॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय १५ ॥
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अध्याय पंधरावा ।
पुरुषोत्तमयोगः ।
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥१॥
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी । भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥२॥
अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥३॥
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें । लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥४॥
घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी । तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥५॥
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ । तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥६॥
तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं । सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥७॥
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण । करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥८॥
इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥९॥
ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी । जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥१०॥
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापें कुरोंडी । तैसी आणी गोडी । अक्षरांतें ॥११॥
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥१२॥
नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे । ऐसा बोलु देखिजे । जेणें दैवें ॥१३॥
श्रवणसुखाच्या मांडवीं । विश्व भोगी माधवीं । तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली ॥१४॥
ठावो न पवता जयाचा । मनेंसी मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥१५॥
जें ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवे । तें अगोचर फावे । गोठीमाजीं ॥१६॥
येवढें एक सौभग । वळघे वाचेचें आंग । श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जैं कां ॥१७॥
तरी बहु बोलूं काई । आजि तें आनीं ठाईं । मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे ॥१८॥
जे तान्हेनि मियां अपत्यें । आणि माझे गुरु एकलौतें । म्हणौनि कृपेंसि एकहातें । जालें तिये ॥१९॥
पाहा पां भरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी । मजलागीं गोसावी । तैसें केलें ॥२०॥
म्हणौनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड । कीं गीता ऐसें गोड । आतुडलें ॥२१॥
होय अदृष्ट आपैतें । तैं वाळूचि रत्नें परते । उजू आयुष्य तैं मारितें । लोभु करी ॥२२॥
आधणीं घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥२३॥
तयापरी श्रीगुरु । करिती जैं अंगीकारु । तैं होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥२४॥
पाहा पां श्रीनारायणें । तया पांडवांचें उणें । कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें ? ॥२५॥
तैसें श्रीनिवृत्तिराजें । अज्ञानपण हें माझें । आणिलें वोजें । ज्ञानाचिया ॥२६॥
परी हें असो आतां । प्रेम रुळतसे बोलतां । कें गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे ? ॥२७॥
आतां तेणेंचि पसायें । तुम्हां संताचे मी पायें । वोळगेन अभिप्रायें । गीतेचेनि ॥२८॥
तरी तोचि प्रस्तुतीं । चौदाविया अध्यायाच्या अंतीं । निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥२९॥
जें ज्ञान जयाच्या हातीं । तोचि समर्थु मुक्ति । जैसा शतमख संपत्ती । स्वर्गींचिये ॥३०॥
कां शत एक जन्मां । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करी तोचि ब्रह्मा । आनु नोहे ॥३१॥
नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवीं डोळसु । तेवीं ज्ञानेंचि सौरसु । मोक्षाचा तो ॥३२॥
तरी तया ज्ञानालागीं । कवणा पां योग्यता आंगीं । हें पाहतां जगीं । देखिला एकु ॥३३॥
जें पाताळींचेंही निधान । दावील कीर अंजन । परी होआवे लोचन । पायाळाचे ॥३४॥
तैसें मोक्ष देईल ज्ञान । येथें कीर नाहीं आन । परी तेंचि थारे ऐसें मन । शुद्ध होआवें ॥३५॥
तरी विरक्तीवांचूनि कहीं । ज्ञानासि तगणेंचि नाहीं । हें विचारूनि ठाईं । ठेविलें देवें ॥३६॥
आतां विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनातें वरी । हेंही सर्वज्ञें श्रीहरी । देखिलें असे ॥३७॥
जे विषें रांधिली रससोये । जैं जेवणारा ठाउवी होये । तैं तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥३८॥
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता । तैं वैराग्य दवडितां । पाठी लागे ॥३९॥
आतां अनित्यत्व या कैसें । तेंचि वृक्षाकारमिषें । सांगिजत असे विश्वेशें । पंचदशीं ॥४०॥
उपडिलें कवतिकें । झाड येरिमोहरा ठाके । तें वेगें जैसें सुके । तैसें हें नोहे ॥४१॥
यातें एकेपरी । रूपकाचिया कुसरी । सारीतसे वारी । संसाराची ॥४२॥
करूनि संसार वावो । स्वरूपीं अहंते ठावो । होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥४३॥
आतां हेंचि आघवें । ग्रंथगर्भींचें चांगावें । उपलविजेल जीवें । आकर्णिजे ॥४४॥
तरी महानंद समुद्र । जो पूर्ण पूर्णीमा चंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसें म्हणे ॥४५॥
अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरा । करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥४६॥
तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु । हा जाणिजे महातरु । थांवला असे ॥४७॥
परी येरां रुखांसारिखा । हा तळीं मूळें वरी शाखा । तैसा नोहे म्हणौनि लेखा । नयेचि कवणा ॥४८॥
आगी कां कुऱ्हाडी । होय रिगावा जरी बुडीं । तरी हो कां भलतेवढी । वरिचील वाढी ॥४९॥
जे तुटलिया मूळापाशीं । उलंडेल कां शाखांशीं । परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे ॥५०॥
अर्जुना हें कवतिक । सांगतां असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥५१॥
जैसा भानू उंची नेणों कें । रश्मिजाळ तळीं फांके । संसार हें कावरुखें । झाड तैसें ॥५२॥
आणि आथी नाथी तितुकें । रुंधलें असे येणेंचि एकें । कल्पांतींचेनि उदकें । व्योम जैसें ॥५३॥
कां रवीच्या अस्तमानीं । आंधारेनि कोंदे रजनी । तैसा हाचि गगनीं । मांडला असे ॥५४॥
यया फळ ना चुंबितां । फूल ना तुरंबितां । जें कांहीं पंडुसुता । तें रुखुचि हा ॥५५॥
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेंचि हा होये । शाड्वळु गा ॥५६॥
आणि ऊर्ध्वमूळ ऐसें । निगदिलें कीर असे । परी अधींही असोसें । मूळें यया ॥५७॥
प्रबळला चौमेरी । पिंपळा कां वडाचिया परी । जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती ॥५८॥
तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया । अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं ॥५९॥
तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडें । सासिन्नलें ॥६०॥
जालें गगनचि पां वेलिये । कां वारा मांडला रुखाचेनि आयें । नाना अवस्थात्रयें । उदयला असे ॥६१॥
ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु ॥६२॥
आतां ऊर्ध्व या कवण । येथें मूळ तें किं लक्षण । कां अधोमुखपण । शाखा कैसिया ॥६३॥
अथवा द्रुमा यया । अधीं जिया मूळिया । तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ॥६४॥
आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी । आत्मविदविलासीं । निर्णयो केला ॥६५॥
हें आघवेंचि बरवें । तुझिये प्रतीतीसि फावे । तैसेनि सांगों सोलिंवें । विन्यासें गा ॥६६॥
परी ऐकें गा सुभगा । हा प्रसंगु असे तुजचि जोगा । कानचि करीं हो सर्वांगा । हियें आथिलिया ॥६७॥
ऐसें प्रेमरसें सुरफुरें । बोलिलें जंव यादववीरें । तंव अवधान अर्जुनाकारें । मूर्त जालें ॥६८॥
देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें । जैसे आकाशा खेंव पसरिलें । दाही दिशीं ॥६९॥
श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हनौनि घोंटु भरों पाहे एकसरा । अवघेयाचा ॥७०॥
ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली । तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया ॥७१॥
श्रीभगवानुवाच ।
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥१॥
मग म्हणे धनंजया । तें ऊर्ध्व गा तरू यया । येणें रुखेंचि कां जया । ऊर्ध्वता गमे ॥७२॥
एऱ्हवीं मध्योर्ध्व अध । हे नाहीं जेथ भेद । अद्वयासीं एकवद । जया ठायीं ॥७३॥
जो नाइकिजतां नादु । जो असौरभ्य मकरंदु । जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ॥७४॥
जया जें आऱ्हां परौतें । जया जें पुढें मागौतें । दिसतेविण दिसतें । अदृश्य जें ॥७५॥
उपाधीचा दुसरा । घालितां वोपसरा । नामरूपाचा संसारा । होय जयातें ॥७६॥
ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेंचि जें ज्ञान । सुखा भरलें गगन । गाळींव जें ॥७७॥
जें कार्य ना कारण । जया दुजें ना एकपण । आपणयां जें जाण । आपणचि ॥७८॥
ऐसें वस्तु जें साचें । तें ऊर्ध्व गा यया तरूचें । तेथ आर घेणें मूळाचें । तें ऐसें असे ॥७९॥
तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी । कां वांझेची संतती । वानणें जैशी ॥८०॥
तैशी सत ना असत होये । जे विचाराचें नाम न साहे । ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ॥८१॥
जे नानातत्त्वांंची मांदुस । जे जगदभ्राचें आकाश । जे आकारजाताचें दुस । घडी केलें ॥८२॥
जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचचित्र भूमिका । विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे ॥८३॥
ते माया वस्तूच्या ठायीं । असे जैसेनि नाहीं । मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होये ॥८४॥
जेव्हां आपणया आली निद । करी आपणपें जेवीं मुग्ध । कां काजळी आणी मंद । प्रभा दीपीं ॥८५॥
स्वप्नीं प्रियापुढें तरुणांगी । निदेली चेववूनि वेगीं । आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी ॥८६॥
तैसी स्वरूपीं जाली माया । आणी स्वरूप नेणे धनंजया । तेंचि रुखा यया । मूळ पहिलें ॥८७॥
वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वीं आठुळैजे कंदु । वेदांतीं हाचि प्रसिद्धु । बीजभावो ॥८८॥
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा ॥८९॥
ऐसी यया वेदांतीं । निरूपणभाषाप्रतीती । परी तें असो प्रस्तुतीं । अज्ञान मूळ ॥९०॥
तें ऊर्ध्व आत्मा निर्मळें । अधोर्ध्व सूचिती मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचें ॥९१॥
मग आधिलीं सदेहांतरें । उठती जियें अपारें । ते चौपासि घेऊनि आगारें । खोलावती ॥९२॥
ऐसें भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥९३॥
तेथ चिद्वृत्ति पहिलें । महत्तत्त्व उमललें । तें पान वाल्हेंदुल्हें । एक निघे ॥९४॥
मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ॥९५॥
तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी । तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणें ॥९६॥
ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोंवळिका । चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो ॥९७॥
मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हें पांच फोंक । महाभूतांचें सरोख । सरळे होती ॥९८॥
तैसीं श्रोत्रादि तन्मात्रें । तियें अंगवसां गर्भपत्रें । लुळलुळितें विचित्रें । उमळती गा ॥९९॥
तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडी । होता करित कांडीं । आकांक्षेचीं ॥१००॥
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धांव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें ॥१०१॥
पाठीं रूपपत्र पालोवेलीं । चक्षु लांब तें कांडें घाली । ते वेळीं व्यामोहता भली । पाहाळीं जाय ॥१०२॥
आणि रसाचें आंगवसें । वाढतां वेगें बहुवसें । जिव्हे आर्तीची असोसें । निघती बेंचें ॥१०३॥
तैसेंचि कोंभैलेनि गंधें । घ्राणाची डिरी थांबुं बांधे । तेथ तळु घे स्वानंदें । प्रलोभाचा ॥१०४॥
एवं महदहंबुद्धि । मनें महाभूतसमृद्धी । इया संसाराचिया अवधी । सासनिजे ॥१०५॥
किंबहुना इहीं आठें । आंगीं हा अधिक फांटे । परी शिंपीचियेवढें उमटे । रुपें जेवीं ॥१०६॥
कां समुद्राचेनि पैसारें । वरी तरंगता आसारे । तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारें । अज्ञानमूळ ॥१०७॥
आतां याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु । जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु । येकाकिया ॥१०८॥
परी तें असो हें ऐसें । कावरें झाड उससे । यया महदादि आरवसें । अधोशाखा ॥१०९॥
आणि अश्वत्थु ऐसें ययातें । म्हणती जे जाणते । तेंही परिस हो येथें । सांगिजैल ॥११०॥
तरी श्वः म्हणिजे उखा । तोंवरी एकसारिखा । नाहीं निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ॥१११॥
जैसा न लोटतां क्षणु । मेघु होय नानावर्णु । कां विजु नसे संपूर्णु । निमेषभरी ॥११२॥
ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाहीं जळा । कां चित्त जैसें व्याकुळा । माणुसाचें ॥११३॥
तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती । म्हणौनि ययातें म्हणती । अश्वत्थु हा ॥११४॥
आणि अश्वत्थु येणें नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें । परी तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥११५॥
एऱ्हवीं पिंपळु म्हणतां विखीं । मियां गति देखिली असे निकी । परी तें असो काय लौकिकीं । हेतु काज ॥११६॥
म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु । तरी क्षणिकत्वेंचि अश्वत्थु । बोलिजे हा ॥११७॥
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥११८॥
जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एके आंगें काढे । आणि नदी येरीकडे । भरितीच असती ॥११९॥
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जंव नुघडे । मेघानदींची ॥१२०॥
ऐसें या रुखाचें होणें जाणें । न तर्के होतेनि वहिलेपणें । म्हणौनि ययातें लोकु म्हणे । अव्ययु हा ॥१२१॥
एऱ्हवीं दानशीळु पुरुषु । वेंचकपणेंचि संचकु । तैसा व्ययेंचि हा रुखु । अव्ययो गमे ॥१२२॥
जातां वेगें बहुवसें । न वचे कां भूमीं रुतलें असे । रथाचें चक्र दिसे । जियापरी ॥१२३॥
तैसें काळातिक्रमें जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे । तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ॥१२४॥
परी येकी केधवां गेली । शाखाकोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढाभ्रें ॥१२५॥
महाकल्पाच्या शेवटीं । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेंचि आणिखीचें दांग उठी । सासिन्नलें ॥१२६॥
संहारवातें प्रचंडें । पडती प्रळयांतींचीं सालडें । तंव कल्पादीचीं जुंबाडें । पाल्हेजती ॥१२७॥
रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडें । जिंके जेवीं ॥१२८॥
कलियुगांतीं कोरडीं । चहुं युगांची सालें सांडी । तंव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ॥१२९॥
वर्ततें वर्ष जाये । तें पुढिला मुळहारी होये । जैसा दिवसु जात कीं येत आहे । हें चोजवेना ॥१३०॥
जैशा वारियाच्या झुळकां । सांदा ठाउवा नव्हे देखा । तैसिया उठती पडती शाखा । नेणों किती ॥१३१॥
एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरीं बहुवी फुटे । ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ॥१३२॥
जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें । येथ असंतचि असिजे जगें । मानिजे संत ॥१३३॥
कां लागोनि डोळां उघडे । तंव कोडीवरी घडे मोडे । नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥१३४॥
वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळीतां अपाडें । दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवीं जगा ॥१३५॥
पैं भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ॥१३६॥
हें बहु असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥१३७॥
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥१३८॥
परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळां निमिखें । होत जात ॥१३९॥
नाहीं अज्ञानावांचूनि मूळ । ययाचें असिलेंपण टवाळ । ऐसें झाड सिनसाळ । देखिलें जेणें ॥१४०॥
तयातें गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणें जाणता । पैं वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची ॥१४१॥
योगजाताचें जोडलें । तया एकासीचि उपेगा गेलें । किंबहुना जियालें । ज्ञानही त्याचेनी ॥१४२॥
हें असो बहु बोलणें । वानिजैल तो कवणें । जो भवरुखु जाणें । उखि ऐसा ॥१४३॥
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥२॥
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा । डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू ॥१४४॥
आणि अधीं फांकली डाळें । तिये होती मूळें । तयाही तळीं पघळे । वेल पालवु ॥१४५॥
ऐसें जें आम्हीं । म्हणितलें उपक्रमीं । तेंही परिसें सुगमीं । बोलीं सांगों ॥१४६॥
तरी बद्धमूळ अज्ञानें । महदादिकीं सासिनें । वेदांचीं थोरवनें । घेऊनियां ॥१४७॥
परी आधीं तंव स्वेदज । जारज उद्भिज अंडज । हे बुडौनि महाभुज । उठती चारी ॥१४८॥
यया एकैकाचेनि आंगवटें । चौऱ्यांशीं लक्षधा फुटे । ते वेळीं जीवशाखीं फांटे । सैंधचि होती ॥१४९॥
प्रसवती शाखा सरळिया । नानासृष्टि डाहाळिया । आड फुटती माळिया । जातिचिया ॥१५०॥
स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदांचे टके । आंदोळती आंगिकें । विकारभारें ॥१५१॥
जैसा वर्षाकाळु गगनीं । पाल्हेजे नवघनीं । तैसें आकारजात अज्ञानीं । वेलीं जाय ॥१५२॥
मग शाखांचेनि आंगभारें । लवोनि गुंफिती परस्परें । गुणक्षोभाचे वारे । उदयजती ॥१५३॥
तेथ तेणें अचाटें । गुणांचेनि झडझडाटें । तिहीं ठायीं हा फांटे । ऊर्ध्वमूळ ॥१५४॥
ऐसा रजाचिया झुळुका । झडाडितां आगळिका । मनुष्यजाती शाखा । थोरावती ॥१५५॥
तिया ऊर्ध्वीं ना अधीं । माझारींचि कोंदाकोंदी । आड फुटती खांदी । चतुर्वर्णांच्या ॥१५६॥
तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचें अभिनव । पालव डोलती बरव । नीच नवे ॥१५७॥
अर्थु कामु पसरे । अग्रवनें घेती थारे । तेथ क्षणिकें पदांतरें । इहभोगाचीं ॥१५८॥
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभें । खांकरेजती शुभाशुभें । नानाकर्मांचे खांबे । नेणों किती ॥१५९॥
तेवींचि भोगक्षीणें मागिलें । पडती देहांतींचीं बुडसळें । तंव पुढां वाढी पेले । नवेया देहांची ॥१६०॥
आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगें हवावे । विषयपल्लव नवे । नीत्य होती ॥१६१॥
ऐसे रजोवातें प्रचंडें । मनुष्यशाखांचे मांदोडे । वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु ॥१६२॥
तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा । मग वाजों लागे घोरा । तमाचा तो ॥१६३॥
तेधवां याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधीं देखा । पल्हेजती डाहाळिका । कुकर्माचिया ॥१६४॥
अप्रवृत्तींचे खणुवाळे । कोंभ निघती सरळे । घेत पान पालव डाळे । प्रमादाचीं ॥१६५॥
बोलती निषेधनियमें । जिया ऋचा यजुःसामें । तो पाला तया घुमें । टकेयावरी ॥१६६॥
प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तिहीं पानीं घेती प्रसर । वासना वेली ॥१६७॥
तंव तंव होतीं थोराडें । अकर्मांचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धांव ॥१६८॥
तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फांटा । जाळ पडे कर्मभ्रष्टां । भुलोनियां ॥१६९॥
पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥१७०॥
परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगींहि नित्य नवा । निरयभोग यावा । फळाचा तो ॥१७१॥
आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगें धुर धुरी । जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥१७२॥
ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण । इया खांदिया तेवीं जाण । फळेंही हेंची ॥१७३॥
अर्जुना गा अवधारीं । मनुष्यालागोनि इया परी । वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची ॥१७४॥
म्हणौनि जीं मनुष्यडाळें । तियें जाणावीं अधींचि मूळें । जे एथूनि हा पघळे । संसारतरु ॥१७५॥
एऱ्हवीं ऊर्ध्वींचें पार्था । मुद्दल मूळ पाहतां । अधींचिया मध्यस्था । शाखा इया ॥१७६॥
परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी । विरुढती या शाखीं । अधोर्ध्वींचिया ॥१७७॥
आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यत्र लागों अर्जुना । जे मनुष्यावांचूनि विधाना । विषय नाहीं ॥१७८॥
म्हणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा । तरी कर्मवृद्धीसि देखा । इयेंचि मूळें ॥१७९॥
आणि आनीं तरी झाडीं । शाखा वाढतां मुळें गाढीं । मूळ गाढें तंव वाढी । पैस आथी ॥१८०॥
तैसेंचि इया शरीरा । कर्म तंव देहा संसारा । आणि देह तंव व्यापारा । ना म्हणोंचि नये ॥१८१॥
म्हणौनि देहें मानुषें । इयें मुळें होती न चुके । ऐसें जगज्जनकें । बोलिलें तेणें ॥१८२॥
मग तमाचें तें दारुण । स्थिरावलेया वाउधाण । सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ॥१८३॥
तैं याचि मनुष्याकारा । मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरीं ॥१८४॥
उकलतेनि उन्मेखें । प्रज्ञाकुशलतेंची तिखें । डिरिया निघती निमिखें । बाबळैजुनी ॥१८५॥
मतीचे सोट वांवे । घालिती स्फूर्तींचेनि थांवें । बुद्धि प्रकाश घे धांवे । विवेकावरी ॥१८६॥
तेथ मेधारसें सगर्भ । अस्थापत्रीं सबोंब । सरळ निघती कोंभ । सद्वृत्तीचे ॥१८७॥
सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा । घुमघुमिति घोषा । वेदपद्याच्या ॥१८८॥
शिष्टागमविधानें । विविधयागवितानें । इये पानावरी पानें । पालेजती ॥१८९॥
ऐशा यमदमीं घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया । देती वैराग्यशाखा कोंवळिया । वेल्हाळपणें ॥१९०॥
विशिष्टां व्रतांचे फोक । धीराच्या अणगटी तिख । जन्मवेगें ऊर्ध्वमुख । उंचावती ॥१९१॥
माजीं वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट । जंव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ॥१९२॥
तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी । तिया आड फुटती फळीं । स्वर्गादिकीं ॥१९३॥
पुढां उपरति रागें लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । पाल्हाजत नित्य नवी । वाढतीचि असे ॥१९४॥
पैं रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥१९५॥
याहीपासून उंचवडें । गुढले फळाचेनि बुडें । इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥१९६॥
मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानीं उंचावलिया । मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥१९७॥
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु । बुडीं साना अग्रीं थोरु । फळाढ्यपणें ॥१९८॥
वरी उपरिशाखाही पाठीं । येती फळभार जे किरीटी । ते ब्रह्मेशांत अणगटीं । कोंभ निघती ॥१९९॥
फळाचेनि वोझेपणें । ऊर्ध्वीं वोवांडें दुणें । जंव माघौतें बैसणें । मूळींचि होय ॥२००॥
प्राकृताही तरी रुखा । जें फळें दाटलीं होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥२०१॥
तैसें जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा । तियें मूळीं टेंकती पांडवा । वाढतेनि ज्ञानें ॥२०२॥
म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें । तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं ॥२०३॥
परी हें असो ऐसें । ब्रह्मादिक ते आंगवसें । ऊर्ध्वमुळासरिसें । न तुकती गा ॥२०४॥
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामें विख्याता । तिया फळीं मूळीं नाडळता । भरलिया ब्रह्मीं ॥२०५॥
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी । ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी । शाखांची वाढी बरवी । उंचावे पैं ॥२०६॥
पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि । म्हणौनि इयें अधीं । म्हणितलीं मूळें ॥२०७॥
एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु । सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु ॥२०८॥
आणि अधींचीं हीं मूळें । उपपत्ती परिसविली सविवळें । आतां परिस उन्मूळें । कैसेनि हा ॥२०९॥
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥३॥
परी तुझ्या हन पोटीं । ऐसें गमेल किरीटी । जे एवढें झाड उत्पाटी । ऐसें कायि असे ? ॥२१०॥
कें ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वीं असे ॥२११॥
हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींच्या डाळीं । माजीं धांवतसे दुजा मूळीं । मनुष्यरूपीं ॥२१२॥
ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु । तरी झणीं हा हळुवटु । धरिसी भावो ॥२१३॥
परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ? ॥२१४॥
गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावें । होआवें मग तोडावें । खपुष्प कीं ? ॥२१५॥
तैसा संसारु हा वीरा । रुख नाहीं साचोकारा । मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी ? ॥२१६॥
आम्हीं सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेचीं घरभरी । लेकुरें जैशीं ॥२१७॥
कय कीजती चेइलेपणीं । स्वप्नींचीं तिये बोलणीं । तैशी जाण ते काहाणी । दुगळींचि ते ॥२१८॥
वांचूनि आम्हीं निरूपिलें जैसें । ययाचे अचळ मूळ असे तैसें । आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥२१९॥
तरी कोणाचेनि संतानें । निपजती तया उन्मूळणें । काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा ॥२२०॥
म्हणौनि पैं धनंजया । आम्हीं वानिलें रूप तें माया । कासवीचेनि तुपें राया । वोगरिलें जैसें ॥२२१॥
मृगजळाचीं गा तळीं । तिये दिठी दुरूनि न्याहाळीं । वांचूनि तेणें पाणियें साळी केळी । लाविसी काई ? ॥२२२॥
मूळ अज्ञानचि तंव लटिकें । मा तयाचें कार्य हें केतुकें । म्हणौनि संसाररुख सतुकें । वावोचि गा ॥२२३॥
आणि अंतु यया नाहीं । ऐसें बोलिजे जें कांहीं । तेंही साचचि पाहीं । येकें परी ॥२२४॥
तरी प्रबोधु जंव नोहे । तंव निद्रे काय अंतु आहे ? । कीं रात्री न सरे तंव न पाहे । तया आरौतें ? ॥२२५॥
तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा । तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या ॥२२६॥
वाजतें वारें निवांत । जंव न राहे जेथिंचें तेथ । तंव तरंगतां अनंत । म्हणावीचि कीं ॥२२७॥
म्हणौनि सूर्यु जैं हारपे । तैं मृगजळाभासु लोपे । कां प्रभा जाय दीपें । मालवलेनि ॥२२८॥
तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये । तैंचि यया अंतु आहे । एऱ्हवीं नाहीं ॥२२९॥
तेवींचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी । तो आळु नोहे अनुरोधी । बोलातें या ॥२३०॥
जें संसारवृक्षाच्या ठायीं । साचोकार तंव नाहीं । मा नाहीं तया आदि काई । कोण होईल ? ॥२३१॥
जो साच जेथूनि उपजे । तयातें आदि हें साजे । आतां नाहींचि तो म्हणिजे । कोठूनियां ? ॥२३२॥
म्हणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगों कवण माये । यालागीं नाहींपणेंचि होये । अनादि हा ॥२३३॥
वांझेचिया लेंका । कैंची जन्मपत्रिका । नभीं निळी भूमिका । कें कल्पूं पां ॥२३४॥
व्योमकुसुमांचा पांडवा । कवणें देंठु तोडावा । म्हणौनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैंची ? ॥२३५॥
जैसें घटाचें नाहींपण । असतचि असे केलेनिवीण । तैसा समूळ वृक्षु जाण । अनादि हा ॥२३६॥
अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंतु ययासि नाहीं । माजीं स्थिती आभासे कांहीं । परी टवाळ ते ॥२३७॥
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे । माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ॥२३८॥
तेसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं । परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥२३९॥
नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥२४०॥
ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥२४१॥
आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां । तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय ॥२४२॥
स्वप्नींही मानिलें लटिकें । तरी निर्वाहो कां एकसारिखें । तेवीं आभासु हा क्षणिकें । रिताचि गा ॥२४३॥
देखतां आहे आवडें । घेऊं जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडें । जळामाजीं ॥२४४॥
तरंगभंगु सांडीं पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणें पाडें । होणें जाणें गा ॥२४५॥
जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठीमोरा । तैसी स्थिती नाहीं तरुवरा । भवरूपा यया ॥२४६॥
एवं आदि ना अंतु स्थिती । ना रूप ययासि आथी । आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥२४७॥
आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी । तरी आतां आत्माज्ञानाच्या लोटीं । खांडेनि गा ॥२४८॥
वांचूणि ज्ञानेवीण ऐकें । उपाय करिसी जितुके । तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये ॥२४९॥
मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक ज्ञानें ॥२५०॥
एऱ्हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा । तो शिणुचि वाउगा । केला होय ॥२५१॥
तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागीं धांवतां दांगा । माजीं वोहळें बुडिजे पैं गा । साच जेवीं ॥२५२॥
तेवीं नाथिलिया संसारा । उपाईं जाचतया वीरा । आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय ॥२५३॥
म्हणौनि स्वप्नींचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया । तेवीं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥२५४॥
परी तेचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें नवें । अभंगबळ होआवें । बुद्धीसी गा ॥२५५॥
उठलेनि वैराग्यें जेणें । हा त्रिवर्गु ऐसा सांडणें । जैसें वमुनियां सुणें । आतांचि गेलें ॥२५६॥
हा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥२५७॥
मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धी करतळें । हातवसावें ॥२५८॥
निसळें विवेकसाहणें । जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें । मग पुरतेनि बोधें उटणें । एकलेचि ॥२५९॥
परी निश्चयाचें मुष्टिबळ । पाहावें एकदोनी वेळ । मग तुळावें अति चोखाळ । मननवरी ॥२६०॥
पाठीं हतियेरां आपणयां । निदिध्यासें एक जालिया । पुढें दुजें नुरेल घाया । पुरतें गा ॥२६१॥
तें आत्मज्ञानाचें खांडें । अद्वैतप्रभेचेनि वाडें । नेदील उरों कवणेकडे । भववृक्षासी ॥२६२॥
शरदागमींचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा । का उदयला रवी आंधारा । घोंटु भरी ॥२६३॥
नाना उपवढ होतां खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो । स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसें ॥२६४॥
तेव्हां ऊर्ध्वींचें मूळ । कां अधींचें हन शाखाजाळ । तें कांहींचि न दिसे मृगजळ । चादिणां जेवीं ॥२६५॥
ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता । छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळातें ॥२६६॥
ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥४॥
मग इदंतेसि वाळलें । जें मीपणेंवीण डाहारलें । तें रूप पाहिजे आपलें । आपणचि ॥२६७॥
परी दर्पणाचेनि आधारें । एकचि करून दुसरें । मुख पाहाती गव्हारें । तैसें नको हो ॥२६८॥
हें पाहाणें ऐसें असे वीरा । जैसा न बोडलिया विहिरा । मग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके ॥२६९॥
नातरी आटलिया अंभ । निजबिंबीं प्रतिबिंब । निहटे कां नभीं नभ । घटाभावीं ॥२७०॥
नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवीं आपणपयां । तैसें आपेंआप धनंजया । न्याहाळणें जें गा ॥२७१॥
जिव्हे आपली चवी चाखणें । चक्षू निज बुबुळ देखणें । आहे तया ऐसें निरीक्षणें । आपुलें पैं ॥२७२॥
कां प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । नाना पाणी भरलें खोळे । पाणियाचिये ॥२७३॥
आपणचि आपणयातें । पाहिजे जें अद्वैतें । तें ऐसें होय निरुतें । बोलिजतु असे ॥२७४॥
जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे । आद्यपुरुष कां म्हणिजे । जया ठायातें ॥२७५॥
तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वायां ॥२७६॥
पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढती न यों इया निगाले । पैजा जेथ ॥२७७॥
संसाराचिया पायां पुढां । पळती वीतराग होडा । ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां ॥२७८॥
अहंतादिभावां आपुलियां । झाडा देऊनि आघवेया । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥२७९॥
पैं जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी । वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची ॥२८०॥
जिये कां वस्तूचें नेणणें । आणिलें थोर जगा जाणणें । नाहीं तें नांदविलें जेणें । मी तूं जगीं ॥२८१॥
पार्था तें वस्तु पहिलें । आपणपें आपुलें । पाहिजे जैसें हिंवलें । हिंव हिंवें ॥२८२॥
आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया । तरी जया कां भेटलिया । येणेंचि नाहीं ॥२८३॥
परी तया भेटती ऐसें । जे ज्ञानें सर्वत्र सरिसे । महाप्रळयांबूचे जैसें । भरलेपण ॥२८४॥
निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥५॥
जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोह मान । वर्षांतीं जैसें घन । आकाशातें ॥२८५॥
निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवीं सोयरा । तैसें नागवती विकारां । वेटाळूं जे ॥२८६॥
फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभें प्रबळे । तयाची क्रिया ढाळेंढाळें । गळती आहे ॥२८७॥
आगी लगलिया रुखीं । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसें सांडिलें अशेखीं । विकल्पीं जे ॥२८८॥
आइकें सकळ दोषतृणीं । अंकुरिजती जिये मेदिनी । तिये भेदबुद्धीची काहाणी । नाहीं जयातें ॥२८९॥
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी । गेली देहअहंता तैसी । अविद्येसवें ॥२९०॥
पैं आयुष्यहीना जीवातें । शरीर सांडी जेवीं अवचितें । तेवीं निदसुरें द्वैतें । सांडिले जे ॥२९१॥
लोहाचें साम्कडें परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ॥२९२॥
अगा सुखदुःखाकारें । द्वंद्वें देहीं जियें गोचरें । तियें जयां कां समोरें । होतीचिना ॥२९३॥
स्वप्नींचें राज्य कां मरण । नोहे हर्षशोकांसि कारण । उपवढलिया जाण । जियापरी ॥२९४॥
तैसेम सुखदुःखरूपीं । द्वंद्वीं जे पुण्यपापीं । न घेपिजती सर्पीं । गरुड जैसें ॥२९५॥
आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचें क्षीर । चरताति जे सविचार । राजहंसु ॥२९६॥
जैसा वर्षोनि भूतळीं । आपला रसु अंशुमाळी । मागौता आणी रश्मिजाळीं । बिंबासीचि ॥२९७॥
तैसें आत्मभ्रांतीसाठीं । वस्तु विखुरली बारावाटीं । ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥२९८॥
किंबहुना आत्मयाचा । निर्धारीं विवेकु जयांचा । बुडाला वोघु गंगेचा । सिंधूमाजीं जैसा ॥२९९॥
पैं आघवेंचि आपुलेंपणें । नुरेचि जया अभिलाषणें । जैसें येथूनि पऱ्हां जाणें । आकाशा नाहीं ॥३००॥
जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना ॥३०१॥
जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु । तैसा नुठी जयां सळु । कामोर्मीचा ॥३०२॥
चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणें आंगी वोसावला । तेवीं अपेक्षेचा अवखळा । न पडे जयां ॥३०३॥
हें किती बोलूं असांगडें । जेवीं परमाणु नुरे वायूपुढें । तैसें विषयांचें नावडे । नांवचि जयां ॥३०४॥
एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाग्नि हुताशें । ते तेथ मिळती जैसें । हेमीं हेम ॥३०५॥
तेथ म्हणिजे कवणें ठाईं । ऐसेंही पुससी कांहीं । तरी तें पद गा नाहीं । वेंचु जया ॥३०६॥
दृश्यपणें देखिजे । कां ज्ञेयत्वें जाणिजे । अमुकें ऐसें म्हणिजे । तें जें नव्हे ॥३०७॥
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पवकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥६॥
पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । हें काय बोलों अंशुमाळी । प्रकाशी जें ॥३०८॥
तें आघवेंचि दिसणें । जयाचें कां न देखणें । विश्व भासतसे जेणें । लपालेनी ॥३०९॥
जैसें शिंपीपण हारपे । तंव तंव खरें होय रुपें । कां दोरी लोपतां सापें । फार होइजे ॥३१०॥
तैसीं चंद्रसूर्यादि थोरें । इयें तेजें जियें फारें । तियें जयाचेनि आधारें । प्रकाशती ॥३११॥
ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी । चंद्रसूर्याच्या मानसीं । प्रकाशे जे ॥३१२॥
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूच्या प्रकाशा । यालागीं तेज जें तेजसा । तें वस्तूचें आंग ॥३१३॥
आणि जयाच्या प्रकाशीं । जग हारपे चंद्रार्केंसीं । सचंद्र नक्षत्रें जैसीं । दिनोदयीं ॥३१४॥
नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नींची डिंडीमा मावळे । कां नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥३१५॥
तैसा जिये वस्तूच्या ठायीं । कोण्हीच कां आभासु नाहीं । तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा ॥३१६॥
पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौतीं पाउलें । महोदधीं कां मिनले । स्रोत जैसे ॥३१७॥
कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरीं । होयचि ना माघारी । परती जैसी ॥३१८॥
नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा । नाहीं तप्तलोहौनि जळा । निघणें जेवीं ॥३१९॥
तेवीं मजसीं एकवट । जे जाले ज्ञानें चोखट । तयां पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ॥३२०॥
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी पसावो । परी विनंती एकी देवो । चित्त देतु ॥३२१॥
तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती । ते देवेंसि भिन्न आथी । कीं अभिन्न जी ॥३२२॥
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हें असंबद्ध । जे फुलां गेलें षट्पद । ते फुलेंचि होती पां ॥३२३॥
पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें । मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥३२४॥
नातरी तूंचि ते स्वभावें । तरी कोणें कोणासि मिळावें । आपणयासी आपण रुपावें । शस्त्रें केवीं ? ॥३२५॥
म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलों अवयवां । शरीरेंसीं ॥३२६॥
आणि जे सदां वेगळें तुजसीं । तयां मिळणीं नाहीं कोणे दिवशीं । मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ? ॥३२७॥
तरी कोण गा ते तूंतें । पावोनि न येती माघौते । हें विश्वतोमुखा मातें । बुझावीं जी ॥३२८॥
इये आक्षेपीं अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा । तोषला बोध शिष्याचा । देखोनियां ॥३२९॥
मग म्हणे गा महामती । मातें पावोनि न येती पुढती । ते भिन्नाभिन्न रिती । आहाती दोनी ॥३३०॥
जैं विवेकें खोलें पाहिजे । तरी मी तेचि ते सहजें । ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ॥३३१॥
जैसे पाणियावरी वेगळ । तळपतां दिसती कल्लोळ । एऱ्हवीं तरी निखिळ । पाणीचि तें ॥३३२॥
कां सुवर्णाहुनि आनें । लेणीं गमती भिन्नें । मग पाहिजे तंव सोनें । आघवेंचि तें ॥३३३॥
तैसें ज्ञानाचिये दिठी । मजसीं अभिन्नचि ते किरीटी । येर भिन्नपण तें उठी । अज्ञानास्तव ॥३३४॥
आणि साचोकारेनि वस्तुविचारें । कैचें मज एकासि दुसरें । भिन्नाभिन्नव्यवहारें । उमसिजेल ॥३३५॥
आघवेंचि आकाश सूनि पोटीं । बिंबचि जैं आते खोटी । तैं प्रतिबिंब कें उठी । कें रश्मि शिरे ? ॥३३६॥
कां कल्पांतींचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया ? । म्हणौनि कैंचें अंश अविक्रिया । एका मज ॥३३७॥
परी ओघाचेनि मेळें । पाणी उजू परी वांकुडें जालें । रवी दुजेपण आलें । तोयबगें ॥३३८॥
व्योम चौफळें कीं वाटोळें । हें ऐसें कायिसयाही मिळे । परी घटमठीं वेंटाळें । तैसेंही आथी ॥३३९॥
हां गा निद्रेचेनि आधारें । काय एकलेनि जग न भरे ? । स्वप्नींचेनि जैं अवतरे । रायपणें ॥३४०॥
कां मिनलेनि किडाळें । वानिभेदासि ये सोळें । तैसा स्वमाये वेंटाळें । शुद्ध जैं मी ॥३४१॥
तैं अज्ञान एक रूढे । तेणें कोऽहंविकल्पाचें मांडे । मग विवरूनि कीजे फुडें । देहो मी ऐसें ॥३४२॥
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥७॥
ऐसें शरीराचि येवढें । जै आत्मज्ञान वेगळें पडे । तैं माझा अंशु आवडे । थोडेपणें ॥३४३॥
समुद्र कां वायुवशें । तरंगाकार उल्लसें । तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेवीं ॥३४४॥
तेवीं जडातें जीवविता । देहाहंता उपजविता । मी जीव गमें पंडुसुता । जीवलोकीं ॥३४५॥
पैं जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा । तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो ॥३४६॥
अगा उपजणें निमणें । हें साचचि जे कां मानणें । तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन ॥३४७॥
एवंविध जीवलोकीं । तूं मातें ऐसा अवलोकीं । जैसा चंद्रु कां उदकीं । उदकातीत ॥३४८॥
पैं काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा । आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ॥३४९॥
तैसें अनादिपण न मोडे । माझें अक्रियत्व न खंडे । परी कर्ता भोक्ता ऐसें आवडे । ते जाण गा भ्रांती ॥३५०॥
किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु । बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपयां ॥३५१॥
पैं मनादि साही इंद्रियें । श्रोत्रादि प्रकृतिकार्यें । तियें माझीं म्हणौनि होये । व्यापारारूढ ॥३५२॥
जैसें स्वप्नीं परिव्राजें । आपणपयां आपण कुटुंब होईजे । मग तयाचेनि धांविजे । मोहें सैरा ॥३५३॥
तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ॥३५४॥
मनाच्या रथीं वळघे । श्रवणाचिया द्वारें निघे । मग शब्दाचिया रिघे । रानामाजीं ॥३५५॥
तोचि प्रकृतीचा वागोरा । त्वचेचिया मोहरा । आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ॥३५६॥
कोणे एके अवसरीं । रिघोनि नेत्राच्या द्वारीं । मग रूपाच्या डोंगरीं । सैरा हिंडे ॥३५७॥
कां रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा । रसाचा दरकुटा । भरोंचि लागे ॥३५८॥
नातरी येणेंचि घ्राणें । जैं देहांशु करी निघणें । मग गंधाची दारुणें । आडवें लंघी ॥३५९॥
ऐसेनि देहेंद्रियनायकें । धरूनि मन जवळिकें । भोगिजती शब्दादिकें । विषयभरणें ॥३६०॥
शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥८॥
परी कर्ता भोक्ता ऐसें । हें जीवाचे तैंचि दिसे । जैं शरीरीं कां पैसे । एकाधिये ॥३६१॥
जैसा आथिला आणि विलासिया । तैंचि वोळखों ये धनंजया । जैं राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ॥३६२॥
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । कां विषयेंद्रियांचा धुमाडु । हा जाणिजे तैं निवाडु । जैं देह पाविजे ॥३६३॥
अथवा शरीरातें सांडी । तऱ्ही इंद्रियांची तांडी । हे आपणयांसवें काढी । घेऊनि जाय ॥३६४॥
जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति । कां साइखडेयाची गती । सूत्रतंतू ॥३६५॥
नाना मावळतेनि तपनें । नेइजेती लोकांचीं दर्शनें । हें असो द्रुती पवनें । नेईजे जैसी ॥३६६॥
तेवीं मनःषष्ठां ययां । इंद्रियांतें धनंजया । देहराजु ने देहा । पासूनि गेला ॥३६७॥
श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥९॥
मग येथ अथवा स्वर्गीं । जेथ जें देह आपंगी । तेथ तैसेंचि पुढती पांगी । मनादिक ॥३६८॥
जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेधवां । तैसाचि फांके ॥३६९॥
तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी । येतुलें हें किरीटी । गमेचि गा ॥३७०॥
जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेंचि भोगिला । अथवा देहोनि गेला । हें साचचि मानिती ॥३७१॥
एऱ्हवीं येणें आणि जाणें । कां करणें हा भोगणें । हें प्रकृतीचें तेणें । मानियेलें ॥३७२॥
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥१०॥
यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥११॥
परी देहाचे मोटकें उभें । आणि चेतना तेथ उपलभे । तिये चळवळेचेनि लोभें । आला म्हणती ॥३७३॥
तैसेंचि तयां संगती । इंद्रियें आपुलाल्या अर्थीं वर्तती । तया नांव सुभद्रापती । भोगणें जया ॥३७४॥
पाठीं भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे । तेथें गेला गेला ऐसें । बोभाती गा ॥३७५॥
पैं रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथें पांडवा । नाहीं तो गा ? ॥३७६॥
कां आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपें तेथ देखिजे । तरी तेधवांचि जालें मानिजे । काय आधीं नाहीं ? ॥३७७॥
कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा । तरी आपणपें नाहीं ऐसा । निश्चयो करावा ? ॥३७८॥
शब्द तरी आकाशाचा । परी कपाळीं पिटे मेघाचा । कां चंद्रीं वेगु अभ्राचा । अरोपिजे ॥३७९॥
तैसें होइजे जाइजे देहें । तें आत्मसत्ते अविक्रिये । निष्टंकिती गा मोहें । आंधळे ते ॥३८०॥
येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं । देखिजे देहींचा धर्मु देहीं । ऐसें देखणें तें पाहीं । आन आहाती ॥३८१॥
ज्ञानें कां जयाचे डोळे । देखोनि न राहती देहींचे खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसें ॥३८२॥
तैसे विवेकाचेनि पैसें । जयांची स्फूर्ती स्वरूपीं बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयातें ॥३८३॥
जैसें तारांगणीं भरलें । गगन समुद्रीं बिंबलें । परी तें तुटोनि नाहीं पडिलें । ऐसें निवडे ॥३८४॥
गगन गगनींचि आहे । हें आभासे तें वाये । तैसा आत्मा देखती देहें । गंवसिलाही ॥३८५॥
खळाळाच्या लगबगीं । फेडूनि खळाळाच्या भागीं । देखिजे चंद्रिका कां उगी । चंद्रीं जेवीं ॥३८६॥
कां नाडरचि भरे शोषें । सूर्यु तो जैसा तैसाचि असे । देह होतां जातां तैसें । देखती मातें ॥३८७॥
घटु मठु घडले । तेचि पाठीं मोडले । परी आकाश तें संचलें । असतचि असे ॥३८८॥
तैसें अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पितें । हें देहचि होतें जातें । जाणती फुडें ॥३८९॥
चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे । ऐसें आत्मज्ञानें चोखटें । जाणती ते ॥३९०॥
आणि ज्ञानही आपैतें होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल । सकळ शास्त्रांचें येईल । सर्वस्व हातां ॥३९१॥
परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिगे मानसीं । तरी सर्वात्मका मजसीं । नव्हेचि भेटी ॥३९२॥
पैं तोंड भरो कां विचारा । आणि अंतःकरणीं विषयांसि थारा । तरी नातुडें धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ॥३९३॥
हां गा वोसणतयाच्या ग्रंथीं । काई तुटती संसारगुंती ? । कीं परिवसिलिया पोथी । वाचिली होय ? ॥३९४॥
नाना बांधोनियां डोळे । घ्राणीं लाविजती मुक्ताफळें । तरी तयांचें काय कळे । मोल मान ? ॥३९५॥
तैसा चित्तीं अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे मातें ॥३९६॥
जो एक मी कां समस्तीं । व्यापकु असें भूतजातीं । ऐक तिये व्याप्ती । रूप करूं ॥३९७॥
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥१२॥
तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी । ते दीप्ति माझी जाणावी । आद्यंतीं आहे ॥३९८॥
जल शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता । ते चंद्रीं पंडुसुता । ज्योत्स्ना माझी ॥३९९॥
आणि दहन पाचनसिद्धी । करीतसे जें निरवधी । ते हुताशीं तेजोवृद्धी । माझीचि गा ॥४००॥
गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥१३॥
मी रिगालों असें भूतळीं । म्हणौनि समुद्र महाजळीं । हे पांसूचि ढेंपुळी । विरेचिना ॥४०१॥
आणी भूतेंही चराचरें । हे धरितसे जियें अपारें । तियें मीचि धरी धरे । रिगोनियां ॥४०२॥
गगनीं मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसें अमृता । भरला जालों चालता । सरोवरु ॥४०३॥
तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार । सर्वौषधींचे आगर । भरित असें मी ॥४०४॥
ऐसेनि सस्यादिकां सकळां । करी धान्यजाती सुकाळा । दें अन्नद्वारां जिव्हाळा । भूतजातां ॥४०५॥
आणि निपजविलें अन्न । तरी तैसें कैचें दीपन । जेणें जिरूनि समाधान । भोगिती जीव ॥४०६॥
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥१४॥
म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठी । दीप्ति जठरींही किरीटी । मीचि जालों ॥४०७॥
प्राणापानाच्या जोडभातीं । फुंकफुंकोनियां अहोराती । आटीतसें नेणों किती । उदरामाजीं ॥४०८॥
शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें कां विदग्धें । परी मीचि गा चतुर्विधें । अन्नें पचीं ॥४०९॥
एवं मीचि आघवें जन । जना निरवितें मीचि जीवन । जीवनीं मुख्य साधन । वन्हिही मीचि ॥४१०॥
आतां ऐसियाहीवरी काई । सांगों व्याप्तीची नवाई । येथ दुजें नाहींचि घेईं । सर्वत्र मी गा ॥४११॥
तरी कैसेनि पां वेखें । सदा सुखियें एकें । एकें तियें बहुदुःखें । क्रांत भूतें ॥४१२॥
जैसी सगळिये पाटणीं । एकेंचि दीपें दिवेलावणी । जालिया कां न देखणी । उरलीं एकें ॥४१३॥
ऐसी हन उखिविखी । करित आहासि मानसीं कीं । तरी परिस तेही निकी । शंका फेडुं ॥४१४॥
पैं आघवा मीचि असें । येथ नाहीं कीर अनारिसें । परी प्राणियांचिया उल्लासें । बुद्धि ऐसा ॥४१५॥
जैसें एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषीं आनानीं । वाजावें पडे भिन्नीं । नादांतरीं ॥४१६॥
कां लोकचेष्टीं वेगळालां । जो हा एकचि भानु उदैला । तो आनानी परी गेला । उपयोगासी ॥४१७॥
नाना बीजधर्मानुरूप । झाडीं उपजविलें आप । तैसें परिणमलें स्वरूप । माझें जीवां ॥४१८॥
अगा नेणा आणि चतुरा । पुढां निळयांचा दुसरा । नेणा सर्पत्वें जाला येरा । सुखालागीं ॥४१९॥
हें असो स्वातीचें उदक । शुक्तीं मोतीं व्याळीं विख । तैसा सज्ञानांसी मी सुख । दुःख तों अज्ञानांसी ॥४२०॥
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ॥१५॥
एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥४२१॥
परी संतासवें वसतां । योगज्ञानीं पैसतां । गुरुचरण उपासितां । वैराग्येंसीं ॥४२२॥
येणेंचि सत्कर्में । अशेषही अज्ञान विरमे । जयांचें अहं विश्रामे । आत्मरूपीं ॥४२३॥
ते आपेआप देखोनि देखीं । मियां आत्मेनि सदा सुखी । येथें मीवांचून अवलोकीं । आन हेतु असे ? ॥४२४॥
अगा सूर्योदयो जालिया । सूर्यें सूर्यचि पहावा धनंजया । तेवीं मातें मियां जाणावया । मीचि हेतु ॥४२५॥
ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरवचि ऐकतां । देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥४२६॥
ते स्वर्गसंसारालागीं । धांवतां कर्ममार्गीं । दुःखाच्या सेलभागीं । विभागी होती ॥४२७॥
परी हेंही होणें अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना । जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेतें होय ॥४२८॥
पैं अभ्रें दिवसु हरपला । तोहि दिवसेंचि जाणों आला । तेवीं मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूतीं ॥४२९॥
एवं निद्रा कां जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया । तेवीं ज्ञाना अज्ञाना जीवां यां । मीचि मूळ ॥४३०॥
जैसें सर्पत्वा कां दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा । तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियांचि सिद्धु ॥४३१॥
म्हणौनि जैसा असें तैसया । मातें नेणोनि धनंजया । वेदु जाणों गेला तंव तया । जालिया शाखा ॥४३२॥
तरी तिहीं शाखाभेदीं । मीचि जाणिजे त्रिशुद्धी । जैसा पूर्वापरा नदी । समुद्रचि ठी ॥४३३॥
आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपतीं शब्देंसीं । जैसिया सगंधा आकाशीं । वातलहरी ॥४३४॥
तैसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसें निवांत । तें मीचि करीं यथावत । प्रकटोनियां ॥४३५॥
पाठीं श्रुतिसकट अशेष । जग हारपे जेथ निःशेष । तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥४३६॥
जैसें निदेलिया जागिजे । तेव्हां स्वप्नींचे कीर नाहीं दुजें । परी एकत्वही देखों पाविजे । आपलेंचि ॥४३७॥
तैसें आपलें अद्वयपण । मी जाणतसें दुजेनवीण । तयाही बोधाकारण । जाणता मीचि ॥४३८॥
मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । उरणें नाहीं वीरा । जयापरी ॥४३९॥
तेवीं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये । तऱ्ही नाहीं कीर नोहे । आणि न साहे असणेंही ॥४४०॥
पैं विश्व घेऊनि गेला मागेंसीं । तया चोरातें कवण कें गिंवसी ? । जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ॥४४१॥
ऐसी जडाजडव्याप्ती । रूप करितां कैवल्यपती । ठी केली निरुपहितीं । आपुल्या रूपीं ॥४४२॥
तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनीं उमटला कैसा । व्योमींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवीं ॥४४३॥
कां प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे । तैसा अर्जुनें आणि वैकुंठें । नांदतसे बोधु ॥४४४॥
तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तंव तंव गोडिये थांवो । म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे ॥४४५॥
जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक जें आतां । स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ॥४४६॥
ते एक वेळ अव्यंगवाणें । कीजो कां मजकारणें । तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भलें केलें ॥४४७॥
पैं अर्जुना आम्हांहि वाडेंकोडें । अखंडा बोलों आवडे । परी काय कीजे न जोडे । पुसतें ऐसें ॥४४८॥
आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तूं केवळ । जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसों ॥४४९॥
जें अद्वैताहीवरी भोगिजे । तें अनुभवींच तूं विरजे । पुसोनि मज माझें । देतासि सुख ॥४५०॥
जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा । तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी ॥४५१॥
तुवां नेणोनि पुसावें । मग आम्ही परिसऊं बैसावें । तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ॥४५२॥
ऐसें म्हणौनि आलिंगिलें । कृपादृष्टी अवलोकिलें । मग देवो काय बोलिले । अर्जुनेंसीं ॥४५३॥
पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें । तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ॥४५४॥
एवं आम्ही तुम्ही येथें । देखावें एका अर्थातें । सांगतें पुसतें येथें । दोन्ही एक ॥४५५॥
ऐसा बोलत देवो भुलला मोहें । अर्जुनातें आलिंगूनि ठाये । मग बिहाला म्हणे नोहें । आवडी हे ॥४५६॥
जाले इक्षुरसाचें ढाळ । तरी लवण देणें किडाळ । जे संवादसुखाचें रसाळ । नासेल थितें ॥४५७॥
आधींच आम्हां यया कांहीं । नरनारायणासी भिन्न नाहीं । परी आतां जिरो माझ्या ठाईं । वेगु हा माझा ॥४५८॥
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । पैं गा तो तुवां कैसा । प्रश्नु केला ? ॥४५९॥
जो अर्जुन श्रीकृष्णीं विरत होता । तो परतोनि मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐकों आला ॥४६०॥
तेथ सद्गदें बोलें । अर्जुनें जी जी म्हणितलें । निरुपाधिक आपुलें । रूप सांगा ॥४६१॥
यया बोला तो शारङ्गी । तेंचि सांगावयालागीं । उपाधी दोहीं भागीं । निरूपीत असे ॥४६२॥
पुसिलिया निरुपहित । उपाधि कां सांगे येथ । हें कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ॥४६३॥
तरी ताकाचें अंश फेडणें । याचि नांव लोणी काढणें । चोखाचिये शुद्धी तोडणें । कीडचि जेवीं ॥४६४॥
बाबुळीचि सारावी हातें । परी पाणी तंव असे आइतें । अभ्रचि जावें गगन तें । सिद्धचि कीं ॥४६५॥
वरील कोंडियाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा । कणु घेतां विरंगोळा । असे काई ? ॥४६६॥
तैसा उपाधि उपहितां । शेवटु जेथ विचारितां । तें कोणातेंही न पुसतां । निरुपाधिक ॥४६७॥
जैसें न सांगणेंवरी । बाळा पतीसी रूप करी । बोल निमालेपणें विवरी । अचर्चातें ॥४६८॥
पैं सांगणेया जोगें नव्हे । तेथींचें सांगणें ऐसें आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आदीं ॥४६९॥
पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेवीं औपाधिका । बोली इया ॥४७०॥
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥१६॥
मग तो म्हणे गा सव्यसाची । पैं इये संसारपाटणींची । वस्ती साविया टांची । दुपुरुषीं ॥४७१॥
जैसी आघवांचि गगनीं । नांदत दिवोरात्री दोन्ही । तैसे संसार राजधानीं । दोन्हीचि हे ॥४७२॥
आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहींचें नांव न साहे । जो उदेला गांवेंसीं खाये । दोहींतें ययां ॥४७३॥
परी ते तंव गोठी असो । आधीं दोन्हींची हे परियेसों । जें संसारग्रामा वसों । आले असती ॥४७४॥
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगें पुरता चांगु । परी ग्रामगुणें संगु । घडला दोघां ॥४७५॥
तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु । इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ॥४७६॥
आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु । हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचूं गा ॥४७७॥
तरी महदहंकारा । लागुनियां धनुर्धरा । तृणांतींचा पांगोरा । वरी पैं गा ॥४७८॥
जें कांहीं सानें थोर । चालतें अथवा स्थिर । किंबहुना गोचर । मनबुद्धींसि जें ॥४७९॥
जेतुलें पांचभौतिक घडतें । जें नामरूपा सांपडतें । गुणत्रयाच्या पडतें । कामठां जें ॥४८०॥
भूताकृतीचें नाणें । घडत भांगारें जेणें । काळासि जूं खेळणें । जिहीं कवडां ॥४८१॥
जाणणेंचि विपरीतें । जें जें कांहीं जाणिजेतें । जें प्रतिक्षणीं निमतें । होऊनियां ॥४८२॥
अगा काढूनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचें आंग । हें असो बहु जग । जया नाम ॥४८३॥
पैं अष्टधा भिन्न ऐसें । जें दाविलें प्रकृतिमिसें । जें क्षेत्रद्वारां छत्तिसें । भागी केलें ॥४८४॥
हें मागील सांगों किती । अगा आतांचि जें प्रस्तुतीं । वृक्षाकार रूपाकृती । निरूपिलें ॥४८५॥
तें आघवेंचि साकारें । कल्पुनी आपणपयां पुरे । जालें असें तदनुसारें । चैतन्यचि ॥४८६॥
जैसा कुहां आपणचि बिंबें । सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे । मग क्षोभला समारंभें । घाली तेथ ॥४८७॥
कां सलिलीं असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसें । अद्वैत होऊनि तैसें । द्वैत घेपे ॥४८८॥
अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरीं । आत्मा विस्मृतीचि करी । निद्रा तेथ ॥४८९॥
पैं स्वप्नीं सेजार देखिजे । मग पहुडणें जैसें तेथ कीजे । तैसें पुरीं शयन देखिजे । आत्मयासी ॥४९०॥
पाठीं तिये निद्रेचेनि भरें । मी सुखी दुःखी म्हणत घोरें । अहंममतेचेनि थोरें । वोसणायें सादें ॥४९१॥
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझें हें ना ॥४९२॥
ऐसिया वेंघोनि स्वप्ना । धांवत भवस्वर्गाचिया राना । तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥४९३॥
आतां ऐक क्षेत्रज्ञु येणें । नामें जयातें बोलणें । जग जीवु कां म्हणे । जिये दशेतें ॥४९४॥
जो आपुलेनि विसरें । सर्व भूतत्वें अनुकरें । तो आत्मा बोलिजे क्षरें । पुरुष नामें ॥४९५॥
जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आली पुरुषता । वरी देहपुरीं निदैजतां । पुरुषनामें ॥४९६॥
आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला । जे उपाधींचि आतला । म्हणौनियां ॥४९७॥
जैसी खळाळीचिया उदका । सरसीं आंदोळे चंद्रिका । तैसा विकारां औपाधिका । ऐसाचि गमे ॥४९८॥
कां खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तैं सरिसींच भ्रंशे । तैसा उपाधिनाशीं न दिसे । उपाधिकु ॥४९९॥
ऐसें उपाधीचेनि पाडें । क्षणिकत्व यातें जोडे । तेणें खोंकरपणें घडे । क्षर हें नाम ॥५००॥
एवं जीवचैतन्य आघवें । हें क्षर पुरुष जाणावें । आतां रूप करूं बरवें । अक्षरासी ॥५०१॥
तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पैं धनुर्धरा । तो मध्यस्थु गा गिरिवरां । मेरु जैसा ॥५०२॥
जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गीं । इहीं न भेदे तिहीं भागीं । तैसा दोहीं ज्ञानाज्ञानांगीं । पडेना जो ॥५०३॥
ना यथार्थज्ञानें एक होणें । ना अन्यथात्वें दुजें घेणें । ऐसें निखिळ जें नेणणें । तेंचि तें रूप ॥५०४॥
पांसुता निःशेष जाये । ना घटभांडादि होये । तया मृत्पिंडा ऐसें आहे । मध्यस्थ जें ॥५०५॥
पैं आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु । तया ऐशी अनाकारु । जे दशा गा ॥५०६॥
पार्था जागणें तरी बुडे । परी स्वप्नाचें कांहीं न मांडे । तैसिये निद्रे सांगडें । न्याहाळणें जें ॥५०७॥
विश्व आघवेंचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे । तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नाम ॥५०८॥
सर्वां कळीं सांडिलें जैसें । चंद्रपण उरे अंवसे । रूप जाणावें तैसें । अक्षराचें ॥५०९॥
पैं सर्वोपाधिविनाशें । हे जीवदशा जेथ पैसे । फळपाकांत जैसें । झाड बीजीं ॥५१०॥
तैसें उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ । तयातें अव्यक्त । बोलती गा ॥५११॥
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । फळभावो तयाचा ॥५१२॥
जयासी कां बीजभावो । वेदांतीं केला ऐसा आवो । तो तया पुरुषा ठावो । अक्षराचा ॥५१३॥
जेथूनि अन्यथाज्ञान । फांकोनि जागृति स्वप्न । नानाबुद्धीचें रान । रिगालें असे ॥५१४॥
जीवत्व जेथुनी किरीटी । विश्व उठतचि उठी । ते उभय भेदांची मिठी । अक्षरु पुरुषु ॥५१५॥
येरु क्षर पुरुषु कां जनीं । जिहीं खेळे जागृतीं स्वप्नीं । तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ॥५१६॥
पैं अज्ञानघनसुषुप्ती । ऐसैसी जे कां ख्याती । या उणी एकी प्राप्ती । ब्रह्माची जे ॥५१७॥
साचचि पुढती वीरा । जरी न येतां स्वप्न जागरा । तरी ब्रह्मभावो साचोकारा । म्हणों येता ॥५१८॥
परी प्रकृतिपुरुषें दोनी । अभ्रें जालीं जियें गगनीं । क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नीं । देखिला जियें ॥५१९॥
हें असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा । मूळ तें रूप पुरुषा । अक्षराचें ॥५२०॥
हा पुरुषु कां म्हणिजे । जे पूर्णपणेंचि निजें । पैं मायापुरीं पहुडिजे । तेणेंही बोलें ॥५२१॥
आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । नेणिजे जिये माझारीं । ते सुषुप्ती गा हा ॥५२२॥
म्हणौनि यया आपैसें । क्षरणें या नसे । आणिकेंही हा न नाशे । ज्ञानाउणें ॥५२३॥
यालागीं हा अक्षरु । ऐसा वेदांतीं डगरु । केला देशी थोरु । सिद्धांताच्या ॥५२४॥
ऐसें जीवकार्य कारण । जया मायासंगुचि लक्षण । अक्षर पुरुषु जाण । चैतन्य तें ॥५२५॥
उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ॥
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥१७॥
आतां अन्यथाज्ञानीं । या दोनी अवस्था जया जनीं । तया हरपती घनीं । अज्ञानतत्त्वीं ॥५२६॥
तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया । जैसा वन्हि काष्ठ जाळूनियां । स्वयें जळे ॥५२७॥
तैसें अज्ञान ज्ञानें नेलें । आपण वस्तु देऊनि गेलें । ऐसें जाणणेंनिवीण उरलें । जाणतें जें ॥५२८॥
तें तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय कां निष्कर्षु । दोहींहून आणिकु । मागिला जो ॥५२९॥
सुषुप्तीं आणि स्वप्ना । पासूनि बहुवें अर्जुना । जागणें जैसें आना । बोधाचेंचि ॥५३०॥
कां रश्मी हन मृगजळा । पासूनि अर्कमंडळा । अफाटु तेवीं वेगळा । उत्तमु गा ॥५३१॥
हें ना काष्ठींचा काष्ठाहुनी । अनारिसा जैसा वन्ही । तैसा क्षराक्षरापासुनी । आनचि तो ॥५३२॥
पैं ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदां । उठी कल्पांतीं उदावादा । एकार्णवाचा ॥५३३॥
तैसें स्वप्न ना सुषुप्ती । ना जागराची गोठी आथी । जैसी गिळिली दिवोराती । प्रळयतेजें ॥५३४॥
मग एकपण ना दुजें । असें नाहीं हें नेणिजे । अनुभव निर्बुजे । बुडाला जेथें ॥५३५॥
ऐसें आथि जें कांहीं । तें तो उत्तम पुरुषु पाहीं । जें परमात्मा इहीं । बोलिजे नामीं ॥५३६॥
तेंही एथ न मिसळतां । बोलणें जीवत्वें पंडुसुता । जैसी बुडणेयाची वार्ता । थडियेचा कीजे ॥५३७॥
तैसें विवेकाचिये कांठीं । उभें ठाकलिया किरीटी । परावराचिया गोठी । करणें वेदां ॥५३८॥
म्हणौनि पुरुषु क्षराक्षरु । दोन्ही देखोनि अवरु । यातें म्हणती परु । आत्मरूप ॥५३९॥
अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी । सूचिजे गा अवधारीं । पुरुषोत्तमु ॥५४०॥
एऱ्हवीं न बोलणेंचि बोलणें । जेथिंचें सर्व नेणिवा जाणणें । कांहींच न होनि होणें । जे वस्तु गा ॥५४१॥
सोऽहं तेंही अस्तवलें । जेथ सांगतेंचि सांगणें जालें । द्रष्टत्वेंसी गेलें । दृश्य जेथ ॥५४२॥
आतां बिंबा आणि प्रतिबिंबा । माजीं कैंची हें म्हणों नये प्रभा ? । जऱ्ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना ॥५४३॥
कां घ्राणा फुला दोहीं । द्रुती असे जे माझारिलां ठायीं । ते न दिसे तरी नाहीं । ऐसें बोलों नये ॥५४४॥
तैसें द्रष्टा दृश्य हें जाये । मग कोण म्हणे काय आहे । हेंचि अनुभवें तेंचि पाहें । रूप तया ॥५४५॥
जो प्रकाश्येंवीण प्रकाशु । ईशितव्येंवीण ईशु । आपणेंनीचि अवकाशु । वसवीत असे जो ॥५४६॥
जो नादें ऐकिजता नादु । स्वादें चाखिजता स्वादु । जो भोगिजतसे आनंदु । आनंदेंचि ॥५४७॥
जो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा पुरुषोत्तमु । विश्रांतीचाही विश्रामु । विराला जेथें ॥५४८॥
सुखासि सुख जोडिलें । जें तेज तेजासि सांपडलें । शून्यही बुडालें । महाशून्यीं जिये ॥५४९॥
जो विकासाहीवरी उरता । ग्रासातेंही ग्रासूनि पुरता । जो बहुतें पाडें बहुतां । पासूनि बहु ॥५५०॥
पैं नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती । रुपें न होनि शुक्ती । दावी जेवीं ॥५५१॥
कां नाना अलंकारदशे । सोनें न लपत लपालें असे । विश्व न होनियां तैसें । विश्व जो धरी ॥५५२॥
हें असो जलतरंगा । नाहीं सिनानेपण जेवीं गा । तेवीं दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो ॥५५३॥
आपुलिया संकोचविकाशा । आपणचि रूप वीरेशा । हा जळीं चंद्र हन जैसा । समग्र गा ॥५५४॥
तैसा विश्वपणें कांहीं होये । विश्वलोपीं कहीं न जाये । जैसा रात्रीं दिवसें नोहे । द्विधा रवि ॥५५५॥
तैसा कांहींचि कोणीकडे । कायिसेनिहि वेंचीं न पडे । जयाचें सांगडें । जयासीचि ॥५५६॥
यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥१८॥
जो आपणपेंचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया । काय बहु बोलों जया । नाहीं दुजें ॥५५७॥
तो गा मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु । म्हणौनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ॥५५८॥
यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥१९॥
परी हें असो ऐसिया । मज पुरुषोत्तमातें धनंजया । जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रें ॥५५९॥
चेइलिया आपुलें ज्ञान । जैसें नाहींचि होय स्वप्न । तैसें स्फुरतें त्रिभुवन । वावों जालें ॥५६०॥
कां हातीं घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कांटाळा । तैसा माझेनि बोधें टवाळा । नागवे तो ॥५६१॥
लेणें सोनेंचि जो जाणें । तो लेणेंपण तें वावो म्हणे । तेवीं मी जाणोनि जेणें । वाळिला भेदु ॥५६२॥
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु । मीचि एकु स्वतःसिद्धु । जो आपणेनसीं भेदु । नेणोनियां जाणे ॥५६३॥
तेणेंचि सर्व जाणितलें । हेंही म्हणणें थेंकुलें । जे तया सर्व उरलें । द्वैत नाहीं ॥५६४॥
म्हणौनि माझिया भजना । उचितु तोचि अर्जुना । गगन जैसें आलिंगना । गगनाचिया ॥५६५॥
क्षीरसागरा परगुणें । कीजे क्षीरसागरचिपणें । अमृतचि होऊनि मिळणें । अमृतीं जेवीं ॥५६६॥
साडेपंधरा मिसळावें । तैं साडेपंधरेंचि होआवें । तेवीं मी जालिया संभवे । भक्ति माझी ॥५६७॥
हां गा सिंधूसि आनी होती । तरी गंगा कैसेनि मिळती ? । म्हणौनि मी न होतां भक्ती । अन्वयो आहे ? ॥५६८॥
ऐसियालागीं सर्व प्रकारीं । जैसा कल्लोळु अनन्यु सागरीं । तैसा मातें अवधारीं । भजिन्नला जो ॥५६९॥
सूर्या आणि प्रभे । एकवंकी जेणें लोभें । तो पाडु मानूं लाभे । भजना तया ॥५७०॥
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयाऽनघ ॥
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात् कृतकृत्यश्च भारत ॥२०॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तम योगोनाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
एवं कथिलयादारभ्य । हें जें सर्व शास्त्रैकलभ्य । उपनिषदां सौरभ्य । कमळदळां जेवीं ॥५७१॥
हें शब्दब्रह्माचें मथितें । श्रीव्यासप्रज्ञेचेंनि हातें । मथुनि काढिलें आयितें । सार आम्हीं ॥५७२॥
जे ज्ञानामृताची जाह्नवी । जे आनंदचंद्रींची सतरावी । विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ॥५७३॥
म्हणौनि आपुलेनि पदें वर्णें । अर्थाचेनि जीवेंप्राणें । मीवांचोनि हों नेणें । आन कांहीं ॥५७४॥
क्षराक्षरत्वें समोर जालें । तयांचें पुरुषत्व वाळिलें । मग सर्वस्व मज दिधलें । पुरुषोत्तमीं ॥५७५॥
म्हणौनि जगीं गीता । मियां आत्मेनि पतिव्रता । जे हे प्रस्तुत तुवां आतां । आकर्णिली ॥५७६॥
साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र । पैं संसारु जिणतें हें शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें ॥५७७॥
परी तुजपुढां सांगितलें । तें अर्जुना ऐसें जालें । जें गौप्यधन काढिलें । माझें आजि ॥५७८॥
मज चैतन्यशंभूचा माथां । जो निक्षेपु होता पार्था । तया गौतमु जालासि आस्था । निधी तूं गा ॥५७९॥
चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हां ॥५८०॥
कां भरलें चंद्रतारांगणीं । नभ सिंधू आपणयामाजीं आणी । तैसा गीतेसीं मी अंतःकरणीं । सूदला तुवां ॥५८१॥
जे त्रिविधमळिकटा । तूं सांडिलासि सुभटा । म्हणौनि गीतेसीं मज वसौटा । जालासि गा ॥५८२॥
परी हें बोलों काय गीता । जे हे माझी उन्मेषलता । जाणे तो समस्ता । मोहा मुके ॥५८३॥
सेविली अमृतसरिता । रोगु दवडूनि पंडुसुता । अमरपण उचितां । देऊनि घाली ॥५८४॥
तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया । परी आत्मज्ञानें आपणापयां । मिळिजे येथ ॥५८५॥
जया आत्मज्ञानाच्या ठायीं । कर्म आपुलेया जीविता पाहीं । होऊनियां उतराई । लया जाय ॥५८६॥
हरपलें दाऊनि जैसा । मागु सरे वीरविलासा । ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादाचा ॥५८७॥
म्हणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य करूं सरलें देखा । ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो ॥५८८॥
तें श्रीकृष्णवचनामृत । पार्थीं भरोनि असे वोसंडत । मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ॥५८९॥
तो धृतराष्ट्र राया । सूतसे पान करावया । म्हणौनि जीवितांतु तया । नोहेचि भारी ॥५९०॥
एऱ्हवीं गीताश्रवण अवसरीं । आवडों लागतां अनधिकारी । परि सेखीं तेचि उजरी । पातला भली ॥५९१॥
जेव्हां द्राक्षीं दूध घातलें । तेव्हां वायां गेलें गमलें । परी फळपाकीं दुणावलें । देखिजे जेवीं ॥५९२॥
तैसी श्रीहरीवक्त्रींचीं अक्षरें । संजयें सांगितलीं आदरें । तिहीं अंधु तोही अवसरें । सुखिया जाला ॥५९३॥
तेंचि मऱ्हाटेनि विन्यासें । मियां उन्मेषें ठसेंठोंबसें । जी जाणें नेणें तैसें । निरोपिलें ॥५९४॥
सेवंतीये अरिसि कांहीं । आंग पाहतां विशेषु नाहीं । परी सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणिजे ॥५९५॥
तैसें घडतें प्रमेय घेइजे । उणें तें मज देइजे । जें नेणणें हेंचि सहजें । रूप कीं बाळा ॥५९६॥
तरी नेणतें जऱ्ही होये । तऱ्ही देखोनि बाप कीं माये । हर्ष केंहि न समाये । चोज करिती ॥५९७॥
तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजें । तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजो जी ॥५९८॥
आतां विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा । तो अवधारू वाक पूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥५९९॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां पंचदशोऽध्यायः ॥