पूर्वार्ध - अभंग ७०१ ते ८००
श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.
शेतकरी शहाणा । अल्पजागीं पेरी बीबियाणा । बदल्यांत बहुत दाणा । पदरी पाडी ॥७०१॥
परमात्मा देतो जसा । दान तूं करी तसा । विसरून नंतर जा कसा । सफल होई पूर्ण ॥२॥
मधुर गोड हितकारी । वचना बोलसी सदा जरी । मुक्तानंदा, जरूर पडे कशास तरी । मंत्र पुरश्चरणाची ॥३॥
प्रियवचन मधुर भाषण । रसुयक्त धार्मिक व्याख्यान । होऊनि जातें संकीर्तन । तेणें आपोआप ॥४॥
करी करवी पाही यज्ञ । यथाशक्ती योग्यतेनें करून । जनतेची सेवा घे जाणुन । जनार्दन-यज्ञच कीं ॥५॥
नको निंदूं यज्ञ । नको घालूं मध्यें विघ्न । करी पेक्षां मनन । यज्ञाची इष्टता ॥६॥
तस्मात् सर्वगतं ब्रह्म । नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् । भगवन्ताचें इति वचनम् । गीतेमधुन ॥७॥
यज्ञाचा महिमा पूर्णा । जाणी प्राज्ञ । न असे बुद्धिमान । पागल भ्रमिष्ट ॥८॥
सुगंधाचें हुंगणें । अंतर तृप्ती तेणें । अन्नास भक्षणें । जठराग्नीची तृप्ती ॥९॥
यदि रूप-दर्शन । नेत्रांची तृप्ती होऊन । स्वस्तुती ऐकून । सारे सुखावती ।७१०॥
मग काय यज्ञामधुन । यज्ञदैवत नारायण । न राहणार पावुन । तृप्ती अशी ॥११॥
अन्नमय पृथिवी । अन्नरसा उपजवी । आपणास जन्मवी । अन्नमय कोषांत ॥१२॥
अन्नानें होतें पोषण । अन्नमय देहीं प्रेम किती पण । अन्नांत सामावे देह अन्नपूर्ण । अंतःसमयीं ॥१३॥
पूर्ण ब्रह्म अन्न । खावें थोडेंच औषधासमान । प्रसाद मानुनी करितां ग्रहण । अमृत बने ॥१४॥
औषधासाठीं मात्रेचे वळसे । अन्नही खावें मोजकें तसें । मर्यादेनें सम्मानानें खातां कसें । अन्न बने स्वर्ग ॥१५॥
अन्न खावें जगण्यास रसाळ । प्रेमानें सेतोषानें वाढविण्या बळ । खाण्य़ासाठीं जगुं नये केवळ । अन्न हें पूर्णब्रह्म ॥१६॥
आरोग्य बल कीर्ती । उत्साह आणि स्फूर्ती । सारे कांहीं उपजती । नियमीत आहारें ॥१७॥
तसेंच नष्ट पावती । अनियमित आहारानें ती । याद राखुनी अस इती । मुक्तानंदा ॥१८॥
अन्नानें समजोनि खाई । आत्मबोधें जीवन वितरी । नियमीत व्यवहार संयमही । मानवधर्म ॥१९॥
धर्माविना जगणें । मानवतेस योग्य नसणें । धर्मापालन ज्ञात करणें । धर्मच ईश्वर ॥७२०॥
सर्वांभूतीं एकात्म भावना । क्षमाशीलता स्वकष्ट-निर्मरतांना । परस्पर देवो भवाच्या आचरणा । जाणी मानवधर्म ॥२१॥
विषम व्यबहारांतुन । आवश्यक समदर्शन । समत्व असे लक्षण । योगाचें कीं ॥२२॥
डोळ्यांनीं बघतों । कानीं ध्वनी परिसतों । जिव्हेनें बोलतों, रस चाखतों । पदीं चालतों ॥२३॥
इंद्रियें अशीं अनेक । व्यवहारी भिन्न प्रत्येक । परी शरीर एक । म्हणुनी सम असती ॥२४॥
भेदद्दष्टी विषम व्यवहार । उच्चनीच भावनेचा आविष्कार । अंतःकरण स्थिति नष्ट करणार । समताच सुखदायी ॥२५॥
कुटुंब ज्याचें मोठें । परिवार पुरा आपुला वाटे । बहुत राहती एककट्ठे । अभेद वृत्तीनें ॥२६॥
एकाचाच सारा वंशविस्तार । असाच परमात्म्याचा संसार । वसुदेव कुटुम्बाचाच परिवार । विश्वव्यापी ॥२७॥
वासुदेवैक कुटुंबकचें अज्ञान । ना विश्वबन्धुत्वप्रेमाचरण । मुक्तानंदा सुखी संसार-जीवन । तोंवरी नाहीं ॥२८॥
परस्पर देवोभव । वृत्तीचा अभ्यास एव । साधनेनंतर आचरण हवं । मानवधर्म हाची ॥२९॥
ह्यामध्यें राष्ट्रोन्नती । आहे भक्ती । पूर्ण योजनाही ती । विकासाची ॥७३०॥
सर्वजण जोंवरी । परस्पर देवोभावाचाच परी । जपुनी न घे तरी । मंत्र हा साचा ॥३१॥
भेदमंत्र तोंवरी । ह्रदयाच्या बाहेरी । घालविण्याची कामगिरी । न कोणी करी ॥३२॥
परस्परांनीं एकमेकांप्रती । पूज्य सम्माननीय भाववृत्ती । मुक्तानंद, ठेवितो खरी शान्ती । स्वप्नींही न दिसे ॥३३॥
घुबड जसा दिनसमयीं । प्रकाशा पाहात नाहीं । कावळा जसा रात्रीं । न देखे प्रकाश ॥३४॥
मुक्तानंदा तसा ज्ञान दयेंत । विद्यमान, व्यवहारी जगतांत । दर्शन नसे करत । अज्ञानाचें ॥३५॥
तत्त्वसमुदायाचें निरीक्षणा । करण्यानें शुद्धात्म बनुन । पुन्हा शुद्धता सोडुन । न राही आपुली ॥३६॥
निद्रिस्त न देखे व्यवहारा । जागा न पाही स्वप्नपसारा । मुक्तानंदा, ज्ञानीही लोक सारा । न बघे ज्ञानावस्थेंत ॥३७॥
कान असुनही बहिरा न ऐके । अन्ध दिवसाही द्दश्य न देखे । जीभ असुनी बोलूं न शके । मुका मनुष्य ॥३८॥
गुरुप्रसादप्राप्त नर । जगातांतील व्यवहार । मुक्तानंदा असाच खरोखर । न पाही ॥३९॥
अन्तर शान्ती, सौम्य स्थिती । अद्वैत वृत्ती, कल्पनातीत गती । मुक्तानंदा ही खरी प्राप्ती । अव्यवहाराही हाच ॥७४०॥
समुदायी नर नारी । विलास सारा संसारीं । एका आत्म्याचाच तरी । दुजा न कोणाचा ॥४१॥
निवृत्त करूं पाहतां वृत्ती । अंतरीं भासे बहु किती । नानात्व नाममात्राचें अती । पूर्ण सत्य एकच ॥४२॥
निघाला सत्यापासूनी । नसे भिन्नता पावुनी । सत्यरूप सत्यांत असुनी । सत्यही मूर्तिमंत ॥४३॥
मुक्तानंदा जें दिसे । तें सत्य असे स्वात्म-विमर्श होतसे । सत्यच ॥४४॥
पंचतत्त्वाचे पंचवीस विभाग । त्यांच्यामध्यें रूप न्यूनाधिक । मानवी देहरचना आणिक । राही अशी ही ॥४५॥
अण्डज जारज स्वेदज । चवथी उद्बीज । मुक्तानंदा पांच पंचवीसाची मोज- । दाद सारी ॥४६॥
नको समजूं अलग । जगता व्यवहारिक । इथें तर पाही एकी । खालील गोष्टी ॥४७॥
नित्यानन्द-वटिका वेदान्ता-शाला । शिकुनी घेण्याला । परीक्षा उत्तीर्ण करण्याला । तसेंच डिग्रीसाठीं ॥४८॥
ह्रदयही वैकुंठ । भूलोक कैलास गोलोक । हो बैकुंठवार्ता नाहक । ह्रदयीं न देखतां ॥४९॥
एक परम पिता । एक अव्यय माता । ह्यांचें कुटुम्ब तत्त्वतां । मानवसंसार सारा ॥७५०॥
मनुष्य न बने जोंवरी । ह्या ज्ञानदशेचा पूजारी । आपुलें रुदन तोंवरी । ना थांबेल ॥५१॥
मोह ईर्षा आशा । मध्यें भेदनिवास असा । भ्रमापासुनी येई दशा । अज्ञानवाढीची ॥५२॥
अन्यांप्रती परभाव । मुक्तानंदा हेंचि दुःखाल्य । शांती कोठली तेथ होय । दूर ती राही ॥५३॥
भेद केवळ मूढता । अशास्त्रीय सर्वता । ना मानवता । देखील ॥५४॥
भेद नसे नीती । भेदभाव जगतीं । नरकवाद इती । जाणुनी घेई ॥५५॥
परमात्मा एक । त्याची द्दष्टी एक । सन्तान एक-। सम त्याचें ॥५६॥
भेद त्यांत न अधिक । न तो न्यूनाधिक । एकांतील अनेकता प्रत्येक । मुक्तानंदा, महामंत्र मृत्यूचा ॥५७॥
देशदेशांतरीचा भेद । भाषाभाषावाद । नामरूपामधील भेद । हे सारे ॥५८॥
मतामतांचा गलबला । मुक्तानंदा हा असला । यज्ञ-कुण्ड ठरला । नरकाचाच ॥५९॥
विशाल पृथ्वी एक । जल एक, वायु एक । जळता अग्नी एक । हे सारे एकेक ॥७६०॥
अवकाशाचें आकाश एक । सर्वाधार चैतन्यात्मा एक । मुक्तानंदा, असे का आणिक । अन्य कांहीं ॥६१॥
व्यर्थ नरजन्मा येऊनी । संसारभारवाहु होवोनि । कोणता पुरुषार्थ करोनी । जगीं दाविला ॥६२॥
नरदेह प्राप्त झाला । आहार निद्रा घेत गेला । भय, मैथुन विना न पावाला । परम अर्थ कांहीं ॥६३॥
जगीं कशास आला । निःखार्थी विचार न केला । स्वार्थी जीवन जगला । ह्या क्षणापावेतों ॥६४॥
द्वन्द्व धर्माची । रागद्वेषाची । पूजाविना प्रेम अप्रेमाची । न पावला आत्मविश्रांती ॥६५॥
न जाणला आत्मा मुमुक्षुत्वानें । स्थिर न केला वैराग्यानें । न दिधलें दान खुल्या मनानें । परमेश्वरदत्त जें ॥६६॥
मोक्षत्वाची नसे सिद्धता । न योगांगाची पारंगतता । भक्तीही न पावतां । राहिलें कोरडा ॥६७॥
संगती सिद्धाची न ठेवीली । न कुसंगती त्यागीली । सत्संगाची ना कास धरीली । आजपावेतों ॥६८॥
निष्फल जीवन किती । आजतक घातविलें अती । जन्मा येऊनी जगतीं । कमाविलें काय ॥६९॥
नियम पाळिलेस कोणते । पशुपक्षी कीटकाहुनी अधिक ते । कोणत्या पावलास सुखलाभातें । सांग पाहूं ॥७७०॥
मुक्तानन्दा जसा । आलास गेलस तसा । नित्यानंदानुभूतीचा ना कसा । लाभ घेतलास ॥७१॥
झोपुनी राही कोठवर । नाही का जागा होणार । इतका खुश कसा राहणार । अज्ञानदिद्रेमध्यें ॥७२॥
संसारीं सारी रडकथाअ । हसणें सोडुनी सर्वथा । रडारडींत मानीशी का यथार्थता । पुर्या खुशीनें ॥७३॥
निश्चिंतता सोडीशी । आरडाओरडा करीशी । रडत बसशी । सदोदीत ॥७४॥
मरणारा मरण्यांत खुशी । मूढ मना चपलता जर त्यागीशी । बनुनी जाशी संतोषी । श्रीगुरुनित्यानंदीं ॥७५॥
लोभाच्या लोलुपतेंत । क्रोधाग्नीमध्यें जळता । जीवन असे जगत । राहण्या का नरजन्म ॥७६॥
आजतक पुरुषार्थ हाच मानला । संसारचक्कींत पिसुन निघाला । रडारडीचा धनी मात्र झाला । जन्मा येऊनी ॥७७॥
आळसानें शुभकर्मत्याग केला । न गुरु ईश भक्तीनें पावला । तसाच ना पूर्ण विरक्तीला । प्राप्त केलें ॥७८॥
संस्कारांचे मागें धावला । मुक्तानंदा परमार्थरूप असला । वैदूर्य हिर्यास मुकला । तेणेंकरूनी ॥७८०॥
आज जें खाल्लें । तेंच उद्यां भक्षिलें । पुढेंही मिळेल ना म्हटलें । चिंता ही जाळी ॥८१॥
न मानीला गुरुचा आदेश । न पाळीला शास्त्रांचा उपदेश । न केला सत्संग विशेष । केव्हांही कधीं ॥८२॥
गाफील राहिला तूं मुक्तानंद । जागा होऊनि धर पदारविन्द। तव गुरुचे नित्यानंद । अजुनी तरी ॥८३॥
म्हणे मी दास रामाचा । गुलाम परी दामाजीचा । श्वानापरी धंदा गल्लोगल्लीं फिरण्याचा । मुक्तानंदा, ही फकीरी कशी ॥८४॥
ज्यानें न केलें प्राप्त अजुनी । त्याच्या सान्निध्यांतही जाऊनी । साथ न ठरे कोणी । बहुत काल ॥८५॥
प्राप्त केलेल्याच्या ठायीं पूर्ण । केलें जाई समर्पण । माधारीं जाऊं शके कोणी न । त्यापासुनी ॥८६॥
मानव यदि दुसर्या मानवास । संतुष्ट खुश करण्यास । यत्न करी खुशामती बनण्यास । जनादरास पात्र होई ॥८७॥
झटे परकल्याणार्थ परंतु । ठेवुनि अंतरीं हेतु । परमात्म्याप्रीत्यर्थु । तरीच पावे सौख्यातें ॥८८॥
परमात्म्याच्या जगतीं । सच्चेपणानें जे वर्तती । निर्मल आचरण ठेविती । त्यांना जरी ॥८९॥
कोणी न मानीलें । काय त्यांत बिघडलें । मुक्तानंदा, समज तुज वन्दीलें । सार्या जगानें ॥७९०॥
परी जोंपर्यंत । राम नाहीं मानत । लौकिक सन्मानाचें तोंपर्यंत । प्रयोजन कसलें ॥९१॥
परमात्म्याचा परिचय होतां । पूर्णरूपीं मिळुन जातां । सर्वांची ओळख तत्त्वतां । होऊन जाई ॥९२॥
ह्रदयीं जर ह्रदयस्थ प्रगटेल । सर्व कलाकार देतील । सहकार्य पूर्ण मिळेल । सहजासहजीअं ॥९३॥
बनविशी ह्रदय-महाल आदर्शपूर्ण । सर्वांचें होइल तें आकर्षण । दागेदार भटकण्याचें कारण । पडे कशाला ॥९४॥
अन्तरींचें स्फुरण । बाहेरी होतें विलासपूर्ण । आंतबाहेरी एकच समान । मुक्तानंदा ही शिवद्दष्टी ॥९५॥
भाग्य तोच मान । सौभाग्याचीही खाण । ह्रदयीं जो प्रकट असोन । रसमय परमात्मा ॥९६॥
ह्रदयीं देदीप्यमान । ज्योतिर्मय आत्मा राही प्रकटुन । अंतरीं त्यातें न मानुन । राही जो आपुल्या ॥९७॥
त्याची अशी गती । कल्पवृक्षाखालती । उभा परी दरिद्रीप्रती । अज्ञानानें ॥९८॥
ह्रदयस्थ असोनी । अनेक पुण्यात्म्यांचा होवोनी । अनुभूतीचा विषय राहोनी । तरी देखील ॥९९॥
आम्हा अनुभूती कां नसे येत । असे बोल जेथ उठत । ते अभागी नव्हत । का सांग ॥८००॥
N/A
References : N/A
Last Updated : July 01, 2011
TOP