॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ५ ॥
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अध्याय पांचवा ।
संन्यासयोगः ।
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥१॥
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें । एक होय तरी अंतःकरणें । विचारूं ये ॥१॥
मागां सकळ कर्मांचा सन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ? ॥२॥
ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांच्या चित्ता । आपुलिये चाडें श्रीअनंता । उमजु नोहे ॥३॥
ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥४॥
तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । जें हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥५॥
परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा । सांगैं दोहींमाजि बरवा । मार्गु कवणु ॥६॥
जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा । आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ॥७॥
जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे । तैसें सोहोकासन सांगडें । सोहपें होय ॥८॥
येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले । मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ॥९॥
देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ॥१०॥
पाहे पां श्रीशंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । देइजेचिना ? ॥११॥
तैसा औदार्याचा कुरुठा । श्रीकृष्णु आपु जाहलिया सुभटा । कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ? ॥१२॥
एथ चमत्कारु कायसा । गोसावी श्रीलक्ष्मीकांताऐसा । आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ॥१३॥
म्हणौनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें । तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ॥१४॥
श्रीभगवानुवाच ।
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥२॥
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां । मोक्षकरु तत्त्वता । दोनीही होती ॥१५॥
तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा । जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणी ॥१६॥
तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥१७॥
आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह । मग सहजें हें अभिन्न । जाणसी तूं ॥१८॥
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥३॥
तरी गेलियाची से न करी । न पवतां चाड न धरी । जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥१९॥
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥२०॥
जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला । म्हणौनि सुखें सुख पावला । अखंडित ॥२१॥
आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें । जें घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणौनि ॥२२॥
देखैं अग्नि विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये । तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी ॥२३॥
तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं । जयाचिये बुद्धी । संकल्पु नाहीं ॥२४॥
म्हणौनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । इयें कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥२५॥
सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥४॥
एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्ययोगुसंस्था । जाणती केवीं ? ॥२६॥
सहजें ते अज्ञान । म्हणौनि म्हणती ते भिन्न । एऱ्हवीं दीपाप्रति काई आनान । प्रकाशु आहाती ? ॥२७॥
पैं सम्यक येणें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें । तें दोहींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥२८॥
यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं साख्यं च योगं च यः पश्यति स पश्चति ॥५॥
आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणौनि ऐक्य दोहींतें सहजें । इयापरी ॥२९॥
देखैं आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा । तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥३०॥
तयासीचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें । जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥३१॥
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्बह्म न चिरेणाधिगच्छति ॥६॥
जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥३२॥
येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे । परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥३३॥
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥७॥
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें । मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनियां ॥३४॥
जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे । मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥३५॥
तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें । तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ॥३६॥
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें । आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्ही अकर्ता तो ॥३७॥
नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्श्रृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपन्श्वसन ॥८॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन ॥९॥
जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं । तरी कर्तृत्व कैचैं काई । उरे सांगैं ? ॥३८॥
ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्तां ॥३९॥
एऱ्हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥४०॥
तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे । परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥४१॥
स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें । अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥४२॥
आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी । निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥४३॥
आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे । पैं सकळ कर्म ऐसें । रहाटे कीर ॥४४॥
हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छ्वासादिक । आणि निमिषोन्निमिष । आदिकरूनि ॥४५॥
पार्था तयाचे ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं । परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥४६॥
जैं भ्रांति सेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला । मग तो ज्ञानोदयीं चेइला । म्हणौनियां ॥४७॥
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥१०॥
आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥४८॥
दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे । देहीं कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥४९॥
तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे । जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥५०॥
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥११॥
देखैं बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥५१॥
हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनु ॥५२॥
मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि रहाटें एकलें । स्वप्नीं जेवीं ॥५३॥
नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥५४॥
इंद्रियांच्या गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥५५॥
योगिये तोही करिती । परी कर्में तें न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥५६॥
आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ॥५७॥
स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥५८॥
हें असो काजेंविण । जें जें कांहीं करण । तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥५९॥
मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरुतें । ओळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥६०॥
ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी । परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥६१॥
जें बुद्धीचिये ठावूनि देही । तयां अहंकाराची सेचि नाहीं । म्हणौनि कर्म करितां पाहीं । चोखाळले ॥६२॥
अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य । हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें ॥६३॥
आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥६४॥
एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ॥६५॥
हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु । होईल श्लोकसंगति भंगु । म्हणौनियां ॥६६॥
जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥६७॥
जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे । तरी आणिकें काय करावें । कथा सांगैं ॥६८॥
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥६९॥
मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देईं ॥७०॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥१२॥
तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला । तो घर रिघोनि वरिला । शांति जगीं ॥७१॥
येरु कर्मबंधें किरीटी । अभिलाषाचिया गांठीं । कळासला खुंटी । फळभोगाच्या ॥७२॥
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन ॥१३॥
जैसा फळाचिये हांवें । तैसें कर्म करी आघवें । मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥७३॥
तो जयाकडे वासु पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये । तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥७४॥
नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं । करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥७५॥
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥१४॥
जैसा कां सर्वेश्वरू । पाहिजे तंव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥७६॥
आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपें । जे हातुपावो न लिंपे । उदासवृत्तीचा ॥७७॥
योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परी महाभूतांचें दळवाडें । उभारी भले ॥७८॥
जगाच्या जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे । जगचि हें होय जाये । तो शुद्धीहि नेणे ॥७९॥
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥१५॥
पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखें । आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ? ॥८०॥
पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥८१॥
तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जे चराचरीं । तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥८२॥
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥१६॥
तें अज्ञान जैं समूळ तुटे । तै भ्रांतीचें मसैरें फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । मज ईश्वराचें ॥८३॥
एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता । तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥८४॥
ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं । देखें आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥८५॥
जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदया येतांचि सूर्य दिवाळी । कीं येरीही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥८६॥
तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठातत्परायणः ।
गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥१७॥
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरूप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥८७॥
ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदया गिंवसित आलें । तयांची समता दृष्टि बोलें । विशेषूं काई ॥८८॥
एक आपणपांचि जैसें । ते देखतीं विश्व तैसें । हें बोलणें कायसें । नवलु एथ ॥८९॥
परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे । कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥९०॥
नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं । अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥९१॥
हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा । भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥९२॥
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥१८॥
मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु । पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ? ॥९३॥
ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन । हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥९४॥
एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा । तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई ॥९५॥
इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ॥१९॥
म्हणौनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म । हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥९६॥
जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां । परी भोगिली निसंगता । कामनेविण ॥९७॥
जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें । परि सांडिलें निदसुरें । लौकिकु हें ॥९८॥
जैसा जनामाजि खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु । तैसा शरीरीं परी संसारु । नोळखे तयांतें ॥९९॥
हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे । तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हे ॥१००॥
तैसें नाम रूप तयाचें । एऱ्हवीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥१०१॥
ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥१०२॥
न प्रहृष्योत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥२०॥
तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलिया जो ॥१०३॥
तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वतां । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥१०४॥
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥२१॥
जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥१०५॥
सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें । रचिला म्हणौनि बाहिरें । पाउल न घाली ॥१०६॥
सांगैं कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें । तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ? ॥१०७॥
तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपेंचि फावलें । तया विषयो सहजें सांडवले । म्हणो काई ? ॥१०८॥
एऱ्हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखें । झकविती कवण ॥१०९॥
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥२२॥
जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले । जैसें रंकु कां आळुकैलें । तुषांतें सेवी ॥११०॥
नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें । मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥१११॥
तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥११२॥
एऱ्हवीं विषयीं सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥११३॥
सांगैं वात वर्ष आतपु धरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥११४॥
म्हणौनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महूर कां म्हणिजे । विषकंदातें ॥११५॥
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥११६॥
हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीचा साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ? ॥११७॥
जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥११८॥
हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टी । सारिखें दिसे ॥११९॥
म्हणौनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥१२०॥
तें अंतर नेणती बापुडे । म्हणौनि अगत्य सेवणें घडे । सांगैं पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥१२१॥
तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर । ते भोगजळींचे जळचर । सांडिती केवीं ॥१२२॥
आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ॥१२३॥
नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट । हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणें ॥१२४॥
जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ? ॥१२५॥
म्हणौनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥१२६॥
या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा । तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी ॥१२७॥
पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष । निराशा तयां दुःख । दाविलें नावडे ॥१२८॥
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्षरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥२३॥
ज्ञानियांच्या हन ठायीं । याची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥१२९॥
जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरीं सुख । एक आथि ॥१३०॥
परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे । तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥१३१॥
भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी । मग सुखेंसि घे आंटी । गाढेपणें ॥१३२॥
तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी । तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥१३३॥
कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैसे सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ॥१३४॥
ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एक होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जें ॥१३५॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥२४॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥२५॥
म्हणौनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें । ते खुणाचि पावले स्वभावें । आत्माराम ॥१३६॥
जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले । ते मी जाणें निखिळ वोतले । सामरस्याचे ॥१३७॥
ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । कीं महाबोधें विहार । केले जैसे ॥१३८॥
ते विवेकाचें गांव । कीं परब्रम्हींचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥१३९॥
ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक । हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥१४०॥
तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळीं बोल देखसी । सनागर ॥१४१॥
परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं । करी साधुहृदयराउळीं । मंगळउखा ॥१४२॥
ऐसा श्रीगुरूचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥१४३॥
अर्जुना अनंत सुखाच्या डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं । मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥१४४॥
अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥१४५॥
जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम । जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥१४६॥
जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटलें । जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥१४७॥
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥२६॥
जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥१४८ ॥
तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण । तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥१४९ ॥
ते ऐसे कैसेंनि जहाले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हें पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥१५० ॥
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥२७॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥२८॥
तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ॥१५१॥
सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी । तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां ॥१५२॥
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेंसीं व्योम । गामिये करिती ॥१५३॥
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे । मग एकेकु वेगळें । निवडूं नये ॥१५४॥
तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥१५५॥
जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ॥१५६॥
तैसें मन एथ मुद्दल जाय । मग अहंभावादिक कें आहे । म्हणौनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥१५७॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥२९॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंज्ञासयोगोनाम पंचमोऽध्यायः ॥५॥
आम्हीं मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले । ते येणें मार्गें आले । म्हणौनियां ॥१५८॥
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हे पार । पातले ते ॥१५९॥
तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप । मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले ॥१६०॥
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणौनि चमत्कारला ॥१६१॥
तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ? ॥१६२॥
तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥१६३॥
म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें । तें आधींचि जाणितलें देवें । तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि ॥१६४॥
एऱ्हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ॥१६५॥
तैसा सांख्याहूनि प्रांजळा । परी आम्हांसारिखियां अभोळां । एथ आहाति परि कांहीं काळा । तो साहों ये वर ॥१६६॥
म्हणौनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ॥१६७॥
तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका । तरी काय जाहलें आईकीजो कां । सुखें बोलों ॥१६८॥
अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ? ॥१६९॥
आधींचि चित्त मायेचें । वरी मिष जाहले पढियंतयाचें । आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ॥१७०॥
तें म्हणो कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि । हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥१७१॥
जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊनि मातली । म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणें ॥१७२॥
हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल । परि तें स्नेहरूपा न येल । बोलवरी ॥१७३॥
म्हणौनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु कवळावा कवणें । जो आपुलें मान नेणें । आपणचि ॥१७४॥
तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ॥१७५॥
अर्जुना जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे । तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल ॥१७६॥
तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥१७७॥
ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं । तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥१७८॥
तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणौनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥१७९॥
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥१८०॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां पंचमोऽध्यायः ॥