तीर्थावळी - अभंग ५१ ते ६२
तीर्थांचे वर्णन.
५१
भक्तजनवत्सल सुखसिंधुराशी । निर्भर मानसीं परमानंदें ॥१॥
सरिसे सकळ भक्त घेउनि पंढरिनाथ । चालिले अक्षत द्यावयासी ॥२॥
बाप तो कवतुकीं अनाथाचा नाथ । भोगिया श्रीमंत खेळू खेळे ॥३॥
तंव ते उदित भाग्य भाग्यवंत । दर्शनाचें आर्त होतें त्यासी ॥४॥
सकळही मिळोनि गेलें कुंडलतीर्थीं । तंव आले कमळापति दर्शनासी ॥५॥
तेथें देखोनियां सकळांचा मेळा । केला द्विजां सकळां प्रणिपातु ॥६॥
सांडोनि देहबुद्धि निःसंदेह व्हावें । कृपा करोनि यावें भोजनासी ॥७॥
पाळावें आपुल्या दिधल्या सत्यवचना । करावी वासना तृप्त माझीं ॥८॥
स्नानसंध्या विधि सारोनि समस्त । यावें शीघ्रवत नैवेद्यासी ॥९॥
ते निवाले दर्शनं तृप्त जाले मनें । परिसोनि वचनें अमृतोपम ॥१०॥
आम्ही तरी आश्रित हेंचि जाणा सत्य । आशिर्वाद नित्य देतों तुम्हां ॥११॥
सर्वभावें आमुचा करावा सांभाळ । स्वामी दीनदयाळ विश्व बोले ॥१२॥
तुम्ही महाराज राजराजेश्वर । पाहावें निरंतर कृपादृष्टी ॥१३॥
तुमचा हा आदर निरुपम सर्वथा । दिधलीसे मान्यता वेदवचना ॥१४॥
तें भाष्य आपुलें जतन सर्वभावें । साक्ष करुनी द्यावें प्रेम नाम्या ॥१५॥
५२
बाप आर्तबंधु सकळ जीवनकंदू । भक्तांचा सुखसिंधु पंढरिरावो ॥१॥
हर्षे निर्भर चित्तीं आले निजभुवना । सांगे विवंचना रुक्माईसी ॥२॥
धन्य दिवस जाला आजि सोनियाचा । सोहळा भक्तांचा आरंभिला ॥३॥
प्रार्थिलें ब्राह्मणां भोजनालागुनी । येताती सारोनि स्नानविधी ॥४॥
आजीचें कवतुक पाहावें अभिन्न । हांसोनियां देव बोलते जाले ॥५॥
तंव म्हणे रुक्माई अहो जी पूर्णकामा । स्वामी मेघश्यामा कृपानिधी ॥६॥
त्यांचें पूर्व पुण्य आजि आलें फळा । देखिले गोपाळा चरण तुमचे ॥७॥
तंव ते नित्य नेम सारोनि आपुले । वेगीं द्विज आले राउळांगणा ॥८॥
नमस्कारुनि देवें बैसविलें आसनीं । पूजा चक्रपाणि आरंभिली ॥९॥
चरण प्रक्षाणुनी गंध तुळसीमाळा । घातलिया गळां ब्राह्मणाच्या ॥१०॥
उजळोनि दीपक ओंवाळिले प्रीति । मग ते पात्रपंक्ति मांडियेल्या ॥११॥
रत्नजडित सकळां सुवर्णाचीं ताटें । षड्रस बरवंटे तयामाजीं ॥१२॥
विस्तारोनि वेगीं ओगरिलीं चांगें । संकल्प श्रीरंगें सोडियेला ॥१३॥
देउनि आपोशन अमरचूडामणी । प्रार्थितो जोडोनि करकमल ॥१४॥
कवळोकवळी घ्यावें नाम अच्युताचें । भोजन भक्ताचें सुखरुप ॥१५॥
ऐसे जेविले आनंदे धाले परमानंदें । मुखशुद्धि गोविंदें समर्पिली ॥१६॥
रत्नाचे दीपक उजाळोनि आरती । साष्टांग श्रीपति नमस्कारिलें ॥१७॥
जोडोनि दोन्ही कर विनवितो श्रीरंग । आजीचा प्रसंग पुण्यकाळ ॥१८॥
आम्हां तुम्हां भेटी जाल्या सुखगोष्टी । भरली सकळ सृष्टी परमानंदें ॥१९॥
अवघें संतजन आमुचे सांगाती । जेवूं एका पांती सरिसे आम्ही ॥२०॥
म्हणोनि सकळिकां पाचारिलें देवें । कवतुक अवघे पाहाती द्विज ॥२१॥
ब्रह्मादिक देव तिष्ठत पाहाती व्योमीं । वंचलों रे आम्ही भक्ति सुखा ॥२२॥
सर्वप्रेम देउनि निवविला नामा । ऐसें भाग्य आम्हां कैसें आतां ॥२३॥
५३
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान सांवता । जनमित्र पढियंता जिवलगू ॥१॥
आसंद सुदामा विसोबा खेचर । नरहरी सोनार आदिकरुनि ॥२॥
बाप आर्तबंधु कृपाळू दीनाचा । अभिमाअन भक्तांचा न संडी कदा ॥३॥
चोखमेळा बंका भक्तवत्सल लाडका । तो बोलविला देखा आरोगणें ।४॥
वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभारु । आवडता डिंगरु केशवाचा ॥५॥
ऐसें थोरसानेम सकळ भक्त राणे । देवें आरोगणें बोलावले ॥६॥
सधूप आणि दीप तुळशीच्या माळा । पूजिलें सकळां देवरायें ॥७॥
तंव राही रखुमाबाई सत्यभामा सती । विस्तारोनि आणिती विविध बोणी ॥८॥
भोंवती भक्तमंडळी मध्यें वनमाळी । शोभे नथमंडळीं चंद्र जैसा ॥९॥
सकळांमुखीं कवळ देतसे निजकरें । उच्छिष्ट पितांबरें सांवरितो ॥१०॥
त्या सुखाचा पारु देखोनी वैकुंठीं । होती लूलूमिठी सुखराशी ॥११॥
ऐसें तें भोजन जालें खेळेमेळें । ब्रह्मरसें धाले सकळ भक्त ॥१२॥
तंव विमानें आकाशीं दाटले सकळ । करिती कल्लोळ पुष्पवृष्टी ॥१३॥
तें देखोनी द्विजवर पडिले चिंतवनी । म्हणती पैं जाली हानी जीवित्वाची ॥१४॥
नव्हे हा ज्ञानमार्ग नव्हे हें वैराग्य । नवल भक्तिभाग्य आवडीचें ॥१५॥
एक म्हणती हा पांडुरंग होय साचें । येव्हढें भाग्य कैचे मानवियां ॥१६॥
हा नव्हे गुणिवंतु क्रियाकर्मातीतु । यासी प्रायःश्चितु काय घडे ॥१७॥
नाहीं यासी आप नाहीं यासी पर । नाहीं या आचार जातिकूळ ॥१८॥
षड्रमार्ग संबंध नाहीम याच्या ठायीं । विकल्पाचें नाहीं वळण कदाम ॥१९॥
कृपेचा कोंवळ सोयरा दीनांचा । उदार मनाचा लोभापर ॥२०॥
अनुसरे त्याचेम मायाजाळ तोडी । बैसणें तो मोडी संसाराचे ॥२१॥
या नामयाची माता आम्हां तुम्हां देखतां । शिणली वेवादतां नानापरी ॥२२॥
नेदी तिच्या हातीं घातिला पाठीसी । धरिला जीवेंसी माझा म्हणुनी ॥२३॥
देहाचा विसरु याच्या रुपाच्या दर्शनें । चरणाचेनि स्मरणें चित्त निवे ॥२४॥
सुख गोष्टी यासी केलिया एकांत । तेणें पुरतसे आर्त जन्ममरणा ॥२५॥
ऐसें त्याचें बोलणें ऐकोणि पंढरिनाथें । दिलें सकळिकांतें अभयदान ॥२६॥
मग निजरुप दाविता जाला तयावेळीं । नामा ह्रदयकमळीं आलिंगिला ॥२७॥
५४
तंव दिव्य रत्नमणि मस्तकीं किरीटी । मळवट लल्लाटीं कस्तुरीचा ॥१॥
माथां मोरपिसावेठीं कुंडलें गोमटीं । पाहात कृपादृष्टी निजभक्ताम ॥२॥
तो पुंडलिकाचा ठेवा पूर्वपुण्यराशी । वैकुंठनिवासी देवरावो ॥३॥
वदन निर्मळ भाव सुस्मित वेल्हाळ । दर्शनी रत्नकीळ तेज फांके ॥४॥
त्या सुखाचे अधिकारी भक्त सप्रेमळ । ह्रदयीं सर्वकाळ हरिचे ध्यान ॥५॥
कौस्तुभ वजयंती पदक ह्रदयावरी । शोभत साजिरी तुळसीमाळा ॥६॥
श्रीवत्सलांछन प्रीतीचें भूषण । चर्चिला चंदन श्यामतनु ॥७॥
शंखचक्र करीं ते कर कटावरी । पितांबरधारी जलदनीयल ॥८॥
तेणें दिव्य तेजें ब्रह्मांड धवळलें । प्रकाशें लोपलें दिग्मंडळ ॥१०॥
सकळ संत द्विज देखती चतुर्भुज । शंख चक्रांबुज गदापाणि ॥११॥
कीटकपक्षी पशुपाषाण तरुवर । देखती द्विजवर विठठलरुप ॥१२॥
परमानंद बोधें निवाले आनंदें । भेदाभेद द्वंद्वे विसरोनि गेलीं ॥१३॥
एकाविण दुजें तेथें न दिसे पैं आन । नाहीं आठवण देहभावा ॥१४॥
सबाह्य कोंदली अवघी विठठलमूर्ति । सुखाची विश्रांति योगियांच्या ॥१५॥
प्रेमें वोसंडत सकळ भक्तजन । देती आलिंगन एकमेकाम ॥१६॥
हर्षे निर्भर चित्तीं आनंदें गर्जती । पावले विश्रांति सकळ द्विज ॥१७॥
ऐसा ब्रह्मानंद सोहळा भोगवी सकळां । आपुल्या प्रेमळा निजदासा ॥१८॥
करोनि सावध वैकुंठींचा राणा । नामा घाली चरणावरी त्यांच्या ॥१९॥
५५
बाप भक्तप्रिय पाहे कृपादृष्टी । करितसे सुखगोष्टी ब्राह्मणांसी ॥१॥
सर्वभावें शरण सर्वकाळी मज । ते हे भक्तराज सखे माझे ॥२॥
याचेनि उपकारें दाटलों संपूर्ण । भक्तपराधीन जालों तेणें ॥३॥
निवृत्ति ज्ञानेश्वर आणि हा सोपान । हे मुगुटमणी जाण सत्वमूर्ति ॥४॥
सर्वभूतीं भजती सर्वभावें सर्वथा । केला पैं अपैता त्याचे बुद्धी ॥५॥
हा जनमित्र जिवलग आमचा सोयरा । सांडिला संसारा ओवाळुनी ॥६॥
माझे नामीं दृढ धरोनि विश्वास । अखंड उदास देहभावीं ॥७॥
जिवाहोनी पढियंता हा भक्त सांवता । निर्धार सांगतां नवलाव याचा ॥८॥
ह्रदय विदारोनि आपुलेनि हातें । ठाव दिला मातें लपावया ॥९॥
बारा दिवसांचा हा भक्तवत्सला । माये सांडियेला वेणुनादीं ॥१०॥
म्हणती वो माझा त्या दिवसापासोनि । नेणें मजवांचून आणिक कांहीं ॥११॥
हा विसोबा खेचर आणि नरहरि सोनार । हा गोरा कुंभार अंतर्निष्ठ ॥१२॥
समाधिस्थ सदा निवालें पैं चित्त । सबाह्य देखत मजलागीं ॥१३॥
सुखाचा सुजणा आसंद सुदामा । हा माझा आत्मा आवडता ॥१४॥
घरदार संसार त्यजिला मजकारणें । तोडिलें पैं येणें मायाजाल ॥१५॥
चोखामेळा बंका भक्त परमसखा । विसोबा हा देखा प्राण माझा ॥१६॥
त्यजुनि सर्व संग एकविध भावें । अनुसरले जिवें माझे ठायीं ॥१७॥
ऐसें या भक्तांचे सांगतों उपकार । आहेत बहुत फार कल्पकोडी ॥१८॥
त्या सकळांच्या चरणींचा रजरेणु माझा नामा । भक्तिभाव प्रेमा दिधला त्यासी ॥१९॥
५६
तंव ते भाग्याचे सागर विनविती द्विजवर । म्हणती तूं माहेर जोडलासी ॥१॥
चरणींचा वियोग न व्हावा सर्वथा । तोडावी ममता प्रपंचाची ॥२॥
नलगे मोक्षमुक्ति नलगे धनसंपत्ती । देई सत्संगती जन्मोजन्मीं ॥३॥
वेदशास्त्रपठणें वहिर्मुखवनें । केली अभिमानें छळणबुद्धी ॥४॥
धिक् तें जाणपण धिक् तो सन्मान । नाहीं प्रेमखूण कळली तुझी ॥५॥
कुळाचेनि अभिमानें अंतरलों गा तेणें । पूर्ण देहाभिमानें भुलोनियां ॥६॥
हें सकळ तुझी माया भुललों पंढरिराया । म्हणोनि जन्म वायां गेलें होतें ॥७॥
अपराधांच्या कोडी घडल्या पैं आमुतें । निषेधिलें तूतें मायबापा ॥८॥
परी त्वा दीनानाथें ब्रीद सत्य केलें । आम्हां तारियेलें पतितांसी ॥९॥
नकळे काय होतें संचित आमुचें । अनंत जन्माचें पूर्वपुण्य ॥१०॥
तें आजि फळलें तुझिया कृपादृष्टी । भाग्यें जाली भेटी संतजनां ॥११॥
दुर्जय तोडिले माया मोहपाश । केला पैं सौरस आपुल्या रुपीं ॥१२॥
तापत्रय वणवा विझविला अवचिता । दिलें प्रेमामृता जीवन आम्हां ॥१३॥
आतां सर्वकाळ अविट हे दृष्टी । यासाठीं संतभेटी निरंतर ॥१४॥
प्रेमाचा जिव्हाळा नामाची आवडी । मग होत कल्पकोडी गर्भवास ॥१५॥
करता करविता तूंचि पैं एक । ब्रह्मांडनायक सर्वगत ॥१६॥
आमुचे अवगुण न धरावे मानसीं । निरवावें संतांसी माझे म्हणुनी ॥१७॥
तुझिया दासाचें द्यावें पैं दास्यत्व । तयाची वंदावी चरनधुळी ॥१८॥
हेंचि व्रततीर्थ क्रियाकर्म आम्हां । द्यावा नित्य प्रेमा नामयासी ॥१९॥
५७
कृपेच्या सागरेम भक्तकरुणाघनें । देऊन आलिंगनें निवविलें तयातें ॥१॥
सर्गज्ञाचा रावो आत्मा ज्ञानदेवो । सांगेल अनुभवो तुम्हांप्रती ॥२॥
ते खूण अंतरीम धरा सर्वभावें । दृढ धरोनि जीवें जतन करा ॥३॥
न लगे तीर्थाटन काया क्लेष जाण । न लगे अनुष्ठान करणें बहू ॥४॥
न लगती सायास करणें उपवास । धरावा विश्वास संतसंगेम ॥५॥
न लगे वज्रासनीं बैसावें नेहटीं । न लगे गिरिकपाटीं करणें वास ॥६॥
न लगे उग्रतप नानामंत्र जप । भेणें जाय पाप संतसंगें ॥७॥
न लगे भस्म उधळनें वाहनें जटाभार । न घालावा पसार लोकाचारीम ॥८॥
सर्वभूतीं करुणा जिव्हे नामस्मृती । मन येईल निवृत्ति आपेंआप ॥९॥
क्रियाकर्मधर्म प्रेमेंविण खटपटा । करितां आला वीट दीर्घ दोषाचा ॥१०॥
साधनावांचुनी मार्ग सोपा जाण । करावें कीर्तन रामकृष्ण ॥११॥
सर्वकाळ कथा संतांची संगती । वाचे नाम कीर्ति सर्वकाळ ॥१२॥
तो हा राजमार्ग सर्वांहोनी चांग । सदा संतसंग वाचें नाम ॥१३॥
संकल्प विकल्प न धरावे मानसीं । मनोभावें संतांसीं शरण जावें ॥१४॥
ज्ञानदेव म्हणे पुढती ऐका एक । सांगेन प्रत्यक्ष अनुभव सिद्ध ॥१५॥
५८
परमामृत सागरु मथुनियां पुरता । काढिला तत्त्वतां ज्ञानबोधु ॥१॥
या सुखाचा पारु जाणते विरळे । घेताती गळाळे संतजन ॥२॥
प्रेमाचिये ताटीं वोगरु सुखामृत । हें सुख त्वरित सेवा आधीं ॥३॥
हें सुख सेवितां परमानंद धणी । कृपा संतजनीं केली पूर्ण ॥४॥
ज्ञानाचें अंजन लेईले संतजन । जनीं जनार्दन देखती सदा ॥५॥
नाहीं भिन्न भेद सर्व ब्रह्म एक । ब्रह्मांडनायक अनंत कोटी ॥६॥
दीपांचा दीपक ह्रदय आत्मज्योती । विश्वीं विठ्ठलमूर्ती देखती सदा ॥७॥
हें सुख दिधलें भक्तांसी विश्रांति । नामाची हे ख्याती परमानंद ॥८॥
पढतां नाम मंत्र ब्रह्मचि अवघें । पाहतां अनुभवें वेदमतें ॥९॥
तें हें विठठलनाम वेदाचें गव्हार । जाणती साचार संतजन ॥१०॥
युगें अठ्ठाविस विठठनामें जपतु । हा पुंडलीक भक्तु महामुनी ॥११॥
उघडली मांडूस भक्तिभाव तारुं । विठठल उद्धारु कलियुगीं ॥१२॥
न लगती सायास करणें उपवास । विठठलनामें पाश तुटती जाणा ॥१३॥
आदि ब्रह्म जुनाट जपती सिद्ध मुनी । तें दिलें मंथोनि पुंडलिकें ॥१४॥
केशवनाम मंत्र नामया सांगितलें । विस्तारोनि केलें मंथन ऐसें ॥१५॥
५९
वेदाचें हें सार वैराग्याचें जीवन । चिदाकाशींची खूण परम गुज ॥१॥
जें शुद्धज्ञान गुह्य मोक्षमुक्ति बीज । सकळ मंत्रराज मंगलानिधी ॥२॥
तें या नामयाचें होतें ह्रदयकमळीं । कथां भूमंडळीं प्रकट केली ॥३॥
तें हें विठठनाम साराचेम पैं सार । कलियुगी उद्धार सकळ जनां ॥४॥
जें श्रवणाचें श्रवण मननाचें मनन । जें निजध्यासन निजध्यासाचें ॥५॥
जें विचाराचें सार वृत्तीचा निर्धार । स्वरुप साक्षात्कार उघडा केला ॥६॥
जें भक्तीचें सौभाग्य ज्ञानाचेम आरोग्य । शास्त्राचें तें चांग मथित नाम ॥७॥
नामापरतें थोर नाहीं पैं आणिक । जनांसि तारक हेंचि एक ॥८॥
जें सकळ धर्म जनक पवित्राचें पावन । जें कां अधिष्ठान आनंदाचें ॥९॥
जें योगसिद्धीचें जीवन पीयुष । जेणें पूर्ण आयुष्य कामनेचें ॥१०॥
पुण्यपावन देवा भक्तांचे सोहळे । प्रत्यक्ष गळाले आनंदाचे ॥११॥
भक्तिभावें याचें करितां श्रवण । मग नाहीं दर्शन गर्भवासा ॥१२॥
म्हणोनि कीर्तन करावें आवडी । घ्यावी अर्थगोडी अनुभवें ॥१३॥
नव्हे हें प्राकृत पाठांतर कवित्व । हा उपनिषद मथितार्थ ब्रह्मरस ॥१४॥
जाणीव शहाणीव न करावी सर्वथा । न पहावी योग्यता व्युत्पत्तीची ॥१५॥
हें सात्विकाचें धन भोक्ते संतजन । नामदेवें पूर्ण ग्रंथ केला ॥१६॥
६०
ज्ञानदेव आले काशी । विश्वेश्वर आडवे येती ॥१॥
रामनगरा वेशीपाशीं । भेटी जाल्या उभयतांसी ॥२॥
परस्परें आलिंगन । नामा वंदी उभयचरण ॥३॥
६१
पुढें उभे वेशीपाशीं । त्याला लोटांगण काशी ॥१॥
स्वर्गीम देवा जाल्या भेटी । भोंवत्या पताकांच्या थाटी ॥२॥
नामा म्हणे विठठल बोला । ज्ञानोबासी म्हणे चला ॥३॥
६२
ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ ॥१॥
ऐसें बोलत चालत । दोघे आले गंगे आंत ॥२॥
ज्ञानोबाचें पायीं । मिठी घाली गंगाबाई ॥३॥
नामा म्हणे सोडा बाई । ज्ञानदेव सर्वांठायीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP