श्रीनिवृत्तिनाथांची समाधी - अभंग ३१ ते ४०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३१
ज्ञानदेव पहावा डोळां । ऐसें वाटतें विठ्ठला ॥१॥
जगजेठी जगत्पाळ । माझी पुरवावी आळ ॥२॥
तुम्हां काय अवघड । लीळें झेला गिरिगड ॥३॥
कल्पतरुतळीं वास । त्या घडे कां उपवास ॥४॥
माझ्या कृपाळुवा देवा । हांकेसरसा घेशी धांवा ॥५॥

३२
ज्ञानदेव माझें सौख्यसरोवर । त्यांत जलचर स्वस्थ होतों ॥१॥
दुर्दैव तापानें आटलें तें नीर । वर्षी रघुवीर कृपामेघ ॥२॥
ज्ञानदेवाविण व्याकुळ हे प्राण । तूं जगज्जीवन देव होसी ॥३॥
विठाबाई तूं गे जाणसी ना जाण । रक्षी मज कोण दुजे येथें ॥४॥

३३
नामा हें वदतां डोळयां आलें पाणी । पडिला धरणीं देवापुढें ॥१॥
नामदेव स्थिती पाहून श्रीपती । विस्मित ते चित्तीं स्तब्ध जाले ॥२॥
कैशा रीती नाम्य संबोखूं मी आतां । कठिण अवस्था देव म्हणे ॥३॥
प्रेम उचंबळे ऐकतां ही आळ । बुझावी गोपाळ नाम्यालागीं ॥४॥

३४
देव म्हणे नाम्या पाहे । ज्ञानदेव मींच आहे ॥१॥
तो आणि मी नाहीं दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥
माझ्या ठायीं ठेवीं हेत । सोड खंत खंडी द्वैत ॥३॥
नाम्या उमय मानसीं । ऐसें म्हणे ह्रषिकेशी ॥४॥

३५
ज्ञानदेवापुढें कथा । करी वारील ह्या व्यथा ॥१॥
आत्मरूपीं ज्ञानेश्वर । तोचि ज्ञानाचा सागर ॥२॥
ज्ञानदेवीं धरी भाव । स्वयें होय तूंचि देव ॥३॥
राम कृष्ण रे गोविंद । जप म्हणे तो मुकुंद ॥४॥

३६
प्रेमळ तूं भक्ता माझ्या नामदेवा । जीवींचा विसावा भक्त तूंची ॥१॥
तुमचेनि माझें देवपण सत्य । चंद्रें पाझरत सोमकांत ॥२॥
तुमचे भक्तीनें आणिलें रूपासी । अवाच्या अविनाशी अरूप तें ॥३॥
पंढरिचा राणा सांगतो ह्या खुणा । भक्तांच्या कारणा येणें मज ॥४॥

३७
नग जों तें सोनें लेण्याजोगें होतें । मुदी कंकण तैं नामें त्यांचीं ॥१॥
मुशीमाजीं जेव्हां गेलें तें मुरोन । जालेसें सुवर्ण अभिन्न तें ॥२॥
तैसा ज्ञानदेव भक्त तो मी देव । लौकिक लाघव दासांसाठीं ॥३॥
ज्ञानसमाधी हे नाशी रूप नांवा । अंतींचा मेळावा मजमाजीं ॥४॥

३८
तेज स्पर्शें ज्योती कर्पुरीं निघाली । दोन्ही तीं निमालीं एकदांची ॥१॥
आघातानें नाद घंटेतून उठे । शेवटीं तो मिटे घंटेमाजीं ॥२॥
ब्रह्मीं माया स्फुरे चैतन्यप्रकाशें । शेवटीं तें वसे ब्रह्मरूपीं ॥३॥
पांडुरंग म्हणे ऐक नाम्या ज्ञान । वाटो समाधान तुझ्य जीवा ॥४॥

३९
नामदेव म्हणे देवा । ब्रह्मज्ञान पोटीं ठेवा ॥१॥
तुम्ही मायेसंगें गूढ । ज्ञान जाणिवेचें आड ॥२॥
आम्हां नाहीं याची चाड । संतभेटी गोड ॥३॥
संटभेटी प्रेम फावे । प्रेमें देवाशीं भेटावें ॥४॥
प्रेम आहे पोटभरी । देव त्यासी पोटीं धरी ॥५॥
नामदेवा ठायीं प्रेम । मार्गीं आडविलें ब्रह्म ॥६॥

४०
देई भक्तिरस प्रेमा । देवा घाली  आम्हां जन्मां ॥१॥
प्रेम येई हातां जरी । जेथें नांदू ती पंढरी ॥२॥
ज्ञानदेवीं भेट व्हावी । ज्ञान गोष्ट कां सांगावी ॥३॥
नामा न बुझावा जनीं । कोण नाचेल कीर्तनीं ॥४॥
पुरवा नामयाच्या आर्ता । देवा सांगे जगन्माता ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP