥ नेत होतों द्रोणपर्वत ॥ तुवां विघ्न करोनि पाडिलें येथ ॥ हें तों त्यासी कळेना ॥९॥

आतां नुगवतां आदित्य ॥ तेथें कोण नेईल पर्वत ॥ वाट पाहतसे रघुनाथ ॥ श्रमेल समर्थ कृपाळु ॥२१०॥

मग बोले भरत वीर ॥ मज वाटतें तूं केवळ ईश्वर ॥ चारी कोटी योजनें दूर ॥ पर्वत घेऊनि आलासी ॥११॥

आतां न उगवतां दिनकर ॥ लंकेसी नग न्यावा सत्वर ॥ नाहीं तरी अनर्थ थोर ॥ सांगतोसी कपीश्वरा ॥१२॥

तुजसमवेत पर्वतास ॥ न भरतां एक निमेष ॥ नेऊनि ठेवीन लंकेस ॥ तरीच दास श्रीरामाचा ॥१३॥

हे जरी नव्हे माझे कृत्य ॥ तरी सूर्यवंशी जन्मोनि व्यर्थ ॥ जननी श्रमविली यथार्थ ॥ हांसेल दशरथ वैकुंठी ॥१४॥

पर्वतसहित हनुमंता ॥ बाणाग्री बैस आतां ॥ कार्मुक वोढोनी तत्वतां ॥ सुवेळेसी पाठवितों ॥१५॥

ऐसें बोलतांचि भरत ॥ मनीं आश्चर्य करी हनुमंत ॥ म्हणे होय रामबंधु यथार्थ ॥ पुरुषार्थ अद्भुत न वर्णवे ॥१६॥

मग हनुमंतें उठोन ॥ वंदिलें भरताचे चरण ॥ म्हणे वंश तुझा धन्य ॥ भरलें त्रिभुवन कीर्तीनें ॥१७॥

महाराज बोलिला यथार्थ ॥ परी मी रामदास हनुमंत ॥ माझें बळ आणि पुरुषार्थ ॥ श्रीरघुनाथ जाणतसे ॥१८॥

हें ब्रह्मांड उचलून ॥ कंदुकाऐसें झेलीन ॥ तुमचा रामनामांकित बाण ॥ त्यासी मान दीधला ॥१९॥

पश्चिमेस उगवेल चंडकिरण ॥ मेरु मंदार सोडिती स्थान ॥ परी रामदास्य करितां पूर्ण ॥ सामर्थ्य माझें न भंगे ॥२२०॥

आतां आज्ञा द्यावी सत्वर ॥ उदय करूं पाहे दिनकर ॥ मग बोले भरत वीर ॥ विजयी होई सर्वथा ॥२१॥

रघुपतीसी माझें साष्टांग नमन ॥ करूनि सांगें वर्तमान ॥ सौमित्रसीतेसहित आपण ॥ अयोध्येसी शीघ्र येइंजे ॥२२॥

अवश्य म्हणे हनुमंत ॥ करतळीं घेऊन पर्वत ॥ जयजय यशस्वी सीताकांत ॥ म्हणोनियां उडाला ॥२३॥

अमृतघट घेऊनियां हातीं ॥ पूर्वीं गेला खगपती ॥ तैसाचि जातसे मारुती ॥ देव पाहती विमानीं ॥२४॥

तों इकडे जानकीनाथ ॥ चिंता करीं वानरांसहित ॥ म्हणे कां न येचि हनुमंत ॥ उशीर बहुत जाहला ॥२५॥

तों उगवे जैसा आदित्य ॥ तैसा दुरोनि देखिला पर्वत ॥ रघुपतीस वानर सांगत ॥ स्वामी मित्र उदय पावला ॥२६॥

ऐसे जंव वानर बोलत ॥ तंव कोपला सीताकांत ॥ म्हणे हा कुळघातकी यथार्थ ॥ उत्तरेसी उदय पावला ॥२७॥

साहा घटिका असे रजनी ॥ आजी पूर्वदिशा सांडोनी ॥ लवकरीच कां तरणी ॥ उत्तरेसी उगवला ॥२८॥

धनुष्य चढविलें सत्वर ॥ राहुमुख काढिला शर ॥ म्हणे हा लोकआयुष्यचोर ॥ रजनीचरासी मिळाला ॥२९॥

तंव तो सुषेण वीर बोलत ॥ सूर्य नव्हे हा आला हनुमंत ॥ ऐसें बोलतां सीताकांत ॥ परम आनंदें उचंबळला ॥२३०॥

पुरुषार्थी अंजनीचा बाळ ॥ अवलीळें उचलिजे अद्भुत फळ ॥ तैसा घेऊनियां अचळ ॥ रामदर्शना येतसे ॥३१॥

कीं अंधकार पडिला सघन ॥ रावण पळाला जीव घेऊन ॥ यालागीं अनंत दीपिका उफाळून ॥ शोधूं आला हनुमंत ॥३२॥

कीं अमृतकुंभचि आणिला ॥ कीं यशाचा ध्वज उभारिला ॥ कीं सौमित्राचा प्राण परतला ॥ रुसोनि जात होता तो ॥३३॥

असो सुग्रीवादि वानर ॥ करूनियां जयजयकार ॥ वेगें धांवती समोर ॥ पर्वत खालीं उतरावया ॥३४॥

गिरि उतरतांचि हनुमंत ॥ स्वामीस लोटांगण घालित ॥ आसनींहूनि रघुनाथ ॥ पुढें धांवे उठवावया ॥३५॥

हनुमंतासी उचलोन ॥ हृदयी धरीं रघुनंदन ॥ रामें नेत्रोदकेंकरून ॥ अभिषेकिला मारुती ॥३६॥

हनुमंताचा वदनचंद्र ॥ स्वकरें कुरवाळी रघुवीर ॥ असो वैद्य सुषेण सत्वर ॥ पर्वताजवळी पातला ॥३७॥

नमस्कार करूनि पर्वत ॥ मंत्रोनि औषधीवरी टाकी अक्षत ॥ चारी वल्ली घेऊनि त्वरित ॥ एकांतीं रस काढिला ॥३८॥

हर्षभरित सुषेण ॥ चारी रसपात्रें भरून ॥ लक्ष्मणापासीं धांवोन ॥ येता जाहला ते काळीं ॥३९॥

संजीवनीचा रस काढिला ॥ तो आधीं मुखीं ओतिला ॥ घायामाजी ते वेळां ॥ संधिनीरस घालित ॥२४०॥

विशल्या लावितां जाण ॥ कोठें न दिसे घायव्रण ॥ सुवर्णकांति संपूर्ण ॥ दिव्यदेह जाहला ॥४१॥

निजेला उठे अकस्मात ॥ तैसा उभा ठेला सुमित्रासुत ॥ बाण तैसा आकर्णपर्यंत ॥ घे घे म्हणोनि धांविन्नला ॥४२॥

पुसे कोठें आहे रावण ॥ त्यासी बाणें करीन चूर्ण ॥ तों रघुनाथें करी धरून ॥ लक्ष्मणासी आलिंगिलें ॥४३॥

जाहला एकचि जयजयकार ॥ देव वर्षती पुष्पसंभार ॥ मग सुषेणें उरले वानर ॥ तेही उठविले ते काळीं ॥४४॥

सागर उद्धरावया भागीरथी ॥ भगीरथें आणिली ये क्षितीं ॥ परी असंख्य जीव उद्धरती ॥ बिंदुमात्र झगटतां ॥४५॥

चक्रवाकालागीं रवि धांवत ॥ परी सर्वांवरी प्रकाश पडत ॥ कीं चकोरासी शशी पावत ॥ रसभरित औषधी होती ॥४६॥

चातकांलागीं मेघ वर्षती ॥ परी आर्द्र होय सर्व जगती ॥ कीं वराचिया पंक्तीं ॥ वऱ्हाडी होती तृप्त जैसे ॥४७॥

तैसें सौमित्राकारणें सत्वर ॥ औषधी आणी वायुकुमर ॥ तेणेंच असंख्य वानर ॥ सजीव केले ते काळीं ॥४८॥

मारुतीचें यशवैभव ॥ क्षणक्षणां वर्णीत राघव ॥ विमानीं इंद्रादि देव ॥ कीर्ति गाती मारुतीची ॥४९॥

असो पर्वत उचलूनि ते वेळां ॥ मारुती माघारा चालिला ॥ दशमुखासी समाचार कळला ॥ सौमित्र उठिला म्हणोनि ॥२५०॥

शत राक्षस निवडून ॥ तयांप्रति सांगे रावण ॥ म्हणे हिरोन घ्यारे गिरि द्रोण ॥ मारुतीसी आडवोनियां ॥५१॥

असुर पाठीं लागती ॥ वानरा पर्वत टाकीं म्हणती ॥ पर्वत धरूनि एके हातीं ॥ परते मारुती तयांवरी ॥५२॥

करचरणघातेंकरून ॥ शतही टाकिले मारून ॥ स्वस्थळी ठेवूनि गिरि द्रोण ॥ सुवेळेसी पातला ॥५३॥

तों उगवेल सूर्यकुळ भूषणाचें चरणकमळ ॥ हनुमंतें वंदोनि तात्काळ ॥ कर जोडून उभा ठाके ॥५४॥

मग नंदिग्रामींचें वर्तमान ॥ रघुपतीसी सांगे वायुनंदन ॥ भरतें सोडूनि दिव्य बाण ॥ द्रोणाचळ पाडिला होता ॥५५॥

मी क्षणभरी पाहिला अंत ॥ तरी परम प्रतापी वीर भरत ॥ मजसमवेत पर्वत ॥ बाणाग्रीं स्थापित होता पैं ॥५६॥

ऐसें बोलतां मारुती ॥ आश्चर्य करिती सकळ जुत्पती ॥ सद्रद होऊनि रघुपती ॥ बोलता जाहला प्रीतीनें ॥५७॥

म्हणे आतां रावण वधोनियां ॥ जाईन भरतासी भेटावया ॥ हनुमंतें चरण वंदोनियां ॥ राघवाप्रति बोलत ॥५८॥

स्वामी निःसीम भरताचें भजन ॥ सप्रेम वैराग्य अद्भुत ज्ञान ॥ चकोर इच्छी रोहिणीरमण ॥ तैसी वाट पाहतसे ॥५९॥

कीं वनास धेनु गेली दूरी ॥ तान्हें वत्स वाट पाहे घरीं ॥ कीं ऊर्ध्वमुखें निर्धांरीं ॥ चातक इच्छी घनबिंदु ॥२६०॥

सर्व मंगलभोग करूनि दूरी ॥ भरत वाट पाहे अहोरात्रीं ॥ ऐसें मारुती बोलतां अंतरीं ॥ आत्माराम संतोषला ॥६१॥

रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हा कल्पवृक्ष उदार ॥ दृष्टांत फळीं समग्र ॥ लावोनि आला पडिभरें ॥६२॥

श्रीधरवरदा आदिपुरुषा ॥ श्रीमद्भीमातटविलासा ॥ ब्रह्मानंदा पंढरीशा ॥ अभंग भजन देईं तुझें ॥६३॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२६४॥

॥ ओंव्या ॥ २६४ ॥ अध्याय ॥ ३२ ॥

॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP