उत्तरार्ध - अभंग १०१ ते २००
श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.
कोठेंही असशी हिंडत । तूंच तुला होइल प्राप्त ।’ रमेति राम’ अयोध्येंत । तोही तूंच ॥१॥
’ कर्षतीति कृष्ण ’ गोकुळींचा । ’शुभं करोतीति शिव’ काशीचा । परशिव कैलासीचा । तूंच असे ॥२॥
वैकुंठवासी श्रीविष्णु तूं । सर्वांमधी एकच व्याप्त तूं । मुक्तानंदा, न जाणतां हें परंतु । अद्वैतबोध होइना ॥३॥
जगरूप जगदीश । जगदीश जगतांत । तूं जगदीशांत । एकता अनंतांत । मुक्तानंदा ॥४॥
आहे एकच अनंत । अनंतांत एक दडत । एकाचेच अनेक घडत । न अन्य देखण्या कांहीं ॥५॥
लोण्याहुनि तूप न अलग । तिळाहुनि ना तेल विलग । जग जगदीश संलग । असेच ॥६॥
मुक्तानंदा मीपणा मिटवुनि । जगताकडे पुन्हा देखोनि । पाहशील जगदीशाहुनि । अन्य ना कोणी ॥७॥
तंतुपट कंकण कनक । नुपुर रजत मृण्मयमटक । मुक्तानंदा जीव जगत एक । केवळ नित्यानंद ॥८॥
एकच असे तत्त्व । व्याप्तींत ज्याच्या सर्व विश्व । मानवा, त्याग भेदाभेद भाव । सर्वात्मक नित्यानंदा भज ॥९॥
सारा पूर्ण संसार । अधिष्ठित परमेश्वरावर । परमात्मा प्रकटित हा प्रसार । पाही गुरुनेत्रानें ॥११०॥
द्दष्टीची सृष्टी । चित्त विषय वृत्ती । अन्यतेची पुष्टी । कारण ॥११॥
मुक्तानंदा आत्मा एक । भासतो अनेक । आपपर भावाचा उद्रेक । समज अन्य म्हणुन ॥१२॥
पूर्ण समज ना जोंवरी । माया जीव ईश तोंवरी । मुक्तानंदा भिन्नता वरी । मानवास ॥१३॥
समज पूर्ण करी जेव्हां विवेक । जगत परमात्म्याचें एक । असे परमानंदमय नाटक । कळुं लागे ॥१४॥
आत्माच विलसे एक । उंचनीच प्रत्येक । कधीं राजा कधीं रंक । बने तोच ॥१५॥
मुक्तानंदा राजाचाच रंक होतो । रंकच राजा बनतो । एकच बहुरूपी नटतो । नाटक एकपात्री ॥१६॥
एकच बनला दोन । अद्धैत द्वैत होऊन । श्रीसंभुतीच जगतरूपानं । सच्चिदानंद प्रगटवी ॥१७॥
मुक्तानंदा भेदाभेद वृत्तीनें । त्याग ग्रहण द्वंद्वानें । हैराण कशास तूं मी पणानें । शांत होऊनि राही ॥१८॥
अंतरमुखी वृत्ती । बहिर्मुखी प्रवृत्ती । ही शास्त्रभ्रमंती । दे सोडुनि ॥१९॥
अंतरीं जें वसे । बाहेरी तें दिसे । अंतरबाह्य एकच असे । पूर्णपणें ॥१२०॥
समजण्या शास्त्रमर्म । कळण्या अंतरंग वर्म । अनुभवणें हाच धर्म । नसे अन्य कर्म ॥२१॥
शास्त्रांतर्गत अंतर्मुखी । तथाकथित बहिर्मुखी । मुक्तानन्दा ही सारी सुखासुखी । एक महा उपाधी ॥२२॥
ब्रह्मज्ञान भ्रम अल्प स्वल्प । जड चेतन भेद विकल्प । परान्यूनता दर्शन संकल्प । न करी कोणा महान ॥२३॥
मुक्तानंदा चेतनच साकारी । जड आकार घरी । जसें जल हिमाकारी । भासतें ॥२४॥
पापपुण्य कल्पना । असे अज्ञानवश भावना । खांबच चोर भासे कांहींना । पोरबुद्धीकारणें ॥२५॥
परमेश्वरनिर्मित संसार । सदोष त्यातें देखकर । अंतःकरण ना कर । भ्रष्ट उगाच ॥२६॥
मुक्तानन्दा जगांतच जगदीश । निर्दोषताच सदोष । सूक्ष्म हा सृष्टीविशेष । जाणुनि घेई ॥२७॥
परमेश्वर उदित जगत । परमेश्वर बनुनि परमेश्वरांत । मुक्तानंदा तूंही परम प्रेमांत । पारमेश्वरीच ॥२८॥
महाशक्ति कुंडलिनी । जगताचा महाप्राण मालिनी । जगत प्रभावीत हिच्या प्रभावांनीं । मुक्तानंदा जाणी हिला ॥२९॥
जगत चितिशक्ति विलासमय । भासमान चिती जगदाकार होय । तिला अपुला इष्ट माननीय । समज मुक्तानंदा ॥१३०॥
पारमेश्वरी शक्ति पूरित । हें चितिविश्व विलसत । महापापी सदोष दर्शन घेतात । मुक्तानंदा, ना अन्य कोणी ॥३१॥
तंतुचेंच वस्त्र पुरेपूर । सुवर्णाचेच अलंकार । सर्व जगतच परमेश्वर । मुक्तानदा ॥३२॥
चितिशक्तिचाच विलास । नको घेऊं जगीं दुसरा तलास । कशास होशी धनी पापास । निष्कारण ॥३३॥
सोन्याचीच अनंत आभूषणं । अंतरबाह्य सर्वत्र सुवर्ण । मुक्तानंदा तूंही तसाच चितीपूर्ण । अंतरबाह्य चिती जाण ॥३४॥
सुवर्णाचें वाकी कंकण । धोतर साडी सुताचीच वीण । घागर घडा मृत्तिकेची घडण । जशी तशी ॥३५॥
ही चिती भगवती । साकारीत सार्या मूर्ती । मुक्तानंदा बने नर नारी व्यक्ती । स्वतः आपण ॥३६॥
दोन्ही नर व नारी । एकच चिन्मय पुरी । समान रूपधारी । असोनि ॥३७॥
मुक्तानंदा लिंगभेद । त्यागी जो दुःखद । चिन्मय चिती अभेद । नसे मुळीं द्वैती ॥३८॥
शिवच शक्ति । शक्तिनेंच शिवव्याप्ती । होते जेव्हां जागृति । अंतरशक्तीची ॥३९॥
तेव्हां शिवशक्तीचें समावेशन । एकता पावती दोन । मुक्तानन्दा कळों ये अभिन्न । शिवशक्ती ॥१४०॥
चितीच लक्ष्मी सरस्वती काली । वितीनेंच व्याप्त जगत मुळीं । मुक्तानन्दा हीच चिती आपुली । कुण्डलिनी होय ॥४१॥
जेथ कुंऽलिनी जाग्रण । मुक्तानन्दा भाग्योदय तेथ संपूर्ण । ह्रदयीं राम प्रगटे पूर्ण । बन कुंडलिनीप्रेमी ॥४२॥
कुल कुण्डलिनी जागृति । नेत्रीं तेजा ये अती चढते वाढते गंधशक्ति । घ्राणेन्द्रियाची ॥४३॥
रसभरित होते जिव्हा ती । ह्रदयीं खेळूं लागे मस्ती । जीवनानंदाची अनुभूती । येऊं लागे ॥४४॥
अन्न लागे रुचकर । दारिद्य पळे दूर । वृद्धावस्थेंतही तारुण्य फार । दिसों लागे ॥४५॥
मुक्तानन्दा कुंडलिनी इच्छाशक्ति । उमाकुमारी जीवनज्योति । योगीयांची आनंदकळा जागती । ज्ञानींची संविती ॥४६॥
दूर देश दिसे अती नजीक । वाणीला ये महावक्तृत्व एक । देव संगीतयुक्त बने मस्तक । आराधी कुंडलिनी ॥४७॥
कुंडलिनीचें होतां जाग्रण । अंगोपांगीं तां थै तां थै नर्तन । रक्त कणोकणीं उसळे स्फुरण । बेहोष मस्ती ही ॥४८॥
जगमग चमके अंतःकरण । नील पीत श्वेत ज्योती दर्शन । वीणाभेरी मृदंगादि नादश्रवण । गुरुकृपा कंडलिनी महाप्रासाद ॥४९॥
प्राप्त करी अंतर समजा पूर्ण । समजांत सामावे सारें संपूर्ण । समजदार सुखी परिपूर्ण । राही दुःखामध्येंही ॥१५०॥
समज सर्वाक्ष । समज प्रकाश । समज श्रेष्ठ मूल्य विशेष । मुक्तानंदा मिळवी अन्तरसमज ॥५१॥
प्राप्त करी अंतरज्ञान । अंतरज्ञान अती महान । मुक्तानंदा, ध्यानाचें पर्यवसान । ज्ञानांतच होई ॥५२॥
अधिक भाषण । न समजे ज्ञान । तसेंच व्याख्यान -। विलास ज्ञान नसे ॥५२अ॥
अंतरंग होतां एकवट । आत्मफूर्ति प्रकट । सत्यज्ञान चोखट । मुक्तानंदा हेंचि ॥५३॥
पढाइची बढाई -। पेक्षां श्रेष्ठ ह्रदयस्फुरण चढाइ । नित्यानंदकृपा जधीं होइ । अंतरस्फूर्ति लाभे ॥५४॥
कवीच्या काव्यांत । उपनिषद मंत्रांत । मस्ती असे मस्त । आत्मरसाची ॥५५॥
मुक्तानंदा पुस्तकी ज्ञानाहुन । मस्तक-ज्ञान महान । मस्तकांतुन पुस्तकें गहन । निघती ना ॥५६॥
नरकवी लाखो गणती । वर कवीची एकच निपज ती । निराधार नरकवी असती । वर कवी आत्माराम प्रसाद ॥५७॥
शश-श्रृंग स्थाणु-चोर । मरु-मरीचिका फसविणार । मुक्तानंदा, नरकान्याचेंही खरोखर । तसेंच प्रयोजन ॥५८॥
न समजतां बोलतो । न पाहतां सांगतो । प्रवचनेंही देतो । श्रवण न घडतां ॥५९॥
अनुभूतीविना केवी । कसा हा म्हणवी । मुक्तानन्दा, स्वतःस कवी । वांझ कवी केवळ ॥१६०॥
ग्रुरुप्रेरिता बोलतो । हरिप्रेरित कार्य करतो । स्वकर्म प्रकाशतो । परमप्रकाशें ॥६१॥
मुक्तानन्दा, महाकवी तोच । असे परमात्मा उवाच । निरोपितो साच । गुरुवचन ॥६२॥
विना अंतरात्मा प्रसाद । पढत पढाईची मुक्तानंद । बढाई कोठपर्यंत । सांग चालेल ॥६३॥
मुक्तानंदा, पुस्तकी ज्ञान । अननुभूति शिक्षण । दुसर्यास गुरुज्ञान संपन्न । बनवणार नाहीं ॥६४॥
चतुर्वेदी झाला । अंगीं सार्या कला । जाणलें व्याकरणाला । निःशेष ॥६५॥
बुद्धीनें प्रगल्भ संपन्न । भक्तही म्हणवी महान । मुक्तानंदा तरी विना ज्ञान । अंध तो जाण ॥६६॥
वक्तृत्वांत बृहस्पति । पूर्ण नाडी शुद्धगती । आकर्षक रूपवान अती । शुकमुनी जैसा ॥६७॥
भीमवत शक्तिशाली । अतिकुशल रचनावलीं । विना मुख ज्ञानाची खोली । अस्तित्वा अर्थ नाहीं ॥६८॥
सर्वशास्त्रपारंगत । सर्व कलावंत । पूरी डिग्री प्राप्त । जरी झाली ॥६९॥
जागृत नसे अंतरशक्ति । मुक्तानन्दा तोंवरी शांती । गवसणार कोणाप्रती । सांग बरें ॥१७०॥
पारमेश्वरी कृपा अद्भुत । वर्षे सर्वत्र सर्वां नित्य । गुरुबोधाविना ज्ञानविलास सत्य । मुत्कानन्दा अज्ञान भ्रम ॥७१॥
जसा असे भाव । तसा स्वजगतोद्भव । मुक्तानंदा निजस्वभाव । नित्यानंदमय बनव ॥७२॥
सार्या मानवांत नित्यानंद । सर्वांचा जो परमपूज्यपद । ज्ञानविना ह्या, मुक्तानंद । व्यर्थ पस्तावीशी ॥७३॥
परमेश्वराचा न्याय । तेथ ना देख अन्याय । तर्क कुतर्कमय । नको बनवुं ॥७४॥
पाण्डित्याची पगडी । झडकरी काढी । मुक्तानंदा असुं दे आवडी । मस्त रहा आत्मानंदीं ॥७५॥
गीता गा होउनी कृष्ण । अर्जुनापांती गीतेचें श्रवण । वसिष्ठापरी रामायण । कथन करी ॥७६॥
ऐक अध्यात्म रामभावांत । पावशील क्षणीं अमृत । भावपूर्ण साधना प्रभावीत । ऐशी होईल ॥७७॥
ह्या जगतीं ज्ञानहीन दशा । हीच जाणी दुर्दशा । प्राप्त करी गुरुज्ञानेशा । मुक्तानंदा ॥७८॥
करी गुरु-ज्ञान । ह्या जगा महान । भू-कैलास निर्मुन । भूलोकीं ॥७९॥
अज्ञानींना जगत दुःखपूर्ण । शून्य ह्र्दया जगत शून्य संपूर्ण । तेंच मंगलमय परिपूर्ण । गुरुप्रेमिकांना ॥१८०॥
होतां अंतर गुरुज्ञानोदय । मग सर्व आत्मविलासमय । प्रचीती येण्या न लगे समय । थोडाही, मुक्तानंदा ॥८१॥
निरिच्छ उदासीन । कामनारहित मन । स्तब्धवृत्तीनें अमन । जेथ आहे ॥८२॥
ह्रदयमध्यंतरीं । अहैतुकी संतोष भरी । मुक्तानंदा तोच खगेखरी । सच्चिदानंद परमात्मा ॥८३॥
मानवाचा चित्तार्क । त्याचा बने स्वर्ग वा नर्क । मुक्तानंदा स्वचित्तीं कुतर्क । नको येऊं दे ॥८४॥
चित्तप्रसाद न जोंवरी । स्वर्गांतही अशांती तोंवरी । मुक्तानंदा, चित्तप्रसाद प्राप्त करी । मानवसंज्ञा लाभेल ॥८५॥
भावाविना नसे भक्ति । भक्तिविना न शक्ति । शक्तिहीनास शांती । कोठुनि प्राप्त ॥८६॥
चित्तशांतीच चिरशांती । चित्तशांती जीवनप्राप्ती । नसे मानवा चित्तशांती । मुक्तानंदा काय कामाचा तो ॥८७॥
वैराग्य विना मन उपशम । साधन कशी विना शम दम । मुक्तानंदा, नष्ट न अहम् । स्वरूप साक्षात्कार कसा ॥८८॥
परमानंदमय । परमेश्वर विलासयुक्त ह्रदय । असूनहि मुक्तानंदा हाय । तुझें चित्त ॥८९॥
करी दोषचिंतन । त्यांतच जाई रमुन । आश्चर्य हें महान । खरोखरी ॥१९०॥
पूर्णरूप चिती चित्तांत । केवढा तूं सौभाग्यवंत । मुक्तानंदा कां व्यर्थ चिंतन । राहशी नर्क ॥९१॥
चित्ताची कमाई । चिती चिंतनीं रमाई भलाई । सोडी चिंतन पापमयी । परदोषांचें ॥९२॥
मानव शरीर दुर्लभ्य । पावेल अहो भाग्य महाभाग्य । मुक्तानंदा जेव्हां मुक्त चित्त योग्य । नर्क चिंतनापासुनि ॥९३॥
करी लायकीची प्राप्तता । दाखवी आपुली योग्यता । वाढवी तशीच पावित्रता । मुक्तानंदा ॥९४॥
परछिद्रान्वेषणांत । अंतरींचें अमृत । वाहूं देण्यांत । कसली धन्यता ॥९५॥
त्यागुनि नित्यानंद अमृतरस । जिव्हे, पिशी परनिंदा नर्करस । मुक्तानंदा, नित्यानन्दस्मृति सरस । निंदानर्क चिंतनीं नको आस ॥९६॥
नको परदोषकथन । मूर्खा पापाचें कशास रोचन । पर पापपर निन्दा करून । निन्दानेता होणा का ॥९७॥
बुद्धिहीनता म्हणुन । जंगली पशु राही नरक खाऊन । वनपक्षी तसाचा नरक पिऊन । बुद्धीच्या अवकृपेनें ॥९८॥
मुक्तानंदा मानव तर बुद्धिशाली । न म्हणवी स्वतःतें जंगली । निंदा नरकाची चटक असली । मग कशास ॥९९॥
कावळ्यास नरकाची आवडी । पोपटास संगीताची गोडी । डुक्कर दुर्गन्धी चिखल चिवडी । स्वर्ग मानुनी त्यास ॥२००॥
N/A
References : N/A
Last Updated : July 01, 2011
TOP