अध्याय तेहतीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


रुधिरधारा मेघ वर्षती ॥ नक्षत्रें खळखळां रिचवती ॥ विद्युलता बहुत पडती ॥ कांपे जगती चळचळां ॥१॥

सप्त पाताळें आंदोळती ॥ शेष कूर्म दचकले चित्तीं ॥ राक्षस वानर कांपती ॥ युद्ध पाहतां दोघांचें ॥२॥

एक काळ एक महाकाळ ॥ एक दावाग्नि एक वडवानळ ॥ क्रोधेंकरून भूमंडळ ॥ दोघेही गिळूं भाविती ॥३॥

पदक्रमवर्णक्रमेंकरून ॥ पंडित करिती वेदाध्ययन ॥ तैसे रघुनाथाचे बाण ॥ परमवेगें सूटती ॥४॥

दोनी रथ धडाडले ॥ समरीं एके ठायीं मिळाले ॥ अश्व अश्वांसहित संघटले ॥ उभे राहिले दोहीं चरणीं ॥५॥

सारथि सारथीयाला म्हणत ॥ रणधुमाळीं मांडली अद्भुत ॥ दोहीं दळीं एकचि आकांत ॥ कोल्हाळ करिती वीर तेव्हां ॥६॥

सारथी परम चतुर ॥ माघारे सारिले रहंवर ॥ जैसे पंडित वाद करोनि अपार ॥ क्षण एक स्थिरावती ॥७॥

तैसे रथ माघारे करून ॥ सवेंच बाण सोडिती सघन ॥ पर्जन्य जैसा ओसरोन ॥ सवेंच मागुती वृष्टि करी ॥८॥

कीं सागरा भरतें ओहटत ॥ सवेंच मागुती विशेष लोटत ॥ तैसे बाणांचे पर्वत ॥ एकावरी एक टाकिती ॥९॥

सप्त दिन अहोरात्र ॥ होत युद्धाचें घनचक्र ॥ परी रामरावणीं क्षणमात्र ॥ विसांवा घेतलाच नाहीं ॥११०॥

रामें काढिले चार बाण ॥ सोडिले चापासी लावून ॥ रथींचे चारी वारू छेदून ॥ अकस्मात टाकिले ॥११॥

तंव रावणें न लागता क्षण ॥ नूतन तुरंग जुंपिले पूर्ण ॥ मग नरवीर श्रेष्ठ रघुनंदन ॥ काय करिता जाहला ॥१२॥

काढिला अर्धचंद्र बाण ॥ जैसा नवग्रहांत चंडकिरण ॥ तो शरासनावरी योजून ॥ मनोवेगें सोडिला ॥१३॥

सवेंचि रावणा न लागतां क्षण ॥ अर्धचंद्रबाण टाकावा तोडून ॥ म्हणून तीक्ष्ण शक्ति योजिली पूर्ण ॥ तो बाण हृदयीं आदळला ॥१४॥

त्या बाणें जाऊन एकसरें ॥ पाडिलीं रावणाचीं दाही शिरें ॥ परी सवेंच निघालीं परिकरें ॥ पूर्विल्या ऐसीं तेधवां ॥१५॥

सवेंचि रविचक्रवदन शर ॥ रामें सोडिला अनिवार ॥ शिरें छेदिलीं समग्र ॥ मागुती तेसींच उद्भवली ॥१६॥

देव आणि वानर ॥ अवघें जाहले चिंतातुर ॥ आतां कैसा मरेल दशकंधर ॥ वारंवार शिरें निघती ॥१७॥

राजाधिराज रघुनाथ ॥ क्षणैक जाहला चिंताक्रांत ॥ तंव तो मातली सारथि बोलत ॥ राघवाप्रति ते काळीं ॥१८॥

म्हणे अनंतब्रह्मांडनायका ॥ सकळचित्तपरीक्षका ॥ आधीं फोडूनि अमृतकूपिका ॥ मग मस्तकां पाडीं धरणीवरी ॥१९॥

ऐसे मातली बोलत ॥ तयासी गौरवी जनकजामात ॥ मग बाण काढिला त्वरित ॥ अगस्तिदत्त मुख्य जो ॥१२०॥

जैसा देवांमाजीं सहस्रनयन ॥ कीं अंडजांमाजीं विष्णुवहन ॥ काद्रवेयांत सहस्रवदन ॥ तैसा बाण समर्थ तो ॥२१॥

कीं वानरांमाजीं हनुमंत ॥ कीं शस्त्रांमाजीं वेदांत ॥ कीं नक्षत्रांसी आदित्य ॥ तैसा बाण समर्थ तो ॥२२॥

शस्त्रांमाजी सुदर्शन ॥ तीर्थांमाजीं प्रयाग पूर्ण ॥ नक्षत्रांसी झांकी आदित्य ॥ तैसा बाण समर्थ तो ॥२३॥

शेष कूर्म वराह धरणी ॥ सप्तसमुद्र शशी तरणी ॥ इतुक्यांचीं सत्वें काढूनी ॥ त्या बाणाठायीं ठेविलीं ॥२४॥

अग्नि वायु शचीरमण ॥ चंडांशु कुबेर यम वरुण ॥ त्रिदश ऋषींचीं सामर्थ्ये पूर्ण ॥ त्या बाणाग्नीं वसती हो ॥२५॥

तो तुणीरांतून काढितांचि बाण ॥ झांकले समस्तांचे नयन ॥ सहस्रसूर्याचा प्रकाश पूर्ण ॥ भूमंडळीं दाटला ॥२६॥

त्या बाणामुखीं ब्रह्मास्त्र ॥ स्थापिता जाहला राजीवनेत्र ॥ चापासि लाविला शर ॥ विषकंठवंद्ये ते समयीं ॥२७॥

सीताधवें ते वेळां ॥ वरी आकर्ण बाण ओढिला ॥ ते वेळां वाटलें लोकां सकळां ॥ काय मांडला कल्पांत ॥२८॥

ऐसा बाण तो सबळ ॥ अत्यंत तेजाचा कल्लोळ ॥ शशी सूर्य लोपले सकळ ॥ सुरवर विमानें पळविती ॥२९॥

जळीं रिता घट डळमळी ॥ तैसा पृथ्वी तेव्हां हेलावली ॥ प्रचंड वीर ते वेळीं ॥ मूर्च्छित पडों लागले ॥१३०॥

जगद्वंद्याचें कर्णी वचन ॥ संागतसे तेव्हां बाण ॥ कुपीसमवेत प्राण ॥ नेतों स्वामी दशकंठाचा ॥३१॥

असो रावणाचें वक्षःस्थळ ॥ लक्षोनियां तमालनीळ ॥ बाण सोडी तत्काळ ॥ ब्रह्मांडगोळ उचंबळला ॥३२॥

मिळोनियां असंख्य चपळा ॥ एकदांचि कडकडोनि पडिल्या ॥ तैसाच बाण ते वेळां ॥ हृदयीं संचरला रावणाचे ॥३३॥

कुपीसहित वक्षःस्थळ ॥ बाण फोडोनि गेला तत्काळ ॥ हृदयी छिद्र पडिलें विशाळ ॥ गवाक्षद्वारासारिखें ॥३४॥

सवेंच परतला तो बाण ॥ रावणाचीं तीन शिरें छेदून ॥ रघुपतीचें भातां येऊन ॥ आपले आपण रिघाला ॥३५॥

उरली शिरें छेदावयातें ॥ आणिक शर काढिला रघुनाथें ॥ प्रार्थिले तेव्हां उर्मिलाकांतें ॥ युद्ध आतां पुरे जी ॥३६॥

रावणें सोडिला प्राण ॥ त्यासी न शिवती तुझें बाण ॥ आतां जवळी जाऊन अवघेजण ॥ प्रेत पाहूं तयाचें ॥३७॥

धनुष्य तृणीरासहित ॥ सौमित्राजवळी राम देत ॥ आमुचे अवताराचें कृत्य समस्त ॥ आजपासूनि संपलें ॥३८॥

जाहला एकचि जयजयकार ॥ जयवाद्यें वाजविती सुरेश्वर ॥ दुंदुभीच्या नादें समग्र ॥ ब्रह्मांड तेव्हां दणाणिलें ॥३९॥

रघुपतीवरी ते वेळां ॥ अद्भुत पुष्पवर्षाव जाहला ॥ गणगंधर्व किन्नरमेळा ॥ सुवेळाचळीं धांवत ॥१४०॥

संतोषले सकळा ऋषीश्वर ॥ आनंदें नाचती वानर ॥ त्रिभुवन आनंदले थोर ॥ रामें रावण वधियेला ॥४१॥

रघुनाथाचे वीर सकळ ॥ रावणाभोवते मिळाले तत्काळ ॥ जैसा वृक्ष उन्मळे समूळ ॥ तैसा विशाळ पडियेला ॥४२॥

मुखावरी गृध्र बैसोन ॥ रावणाचे फोडिती नयन ॥ रक्त जातसे वाहून ॥ सैरावैरां चहूंकडे ॥४३॥

मुखीं शिरी पडली धुळी ॥ मुकुट लोळती भूमंडळी ॥ असो समस्त पाहती ते वेळीं ॥ बिभीषण दुःखें उचंबळला ॥४४॥

शरीर टाकिलें धरणीवरी ॥ हृदय पिटी दोहीं करी ॥ म्हणे दिशा शून्य याउपरी ॥ माझ्या पडल्या निर्धारें ॥४५॥

अगाद्य जयाचे प्रतापबळ ॥ क्रोधे जैसा वडवानळ ॥ चातुर्याचा सागर केवळ ॥ खंडें केली वेदांचीं ॥४६॥

परम जयाचे तप दारुण ॥ संतति संपत्तियुक्त पूर्ण ॥ जेणें देवांचे गर्व हरून ॥ बंदी सर्व घातले ॥४७॥

जयाकारणें आदिपुरुषें ॥ अवतार धरिला राघवेशें ॥ अद्भुत कर्तव्य केलें लंकेशें निर्गुण आणिलें सगुणत्वा ॥४८॥

जो परम पुरुष निर्विकार ॥ तो प्रत्यक्ष दाविला साकार ॥ जानकी आणून उपकार ॥ केला अम्हांवरी रावणें ॥४९॥

जो वेदवंद्य राजीवनेत्र ॥ तो आमुचा जाहला प्राणमित्र ॥ हा रावणें केला उपकार ॥ सुग्रीवासहित आम्हांवरी ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP