संतमहिमा - अभंग ३१ ते ४४
संत नामदेवांनी संतांचा महिमा इतका रसाळ वर्णन केला आहे, तो एकमात्र त्यांनीच करू जाणे!
३१
संतांपायीं माथां धरितां सद्भावें । तेणें भेटे देव आपेंआप ॥१॥
म्हणवूनि संतां अखंड भजावें । तेणें भेटे देव आपेंआप ॥२॥
साधुपाशीं देव कामधंदा करी । पीतांबर धरी वरी छाया ॥३॥
नामा म्हणे देव इच्छी संतसंग । आम्हां जिवलग जन्मोजन्मीं ॥४॥
३२
बहुरुप्या ब्राह्मणा पडियेलें मित्र । दोहींचें तें गोत्र एक जालें ॥१॥
वेश्या पतिव्रते पडियेला शेजार । दोहींचा आचार एक जाला ॥२॥
संग तोचि बाधी संग तोचि बाधी । कुसंग तो बाधी नारायणा ॥३॥
नामा विष्णुदास सत्संगति बोधला । आत्मा हा लाधला पांडुरंग ॥४॥
३३
जायाचें सोंवळें जायाची ही चोळी । जायाची गरसोळी तीहि जाय ॥१॥
जिणें हें जायाचें जिणें तें जायाचें । तें पैल कोणाचें देणें आहे ॥२॥
जायाचा आचार जायाचा विचार । जायाचा भ्रतार क्षणभरी ॥३॥
नामा म्हणे अवघें जिणें तें जायाचें । संतसंगतीचें सुख घ्यावें ॥४॥
३४
संतसंगतीचेम काय सांगूं सुख । आपण पारिखें नाहीं तेथें ॥१॥
साधु थोर जाणा साधु थोर जाणा । साधु थोर जाणा कलियुगीं ॥२॥
इहलोकीं तोचि सर्वांभूतीम सम । शरीराचा भ्रम नेणे कदा ॥३॥
नामा म्हणे गाय दूध एक सरे । साधु निरंतर वर्ते तैसा ॥४॥
३५
भोळ्या भाविकांचें वचन नुल्लंघी । फिरतसे संगें तयामागें ॥१॥
मी एक अभक्त मी एक अभक्त । मी एक अभक्त पापराशी ॥२॥
नाममाळा दृढ न करी जतन । परि जाणे वर्ममूख संतसंगें ॥३॥
नामा म्हणे नाहीं तुम्हांसी उपमा । आमुचे स्वधर्म शुद्ध नाहीं ॥४॥
३६
परिसाचेनि संगें लोह होय सुवर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥१॥
कीटकी ध्याताम भृंगी जाला तोचि वर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥२॥
वनस्पति परिमळु चंदन जाला जाण । तैसा भेटे नारायण संतंसंगें ॥३॥
अग्निस मिळे तें न ये परतोन । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥४॥
सरिता ओघ जाय सिंधूसी मिळून । तैसा भेटे नारायण संतसंगें ॥५॥
नामा म्हणे केशवा मज देई संतसंग । आणिक कांहीं तुज न मागे बापा ॥६॥
३७
येतां जातां थोर कष्टलों गर्भवासीं । पडिलों गा उपवासी प्रेमेंविण ॥१॥
बहुतांचा सेवकु जाला काकुळती । न पावे विश्रांति कधीं काळीं ॥२॥
ऐसें माझें मन सिणलें नानापरी । घालीन आभारी संतांचियां ॥३॥
वियोगें संतांच्या व्याकुळ चिंतातुर । हिंडे दारोदार दीन रुपें ॥४॥
परि कोणी संतांच्या न घालिती चरणीं । तळमळी अनुदिनीं श्रांत सदा ॥५॥
माझें माझें म्हणवूनि जया घाली मिठी । दिसें तेचि दिठी नाहीं होय ॥६॥
तया शोकानळें संतप्त आंदोळे । गेलें तें न मिळे कदा काळीं ॥७॥
न देखत ठायीं देखावया धांवें । भ्रांति भुले भावें नाना मार्गीं ॥८॥
तुझा स्वरुपानंदु नाहीं ओळखिला । जाहली विठठला हानि थोर ॥९॥
लोहाचा कवळु लागला परिसातें । पढिये सर्वांते होय जेंवी ॥१०॥
नामा म्हणे तैसी भेटी संतचरणीं । करुनि त्रिभुवनीं होईन सरता ॥११॥
३८
सुख सांगावें संतांपुढें । जेणें सुख अधिक वाढे ॥१॥
आणिक न करावें शहाणें । प्रेम दिठावले झणें ॥२॥
खंडितां कल्पनेचा लाग । त्यासि असावा अनुराग ॥३॥
तोडिताम वासनेचा तंतु । त्यासि असावा एकांतु ॥४॥
गिळी अहंतेचें बीज । त्याचें व्हावें चरणरज ॥५॥
नामा म्हणे त्याचे संगतीं । चित्ता आपेंआप येईल निवृत्ति ॥६॥
३९
वासनेविरहित होवोनि एकवट । असावेम निकट संतसंगें ॥१॥
हेंचि माझें तीर्थ हेंचि माझें व्रत । करावें दास्यत्व हरिभक्तांचें ॥२॥
नामा म्हणे केशवा तरीच शरणांगत । नाहीं तरी पतित म्हणा मातें ॥३॥
४०
संतांच्या चरणा द्यावें आलिंगन । जीवें निंबलोण उतरावें ॥१॥
तेथेंचि निश्चळ राहे माझ्या मना । मग तुज यातना नव्हती कांहीं ॥२॥
संतांचे द्वारींचा होई द्वारपाळ । तुटे मायाजाळ मोहपाश ॥३॥
संतांचे प्रसाद सेविसी उरले । आयुष्य सरलें दुणावेल ॥४॥
नामा म्हणे संत आहेत कृपासिंधु । देती भक्तिबोधु प्रेमसुख ॥५॥
४१
आपुलें शरीर घालूनियां पुढें । पडे वाडेंकाडें सर्वभावें ॥१॥
नाम आवडती नानाभूते सुष्टि । देखेन मी दृष्टी ब्रह्मरुप ॥२॥
विष्णुरुप सर्व भवीं अखंडित । मानी सर्वभूत आत्मा माझा ॥३॥
नामा म्हणे सत्य सत्य जे बोलती । ज्यांचे पायींची माती इच्छितसें ॥४॥
४२
संतांचें लक्षण ओळखावया खूण । जो दिसे उदासीन देहभावा ॥१॥
सतत अंतरीम प्रेमाचा जिव्हाळा । वाचे वसे चाळा रामकृष्ण ॥२॥
त्या संतांचे चरण देखिले मी दृष्टीं । जळती कल्प कोटी पापराशी ॥३॥
जयाच्या ह्रदयीं प्रेमाचा जिव्हाला । जीवें भावें गोपाळ न विसंबती ॥४॥
त्याचे अंगणींचा होईन सांडोवा । मग तूं केशवा नुपेक्षिसी ॥५॥
तुझ्या ध्यानीं ज्यांचे सदा भरलें मन । विश्व तूंचि म्हणोन भजती भावें ॥६॥
त्याच्या उष्टावळीचा होईन मागता । तरीच पंढरीनाथा भेटी देसी ॥७॥
ऐसे नित्यानंदे बोधें जे निवाले । ते जीवावेगळे न करी नाम्या ॥८॥
४३
माझे मायबाप साधुसंतजन । माझे जीवप्राण अंतरीचे ॥१॥
भवभयाहूनि तारियेलें मज । बाळेभोळे गुज प्रेम दावी ॥२॥
रंकाहूनि रंक जालों मी सेवक । ब्रह्मादिक देख इच्छिती सुख ॥३॥
नामा म्हणे संतभाग्य अलौकिक । शुद्ध निष्कलंक पुण्यरुप ॥४॥
४४
आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरिच्या दासां ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळीं । हे संत मंडळी सुखी असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विष्णुदासां भाविकांसी ॥३॥
नामा म्हणे तया असावेम कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP