आतां अवधारा । कथा एकादशीं । आहे दोहीं रसीं । परिपूर्ण ॥१॥
जेथें विश्वरूप - । दर्शनाचा योग । घडेला हो चांग । पार्थालागीं ॥२॥
शांतरसाचिया । घरीं जेथ भला । पाहुणा पातला । अद्भुत तो ॥३॥
बैसले पंक्तीस । रस जे इतर । जाहला सत्कार । तयांचा हि ॥४॥
वधू -वरांचिया । मिरवती लग्नीं । वस्त्रीं आभरणीं । वर्हाडी हि ॥५॥
तैसे मराठीच्या । सुखासनीं भले । देखा मिरवले । सर्व रस ॥६॥
परी शांताद्भुत । बहु शोभिवंत । घ्यावें ओंजळींत । लोचनांच्या ॥७॥
भासती ते जैसे । भेटाया साचार । आले हरि -हर । प्रेमभावें ॥८॥
किंवा चंद्र -सूर्य । अमावास्या -दिनीं । भेटती गगनीं । एकमेकां ॥९॥
तैसें शांत आणि । अद्भुत हे रस । प्रेमें भेटायास । आले येथें ॥१०॥
गंगा -यमुनौघ । मिळोनि एकत्र । प्रयान सु -क्षेत्र । झालें जैसें ॥११॥
मिळाले तैसे च । येथें शांताद्भुत । म्हणोनि सुस्नात । होत विश्व ॥१२॥
गंगे -यमुनेचे । प्रवाह प्रकट । तैसे मृर्तिमंत । दोन्ही रस ॥१३॥
माजीं गीतारूप । सरस्तती गुप्त । म्हणोनि उचित । त्रिवेणी ही ॥१४॥
कराया प्रवेश । ऐशा त्रिवेणींत । सुलभ हा पंथ । श्रवणाचा ॥१५॥
ज्ञानेदव म्हणे । सदूगुरूची कृपा । मार्ग झाला सोपा । सर्वांलागीं ॥१६॥
धर्माचें निधान । श्रीगुरु निवृत्ति । तेणें मज हातीं । धरोनियां ॥१७॥
तोडोनि बिकट । संस्कृताचे तट । बांधिला हा घाट । मराठीचा ॥१८॥
म्हणोनि कोणी हि । गीता -त्रिवेणींत । सद्भावें सु -स्नात । व्हावें आतां ॥१९॥
मग विश्वरूप - । माधवासन्मुख । द्यावें तिळोदक । सांसारासी ! ॥२०॥
असो , मृर्तिमंत । ऐसे रसभाव । देखा येथें सर्व । भरा आले ॥२१॥
शवणसुखाचें । येथें आज भलें । राज्य प्राप्त झालें । जगालागीं ॥२२॥
जेथें शांताद्भुत । होती मूर्तिमंत । आणि प्रतिष्ठित । इतर हि ॥२३॥
असो हें तों गौण । परी जेथें पूर्ण । कैवल्य -निधान । प्रकटलें ॥२४॥
तो हा अकरावा । अध्याय पावन । विश्रांतीचें स्थान । विश्वेशाचें ॥२५॥
परी तो अर्जुन । पातला येथें हि । काय त्याचें नाहीं । थोर भाग्य ? ॥२६॥
काय म्हणूं येथें । पार्थ चि पातला । सुकाळ हा झाला । कोणातें हि ॥२७॥
कीं तो मूर्तिमंत । गीतेचा भावार्थ । देखा मराठींत । प्रकटला ॥२८॥
ह्या चि लागीं लक्ष । द्यावें तुम्हीं संतीं । ऐकावी विनंति । ही च माझी ॥२९॥
लडिवाळपण । ऐसें करावया । तुम्हां संतांचिया । सभेमाजीं ॥३०॥
असोनि अपात्र । जरी आजि धजें । तरी तुम्ही माझे । मायबाप ॥३१॥
मज लेकरातें । आपुला मानुन । घ्यावें सांभाळून । पेमभावें ॥३२॥
अहो पढवावें । राघूसी आपण । पढे तरी मान । डोलवावी ॥३३॥
ना तरी माउली । बालकालागोन । प्रेमें शिकवोन । नाना गोष्टी ॥३४॥
मग तयाचिया । कृतीचें कौतुक । करोनियां सुख । पावे जैसी ॥३५॥
तैसं तुम्हांपुढें । जें जें बोलें येथें । तुम्ही च तें मातें । शिकविलें ॥३६॥
म्हणोनियां प्रभो । आपुलें आपण । करावें श्रवण । तुम्हीं संतीं ॥३७॥
अहो संत -जन । तुम्हीं च हें गोड । लाविलें ना झाड । साहित्याचें ? ॥३८॥
अवधानरूपी । अमृत शिंपून । करावें पोषण । तरी आतां ॥३९॥
रसभावरूप । फुलांचा सुंदर । येईल बहर । मग ह्यासी ॥४०॥
आणि नानार्थांच्या । फळभारें पूर्ण । देखा ओथंवून । येईल हें ॥४१॥
तुमचिया धर्में । सहजें होईल । सुखाचा सुकाळ । जगालागीं ॥४२॥
ऐकोनि हे बोल । संत आनंदले । म्हणती गा भलें । केलें तुवां ॥४३॥
संतोषलों आम्ही । आतां सांगें तेथें । पुसिलें जें पार्थें । कृष्णालागीं ॥४४॥
तंव ज्ञानदेव । निवृत्तीचा दास । म्हणे श्रोतयांस । विनवोनि ॥४५॥
अहो कृष्णार्जुन - । संवाद अद्भुत । मी तरी प्राकृत । काय बोलूं ॥४६॥
परी बोलवाल । जरी तुम्ही मज । तरी तो सहज । बोलेन मी ॥४७॥
प्रभु रामचंद्रें । वानरांकडोन । लंकेचा रावण । जिंकविला ॥४८॥
केल्या पराभूत । अकरा अक्षौहिणी । धनंजयें रणीं । एकल्यानें ॥४९॥
म्हणोनि समर्थ । जें जें करी कांहीं । चराचरीं होई । तें तें सिद्ध ॥५०॥
तैसे तुम्ही श्रोते । सज्जन समर्थ । बोलवा गीतार्थ । माझ्या मुखें ॥५१॥
असो ऐका आतां । गीताभाव स्पष्ट । बोलिला वैकुंठ - । नायक जो ॥५२॥
अनादि जो आद्य । वेदप्रतिपाद्य । जो का विश्ववंद्य । परमात्मा ॥५३॥
तो चि कृष्णनाथ । जिये ग्रंथीं वक्ता । धन्य तो श्रीगीता - । ग्रंथ धन्य ॥५४॥
तेथींची थोरवी । वानूं कैसी किती । शंभूची हि मति । गुंग जेथें ॥५५॥
आतां जीवेंभावें । तया नमस्कार । करावा साचार । हें चि भलें ॥५६॥
असो विश्वरूप । देखावयासाठीं । ऐका तो किरीटी । काय करी ॥५७॥
निजांतरीं तेणें । भोगिला प्रत्यय । सर्वेश्वरमय । विश्व सर्व ॥५८॥
तरी आतां व्हावा । तो चि सर्वेश्वर । बाहेरी गोचर । लोचनांसी ॥५९॥
ऐसी उत्कटेच्छा । अंतरामाझारीं । धजे ना तो परी । बोलावया ॥६०॥
मनीं म्हणे जें का । विश्वरूप गूढ । कैसें तें उघड । पुसों आतां ॥६१॥
पूर्वीं कधीं कोणी । प्रिय व्यक्तीनें हि । विचारिलें नाहीं । देवासी जें ॥६२॥
तें चि विश्वरूप । दाखवावें मज । म्हणूं कैसें आज । एकाएकीं ॥६३॥
माते लक्ष्मीहून । काय जवळचा । असें मी देवाचा । सखा जरी ॥६४॥
परी तिजसी हि । नाहीं झालें धैर्य । काढाया विषय । देवाशीं हा ॥६५॥
गरुडासमान । नाहीं केली सेवा । परी तो हि देवा - । जवळी हें ॥६६॥
बोलावया जेथें । करी च ना धीर । तेथें मी साचार । पुसों कैसें ? ॥६७॥
नित्य संनिधानीं । सनकादि मुनि । काय तयांहूनि । निकट मी ॥६८॥
तयांसी हि नाहीं । सुचला हा चाळा । काय मी आगळा । तयांहून ॥६९॥
अहो गोकुळींच्या । प्रेमळांसमान । काय आवडेन । देवासी मी ॥७०॥
परी बाळरूपें । तेणें यशोदेसी । गोपगोपिकांसी । ठकविलें ॥७१॥
एकादशी -व्रत । अंबरीषें केलें । तयाचे सोशिले । गर्भवास ॥७२॥
परी विश्वरूप । राखोनि ठेविलें । नाहीं दाखविलें । कोणातें हि ॥७३॥
एवढें हें गुज । एकाएकीं आतां । कैसें भगवंता - । लागीं पुसों ॥७४॥
आणि पुसों नये । ऐसें जरी म्हणें । तरी मज तेणें । सुख नोहे ॥७५॥
आतां देहीं प्राण । राहणें कठिण । देखिल्यावांचोन । विश्वरूप ॥७६॥
तरी हळुहळू । करावें प्रकट । निज -मनोगत । देवापाशीं ॥७७॥
मग तयालागीं । आवडेल जैसें । रहाटावें तैसें । आपण हि ॥७८॥
योजूनियां ऐसें । पार्थ भीत भीत । जाहला प्रवृत्त । बोलावया ॥७९॥
परी बोलांमाजी । होता जो का भाव । तयाचा प्रभाव । काय सांगूं ॥८०॥
कीं जो मुखें बोल । निघतां चि देवें । प्रकट करावें । विश्वरूप ॥८१॥
अहो धेनु जैसी । नि वत्स पाहे । आणि उठे मोहें । खडबडोनि ॥८२॥
मग तयें तिज । मारितां चि ढुसी । सोडील ना कैसी । पान्हा तेथें ? ॥८३॥
तैसा पांडवांचा । कराया सांभाळ । धांवे जो गोपाळ । रानीं -वनीं ॥८४॥
तया कळतां चि । पार्थाचें हें आर्त । कैसें बरें स्वस्थ । रहावेल ? ॥८५॥
कृष्ण परमात्मा । देव रमा -पति । असे प्रेम -मूर्ति । स्वभावें तो ॥८६॥
तया प्रेमा मग । मिळे उत्तेजन । भेटतां अर्जुन । प्राणसखा ॥८७॥
आतां एकमेक । भोगितां तें सुख । उरे वेगळीक । हें चि बहु ॥८८॥
म्हणोनियां पार्थें । प्रार्थितां चि देव । दाखवील विश्व - । रूप कैसें ॥८९॥
तो चि आरंभींचा । ऐका कथाभाग । देवोनियां चांग । अवधान ॥९०॥
अर्जुन उवाच --
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥१॥
तंव पार्थ म्हणे । तुम्हीं मजसाठीं । प्रकटिल्या गोष्टी । शब्दातीत ॥९१॥
जीव - महदादि । जेव्हां लुप्त होती । अव्यक्तीं आटती । मह -भूतें ॥९२॥
तेव्हां स्वरूपीं ज्या । राहसी तूं देव । विश्रांतीचा ठाव । अंतिम तो ॥९३॥
ठेविलें जें होतें । कृपणाच्या परी । तुवां निजांतरीं । राखोनियां ॥९४॥
तेविं शब्दब्रह्मा - । पासोनि हि तुंवा । लपवोनि देवा । ठेविलें जें ॥९५॥
तें चि जीवाचिया । अंतरींचें गुज । प्रकटिलें आज । मजपुढें ॥९६॥
जया आत्मज्ञाना - । साठीं नीलकंठे । ऐश्वर्य गोमटें । ओंवाळिलें ॥९७॥
तीच वस्तु तुवां । मजलागीं भली । दाखवोनि दिली । एकाएकीं ! ॥९८॥
ऐसें बोलूं तरी । आम्ही तुजहून । असूं काय भिन्न । अंतर्यामीं ? ॥९९॥
परी गेलों होतों । साच बुडोनियां । माया -मोहाचिया । महा -पूरीं ॥१००॥
घालोनियां उडी । तों चि तूं श्रीहरि । काढिलें बाहेरी । आतां मज ॥१०१॥
एक तुजविण । आणिक तों कांहीं । विश्वीं दुजें नाहीं । हें चि साच ॥१०२॥
परी विपरीत । आमुचें संचित । कैसे झालों भ्रांत । अहंकारें ॥१०३॥
पाहें जगामाजीं । मी एक अर्जुन । देह -अभिमान । वाहें ऐसा ॥१०४॥
तेविं कौरवांतें । मानोनि स्व -जन । नको म्हणें रण । ह्यांच्यासवें ॥१०५॥
हे तों आप्त -जन । वधोनियां ह्यांतें । थोर दुर्गतीतें । पावेन मी ॥१०६॥
ऐसें दुष्ट स्वप्न । होतों मी पहात । तों चि तूं जागृत । केलें मज ॥१०७॥
सोडोनि गंधर्व - । नगरीची वस्ती । बाहेरी श्रीपति । निघालों मी ॥१०८॥
करीत मी होतों । मृग -जळ -पान । भावावी तहान । म्हणोनियां ॥१०९॥
सर्प नव्हे दोरी । परी त्या लहरी । मज खरोखरी । येत होत्या ॥११०॥
ऐशापरी होतों । मर मी वायां । वांचविलें दया - । सिंधो तुवां ॥१११॥
कूपीं प्रतिबिंब । आपुलें च पाहे । उडी घालिताहे । सिंह तेथें ॥११२॥
तों चि तया कोणी । धरोनि राखावें । तैसें मज देवें । वांचविलें ॥११३॥
एर्हवीं अनंता । मी तरी साचार । ऐसा चि निर्धार । केला होता ॥११४॥
सप्त हि सागर । एके ठायीं यावे । आघवें बुडावें । जग चि हें ॥११५॥
वरी आकाश हि । पडावें तुटोन । परी नको रण । गोत्रजांशीं ॥११६॥
ऐशा अहंकारें । खेंचला जावोन । आग्रहीं बुडोन । गेलों होतों ॥११७॥
माझिया सन्निध । भला तूं श्रीहरि । म्हणोनि बाहेरी । काढिलेंस ॥११८॥
लटिका मी एक । कटिके गोत्रज । लटिकें च झुंज । असोनि हि ॥११९॥
मानोनि तें साच । झालों होतों पिसा । परी तूं विश्वेशा । राखिलेंस ॥१२०॥
लाक्षागृहीं आम्हां । संरक्षिलें साच । तें तों देहासीच । होतें भय ॥१२१॥
परी आतां येथें । चैतन्यासकट । होत होता घात । सर्वस्वाचा ॥१२२॥
दुराग्रहरूपी । दैत्य हिरण्याक्ष । घेवोनियां पक्ष । असत्याचा ॥१२३॥
मारोनि खांकेस । बुद्धि -वसुंधरा । मोहार्णव -द्वारा । लपे आंत ॥१२४॥
आपुल्या सामार्थें । पुन्हा एक वेळ । माझी बुद्धि मूळ । जागीं आली ॥१२५॥
माझ्यासाठीं दुजा । वराहावतार । लागला साचार । घ्यावा तुज ! ॥१२६॥
ऐसे हे अपार । तुझे उपकार । एका मुखें फार । काय बोलूं ॥१२७॥
परी प्रेम -सिंधो । निज -पंच -प्राण । माझिया स्वाधीन । केले तुवां ॥१२८॥
निःसीम तें प्रेम । वायां नाहीं गेलें । भलें यशा आलें । देवराया ॥१२९॥
तुझ्या प्रसादें चि । प्रभो निःसंदेह । नष्ट झाला मोह । सर्व माझा ॥१३०॥
दिव्य आनंदाच्या । सरोवरांतील । जणूं सु -निर्मळ । पुण्डरीक ॥१३१॥
सतेज कोमल । ऐसी तुझी द्दष्टि । करी कृपावृष्टि । जयावरी ॥१३२॥
तयापुढें माया - । मोहाचा प्रभाव । तुच्छ सर्वथैव । नव्हे कैसा ? ॥१३३॥
वडवाग्निपुढें । मृग -जळ -वृष्टि । तैसी भव -भ्रांति । तुजपुढें ॥१३४॥
तुझ्या कृपेचिया । रिघोनि गाभारां । घेतसें मी चारा । स्वानंदाचा ॥१३५॥
आतां मायामो । पावला विलय । आश्चर्य तें काय । देवा येथें ? ॥१३६॥
घेवोनि शपठ । तुझ्या पायांची च । सांगतों मी साच । उद्धरलों ॥१३७॥
भवाप्ययौ हि भृतानां शुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥२॥
तुझे देवदेवा । विस्तीर्ण नयन । कमळासमान । विराजती ॥१३८॥
कोटीसूर्यांसम । दिव्य तुझें तेज । आज तूं चि मज । बोध केला ॥१३९॥
होते कैशा रीती । भूतांची उत्पत्ति । कैशीं लया जाती । मागुती तीं ॥१४०॥
तें चि प्रकृतीचें । तुवां परिपूर्ण । केलें विवेचन । मजपुढें ॥१४१॥
‘ पुरुष ’ तत्त्वाचा । दाविला निवाडा । देवोनियां झाडा । प्रकृतीचा ॥१४२॥
त्या चि पुरुषाचें । पांधरोनि यश । जाहलें सुवेष । शब्दब्रह्म ॥१४३॥
मग धर्माऐसें । प्रसवलें रत्न । लाहोनि जीवन । उत्कर्षें त्या ॥१४४॥
त्या चि पुरुषाचा । घेतला आश्रय । म्हणोनियां श्रेय । लाभलें हें ॥१४५॥
असो ऐसें तुझें । अगाध माहात्म्य । स्वानुभवरम्य । असें जें कां ॥१४६॥
सकल हि मार्गीं । जाणावया होय । एक चि विषय । सर्वथा जें ॥१४७॥
तें चि तुवां मज । जगत्पते आज । दाविलें सहज । ऐशा रीती ॥१४८॥
मेघाचें पटल । नष्ट होतां जैसें । भानु -बिंब दिसे । नभामाजीं ॥१४९॥
किंवा हातें दूर । सारितां शेवाळ । सुनिर्मळ जळ । दिसूं लागे ॥१५०॥
नातरी सर्पाचे । दूर होतां वेढे । जैसी भेट घडे । चंदनाची ॥१५१॥
किंवा हस्तगत । होय द्रव्य -राशि । पळोनि विवशी । जाय जेव्हां ॥१५२॥
तैसी ज्ञानाआड । प्रकृति जी होती । देवें सारोनि ती । पलीकडे ॥१५३॥
मग बुद्धीलागीं । माझिया साचार । केलें शेजघर । परब्रह्म ॥१५४॥
म्हणोनियां एक । तूं चि सर्वेश्वर । जाहला निर्धार । जीवाचा हा ॥१५५॥
परी उत्कटेच्छा । आणिक हि एक । उपजली देख । कृपासिंधो ॥१५६॥
धरोनियां भीड । उगा चि रहावें । तरी पुसों जावें । दुज्या कोणा ? ॥१५७॥
जाणतसों काय । आम्ही ठाव दुजा । देवा अधोक्षजा । तुजवीण ? ॥१५८॥
होतो उपकार । जळाचा म्हणोनि । जळचरें पाणी । सांडियेलें ॥१५९॥
किंवा तान्ह्या बाळें । मानिला संकोच । करावया साच । स्तनपान ॥१६०॥
तरी निजप्राण । रक्षावया जाण । असे का साधन । दुजें त्यासी ? ॥१६१॥
म्हणोनियां आतां । न धरितां भीड । बोलावें उघड । आवडे तें ॥१६२॥
ऐसें माझ्या मनीं । आलें चक्र -पाणी । तंव बोल झणिं । म्हणे देव ॥१६३॥
एवमेतद्यथाऽऽत्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥३॥
मग म्हणे पार्थ । विभूति आपुल्या । मज दावियेल्या । तुम्हीं देव ॥१६४॥
शांत झाली माझ्या । प्रतीतीची द्दष्टी । पाहोनि विभूति - । विस्तार तो ॥१६५॥
लोक -मालिका ही । होवोनि हारपे । जयाच्या संकल्पें । ह्रषीकेशा ॥१६६॥
आणि जया ठाया । देवा तूं आपण । साच मी म्हणोन । संबोधिसी ॥१६७॥
तें तुझें केवळ । स्वरूप जें मूळ । जेथेनि सकळ । घेसी रूपें ॥१६८॥
होसी तूं द्विभुज । तेविं चतुर्भुज । करावया काज । निर्जरांचें ॥१६९॥
क्षीर -सागरांत । शेषशायी होसी । अवतार घेसी । मत्स्यादिक ॥१७०॥
गारुडी तूं ऐसा । संपतां चि खेळ । राहसी केवळ । स्वरूपीं ज्या ॥१७१॥
अंतरीं रिघोनि । ध्याती योगी -वृंदें । सर्वोपनिषदें । गाती जया ॥१७२॥
जया स्वरूपातें । सनकादि मुनि । राहिलें देवोनि । प्रेम -मिठी ॥१७३॥
ऐसें विश्वरूप । ऐकतों जो कानीं । अगाध म्हणोनि । तुझें देवा ॥१७४॥
तें चि देखावया । झालें जगन्नाथा । माझें चित्त आतां । उतावीळ ॥१७५॥
तुम्ही माझा दूर । करोनि संकोच । मज लोभें साच । विचारिलें ॥१७६॥
तरी ही च एक । तीव्र इच्छा मनीं । असें बाळगोनि । राहिलों मी ॥१७७॥
कीं तें तुझें एक । विश्वरूप थोर । द्दष्टीसी । गोचर । व्हावें माझ्या ॥१७८॥
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥४॥
परी आणिक तें । ऐक मायबापा । तुज विश्वरूपा । देखावया ॥१७९॥
असे माझ्या ठायीं । योग्यता साचार । किंवा अधिकार । नसे माझा ॥१८०॥
आपुलें आपण । कांहीं च हें नेणें । नेणसी कां म्हणे । देव जरी ॥१८१॥
तरी रोगी काय । आपुलें आपण । रोगाचें निदान । जाणतसे ? ॥१८२॥
आणि होतां मन । तीव्र इच्छाधीन । पडे विस्मरण । पात्रतेचें ॥१८३॥
जैसें म्हणे कोणी । तृषाक्रांत नर । न पुरे सागर । मज आतां ॥१८४॥
ऐसी अनावर । उत्कंठेची भूल । राखवेना तोल । माझा मज ॥१८५॥
म्हणोनियां जाणे । माउली च साची । जैसी बालकाची । योग्यता ती ॥१८६॥
तैसा विचारांत । घेवोनि साचार । माझा अधिकार । जनार्दना ॥१८७॥
मग प्रवर्तावें । देवा यदुराया । मज दाखवाया । विश्वरूप ॥१८८॥
नसे माझ्या अंगीं । प्रात्रता ती चांग । तरी तैसें सांग । कृपावंत ॥१८९॥
वायां चि सुस्वर । गावोनियां गाणें । तेणें सुख देणें । बधिरासी ! ॥१९०॥
चातकासाठीं च । जरी वर्षे मेघ । तृप्त करी जग । आघवें तो ॥१९१॥
परी मेघ -वृष्टि । खडकीं जी होय । वृथा नव्हे काय । सर्वथा ती ? ॥१९२॥
चकोरासाठीं च । काय चंद्रामृत । नव्हे का तें प्राप्त । सर्वांसी हि ॥१९३॥
परी सर्वांसी तों । अमृताचे कण । वेंचायाचें ज्ञान । असे कोठें ? ॥१९४॥
पडला प्रकाश । उजाडोनि दिन । परी द्दष्टीविण । काय होय ? ॥१९५॥
असो ; विश्वरूप । दाविसील ऐसा । पूर्ण भरंवसा । असे मज ॥१९६॥
कीं तूं सर्वेश्वरा । जाणां -अजाणांसी । होसी सकळांसी । नित्य नवा ॥१९७॥
कैसें तुझें थोर । औदार्य स्वतंत्र । देतां पात्रापात्र । पाहसी ना ॥१९८॥
कैवल्याएवढी । वस्तु जी पावन । करिसी ती दान । वैर्यांसी हि ॥१९९॥
जगीं मोक्ष बहु । दुर्लभ तो होय । तो हि तुझे पाय । सेवीतसे ॥२००॥
म्हणोनियां जाय । पाठविसी तेथें । पाइकाचे नातें । स्वीकारोनि ॥२०१॥
पाजोनियां तुज । विष -स्तन -पान । हरूं पाहे प्राण । पूतना जी ॥२०२॥
तिज तुवां दिलें । सायुज्याचें दान । ऋषींच्या समान । सनकादि ॥२०३॥
राजसूय -यज्ञ । केला धर्मराजें । तेथें ऋषि राजे । पातले जे ॥२०४॥
तयांच्या समक्ष । दुर्वाक्यें बोलोन । जेणें अपमान । केला तुझा ॥२०५॥
ऐसा शिशुपाल । दंडावयाजोगा । दिली तया जागा । स्व -स्वरूपीं ॥२०६॥
उत्तानपादाचा । पुत्र धुवबाळ । मिळवाया स्थळ । पितृ -अंकीं ॥२०७॥
मधुवनामाजीं । घालोनि आसन । करी तुझें ध्यान । भक्ति -भावें ॥२०८॥
तरी तयासी तूं । चंद्रसूर्याहून । भलें दिलें स्थान । विश्वामाजीं ॥२०९॥
दुःखितांसी ऐसें । कैवल्य उघडें । देतां मागें पुढें । पाहसी ना ॥२१०॥
अंतीं नारायण । नाम उच्चारून । करी पाचारण । पुत्रालागीं ॥२११॥
ऐसा अजामीळ । संसारीं आसक्त । तरी हि तो मुक्त । केला तुवां ॥२१२॥
वक्षःस्थळीं लाथ । मारी भृगुऋषि । परी मिरविसी । भूषण तें ॥२१३॥
दुष्ट शंखासुर । जो कां तुझा वैरी । बाळगिसी करीं । देह त्याचा ॥२१४॥
अपकार्यांसी हि । तुझा उपकार । होसी तूं उदार । अपात्रीं हि ॥२१५॥
घेवोनियां दान । त्रिपाद भूमीसी । बळीचा झालासी । द्वार -पाळ ॥२१६॥
काय गणिकेनें । केली तुझी भक्ति । काय गुण -कीर्ति । परिसिली ॥२१७॥
होती बोलावीत । कौतुकें राघूसी । तरी वैकुंठासी । नेलें तिज ॥२१८॥
ऐसें अल्प -स्वल्प । पाहोनि निमित्त । करिसी तूं मुक्त । एकाएकीं ॥२१९॥
तो तूं कृपावंत । उदार दयाळ । काय वाळिशील । मजलागीं ? ॥२२०॥
करोनि सुकळा । दुग्धाचा अवीट । निवारी संकट । जगाचें जी ॥२२१॥
तिये सुरभीचीं । वत्सें क्षुधाग्रस्त । ऐसें विपरीत । घडे केविं ? ॥२२२॥
म्हणोनि जें तुज । विनविलें कांहीं । तें तूं लवलाहीं । दाविशील ॥२२३॥
परी विश्वरूप । देखावया थोर । योग्यता साचार । देईं मज ॥२२४॥
देवा तुझ्या विश्व - । रूपाचें दर्शन । घ्यावया लोचन । समर्थ हे ॥२२५॥
ऐसें तुज वाटे । तरी मनोरथ । आतांचि त्वरित । पूर्ण करीं ॥२२६॥
ऐसी यथायोग्य । कराया विनंति । सरसावें पति । सुभद्रेचा ॥२२७॥
तंव तें षड्गुण - । चक्रवर्तीलागीं । कैसें त्य प्रसंगीं । साहवेल ॥२२८॥
कृपामृतें पूर्ण । मेघ तो श्रीकृष्ण । सन्निध अर्जुन । वर्षाकाळ ॥२२९॥
ना तरी तो वाटे । कोकिळ श्रीकांत । पार्थ तो वसंत । जणूं तेथें ॥२३०॥
किंवा पाहोनियां । पौर्णिमेचा विधु । जैसा क्षीरसिंधु । उचंबळे ॥२३१॥
तैसा द्विगुणित । प्रेम -बळें कृष्ण । पार्थासी पाहोन । उल्हासला ॥२३२॥
तया उल्हासाच्या । मग आवेशांत । म्हणे कृपावंत । गर्जोनियां ॥२३३॥
दाखवीन देख । आतां क्षणार्धांत । पार्था असंख्यात । स्वस्वरूपें ॥२३४॥
एक विश्वरूप । देखावें ऐसा च । मनोरथ साच । अर्जुनाचा ॥२३५॥
विश्वरूपमय । परी देवें भलें । करोनि ठेविलें । आघवें चि ! ॥२३६॥
अहो देखा कैसें । देवाचें औदार्य । अपार तें काय । मापितां ये ? ॥२३७॥
सह्स्त्र पटीनें । जो का सदोदित । पुरवितो आर्त । याचकांचे ॥२३८॥
भक्ताचिया भावा । भुलोनि तो देव । आपुलें सर्वस्व । अर्पीतसे ॥२३९॥
ठेविलें चोरोन । वेदांपासोनि हि । दाविलें जें नाहीं । शेषातें हि ॥२४०॥
रमेमासोनि हि । राखिलें निभ्रांत । जीवींचें गुपित । ऐसें जें का ॥२४१॥
तें चि विश्वरूप । नाना प्रकारांनीं । प्रकट करोनि । दावीतसे ॥२४२॥
दावी विश्वरूप । श्रीहरि साचार । भाग्य हें अपार । अर्जुनाचें ॥२४३॥
जागृतीमधून । स्वप्नामाजीं जातां । दिसे तें तें स्वतां । आपण चि ॥२४४॥
तैसा अगणित । ब्रह्मांडस्वरूप । झाला आपोआप । स्वयें चि तो ॥२४५॥
प्रकटिल विश्व - । रूपाचा आकार । केशवें साचार । एकाएकीं ॥२४६॥
फेडोनियां स्थूल - । द्दष्टीचें पटल । दाविलें केवल । योगैश्वर्य ॥२४७॥
परी नाहीं आलें । तयाचिया ध्यानीं । पार्थ कैसा झणीं । देखेल हें ॥२४८॥
झाला प्रेमातुर । म्हणे एकाएकीं । पार्था हें विलोकीं । विश्वरूप ॥२४९॥
श्रीभगवानुवाच --
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्त्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥५॥
तुज विश्वरूप । दाखविलें एक । कायसें कौतुक । तरी त्यांत ? ॥२५०॥
माझ्या चि स्वरूपीं । आघवें हें आतां । सामावलें पार्था । देख देख ॥२५१॥
कांहीं कृश कांहीं स्थूळ । लघु आणिक विशाळ ॥२५२॥
कांहीं सरळ विस्तीर्ण । कांहीं देख प्रांतहीन ॥२५३॥
अनावर प्रामाणिक । कांहीं प्रेमळ कडक ॥२५४॥
कांहीं व्यवहाराप्रिय । कांहीं तटस्थ निष्क्रिय ॥२५५॥
कांहीं दक्ष कांहीं मूढ । कांहीं सोपीं कांहीं गूढ ॥२५६॥
कांहीं उदार कंजूष । कांहीं रागीट विशेष ॥२५७॥
कांहीं सौम्य आणि शांत । कांहीं देख मदोन्मत्त ॥२५८॥
कांहीं बोलती गर्जून । कांहीं स्वीकारिती मौन ॥२५९॥
कांहीं स्तब्ध चि साचार । कांहीं आनंद -निर्भर ॥२६०॥
कांहीं लोभिष्ट विरक्त । कांहीं जागीं कांहीं सुप्त ॥२६१॥
कांहीं संतुष्ट प्रसन्न । कांहीं कष्टी आणि खिन्न ॥२६२॥
कांहीं अशस्त्र सशस्त्र । कांहीं तल्लीन विचित्र ॥२६३॥
कांहीं तामसी स्नेहाळ । कांहीं अक्रळविक्रळा ॥२६४॥
कांहीं उत्पत्तीचा खेळ । खेळती गा सर्वकाळ ॥२६५॥
कांहीं संरक्षणशील । प्रेमें करिती सांभाळ ॥२६६॥
कांहीं संहारकार्यांत । देख आवेशें वर्तत ॥२६७॥
कांहीं देख साक्षीभूत । सर्व कर्मीं अनासक्त ॥२६८॥
ऐसीं नानाविध । आणि असंख्यात । स्वरूपें तीं येथ । देख माझीं ॥२६९॥
आतां देख देख । आणिक तीं माझीं । प्रकाशती जीं जीं । दिव्य तेजें ॥२७०॥
तयांचे जे वर्ण । ते हि भिन्न भिन्न । कैसे विलक्षण । देख देख ॥२७१॥
तप्तभांगारापरिस । कांहीं तेजस्वी तांबूस ॥२७२॥
जैसें संध्यासमयास । दिसे शेंदरें आकाश ॥२७३॥
तैसीं देख हीं साचार । कांहीं पिंगट अपार ॥२७४॥
जैसें दिव्य माणिकांनीं । जातां ब्रह्मांड भरोनि ॥२७५॥
तेज फांके अनिवार । तैसीं सहज सुंदर ॥२७६॥
कांहीं केशरी उत्तम । देख अरुणोदयासम ॥२७७॥
कांहीं देख शुभ्रवर्ण । शुद्ध स्फटिकासमान ॥२७८॥
इंद्रनीळासम कांहीं । रूपें सुनीळ हीं पाहीं ॥२७९॥
कांहीं देख काळींकुट्ट । जणूं काजळाचें कीट ॥२८०॥
कांहीं रक्तवर्ण लाल । जैसें जास्वंदीचें फूल ॥२८१॥
कांहीं देख पीतवर्ण । दिव्य कांचनासमान ॥२८२॥
कांहीं नव -मेघांसम । देख श्यामल परम ॥२८३॥
कांहीं देख गौरवर्ण । शुभ्रचंपकासमान ॥२८४॥
जैसे हरित तृणांकुर । तैसीं कांःईम हिरवींगार ॥२८५॥
तप्त -ताम्र तैसीं देख । कांहीं तांबडीं आणिक ॥२८६॥
कांहीं श्वेतचंद्रासम । देख निर्मल उत्तम ॥२८७॥
ऐसीं पार्था देख देख । माझीं स्वरूपें अनेक ॥२८८॥
विविध वर्णांचीं । माझीं रूपें पाहीं । तैशा आकृति हि । भिन्न भिन्न ॥२८९॥
लाजोनि मदन । खालीं घाली मान । जयांतें पाहोन । धनंजया ॥२९०॥
ऐसीं सुकुमार । सुंदर हीं देख । बांधा हि सुरेख । जयांचा गा ॥२९१॥
आणि तुळतुळीत । जयांचें शरीर । ऐसीं मनोहर । स्वरूपें हीं ॥२९२॥
शृंगार -श्रियेचीं । जणूं भांडारें हीं । उघडलीं पाहीं । आज येथें ॥२९३॥
देख हीं गोंडस । आणि गुबगुबीत । कांहीं किडकिडीत । आणि शुष्क ॥२९४॥
अत्यंत विक्राळ । आणि दीर्घकंठ । विताळ विकट । तैसीं देख ॥२९५॥
ऐसीं स्वरूपें हीं । नानाविधाकृति । पाहूं जातां मिति । नाहीं तयां ॥२९६॥
अंग -प्रत्यंगांत । तयांचिया पाहें । सामावलें आहे । विश्व सारें ॥२९७॥