अभंग -
रत्नजडित सिंहासन । वरी शोभे रघुनंदन ॥१॥
वामांकीं ते सीताबाई । जगज्जननी माझी आई ॥२॥
पश्चाद्गागीं लक्षुमण । पुढें अंजनीनंदन ॥३॥
भरत शत्रुघन भाई । चामर ढाळिती दोही बाहीं ॥४॥
नळनीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त ॥५॥
देहबुद्धि नेणों कांहीं । दास अंकित रामापायीं ॥६॥
अभंग - रामा सदगुरुची कृपा । जेणें दाखवी स्वरुपा ॥१॥
तो हा गुरु परब्रह्म । जेणें केलें स्वयंब्रह्म ॥२॥
धरा सदगुरुचरण । जेणें चुकती जन्म मरण ॥३॥
रामा सदगुरु तोचि देव । दास म्हणे धरा भाव ॥४॥
भजन - सीताराम सीताराम .
नंतर सवडीनुरुप जीं जीं अभंग पदें वगैरे म्हणावयाचीं असतील तीं म्हणावीं .
भजन - रामकृष्ण हरी । जयजय रामकृष्ण हरी ॥ हें भजन सुरुं होतांच बुक्का लावाव व नंतर पुढील क्रमानुसार वाराचें पद्य त्या त्या वारीं म्हणावें . रविवार - सूर्य , सूर्यवंश , किंवा खंडोबा ; सोमवार - शंकर ; मंगळवार - देवी ; बुधवार - विठ्ठल ; गुरुवार - गुरु ; शुक्रवार - कृष्ण ; शनिवार - मारुति . नंतर वाराचें भजन म्हणावें .
वारांचीं भजनें - रवि - नारायण विधि वसिष्ठ राम । रामदास कल्याणधाम ॥ सोम - शिव हर रे शिव हर रे । सांब सदाशिव शिवहर रे ॥ मंगळ - रामाबाई माझे आई । करुणा तुला येऊं दे ॥ बुध - विठ्ठल जयजय । विठोबा जयजय ॥ गुरु - जयजय गुरुराज महाराज । जयजय रामदास महाराज ॥ शुक्र - राधाकृष्ण । गोविंदराम भज ॥ शनि - माझ्या मुख्यप्राणा मारुतिराया रे बलभीमा ॥
उपसंहाराचे अभंग - धन्य राजाराम धन्य जानकी सती । धन्य लक्षुमण धन्य दास मारुती ॥१॥
धन्य ती अयोध्या धन्य तेथींचे जन । धन्य सूर्यवंश जेथें रामनिधान ॥२॥
धन्य तो दशरथ धन्य कौसल्या माता । धन्य तो वसिष्ठ ज्याची राघवीं सत्ता ॥३॥
धन्य ते वानर ज्यांसी राम कृपाळू । धन्य रामदास ज्याचे नामीं निर्मळू ॥४॥
नंतर श्रीसमर्थस्तवनपर एखादें पद्य म्हणावें .
भजन - रामा रामा हो रामा ।
अभंग - कष्टी जाला जीव केली आठवण । पावलें किराण मारुतीचें ॥१॥
संसारसागरीं आकांत वाटला । भुभुःकार केला मारुतीनें ॥२॥
मज नाहीं कोणी मारुतीवांचूनी । चिंतितां निर्वाणीं उडी घाली ॥३॥
माझें जिणें माझ्या मारुतीं लागलें । तेणें माझें केलें समाधान ॥४॥
उल्हासलें मन पाहतां स्वरुप । दास म्हणे रुप राघोबाचें ॥५॥
भजन - जय रामदास माउली ।
अभंग - आम्ही अपराधी अपराधी । आम्हां नाहीं दृढबुद्धि ॥१॥
माझे अन्याय अगणित । कोण करील गणित ॥२॥
मज सर्वस्वीं पाळिलें । प्रतिदिनीं सांभाळिलें ॥३॥
माझी वाईट करणी । रामदास लोटांगणीं ॥४॥
अभंग - नेणों भक्ति नेणों भाव । आम्ही नेणों दुजा देव ॥१॥
राघोबाचे शरणांगत । जालों रामनामांकित ॥२॥
मुखीं नाम हातीं टाळी । काळ घालूं पायांतळीं ॥३॥
रामदासीं रामनाम । बाधूं नेणे काळ काम ॥४॥
अभंग - आतां पावन करावें । शरणांगतां उद्धरावें ॥१॥
आम्ही कांहीं नेणों हित । म्हणुनी जाहालों पतित ॥२॥
पुण्य नाहीं माझे गांठीं । जाली दोषांची राहाटी ॥३॥
दास म्हणे माझें जिणें । रामा सर्वस्वेंसी उणें ॥४॥
भजन - हरे राम रामा रामा । राम राया राघोबारे ॥ पतित पावना रामा । जयजय पावना रामा ॥ रामदास गुरु माझे आई । मला ठाव द्यावा पायीं ॥
श्रीसमर्थांचा गाथा .
श्लोक - सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणीं देह माझा पडावा ॥ उपेक्षूं नको गूणवंता अनंता । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥१॥
भजन - नारायणा ( कल्याणा ) योगीराजा । तारीं रे महाराजा ॥
श्लोक - मुखीं राम त्या काम बांधूं शकेना । गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना ॥ हरीभक्त तो शक्त कामासि मारी । जगीं धन्य तो मारुती ब्रम्हचारी ॥१॥
भजन - सीताराम सीताराम ॥ सीताकांतस्मरण जयजयराम । सदगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजकी जय । महारुद्र हनुमानकी जय । श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराजकी जय ( आपापल्या गुरुपरंपरेचें जयजयकारपूर्वक स्मरण करावें ) जयजय रघुवीर समर्थ .
श्रीरामसमर्थ .