अध्याय १ ला - श्लोक ३१ ते ४०

स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .


निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।

न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥३१॥

कौरवांचा वध । जरी वाटे चांग । न मारुं कां सांग । धर्मादिकां ॥३३३॥

आम्ही आप्तजन । सर्व हि निभ्रांत । एक चि ना गोत । एकमेकां ॥३३४॥

म्हणोनियां देवा । जळो जळो झुंज । माने ना हें मज । कांहीं केल्या ॥३३५॥

महा -पातकाचा । कां गा व्हावें धनी । दिसे मज हानि । सर्वस्वाची ॥३३६॥

ऐसें वाट आतां । टाळिली लढाई । तरी आशा कांहीं । कल्याणावी ॥३३७॥

न काङेक्ष विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।

किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥३२॥

येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।

त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यत्वा धनानि च ॥३३॥

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।

मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्वन्धिनस्तथा ॥३४॥

देखोनि हें मज । नको नको जय । राज्य तरी काय । कशासाठीं ॥३३८॥

वधोनि हे सर्व । भोगावे जे भोग । लागो तयां आग । पार्थ बोले ॥३३९॥

ऐशा भोगाभावीं । कैसी हि आपदा । येवो तो गोविंदा । साहवेल ॥३४०॥

पुढें उभे कोण । गुरु भीष्म -द्रोण । सुखें वेचूं प्राण । ह्यांच्यासाठीं ॥३४१॥

वधोनियां ह्यांते । घ्यावें राज्य -सुख । स्वप्नांत हि देख । इच्छूं ना हें ॥३४२॥

कां गा जन्मा यावें । जगावें किमर्थ । जरी चितूं घात । वडिलांचा ॥३४३॥

कुळीं ह्याचिसाठीं । इच्छिती का पुत्र । कीं तयें स्व -गोत्र । निर्दाळावें ॥३४४॥

मनीं तरी कां हा । आणावा विचार । कां व्हावें कठोर । वज्राऐसें ॥३४५॥

घडे तरी घडो । ह्यांचें कांहीं हित । वागणें उचित । हें चि आम्हां ॥३४६॥

जें जें कांहीं आम्ही । संपादावें येथें । उपभोगावें तें । सर्वानीं च ॥३४७॥

जरी ह्यांच्या काजीं । वेंचलें जीवित । तरी त्यांत हित । सर्वथैव ॥३४८॥

दिगंतींचे राजे । जिंकोनि सकळ । तोषवावें कुळ । आपुलें जें ॥३४९॥

परी कर्म -गति । कैसी विपरीत । तें चि आलें येथ । झुंजावया ॥३५०॥

स्त्रिया मुलें सर्व । सांडोनि भांडार । शस्त्राग्रीं जिव्हार । ठेवोनियां ॥३५१॥

पाहें झाले सज्ज । लढावया आज । ऐसेम हे गोत्रज । आमुचे चि ॥३५२॥

देवा तूं चि सांग । ह्यांसी कैसें मारुं । कोणावरी धरुं । शस्त्र आतां ॥३५३॥

आपुला आपण । करावा का घात । असे हें उचित । काय आम्हां ? ॥३५४॥

लढावया आले । जाणसी ना कोण । देखें भीष्म -द्रोण । पलीकडे ॥३५५॥

आम्हांवरी ज्यांचे । थोर उपकार । कैसें करुं ठार । तयांलागीं ॥३५६॥

सासरे मेहुणे । आणि हे आतुल । बांधव सकल । आमुचे चि ॥३५७॥

पुत्र नातू आप्त । सोयरे समस्त । संबंध निकट । एकमेकां ॥३५८॥

करुं वध ह्यांचा । ऐसें बोले वाचा । तरी हि तयाचा । दोष लागे ॥३५९॥

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।

अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥३५॥

ह्याहिवरी हे तों । हवें तें करोत । आतां चि मारोत । आम्हांलागीं ॥३६०॥

परी आम्हीं ह्यांचा । कदापि निःपात । न चिंतावा येथ । मनानें हि ॥३६१॥

त्रिलोकींचे राज्य । सर्व झालें प्राप्त । तरी अनुचित । नाचरें हें ॥३६२॥

मनीं कोणाच्याहि । नुरेल आदर । जरी ऐसें घोर । कृत्य केलें ॥३६३॥

तुझें मुख कैसें । दिसेल आम्हांसी । जरी आम्हीं ह्यांसी । घात चिंतूं ॥३६४॥

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।

पापमेवाऽऽश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥३६॥

गोत्रजांचा घात । घडेल हातून । तरी मी ठरेन । पाप -राशि ॥३६५॥

महा -पुण्यें घेसी । आमुचा कैवार । तो तूं आम्हां दूर । होशील कीं ॥३६६॥

कुलाचा संहार । होतां चि अशेष । जडतील दोष । आम्हांलागीं ॥३६७॥

तिये वेळीं मग । तुज देवराया । आम्ही कोणे ठायां । शोधावें गा ? ॥३६८॥

उपवनीं अग्नि । देखोनि प्रबळ । क्षण ना कोकिळ । राहे तेथें ॥३६९॥

कर्दमें भरलें । देखे सरोवर । तरी तें चकोर । त्यजी जेवीं ॥३७०॥

तया परी मातें । सोडिशील देवा । पुण्याचा ओलावा । संपतां चि ॥३७१॥

घालोनियां मातें । मायेची भुरळ । दूर तूं जाशील । ठकवोनि ॥३७२॥

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ‍ ।

स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥३७॥

नाना परी वाटे । सदोष हें कर्म । ना करीं संग्राम । ह्यांच्या संगें ॥३७३॥

आम्हांलागीं तुझा । होतां चि वियोग । काय उरे मग । सांगें कृष्णा ॥३७४॥

कौरवांचा घात । करावा भोगार्थ । घडे ना ही मात । पार्थ म्हणे ॥३७५॥

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।

कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ‍ ॥३८॥

कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ‍ ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्धिर्जनार्दन ॥३९॥

जरी अभिमानें । होवोनि उन्मत्त । ठाकले युद्धार्थ । कौरव हे ॥३७६॥

तरी लागे आम्हां । पहावें स्व -हित । ऐसें माझें मत । भगवंता ॥३७७॥

वधावे हे कैसे । आपुले आप्तेष्ट । घ्यावें कालकूट । जाणतां चि ॥३७८॥

अहो मार्गी ठाके । सिंह अकस्मात । चुकवितां हित । नोहे काय ? ॥३७९॥

असता प्रकाश । सांडोनियां दूर । सेवितां अंधार । काय लाभ ? ॥३८०॥

भडकला अग्नि । देखोनि समोर । नाहीं झालों दूर । तेथोनियां ॥३८१॥

तरी आपणातें । जैसा तो घेरुन । टाकील जाळून । क्षणामाजीं ॥३८२॥

तैसे महादोष । येथें मूर्तिमंत । आदळूं पहात । अंगावरी ॥३८३॥

जाणोनि कां व्हावें । युद्धासी प्रवृत्त । कृष्णाप्रति पार्थ । ऐसें बोले ॥३८४॥

म्हणे देवा आतां ऐकावी सर्वथा । महाभीषणता । पापाची ह्या ॥३८५॥

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कृलं कुत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥४०॥

काष्ठावरी होतां। काष्ठांचे घर्षण । उपजे त्यांतून । अग्नि जो का ॥३८६

होतां तो प्रदीप्त । जैसे काष्ठजात । जाळोनि टाकीत । समस्त हि ॥३८७॥

तैसा गोत्रीं वध । होतां परस्पर । तेणें दोषें घोर । कुलक्षय ॥३८८॥

होता कुलक्षय । लोपे कुलधर्म । संचरे अधर्म । कुळामाजीं ॥३८९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP