मंत्रशास्त्राच्या दृष्टीनें मागील भागांत गुरु कसे असावे याचा विचार झाला . आतां शिष्याचे ठायीं कोणते आचार व गुण असावे हें थोडक्यांत पुढें दिलें आहे .
पुरुषांनां ३० वर्षीचे पूर्वी मंत्रसिद्धि लवकर होते , स्त्रियांनां विवाहापूर्वी मंत्रसिद्धि प्राप्त होते . पुरुषांनां ३० ते ५० वर्षीपर्यंत उशिरां होते व ५० ते ६० पर्यंत कष्टसाध्य असते .
ब्राह्यणांनां मंत्रसिद्धि होण्यास ते सदाचारसंपन्न असावे . संध्या प्रतिदिनीं द्विकाल करून १०८ गायत्री मंत्राचा जप करावा लागतो . शिखा यज्ञोपवीत धारण करणारे व मातृपितृभक्त व एकपत्नीव्रती असावे . ब्रह्यचारी असल्यास उत्तमच .
क्षत्रिय व वैश्य संस्कारसंपन्न असावे . मद्य . मांसविर्जित , स्नान , विष्णुसहस्त्रनाम , रामरक्षा पाठ करीत असलेले , गीता , ज्ञानेश्र्वरी , दासबोध , एकनाथी भागवत यांपैकीं एकाचा तरी पाठ करीत असलेले असावे .
स्तुति , निंदा , वर्ज्य असावी , कायिक , वाचिक व मानसिक शुद्धिसंपन्नता असावी . सत्यवाणी , परदारविवर्जित , परदुःखेन दुःखित , परोपकारनिरत , न्यायानें धनोपार्जन करणारे , कुलदेवता , इष्ट देवता उपासक असावे , गुरूचे ठायीं आदरबुद्धि ठेवणारे , गुरुचनावर पूर्व श्रद्धा ठेवणारे व गुरुवचनांवर पूर्ण विश्वास ठेवणारे असावे .
कोणी न विचारतां बोलणारा व अवास्तव बोलणारा , आपल्याशींच बोलणारा , असा नसावा ; मित भाषण करणारा , बोलतांना लहानमोठयांशीं नम्र भाषण बोलणारा , सदा आनंदी , गुरुसेवेला तत्पर असणारा , इष्टदेवतेतर देवतांची निंदा न करणारा , इंद्रियनिग्रह असणारा , सत्य , न्याय , दया , इत्यादि रक्षण करणारा असा असावा . मंत्रसिद्ध होईपर्यंत गुरुसानिध्य असावें . तो शारीरिक व्यंगरहित , निरोगी असावा .
व्यवहारांत शिष्यानें गुरूला योग्य सल्ला द्यावा . गुरु घोडी शिष्य जोडी असा व्यवहार शिष्यानें गुरूशीं करूं नये .