श्रवणेन्द्रियासी । आज उजाडलें । निधान देखिलें । गीतारुप ॥१॥
आतां हा संसार । झाला मोक्षमय । स्वप्न चि हें होय । साचाऐसें ॥२॥
ज्ञानाचा विचार । आधीं च मधुर । वरी वक्ता थोर । जगजेठी ॥३॥
आणि भला श्रोता । भक्तराज पार्थ । योग आला येथ । आगळा हा ॥४॥
व्हावा सुगंधित । कोकिळेचा स्वर । ना तरी मधुर । पुष्प -गंध ॥५॥
मग तेथें जैसा । आनंदाचा भर । तैसा हा सुंदर । कथाभाग ॥६॥
कैसी कथारुपी । अमृताची गंगा । जोडली ही जगा । थोर भाग्यें ॥७॥
किंवा श्रोतेजनीं । जप -तपें केलीं । तींच फळा आलीं । गीतारुपें ॥८॥
सर्व इंद्रियांनीं । आतां सर्वा परी । श्रवणाच्या घरीं । रिघोनियां ॥९॥
श्रीहरी -पार्थाचा । संवाद गीताख्य । तयाचें चि सौख्य । भोगावें हें ॥१०॥
प्रसंग सोडोन । पुरे हा पाल्हाळ । संवाद रसाळ । निवेदीन ॥११॥
तदा रायालागीं । म्हणे तो संजय । थोर भाग्य होय । अर्जुनाचें ॥१२॥
कीं तो कृष्णनाथ । तयासवें येथ । संवादे अत्यंत । प्रेमभरें ॥१३॥
पिता वसुदेव । देवकी जननी । तयां हि बोलोनि । दावी ना जें ॥१४॥
बंधु बलराम । नेणे वार्ता ज्याची । बोले गुह्य तें चि । अर्जुनाशीं ॥१५॥
रमादेवी नित्य । सन्निध ती राहे । परी पाहे ना हें । प्रेम -सुख ॥१६॥
हरि -प्रेम पूर्ण । बहरलें साच । लाभलें ह्यासी च । आज येथें ॥१७॥
सनकादिकांनीं । इच्छिलें उदंड । प्रेम हें अखंड । भोगावया ॥१८॥
केली पराकाष्ठा । परी त्यांची आशा । येणें पाडें यशा । नाहीं आली ॥१९॥
पार्थचिया ठायीं । श्रीहरीचें प्रेम । मज निरुपम । दिसतसे ॥२०॥
तेणें कैसें केलें । पुण्य सर्वोत्तम । संवादे हा प्रेम - । भरें देव ॥२१॥
तयाचिया प्रीती - । साठीं निराकार । होवोनि साकार । अवतरे ॥२२॥
पार्थ कृष्णाठायीं । तल्लीन म्हणोनि । वाटती हे दोन्ही । एकरुप ॥२३॥
एर्हवी हा देव । वळेना योग्यांसी । तेविं वेदार्थासी । कळेना हा ॥२४॥
ध्यानाची हि दृष्टि । पोहोंचेना जेथें । तो चि आज येथें । साकारला ॥२५॥
देवांचा हि देव । अनादि निष्कंप । नित्य आत्मरुप । असे तरी ॥२६॥
कैशापरी देखा । पार्थासी प्रसन्न । झाला भक्ताधीन । तो हा येथें ॥२७॥
वस्त्राची ज्या घडी । मोडितां साचार । त्रैलोक्य -विस्तार । दिसूं लागे ॥२८॥
तो हा निराकार । परी आकारला । देहधारी झाला । पार्थासाठीं ॥२९॥
श्रीभगवानुवाच ---
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥१॥
मग देव म्हणे । आम्ही हा चि योग । सांगितला साङ्ग । सूर्यालागीं ॥३०॥
परी ह्या गोष्टीसी । आतां बहु दिन । सहजें लोटून । गेले पार्था ॥३१॥
विवस्वान सूर्ये । ही च योगस्थिति । सर्व मनुप्रति । निरुपिली ॥३२॥
मनूनें आपण । आचरोनि चांग । शिकविली मग इक्ष्वाकूतें ॥३३॥
परंपरा ऐसी । पार्था पुरातन । विस्तारली जाण । असे येथें ॥३४॥
एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥२॥
जाणिला आणिक । पुढें राजर्षीनीं । परी नेणे कोणी । आतां ह्यातें ॥३५॥
विषयांचे ठायीं । प्रीति अनिवार । वाढली साचार । प्राणियांची ॥३६॥
ठेविती आसक्ति । देहीं च म्हणोनि । गेले विसरोनि । आत्मबोध ॥३७॥
देखें आस्थाबुद्धि । गेली आडवाटे । सार्थक तें वाटे । भोगसुखीं ॥३८॥
जाहला संसार । हा चि जीवप्राण । तयांलागीं जाण । धनुर्धरा ॥३९॥
जे का दिगंबर । तयांचिया गांवीं । काय तीं करावीं । उंची वस्त्रें ॥४०॥
सांगें धनंजया । जन्मांध जो होय । काय सूर्योदय । तयालागीं ॥४१॥
किंवा बहिर्यांच्या । सभेमाजीं जाण । कोण देई मान । संगीतासे ॥४२॥
ना तरी कोल्ह्यासी । चांदण्याची वेळ । कैसी आवडेल । सांगें मज ॥४३॥
नभीं चंद्रोदय । नाहीं झाला तों च । ज्यांची असती च । दृष्टि लोपे ॥४४॥
तयां कावळ्यांसी । चंद्राची ओळख । कैसी व्हावी देख । धनुर्धरा ॥४५॥
तैसी वैराग्याची । न देखते शींव । नेणती जे नांव । विवेकाचें ॥४६॥
सांग बरें मज । सर्वेश्वराप्रति । कैसे ते पावती । मति -मंद ॥४७॥
नेणों कैसा मोह । वाढला सांप्रत । तेणें गेला व्यर्थ । दीर्घ काळ ॥४८॥
म्हणोनि हा योग । सर्वथा ह्या लोकीं । लोपला विलोकीं । धनंजया ॥४९॥
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥३॥
तो चि हा निभ्रांत । तुजप्रति आतां । वर्णिला तत्त्वतां । कर्म -योग ॥५०॥
जीवींचे हें गुज । तुजपासोनियां । कैसें ठेवूं प्रिया । लपवोनि ॥५१॥
प्रेमाची तूं मूर्ति । भक्तीचें जीवन । सख्यत्वाचा प्राण । तूं चि एक ॥५२॥
आतां तुज काय । ठकवावें येथ । संबंध निकट । तुझा -माझा ॥५३॥
असों जरी आम्ही । रणांगणीं येथ । तरी साहोनि तें । क्षणभरी ॥५४॥
आधीं तुझें लागे । हरावें अज्ञान । पार्था , उपेक्षून । गलबला ॥५५॥
अर्जुन उवाच ---
अपर भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥४॥
तंव बोले पार्थ । कृपानिधे हरी । माय बाळावरी । करी प्रेम ॥५६॥
तरी सांगें येथ । कायसा विस्मय । तूं चि एक माय । अनाथांची ॥५७॥
संसार -श्रांतांची । साउली तूं मोठी । तुझ्या कृपेपोटीं । जन्म आम्हां ॥५८॥
माता जरी व्याली । पांगळें अपत्य । तरी साहे नित्य । भार त्याचा ॥५९॥
प्रभो , तैसा आहे । येथें हि प्रकार । तुजपुढें फार । काय बोलूं ॥६०॥
कृपानिधे आतां । पुसेन जें कांहीं । ऐकोनि तें घेई । सावधान ॥६१॥
तेवीं चि आशंका । घेतली म्हणोनि । नको आणूं मनीं । राग त्याचा ॥६२॥
पाहें तुझे बोल । ऐकोनि क्षणैक । जाहलें साशंक । मन माझें ॥६३॥
कीं तो विवस्वान । वाडवडिलां हि । ठाउका चि नाहीं । कोण काय ॥६४॥
तरी तुवां देवा । केव्हां कैसा त्यास । केला उपदेश । सांगें मज ॥६५॥
ऐकें विवस्वान । तो तरी प्राचीन । तूं तंव श्रीकृष्ण । सांप्रतचा ॥६६॥
म्हणोनि ही गोष्ट । वाटे विसंगत । साशंकलें चित्त । ह्या चि लागीं ॥६७॥
तेविं तुझी देवा । अगाध ती लीला । कळेना आम्हांला । सर्वथैव ॥६८॥
म्हणोनियां जें हें । सांगसी तूं मातें । केविं म्हणों खोटें । एकाएकीं ॥६९॥
तरी तुवां कैसा । रवीलागीं भला । उपदेश केला । पूर्वकाळीं ॥७०॥
सर्व तो वृत्तांत । मज उमजेल । ऐशापरी बोल । कृपावंता ॥७१॥
श्रीभगवामिवाच ---
बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥५॥
तंव तो श्रीकृष्ण । म्हणे पंडुसुता । जिय काळीं होता । विवस्वान ॥७२॥
नर्सो तदा आम्ही । तुज भ्रांति ऐसी । तरी तूं नेणसी । अर्जुना हें ॥७३॥
अनेक ते जन्म । तुझे -माझे झाले । परी तूं आपुले । नाठविसी ॥७४॥
ज्या ज्या वेळीं जे जे । माझे अवतार । सर्व ते साचार । स्मरतसें ॥७५॥
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥६॥
म्हणोनि हें मज । आठवे सकळ । कार्य तें मागील । धनंजया ॥७६॥
असोनि अजन्मा । घेतों अवतार । येथें वारंवार । मायायोगें ॥७७॥
अविनाशीपण । न लोपतां माझें । दिसे जेथें जें जें । होणें जाणें ॥७८॥
प्रतिबिंबे सर्व । माझ्या चि तें ठायीं । माया -योगें पाहीं । धनुर्धरा ॥७९॥
स्वतंत्रता माझी । न लोपे ती जाण । परी कर्माधीन । ऐसा वाटें ॥८०॥
अर्जुना सकळ । भ्रांतीचा तो खेळ । असें मी केवळ । जैसातैसा ॥८१॥
दर्पणीं तें जैसें । प्रतिबिंब दिसे । एक वस्तु भासे । दोहों ठायीं ॥८२॥
मूळ वस्तूचा त्या । करितां विचार । असे का साचार । दुजें रुप ॥८३॥
तैसा जरी पार्था । असें निराकार । करोनि स्वीकार । प्रकृतीचा ॥८४॥
जगत्कर्यासाठीं । होतसें साकार । नटें अवतार । घेवोनियां ॥८५॥
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम् ॥७॥
युगायुगीं सर्व । धर्म संरक्षावे । ओघ हा स्वभावें । आद्य असे ॥८६॥
म्हणोनियां जेव्हां । जेव्हां धर्मालागीं । आक्रमी सर्वागीं । अधर्म हा ॥८७॥
तेव्हां ठेवीं माझें । अजत्व हि दूर । नाठवीं साचार । अव्यक्तत्व ॥८८॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥८॥
आपुल्या भक्तांचा । घेवोनि कैवार । येतों अवतार । धरोनियां ॥८९॥
मग अज्ञानाचा । गिळोनि काळोख । सीमा तोडीं देख । अधर्माची ॥९०॥
उभारितों संतां - । हातीं सौख्य -ध्वज । फाडितों सहज । पाप -लेख ॥९१॥
करोनियां दैत्य -। कुळाचा संहार । साधूंसी सत्कार । देववितों ॥९२॥
धर्म -नीति ह्यांची । करोनियां भेट । दोघांसी हि गांठ । बांधितों मी ॥९३॥
अविवेकरुपी । फेडोनियां मसी । विवेक -दीपासी । उजळितों ॥९४॥
तदा स्वानंदाची । दिवाळी साचार । होय निरंतर । योगियांसी ॥९५॥
आत्म -सुखें विश्व । भरोनियां जाई । धर्म चि तो पाहीं । नांदे जगीं ॥९६॥
आणि भक्तजन । सत्त्वगुणें जाण । होती परिपूर्ण । पंडु -सुता ॥९७॥
पाप लया जातें । पुण्य उजाडतें । जेव्हां प्रकटते । मूर्ति माझी ॥९८॥
ह्या चि काजालागीं । धनंजया जाण । होतों अवतीर्ण । युगायुगीं ॥९९॥
परी हें चि तत्त्व । ओळखे जो जगीं । तो चि भक्त योगी । ज्ञानवंत ॥१००॥
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥९॥
असोनि अजन्मा । कैसा घेई जन्म । अक्रिय मी कर्म । कैसें करीं ॥१०१॥
स्वभावें संपूर्ण । जयासी हें ज्ञान । तो चि पार्था जाण । मुक्तश्रेष्ठ ॥१०२॥
नसे देहभाव । जरी देहधारी । वर्ततो व्यापारीं । अनासक्त ॥१०३॥
मग माझिया चि । स्वरुपीं तत्त्वतां । मिळे तो पावतां । पंचत्वातें ॥१०४॥
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥१०॥
कोणत्या गोष्टीचा । करिती ना शोक । होती पार्था देख । निष्काम जो ॥१०५॥
क्रोधाचिया मार्गे । कदापि न जाती । संतत मत्प्राप्ति -। संपन्न जे ॥१०६॥
सेवेसाठीं साच । राहिले जिवंत । आत्मबोधें तुष्ट । निःसंग जे ॥१०७॥
तर्पे तेजःपुंज । तपस्वी जे पूर्ण । एक चि ठिकाण । ज्ञानासी जे ॥१०८॥
तीर्थासी हि जेणें । येई पवित्रता । तीर्थरुप स्वतां । होती जे का ॥१०९॥
स्वभावें ते झाले । मद्रूप चि पार्था । मुक्ति सायुज्यता । मेळवोनि ॥११०॥
तयां -माझ्यामध्यें । उरे ना अंतर । म्हणोनि साचार । एकरुप ॥१११॥
कलंक काळिमा । नष्ट होतां पूर्ण । पितळ ती जाण । सुवर्ण चि ॥११२॥
यमनियमांच्या । कसीं उतरोन । झाले जे पावन । तपोज्ञानें ॥११३॥
पावले ते तैसे । साच मद्रूपता । जाण पंडु -सुता । निःसंदेह ॥११४॥