अध्याय ३ रा - श्लोक १ ते १०

स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .


अर्जुन उवाच ---

ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।

तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥१॥

ऐका मग पार्थ । केशवातेम बोले । देवा , सांगितलें । तुवां जें का ॥१॥

तें तुझें भाषण । ऐकिलें मी चांग । आतां मज सांग । रमा -कांता ॥२॥

पाहतां निष्कर्ष । कर्म आणि कर्ता । नुरे चि तत्त्वतां । आत्मरुपीं ॥३॥

ऐसें तुझें मत । निश्चित अनंता । असे तरी आतां । मजलागीं ॥४॥

म्हणसी कां पार्था । करीं हा संग्राम । कासया हें कर्म । महा -घोर ॥५॥

ऐशा कर्मी मज । योजितां संकोच । वाटे ना कांहीं च । कैसा तुज ॥६॥

सर्व हि कर्माचा । करोनि निषेध । तूं चि आत्म -बोध । वाखाणिसी ॥७॥

तरी कां गा ऐसें । कर्म हिंसात्मक । करविसी देख । माझ्या हातें ॥८॥

आतां मनीं तूं चि । विचारोनि पाहें । सुसंगत का हें । हृषीकेश ॥९॥

जरी मनिसी ना । अल्प हि कर्मासी । कां गा करविसी । ऐसी हिंसा ? ॥१०॥

व्यामिश्रेणेव व्याक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।

तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ‍ ॥२॥

त्वां चि जरी ऐसें । बोलावें श्रीहरी । संपला चि तरी । विवेक तो ॥११॥

आम्ही नेणत्यांनी । ऐशा स्थितिमाजीं । काय करावें जी , । हृषीकेशा ॥१२॥

जरी हा ऐसा च । तुझा उपदेश । काय मति -भ्रंश । आणिक तो ॥१३॥

व्हावा आत्मबोध । लागली उत्कंठा । भागली ती आतां । भली बापा ! ॥१४॥

वैद्य पथ्यपाणी । सांगोनियां जाई । मग विष देई । आपण चि ॥१५॥

तरी सांगें रोगी । वांचेल तो कैसा । वाटे तुझा तैसा । उपदेश ॥१६॥

आंधळ्यासी जैसें । न्यावें आडवाटे । किंवा मर्कटातें । झिंगवावें ॥१७॥

तैसा उपदेश । हा तुझा गोपाळा । भला प्राप्त झाला । आम्हांलागीं ! ॥१८॥
आम्हीं तों अजाण । वरी मोहग्रस्त । म्हणोनियां हित । विचारिलें ॥१९॥

तंव तुझें देवा । एकैक नवल । आदेशीं केवळ । गुंतागुंत ॥२०॥

तुजलागीं ऐसा । शरण जो आला । घालावें का त्याला । घोंटाळ्यांत ॥२१॥

तुझिया बोलासी । तन -मन -जीवें । आम्हीं वोळंगावें । पद्मनाभा ॥२२॥

आणि तुंवा जरी । करावें ऐसेंच । तरी संपलें च । म्हणों आतां ॥२३॥

आतां ह्याच परी । बोधिसी आम्हांसी । तरी तें करिसी । चांगलें च ! ॥२४॥

नको ती ज्ञानाची । धरावया आस । ह्यापुढें आम्हांस । पार्थ म्हणे ॥२५॥

ज्ञान तें राहिलें । राहो देवा , देख । परी झालें एक । आणिक हें ॥२६॥

माझ्या मतें होते । योजिलें निश्चित । मात्र गुंता त्यांत । झाला आतां ॥२७॥

तेविं कृपासिंधो । प्रभो तुझी लीला । कळे ना आम्हांला । सर्वथैव ॥२८॥

करोनियां काय । बोधाचें निमित्त । पाहतोसी येथ । चित्त माझें ॥२९॥

किंवा प्रभो माझें । करिसी वंचन । सांगसी कीं ज्ञान । गूढार्थानें ॥३०॥

कांहीं च ह्यांतील । नये अनुमाना । म्हणोनि प्रार्थना । तुज आतां ॥३१॥

देवा , नको बोलूं । बोल ऐसें गूढ । तत्त्व तें उघड । सांगें मज ॥३२॥

मी तों असे जरी । मूढाहून मूढ । परी भाव दृढ । तुझ्या ठायीं ॥३३॥

म्हणोनियां तूं हि । ऐसें चि बोलावें । होय जें स्वभावें । एकनिष्ठ ॥३४॥

रोगियासी द्यावें । औषध साचार । रोग -परिहार । करील जें ॥३५॥

परी तें असावें । जैसें सुमधुर । आणि रुचकर । आगळें चि ॥३६॥

सांगावें उचित । तैसें तत्त्वज्ञान । जें का परिपूर्ण । सकळार्थे ॥३७॥

तेविं तें असावें । सुबोध अत्यंत । जेणें माझें चित्त । प्रकाशेल ॥३८॥

देवा तुजऐसा । लाभला सद्‌गुरु । तरी कां न करुं । इच्छा -तृप्ति ॥३९॥

आताम येथें भीड । धरावी कोणाची । देवा तूं आमुची । माउली च ॥४०॥

दैवें कामधेनु । जाहली स्वाधीन । तरी कां गा वाण । कामनेची ॥४१॥

किंवा जरी भाग्यें । चिंतामणि जोडे । कासया सांकडें । वासनेचें ॥४२॥

मग जें जें कांहीं । आपुलें वांछित । कां तें मनोगत । इच्छावें ना ॥४३॥

अमृत -सागरा -। सन्निध येवोनि । रहावें होवोनि । तृषाक्रांत ॥४४॥

तरी कां करावे । मागील सायास । तीर गांठायास । जाहले जे ॥४५॥

तैसा जन्मोजन्मीं । उपासितां तुज । सुदैवें तूं आज । लाभलासी ॥४६॥

तरी इच्छी मन । तें तुझ्यापासोन । आतां कां मागोन । घेऊं नये ॥४७॥

जाहला कीं आज । मानसा सुकाळ । पुरले सकळ । मनोरथ ॥४८॥

सर्व हि इच्छांचे । सफल जीवन । यशा आलें पूर्ण । पूर्वपुण्य ॥४९॥

कीं जो सर्वश्रेष्ठ । मांगल्याचें धाम । देव सर्वोत्तम । देवांचा हि ॥५०॥

तो तूं येथें आज । आमुच्या आधीन । झालासी म्हणोन । बोलतों हें ॥५१॥

वेळ ना अवेळ । मातेचिया ठायीं । स्तन्यालागीं पाहीं । बाळकासी ॥५२॥

तैसें माझ्या मना । आलें देवा तें तें । विचारितों तूतें । कृपानिधे ॥५३॥

तरी आचराया । सर्वथा उचित । आणि जेणें हित । पर -लोकीं ॥५४॥

ऐसें मज एक । निश्चयेंकरोन । सांगें विवरोन । पार्थ म्हणे ॥५५॥

श्रीभगवानुवाच ---

लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।

ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेण योगिनाम् ‍ ॥३॥

ऐकोनि हे बोल । मग श्रीअच्युत । होवोनि विस्मित । काय बोले ॥५६॥

म्हणे पार्थ तुज । सांगितला येथ । सर्वथा संक्षिप्त । अभिप्राय ॥५७॥

बुद्धियोगाचें तें । करितां व्याख्यान । सांख्य -तत्त्वज्ञान । निरोपिलें ॥५८॥

प्रसंगेंकरोन । स्वभावतां येथें । परी त्या हेतूतें । नेणोनियां ॥५९॥

धनंजया वायां । क्षोभलासी मनीं । जाण मी चि दोन्ही । सांगितले ॥६०॥

अनादिसिद्ध हे । दोन्ही मार्ग साच । प्रकटिले मीं च । धनुर्धरा ॥६१॥

ज्ञान -योग ऐसें । बोलती एकातें । अनुष्ठिती । ज्यातें । सांख्यमार्गी ॥६२॥

जेथें साधकासी । होतां साक्षात्कार । तत्काळ साचार । तद्रूपता ॥६३॥

कर्म -योगीं होतां । साधक प्रवीण । पावती निर्वाण । कालान्तरीं ॥६४॥

जाण अर्जुना हे । मार्ग जरी दोन्ही । परी ते निदानीं । एक होती ॥६५॥

सिद्ध किंवा साध्य । असो स्वयंपाक । परी तृप्ति एक । भोजनान्तीं ॥६६॥

किंवा नदी एक । वाहते पूर्वेस । दुजी पश्चिमेस । भिन्नमार्गे ॥६७॥

एका चि सागरीं । परी दोन्ही अंतीं । जाती जैशा रीती । मिळोनियां ॥६८॥

तैसें हे एका चि । तत्त्वाचे सूचक । दोन्ही मार्ग देख । सव्यसाची ॥६९॥

परी जैसा । ज्याचा । असे अधिकार । तैसी च साचार । उपासना ॥७०॥

एक चि भरारी । मारोनियां वृक्षीं । झोंबे जैसा पक्षी । फळालागीं ॥७१॥

सांगें तैशा वेगें । कैसें मनुष्यातें । उडोनियां तेथें । जाववेल ॥७२॥

परी पाहें तो हि । अर्जुना साचार । घेवोनि आधार । मार्गाचा चि ॥७३॥

फांदीफांदीवरी । चढोनियां तेथ । पावतो निश्चित । हळुहळू ॥७४॥

तैसें सांख्यालागीं । ज्ञानाचिया बळें । निर्वाण आकळे । तत्काळ चि ॥७५॥

विहंगम -मार्गे । तयां मोक्ष -प्राप्ति । कर्मयोग्यप्रति । दुजा मार्ग ॥७६॥

निष्काम कर्माचा । तयांसी आधार । पाहें पैल पार । पावावया ॥७७॥

विहित स्व -कर्म । आचरोनि येथें । वेळें पावती ते । पूर्णत्वास ॥७८॥

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्य पुरुषोऽश्नुते ।

न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥४॥

ना तरी अर्जुना । सर्वथा उचित । कर्मारंभ येथ । नाचरोनि ॥७९॥

निश्चयेंकरोन । नैष्कर्म्याची सिद्धि । लाभे चि ना कधीं । कर्महीना ॥८०॥

सांडोनि स्वकर्म । नैष्कर्म्य पावणें । वायां हें बोलणे । मूर्खत्वाचें ॥८१॥

पैलतीरा जावें । ऐसी जरी आस । त्यजोनि नावेस । कैसें होय ॥८२॥

वाटे तृप्त व्हावें । करोनि भोजन । तरी कां गा अन्न । रांधूं नये ? ॥८३॥

किंवा रांधिलेलें । सेवावें ना जरी । तृप्त व्हावें तरी । कैसें सांग ॥८४॥

निरिच्छता नाहीं । लाभली जोंवरी । सुटे ना तोंवरी । व्यवहार ॥८५॥

मग तो साधक । होतां आत्मतुष्ट । राहे खटपट । स्वभावें ती ॥८६॥

म्हणोनि सांगतों । ऐक आतां पार्था । जयालागीं आस्था । नैष्कर्म्याची ॥८७॥

तयानें आपुलें । कर्म जें उचित । सोडूं नये येथ । सर्वथैव ॥८८॥

आणि निजेच्छेनें । कर्म स्वाकारावें । तरी च तें व्हावें। ऐसें आहे ? ॥८९॥

किंवा सोडावें तें । ऐसें मनीं आलें। तरी का सुटलें । ऐसें होय ? ॥९०॥

बोलणें हें ऐसें । वाउगें वाह्यात । आतां जें यथार्थ । तें चि पाहें ॥९१॥

कर्म हें अर्जुना । सोडितां सुटे ना । संदेह तो मना । नको येथें ॥९२॥

न हि कश्चित्क्षणमापि जातु तिष्ठत्यकर्मकृत ।

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥५॥

कर्म मी करीन। किंवा तें सोडीन । बोलणें हें जाण । अज्ञानाचें ॥९३॥

जोंवरी अर्जुना । मायेचा आश्रय । तोंवरी तें होय । स्वभावें चि ॥९४॥

प्रकृतीपासोन । होती जे त्रिगुण । तयांच्या आधीन । कर्मजात ॥९५॥

पार्था योग्य कर्मे । जेवढीं म्हणोन । दिलीं तीं सोडोन । हटाग्रहें ॥९६॥

तरी स्वाभाविक । इंद्रियांचें कार्य । नष्ट होतें काय । सांगें मज ॥९७॥

काय कर्णद्वारा । ऐकणें थांबलें । तेज का लोपलें । नेत्रांतील ॥९८॥

नासिकेचें रंध्र । बुजोनि का गेलें । घेईनासें झालें । परिमळ ॥९९॥

सांगें प्राणापान । खेळती ना देहीं । मति झाली काई । निर्विकल्प ॥१००॥

न लागे का भूक । न लागे तहान । गेल्या मावळोन । सर्व इच्छा ? ॥१०१॥

आतां निद्रेमाजीं । न पडे का स्वप्न । न येई फिरोन । जागृती ती ॥१०२॥

किंवा सांगें चालों । विसरले पाय । असो , ठेले काय । जन्म -मृत्यु ? ॥१०३॥

सर्व हे व्यापार । थांबती ना मग । सोडिलें तें सांग । काय आतां ॥१०४॥

म्हणोनि अर्जुना । जे का मायावंत । तयां नाहीं येथ । कर्म -त्याग ॥१०५॥

कर्म हें निपजे । प्रकृतीच्या गुणें । पराधीनपणें । पंडु -सुता ॥१०६॥

तरी तें करीन । किंवा तें सोडीन । वायां अभिमान । अंतरीं हा ॥१०७॥

देखें रथारुढ । होवोनि केवळ । बैसावें निश्चळ । जरी तेथें ॥१०८॥

तरे रथासंगें। पराधीनपणें । घडावें हिंडणें । जैसें मग ॥१०९॥

किंवा शुष्क -पत्र । जैसें का निचेष्ट । भ्रमे आकाशांत वायूसंगें ॥११०॥

तैसा प्रकृतीचा । घेवोनि आसरा । कर्मेद्रियद्वारा । निरंतर ॥१११॥

तो हि धनंजया । व्यापरे त्रिगुणीं । होय जरी कोणी । कर्म -त्यागी ॥११२॥

म्हणोनि जोंवरी । प्रकृतीचा संग । न हो कर्म -त्याग । तोंवरी तो ॥११३॥

असोनियां ऐसें । करुं जे म्हणती । आग्रह चि अंतीं । उरे त्यांचा ॥११४॥

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ‍ ।

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥६॥

उचित तें कर्म । सांडोनि धांवती । कर्मातीत स्थिति । गांठावया ॥११५॥

परी कर्मेंद्रिय । प्रवृत्ति सर्वथा । मूढपणें पार्था । निरोधून ॥११६॥

तयां कर्म -त्याग । कदापि न घडे । मन कर्मी जडे । म्हणोनियां ॥११७॥

परि ब्राह्मात्कारीं । त्यागाचा जो डौल । दाविती तें फोल । दैन्य जाण ॥११८॥

ऐसे कोणी मूढ । वर्तती जे येथ । जाण ते निभ्रांत । भोगासक्त ॥११९॥

आतां ऐकें तुज । प्रसंगें सांगेन । अर्जुना लक्षण । निष्कामाचें ॥१२०॥

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।

कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥७॥

जो का पार्था गूढ । परब्रह्मपदीं । ठेवी दृढबुद्धि । अंतरांत ॥१२१॥

आणि जैसे लोक । वागती संसारीं । तैसा बाह्यात्कारीं । वर्ततसे ॥१२२॥

इंद्रियांसी आज्ञा । करी ना किरीटी । घरे ना जो भीति । विषयांची ॥१२३॥

आणि प्राप्त कर्म । जें जें का उचित । तें तें नाहीं जात । अव्हेरोनि ॥१२४॥

कर्मेंद्रियें कर्मी । वावरतां पार्था । तयांसी सर्वथा । आवरी ना ॥१२५॥

परी तेथें ऊर्मि । होय जी निर्माण । तेणें ज्याचें मन । झांकोळे ना ॥१२६॥

कामनेमाझारीं । गुंतोनि न जाय । न जो लिप्त होय । मोह -मळें ॥१२७॥

जैसें पद्म -पत्र । राहोनि जळांत । भिजे ना तयांत । लेशमात्र ॥१२८॥

तैसा उपाधींत । नव्हे लिप्त जो का । सकळांसारिखा । दिसोनियां ॥१२९॥

तोय -संगें जैसें । भानु -बिंब भासे । तैसा तो हि दिसे । संसारांत ॥१३०॥

आणिकांसारिखा । सर्वसाधारण । दिसे बाहेरुन । पाहूं जातां ॥१३१॥

परी अभ्यंतरीं । निर्धारितां साची । नाकळे तयाची । आत्म -स्थिति ॥१३२॥

धनंजया ऐशा । लक्षणांनी युक्त । आसक्तिरहित । असे जो का ॥१३३॥

ओळखावा तो चि । मुक्त तो चि योगी । वर्णिती जो जगीं । विशेषत्वें ॥१३४॥

तूं हि पार्था व्हावें । ऐसा चि निजांगें । म्हणोनि हें सांगें । तुजप्रति ॥१३५॥

आवरोनि मन । अर्जुना केवळ । होई तूं निश्चळ । अंतर्यामीं ॥१३६॥

मग आपुलाले । करोत व्यापार । सुखानें साचार । कर्मेन्द्रियें ॥१३७॥

नियंत कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।

शरीरयात्राऽपि च ते न प्रसिध्द्येदकर्मणः ॥८॥

सांडोनि स्वकर्म । कर्मातीत व्हावें । हें तों न संभवे । संसारीं ह्या ॥१३८॥

मग शास्त्रबाह्य । करावें का कर्म । सोडावा का धर्म । सांगें आतां ॥१३९॥

म्हणोनियां पार्था । प्रसंगानुसार । कर्म जें साचार । प्राप्त होय ॥१४०॥

तें तुवां विहित । आचरावें येथ । परी फलाशेंत जें देख । स्वभावें चि ॥१४१॥

निष्काम कर्माचें । नेणसी कौतुक । सोडवी जें देख । स्वभावें ॥१४२॥

अधिकार तैसा । सेवितां स्वधर्म । होय तें कर्म । मोक्षप्रद ॥१४३॥

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।

तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥९॥

स्वधर्म जो तो चि । नित्य -यज्ञ जाण । घडे अनुष्ठान । त्याचें जेथें ॥१४४॥

तेथें मग नाहीं । पापाचा प्रवेश । तुटे कर्म -पाश । आपोआप ॥१४५॥

स्वधर्म हा सांडे । कुकर्म आवडे । तेव्हां बंध पडे । सांसारिक ॥१४६॥

म्हणोनि अर्जुना । स्वधर्माचरण । अखंड यजन । करी जो हें ॥१४७॥

तया याज्ञिकासि । कर्माचें बंधन । घडे ना तें जाण । कल्पान्तीं हि ॥१४८॥

हा चि नित्ययज्ञ । घडे ना म्हणोन । लोक पराधीन । पडे बंधीं ॥१४९॥

ह्या चि विषयींची । कथा आतां एक । सांगेन ती ऐक । धनुर्धरा ॥१५०॥

सहयज्ञाः प्रजाः सृष्टाव पुरोवाच प्रजापतिः ।

अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ‍ ॥१०॥

केली ब्रह्मदेवें । सृष्टि -संस्थापना । निर्मिली अर्जुना । प्रजा सर्व ॥१५१॥

तेव्हां स्वधर्माचा । नित्ययज्ञ भला । लावोनियां दिला । प्रजेसी त्या ॥१५२॥

परी जाणेना ती । यज्ञाचें त्या वर्म । कीं तो अति सूक्ष्म । म्हणोनियां ॥१५३॥

तेव्हां प्रजा सर्व । ब्रह्मदेवाप्रति । करोनि विनंति । म्हणे देवा ॥१५४॥

कशाचा आधार । सांग येथें आम्हां । मग पद्मजन्मा । काय बोले ॥१५५॥

म्हणे ऐका तुम्हां । स्वधर्मानुसार । दिला जो आधार । स्वधर्माचा ॥१५६॥

त्या चि स्वधर्माची । करा उपासना । सफळ कामना । तेणें मग ॥१५७॥

नको व्रत नेम । पीडणें देहासी । न जावें तीर्थासी । दूर कोठें ॥१५८॥

किंवा योगादिक । साधनें नकोत । पूजाया दैवत । नको दुजें ॥१५९॥

ना तरी सकाम । नको आराधना । नकोत ते नाना । मंत्रतंत्र ॥१६०॥

सर्वथा हें कांहीं । नको करायास । सेवा स्वधर्मास । अनायासें ॥१६१॥

करी पति -सेवा । पतिव्रता जैसी । तैसे भजा ह्यासी । निष्कामत्वें ॥१६२॥

पूजनीय एक । हा चि तुम्हांप्रति । ऐसें प्रजापति । तेव्हां बोले ॥१६३॥

एकभावें जरी । सेवाल स्वधर्म । कामधेनुसम । होईल हा ॥१६४॥

करील तो मग । तुमचें रक्षण । अहो प्रजाजन । निरंतर ॥१६५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP