श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग १ ते १०

श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.



मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रुमा ।
निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥
विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा ।
भरित दाटलें अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥
मति चालविली रसाळ । संत श्रोतिया केला सुकाळ ।
दिधलें पुरुषार्थाचें बळ । तें तूं केवळ संजीवन ॥३॥
अमृतानुभव आनंदलहरी । ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी ।
संस्कृत प्राकृत वैखरी । वदविली माझी ॥४॥
आतां मोक्षाचिया वाटा । पाहिला षड्रचक्र चोहटा ।
आज्ञा द्यावी वैकुंठा । ज्ञानदेव म्हणे ॥५॥


आतां पदपदांतराची सेवा । संपादिली स्वामी केशवा ।
धन्य आमुचिया दैवा । जोडिलां तुम्ही ॥१॥
आत्मविद्या बोलावया कारणें । सुख पावले श्रोते सज्जन ।
आतां जें आरंभिलें मनें । तें आपण सिद्धि न्यावें ॥२॥
भूवैकुंठ एक पंढरी । ल्याहूनि आगळी आळंकापुरी ।
सिद्धेश्वरा शेजारीं । इंद्रायणी ॥३॥
त्रिपुटी पश्चिम मोक्षाची वाट । प्रत्यक्ष कैलास सिद्धपेठ ।
गोपाळपुरीं केलीं गोष्ट । चौघीजणी ॥४॥
नलगे कलियुगींचा वारा । जें जें बोलिलों जगदोद्वारा ।
मागितला थारा । पदीं तुझ्या ॥५॥
आतां वैराग्याचें बळ । सिद्धि प्राप्तीचें फळ ।
ज्ञानदेवें घेतली आळ । जाणा स्थळ आवडीचें ॥६॥


अष्टोत्तरशें तीर्थें सारीं । ओघें आलीं आळंकापुरीं ।
वाद्यें वाजताती गजरीं । कीर्तन लहरी अमृताची ॥१॥
जैसा कस्तुरीचा सुगंधु । अनुभवी न म्हणतीच बद्धु ।
तैसा औटपिठाचा नादु । आठवी गोविंदु आवडीनें ॥२॥
बौद्ध अवतार चक्रपाणि । सत्रावी कळा माय रुक्मिणी ।
जाणत असे अंतःकरणीं । भक्त इच्छा ॥३॥
भावें विठठलें केली गोष्टी । ज्ञानदेवें अपूर्व इच्छिलें पोटीं ।
जावें उठाउठीं । समुदायेंसी ॥४॥


विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥१॥
परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥
गंधर्व आणि देव आले सुरगण । चाललीं विमानें आळंकापुरीं ॥३॥
लहान थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
नामा म्हणे देवा दिसती तांतडी । जाती मज घडी युगा ऐसी ॥५॥


पंढरीचा पोहा आला आळंकापुरीं । पंच कोसावरी साधुजन ॥१॥
पांडुरंगा संगें वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यस ॥२॥
पताकांचे भार निघाले बाहेर । भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥३॥
अवघिया भेटी जाल्या त्या बाहेरी । मग आळंकापुरी येते जाले ॥४॥
सोपानानें मग केला नमस्कार । उतरिले पार पांडुरंगा ॥५॥


हरिहरविधाता आले आळंकापुरीं । इंद्रायणी तीरीं एक थाटी ॥१॥
योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥
शून्याचिया पोटीं निरंजन गुंफा । ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला ॥३॥
उन्मनीं निद्रा लागलीसे फार । स्वरुपीं ज्ञानेश्वर जागा जाला ॥४॥
नामा म्हणे देवा भली देली बुद्धी । लागली समाधि ज्ञानदेवा ॥५॥


लागली उन्मनी वैराग्याचे धुणी । जागा निरंजनीं निरंतर ॥१॥
भूचरी खेचरी चाचरीच्या छंदें । अगोचरीच्या नादें सहस्त्र दळीं ॥२॥
औटहातध्वनी चित्तवृत्ती जेथें । उजळली ज्योत चैतन्याची ॥३॥
नामा म्हणे देवा करा सावधान । नाहीं देहभान ज्ञानदेवा ॥४॥


धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग । मिळाले ते सांग आळंकापुरीं ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत । जाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥


अल्याड पल्याड पताकांचे भार । मध्यें मनोहर इंद्राहणी ॥१॥
पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या । नीळवर्ण सार्‍या लखलखित ॥२॥
जरी जर्तातरी जाल्या रानभरी । विजा त्यावरी खेळताती ॥३॥
सर्पाकार दंड तारांगणावाणी । पताका तिकोनी दाटताती ॥४॥
नामा म्हणे तेथें पताकांचे भार । केव्हडें भाग्य थोर ज्ञानोबाचें ॥५॥

१०
कैलासासा वास अधिक सिद्धबेट । विष्णूचें वैकुंठ पुरातन ॥१॥
भूमीवरी पंढरी तैसी आळंकापुरी । पंच कोशावरी पुण्यभूमी ॥२॥
सुखाची हे मूर्ति नीलकंठलिंग । चक्रतीर्थ सांग मोक्ष भेटे ॥३॥
परमार्थ सुअर्थ देखतांची संत । सांगितली मात अनुभवाची ॥४॥
नामा म्हणे देवा हें स्थळ चांगलें । चित्त मन रंगलें ज्ञानोबाचें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP