( स्थळ : शाहजादी लवंगिका हिचें नृत्यागार, बजवय्ये हत्यारं लावीता आहेत. तितक्यांत उस्ताद जमनलाल घाईघाईनें प्रवेश करतो. )
जमनलाल : ( बजवय्यांना ) मुझे देर तो नही हुई ? बजवय्ये, हत्यारं लागून तयार आहेत ना ?
बजवय्ये : हां उस्ताद, तय्यार है ।
[ शहाजादीची सखी ‘ कलिया ’ प्रवेश करते, ]
कलिया : उस्ताद, सरकार येत आहेत पायल बांधून.
जमनलाल : कलिया, हम उन्हीके इंतजारमें हैं । येऊं दे त्यांना,
कलिया : जी हां ( जाते. )
जमनलाल : बजवय्ये, शाहजादीसाहिबा आ रही है । दूध--शक्कर के जैसे साथ एकजीव पाहिजे.
[ पखवाजवाला, सारंगिया, सतारिया इत्यादि एकाच वेळीं ‘ मल्हार ’ ची स्वरमाला छेडतात. ]
जमनलाल : हां, ठीक है ।
[ सुरावट चालू असतांना शाहजादी लवंगिका आपली सखी ’ कलिया ’ हिच्यासह, पैंजणांचा झणत्कार करीत, रंगभूभीवरील विरळ पडद्यामागें येते. सखी पडद्याबाहेर येऊन उभी राहाते. जमनलालल ‘ आदाब अर्ज’ करते. ]
जमनलाल : ( आदबीनें ) सरकार, आज आपल्याला सावन--गीत अन सावननृत्य करायचं आहे ‘ मल्हारां त.
शाहजादी : कलिया, उस्तादांना म्हणावं, आमचीहि तीच तमन्ना आहे.
कलिया : आपला हुकूम मंजूर आहे सरकारांना,
जमनलाल : बहोत अच्छा. शाहजादी साहिबा, आपकी साथ करनेके लिये खुड सावनभी आपकी खिदमत में हाजीर है !. देखिये उसकी काली घटा ! गगन के आंगन में काले काले बादल धीरे धीरे आरहे हैं. ( स्वरमाला व नृत्य ) उनके साथ साथ बिजलियां भी बनठन के आयी. ( स्वरमाला व नृत्य ) शांतल पवनकी मतवारी लहरें बहने लगी. ( स्वरमाल व नृत्य )
उसी लहरोंके चंचल हिंडोलपर, बादल बिजलियोंके साथ झूला झुलने लगे--आसंमाँके इस सिरेसे उस सिरेतक !. ( स्वरमाला व नृत्य )
देखिये देखिये, मुहब्बतसे पुरकैफ बादल, उमड घुमडकर शोर मचाने लगे. बिजलियोंका चमकीला नाच भी शुरु हुवा. ( स्वरमाला व नृत्य )
और इधर. प्यासे चातकने चंचूपुट खोल दिये. धरतीके हिजाबके हरियाले घुंघट खुल गये. ( स्वरमाला व नृत्य ) सुंदरियों के मनमोर के साथ साथ, बनमोर भी नाचने लगा. जलधारा रूमझुम बरसने लगी. त्वरमाल व नृत्य )
वही अमृतधारा साथ लेकर, बल खाती हुई, इठलाती हुई, नदियाँ सागर को मिलने चली. ( स्वरमाल व नुत्य ) वो नदियाँभी यही सावन-गीत गुंज रही है --
सावन--घन गरजे; बजायें
मधुर मधुर ‘ मल्हार ’ ! ॥धु०॥
चमचम नाचे उसकी सजनी
छेल छबेली नार. !
इंद्र--धनुषका मोर--मुकुट सिर
सावन--घन घन--शाम चढायें ।
गोरी गोरी विजली गोपी
अपना सुंदर रूप दिखायें ।
शहनाई बन--पवन बजायें.
करें मयूर पुकार !.
हरियाला सावन मन--भावन
बरसे अमृत--धार !.
[ अभिमयगीत संपतांच वाहवा होते. हें गीत सुरू झाल्यावर प्रवेश केलेला मन्सूरखां, इतरांहून मोठया आवाजांत वाहवा करतो. ]
मन्सूरखां : बहोत अच्छा ! कितनी लाजवाब मीठी आवाज ! वाह क्या खूब ! हुजूरने छेडी रसीली तान बस आपने तो काटे हैं तानसेनके कान । सुनके यह तराना हुवा बुलबुल हैरान ! दिवाना हुवा जमाना ; नीचे झुका आसमान ! और नाच भी कितना अच्छा !
हो गये घायल हम सरकार !
सुनके पायलकी झनकार ।
सौ सौ अदायें, खुषीके खजानें,
भरे बाचमें ये बहारे बहार !
वाटलं , कीं सरकारांच्या पायांतलं घुंगरु व्हावं !
जमनलाल : घुंगरु ? नको, शायरे आलम् ! आपण घुंगुरु होऊं नका,
मन्सूरखां : क्यों ?
जमनलाल : अहो, तो काय, बैलाच्याहि गळ्यांत बांधतात. त्यापेक्षां सरकारांच्या पायीं कुर्र कुर्र करणारा .
मन्सूरखां : ( अधीरतेनें ) क्या ?
जमनलाल : त्यांच्या पायांतल कुर्र कुर्र करणारा.
मन्सूरखां : क्या ? कुरकुर करणारा ?
जमनलाल : नही जी. कुर्र कुर्र कुर्र कुर्र करणारा जूता होणाची बाळगा ! रुबाबदार दिल्लीशाही चढाव व्हा ! कुर्रेंबाज, तुर्रेंबाज !
मन्सूरस्त्रां : बहोत अच्छा ! ही सूचना आमच्या दर्जाला शोभणारीच आहे ! वाहव्वा ! सरकारांच्या पायींचा चढाव झालों, तर लोक मला कोहिनूर समजून शिरावर चढवतील !
बन गया गर बंदा उन पावोंका जूता ।
कौन कंबख्त नही उसे सरपे लेता ? ।
कलिया : मन्सूरखां, कोणत्याहि खानदानी स्त्रील तिची खुषामद आवडत नाहीं, हें तुम्हांल सांगायल का पाहिजे ?
जमजलाल : ( जरा बाजूल ) हो हो, यांना सांगायलच पाहिजे. बेटी कलिया. अल्लानं अक्कल कमी दिली म्हणून, कांहीं लोक अस्सा सूड उगवतात त्या अल्लावर !
मन्सूरखां : ( संशयानें ) क्या गुफगू हो रही है ? उस्ताद, आपलं काम सुरू करा. सारंगी--सतार सुरू, गया--टप्पा बस्स झाल्या !
कलिया : वा ! खासा न्याय शायरे आलम हे जमनलाल नाचगाण्याचे उस्ताद आहेत. पण जहाँपन्हांच्या मजींचा नि शाहजादीसाहिबांच्या दिलदारीचा फायदा घेऊन, आपण मात्र अजब रुबाब दाखवीत आहांत, शाहजादीसाहिबांच्या उस्तादांना दम भरीत आहांत. या मैफलींत ज्यानं त्यानं आपला दर्जा ओळखून वागावं ! शायरे आलम--
औसी जगह बैठना कि कोड ना बोले ऊठ ।
और औसी बात करना कि कोइ ना बोले चूप ॥
मन्सूरखां : ( लाळघोटेपणानें ) जी हां, जी हां, बिलकुल ठीक बात कही, शाहजादीसाहेबांच्या संगतींत तूंहि शायरी बोलूं लागलीस की ! सरकारांचा सहवास हा असा असतो !
शाहजादी : ( विषय बदलण्याच्या हतूनें ) कलिया, ये फजूल बातें बंद करो. मन्सूरखांना गुलब--बुलबुल--नाचाची गजल उद्यां पाठवून द्यायला सांग.
कलिया : ( मन्सूरखांकडे पाहात, संवचटपणें ) कसूर माफ, कसूर माफ करा सरकार. शायरे आलम. शाहजादीसाहिवांना ‘ गुलाब--बुलबुल’-- नाचासाठीं एक गजल पाहिजे आहे. ती उद्यां पाठवून देण्याचा हुकूम आहे त्यांचा.
जमनलाल : ख्य़ालमें रखिये शायरे आलम. इथं येण्याची तकलीफ घ्यायचं कारण नाही । उद्यां पाठवून द्या गजल जासूदाबरोबर.
मन्सूरखां : उद्यांचा वायदा कशाला ? उद्यांचा काय भरोसा ?
हूजुर, चंचल जिंदगी दमभरका है खेल ।
कलकी बात छोड दो, हो न हो फिर मेल ॥
अभीके अभी गजल पेश करतां हूँ ! कलिया, परवानगी आहे सरकारांची ?
शाहजादी : कलिया, उनको कहेना--‘ गजल चांगली पाहिजे, घाई कशाला करतां ?’
कलिया : बुलबुले--देहली ! चांगली गजल पाहिजे आहे सरकारांना, झुरळाच्या पायाल शाई लावून त्याला कागदावर नाचवलं. कीं झाली गजल तयार. अशी गजल बनविण्य़ांत काय कर्थ ? असली गजल नको तर ‘ असली ’ गजल पाहिजे । घाईरर्दोंन उगाच काम बिघडेल. म्हणून सरकार म्हणतात. उयां. पर्यंत गजल तयार झाली तरी हरकत नाहीं,
मन्सूरखाँ : कलिया, मला असं छेडूं नकोस, अभीके अभी एक गुलाब--चुळ--बूळ--कसूर माफ, कसूर माफ--एफ गुलाब--बुलबुल वरील बढिया शेर सुनावतो,
जमनलाल : ( मिस्किल स्वरांत ) क्या ? गुलो--बुलबुलपर शेर ? और वो भी इसी वख्त ?
मन्सूरखाँ : हां हां गुलोबुलबुल ! और बो भी इसी वख्त; अभीके अभी ! यूं--
सुबहको बुलबुलके दिलके
लाख टुकडे हो गये ।
[ तीच ओळ पुन्हां पुन्हां आळवतो. पण पुढची ओळ सुचत नाहीं. ‘ लाख टुकडे हो गये ’ हा चरण अखेर खालच्या सुरांत म्हणून हताश झाल्यागत थांबतो. ]
कलिया : हां कबूल, लेकिन आगे क्या ?
मन्सूरखां : ‘ लाख टुकडे हो गये ’ !
जमनलाल : कबूल, एकदम कबूल. लेकिन. बुलबुलच्या कलेजाचे लाख टुकडे कां झाले, त्याचं सुकस्वप्न भंग का पावलं, तें तर बोलाल की नाहीं ?
कलिया : अहो, दुसर्याचा शेर असेल हा ! म्हणून नसेल आठवत पुढचां ओळ त्यांना !
[ मन्सूरखां शरमिंदा होऊन गप्प राहातो. त्याला पुढची ओळ रचतां येत नाहीं. ]
कलिया : शाहजादीसाहिबा, यांना पुढची ओळ सुचत नाहीं. आपणच पहिली ओळ म्हणाना . म्हणजे शायद या ‘ हांजीबाबां ’ ना स्फूर्ति येईल !
शाहजादी : ठीक है, जशी तुझी इच्छा.
[ शाहजादी ती ओळ वारंवार वेगवेगळ्या ढंगांत म्हणते, ति एकच ओळहि तिल इतकी कांहीं आवडते. कीं ती पुन: पुन: आळवण्यांतच शाहजादी गुंग होते ; काव्य व व गायन यांच्या धुंद दुनियेंत ती प्रविष्ट होते. मैफलीचा तिला विसर पडतो. त्याच वेळीं मैफलींतील इतर लोक मात्र मन्सूरखांला ‘ आगे का मिसरा कहिये जनाव.” “पुढची ओळ म्हणा झटपट,” “ शेर तो पूरा कीजिये लल्दीसे ” असा आग्रह हलक्या आवाजांत करतात.
तो चिंताक्रांत होतो. पण पुढची ओळ त्याला काहीं केल्या रचतां येत नाहीं; आठवत नाहीं. तो मानेनें व हातवार्यानें ‘ काय करावं सुचत नाहीं ’ असा भाव व्यक्त करतो.
तिकडे शाहजादी आर्त सुरांत ती ओळ--तो अपुरा शेर--म्हणतच आहे. तोंच तिचे ते मधुर आलाप ऐकून गान--लुब्ध हरिणासारखे आकृष्ट झालेले जगन्नाथ पंडित, त्या मैफलींत अचानक प्रविष्ट होतात. मैफलींतले सारेजण त्यांच्याकडे टकमका पाहातात. पण त्यांचें कोणाकडेच लक्ष नाहीं. ते वेगळ्याच दुनियेंत आहेत. नादब्रह्माच्या बेहोपींत आहेत.
शाहजादीची अखेरची आर्त लकेर विराम पावते न पावते, तोंच तिजहून अधिक आर्त न खडया आवाजांत ते, त्या अपुर्या उर्दू ओळीनें मनांत उभें राहिलेलें संस्कृत--काव्य म्हणतात--]
जगन्नाथ :
उष:काले वसंतस्य हन्त बुलबुल--मानसम ।
कोमलं विमलं चाभूत विदीर्णं शत--खंडितम ॥
यदा प्रियतरं पुष्पं द्दष्टं भ्रमर--चुंबितम ।
तदा नीहार--रूपेण पतिता बाष्प--बन्दव: ॥
[ गीत संपतांच श्रोते आश्रर्यमुग्ध होऊन ‘वाहवा वाहवा ’ करतात . ]
जमनलाल : वाहवा, कलिया, कविराजांनीं तर कमाल केली. यांच्या संस्कृत शायरीनं नादमाधुर्याची तर बहार उडविली.
कलिया : हो. पण तिचं अर्थमाधुर्य पुरेपूर कसं कलनार आपल्याला ?
मन्सूरखां : ( खंवचटपणें ) मुष्किलच आहे तें ! दोनचार नाणीं मडक्यांत टाकून तीं वाजविलीं. तर त्यांतूनहि मधुर आवाज निघतो. पण त्याला कांहीं अर्थ असतो का ? जनाब ! ये क्या शायरी है ?
जमनलाल : वो जाने दो. ( साम्रोरा जाऊन नम्रतेनें ) कविराज, आपण बुलबुलंबाबत कांहीतरी बोललांत, इतकंच कळलं आम्हांला. आम्ही दाराशुकोहसारखे संस्कृतचे जाणकार थोडेच आहोंत ? तेव्हा म्हटलं.
जगन्नाथ : आलं लक्षांत, आलं लक्षांत. मी तो अपुरा ‘ शेर ’ संस्कृतांत पुरा केला म्हणून भांबावलांत तुम्ही. पण त्यांत काय आहे मोठंसं ? तोच उर्दूंत पुरा करता येईल .
सुबहको बुलबुल के दिलके
लाख टुकडे हो गये ।
प्यारसे भवरेने जब
रुकसार गुल के चूम लिये ॥
बेवफाई देखकर
रोने लगा वो जार जार ।
गुलजार में, शबनम नहीं.
आँसूं के गौहर गिर गये ॥
[ मन्सूरखां सोडून सर्वजण “ वाहवा ” “ सुभान अल्ला ” “ कमाल कर दी ” इत्यादि तारीफ करतात. ]
जमनलाल : वाहवा ! कलिया. उर्दू भाषेवरहि यांची हुकमत आहे, हा कीतींचा डंका सार्थ केला ह्यांनीं !
कलिया : हो. नाहींतर हे ’ शायरे आलम ’, बसले होते ‘ लाख टुकडे ’ करीत तुमच्या--आमच्या जिवांचे !
[ मन्सूरखां संतापतो. पण तो कांहीं बोलणार, इतक्यांत ]
शाहजादी : कलिया, त्या शानदार शायरीच्या बेहतरीन बहरांत मशुल होऊन, सारां मैफल मोंगली आदब विसरून गेली. याबद्दल दिलगिरी पेश करा अन कविराजांना बसायला प्रथम आसन द्या.
कलिया : कविराज, शाहजादीसाहिबा म्हणतात.
जगन्नाथ : ( एकदम भानावर येऊन ) माफ करा. मी इथं ओळखदेख नसतांना आलों. मैं माफी चाहता हूं. पण मी तरी काय करूं ? मी आलों नाहीं. मला खेंचून आणलं त्यांनीं !
जमनलाल : खेंचून आणलं ? सर्वांचं अंतःकरण आपल्या शायरीनं खेंचून घेणार्या जगन्नाथ पंदितांना खेंचून आणलं ? अशीं बेअदब माणसं आहेत तरी कोण ?
कलिया : कोणीं खेंचून आणलं आपल्याला ?
जगन्नाथ : त्या मधुर आलापांनीं ! मी या महालावरून सहज जात होतों, तोंच ते दर्दभरे मधुर स्वर माझ्या कानीं पडले--घायाळ बुलबुलाच्या आर्त पुकारांसारखे ! ते आलाप माझं ह्रदय भेदून गेले. आणि त्यांनींच मला इथं आणलं. त्यामुळें कदाचित आपल्या मैफलीचा रसभंग झाला असेल. गुस्ताखी. माफ. जातों मी. [ जाऊं लागतात. मन्सूरखां ’ जातो आहे तर जाऊं द्या ’ अशा आशयाचे हातवारे करून ]
मन्सूरखां : अच्छा ! खुदा हाफीज !
शाहजादी : नहीं नहीं. सहेली, त्यांना जाऊं देऊं नकोस, त्यांनीं या मैफलींत रंग भरल आहे. त्यांच्या इथं येण्यानं ह्या मैफलीचा गुलशन रोशन६ झाला आहे
जगन्नाथ : कलिया , सरकारांना म्हणावं. आपण केलेल्या प्रशंसेबद्दल मी कृतज्ञ आहें, पण औपचारिक स्तुतीचा असा मुलयम मारा सुरु झाला. की आमचा जीव घाबरा होतो.
मन्सूरखां : होणारच ! कारण मेहमानाची इतकी तारीफ करणं शाहजादीसाहिबांच्या दिलदारीला शोभतं; पण दाराशुकोहच्या वशिल्यां शहेनशहांच्या दरबाराम्त आलेल्या या दख्खनी शायरांना अथवा काफर कवीला ती तारीफ शोभत नाहीं. म्हणूनच यांचा जीव घाबारा झाला !कांही झालं तरी खाविंदांच्या आश्रयाला आलेले पोटभरू शायर हे !
जमनलाल : शायरे आलम ! जहाँपन्हांच्या दरबारांत जगन्नाथराय आले हें खरं; पण पोटभरू म्हनून नाहीं. काशीच्या पंडितांचा अन जयपूरच्या मौलवींचा पाडाव केल्यानं ते मशहूर झाले. म्हणून तर या दख्खनच्या विद्वत चिंतामणीला दिल्लीपतीनं बोलावून घेतलं आणि आपल्या मुकुटांत मानाचं स्थान दिलं. अशा या विद्वान कवील हिणविण्यांत काय मतलब आहे ?
जगन्नाथ : उस्ताद, कांहीं का मतलब असेना, आम्ही तिकडे लक्षच देत नाहीं. ‘ अनुहुंकुरूते घन--ध्वनिं नहि गोमायु--रुतानि केसरी !’ सिंहानं शक्यतोंवर मेघांच्या गडगटाला आपल्या गर्जनेनं जबाब द्यावा; कोल्हेकुईल नव्हे !
मन्सूरखां : ( संतापून ) खामोश ! कोणाला कोल्हा म्हणतां ? जबान छाढून टाकीन !
जगन्नाथ : खुशाल टाका ! आपल्या शेळपट शायरीचं पाणी पाहिलं, आतां जनानी जंबियाची बहादुरी बघुं या !
मन्सूरखां : खामोश !.
जमनलाल : ( समजावणीच्या स्वरांत ) हां हां, नवाबजादे. आपण एवढे “ शायरे आलम ” आणि हे जगन्नाथ पंडित एवढे ‘ काव्य केसरी.
मन्सूरखां : हे ’ काव्य-केसरी ‘ ? हे ’ दख्खनचे सिंह ’ ? मालूम है, मालूम है, कंगाल दख्खनके भूकेबंगाल पंडित बहोत देखे हैं हमने !
जगन्नाथ : पाहिले असतील : पण माझ्यासारखे नाहीं. दिल्लीपतींपुढें लाचारीनं गोंडा घोळून पदवी. पैसा आणि पारितोषिक उपटणं हेंच ज्याचं ध्येय, असे कांहीं दक्षिणी विद्वान या दिल्लींत तळ ठोकून असले आहेत. पण हा जगन्नाथ त्यांच्यापैकीं नव्हें ! देवी सस्वतीच्या कृपनें , गंगायमुनेच्या आशीर्वादानं, या जगन्नाथाचं सारस्वत मनोहारी झालेलं आहे; केवळ दरबारी मेहरबानीनं वाढणारं सारस्वताचं झाड नव्हे हें ।
मन्सूरखां : शाहजादीसाहिबांच्या मैफलींत ही मुजोरी ? मी माझ्या बेहतरीन उर्दू शायरीचे नमुने पेश करतो. हिंमत असेल तर त्याहून वरचढ नमुने आपण पेश करा. कलिया. सरकारांना विचार, आहे का या लढतीस परवानगी ?
कलिया : परवानगीची गरज नाहीं. शायरीची लढत पाहाण्याचा शौकच आहे सरकारंना, होऊं द्या दोन भाषांतील शायरीची लढत. हं उस्तादजी, आतां मघांसारखे ‘ लाख टुकडे ’ होणार बरं का !. ( वाट पाहून ) हां, मन्सूरखां, शुरू कीजिये ! पहिली ओळ तरी आठवते ना ? चला, धमाल उडवून द्या.
मन्सूरखां : हां, हां, जरा कमाल तो देखिये. उस्तादजी, मतला अर्ज है ?
जमनलाल : हां, इरशाद हो, इरशाद हो !
मन्सूरखां : मसजिद में हम हर दिन गये,
शेखकी सों वात सुन ली ।
तो भी ये ( थांबून ‘ आह ’ असें उदगारतो )
मदहोश दिलसे ( ‘ जो हो हो हो ’ स्वत:शींच खूषीत येऊन उदगारतो )
दिलरुबा माशुक न निकली ॥
[ श्रोते मंद स्वरांत ‘ वाहवा वाहवा ’ करतात. ]
मन्सूरखां : ( ऐटीत ) आहे का असा एक तरी शेर तुमच्या पोतडींत !
जगश्राथ : एकच काय, असे पन्नास शेर आहेत आमच्यापाशीं !
मन्सूरखां : फजूल बढाई नको.
जगन्नाथ : ती संवय आम्हांला नाहीं । मनांत भरलेली सुंदर आणि तिच्या इष्काची अदिरा, यांच्यावर मशिद--मंदिराची, कुराणांची--पुराणांची, इतकंच काय, खुद्द परमेश्र्वराची मात्रा चालत नाहीं, हा विचार कांहीं आम्हांस नवीन नाहीं !
मन्सूरखां : फजूल बढाई नको, कुछ शायरी सुनाइये जनाब !
जगन्नाथ : अच्छा , उर्दू पाहिजे असेल तर हा घ्या--खुद्द खूदाशीं झालेला आमचा सबाल--जबाब--
मेरी आह सुनके जो अल्लाह बोले--
‘ गमे जिंदगीकी दवा इष्कही है ।’
‘ मगर इष्कके दर्दकी क्या दवाई ?’
जो ये हमचे पूछा--वो खामोश बैठे ॥
[ मन्सूरखां चकित होऊन मटकन खालीं बसतो. इतर सर्वजण ‘ वाहवा, बाहवा ,’ ‘ बहोत अच्छे ’ म्हणतात. ]
इष्काची बिमारी बेदवा आहे. सर्व रोगांवर औषध आहे; सर्व दुःखांवर इलाज आहे; पण इष्कावर इलाज नाहीं, मग प्रेयसी मनोमंदिजरांतून बाहेर निघणार कशी ? म्हणूनच आम्हीं संस्कृतांत म्हटलं आहे--
उपनिषद: परिपीता गीतापि च हन्त !
मतिपथं नीता तदपि न, हा !
विधुवदाना मानस--सदनादियं बहिर्याति । ( सर्वजण ‘ बाहवा ’ करतात. )
जमनलल : क्यों. शायरे आलम, खामोश क्यों बैठें हो ? आपने दिलदारीसे दाद मी नही दी ?
जगन्नाथ : अहो, देवभाषा संस्कृत समजत नसेल कदाचित या शायरांना ! [ सर्वाना कवित्व कळावं म्हणून तीच कल्पना देशभाषेंत सांगतात--]
रामायण--पारायण केलें केलें गीता--वाचनही ।
तरिही विधुवदना ही ललना मन--सदनांतुन ना जाई । [ वाहवाची धूम उठते ]
शाहजादी : वाहवा । बेहतरीन ! कलिया, उनको कहेना, अनेक भाषांवरची ही बिनजोड हुकमत दाखवून, आपण मैफलीच्या दिलावार हुकमत बसविली आहे !
कलिया : पंडितजी, आपण बहुभाषा--प्रभुत्व दाखवून या रसिकांच्या सभेवर प्रभुत्व स्थापन केलं आहे, असं सरकारचं मत आहे.
जगन्नाथ : कलिया, या गुणग्राहतेबद्दल त्यांना शुक्रिया कळवा आणि सांगा, कीं भाषा--भाषांचीं भांडणं आम्हांस वस्तुतः पसंत नाहींत. प्रत्येक भाषेचं कांहीं वेगळं वैशिष्टय असतं , म्हणूनच आमच्या देववाणीचं अमृत आम्ही भरपूर प्यायलें असलों, तरी उर्दू--कविता--सुंदरीच्या अधरींची शराबहि आम्हीं मोकळ्या मनानं चाखली आहे !
मन्सूरखां : क्या ? संस्कृत--भाषा अमृत ? और हमारी उर्दू शराब ? हमें यह हरगिज मंजूर नही !
कलिया : म्हणजे मन्सूरखां, फिरून लढत करण्याची जिद्द उरली आहे तर ?
मन्सूरखां : जी हां. आतां अस्सल चीज बाहेर काढतों ! [ शाहजादीकडे वळून ] हम सिर्फ एकही मिसरा पेश करते हैं, हुजूर मिसरा अर्ज है ?
जमनलाल : इरशाद हो ! इरशाद हो !
मन्सूरखां : शुक्रिया --
[ नेहनीच्य संवयीप्रमाणें, कवितेचा चरन म्हणण्याआधीं नुसता मूक अभिनय करतो; हाव--भाव , हातवारे करतो, आणि मग--]
परदा उठाया, फिर गिराया, आर फिर उठा बैठे !
जमनलाल : वा: ! बहोत अच्छा ! गजब कर दिया !
मन्सूरखां : यकीनन गजब हुवा ! सुनिचे--“ एका परदानशीन यवन --सुंदरीनं भर मैफलींत आपल्या चेहर्यावरचा परदा जरा वर उचलल. अन् फौरन खालीं आणल. और क्या ताज्जूब है ! फिरसे परदा एकदम बाजूला हटवून वो चंद्रमुखी, गरूर के साथ पुरकैफ नजरसे देखने लगी ।
जमनलाल : वा: ! वा: ! क्या मिसरा है--मिसरीके जैसा ! मीठा ! लजवाब !
मन्सूरखां : शुक्रिया [ जगन्नाथ पंडितांना--] लेकिन आप कहिवे ऐसा क्यों हुवा ? वो चंद्रमुखी--वो माहेलका--वे परदा क्यों हुई ?
जगन्नाथ : क्यों ?--
परदा उठाचा, फिर गिराया, और फिर उठा बैठे ।
कि देखें देखनेवालों में किस में होश बाकी है ॥
[ श्रोते अतिशय तारीफ करतात. ‘ वाहवा !’ ‘ क्या मजा आया ’ ‘ सुभानअल्ला. ’]
शाहजादी : वाहवा ! जगन्नाथराय, अशा शायरीवर जान कुरवान करावीशी वाटते !
मन्सूरखां : सरकार, या दख्खनी शायराची इतकी तारीफ ? सवाल--जबाबांना परवानगी द्या, त्यांत मीं जगन्नाथाला चीत नाहीं केलं. तरच त्याची तारीफ करणं ठीक होईल. सरकार, द्याच सवाल--जबाबांना परवानगी.
शाहजादी : परवानगी आहेच आमची--
मन्सूरखां : शुक्रिया ! बहोत अच्छं ! आतां माझ्या या सवालाला हिंमत असेल, तर जगन्नाथांनीं जवाव द्यावा !
कलिया : ( हंसून ) सवाल तर सांगाल की नाहीं ? सवाल न सांगतांच जवाव ?
मन्सूरखां : नहीं जी ! ओसे कैसे ? सुनिये--सुनिये-- ( साभिनय म्हणतो )
देख उस हुन्सवालीकी
कमर क्या खूच है पतली ।
बताओ जी मुझे कोई
हुई है क्यों कमर पतली ।
जगन्नाथ : अहो, कंबर बारीक नाहीं झाली, तरच नवल. पाहा बरं --
‘ त्या रमणीची कटि कां बारिक ?’
सवालास या साधें उत्तर
“ उरोज--भारें कष्टी झाली
म्हणून बनली कंबर बांरिक !” ( श्रोते वाहवा करतात )
शाहजादी : वाहवा ! क्या बेहतरीन शेर ! वाटतं, कीं या शेराचं चुबन घ्यावं !
( कलिया व जमनलाल साभिप्राय डोळे मिचकावतात. )
आहे ! क्या लाजवाब है ये जवाब ! जगन्नाथराय, तुम्हीं आज हें शायरीचं मैदान सर केलं ! ( जमनलाल व कलिया मिस्किलपणें हुंकार भरतात. )
कलिया : (हलक्या आवाजांत ) शाहजादीसाहिबा, अजून पुरं जिंकले नाहीं जगन्नाथरायांनीं. ( शाहजादीच्या कानांत कांही कुचचुजते, )
शाहजादी : ( जगन्नाथरायांना ) जगन्नाथराय, माझी ही सहेली पहेली घालण्यांत तरबेज आहे; शेरो शायरीची शौकिन आहे. तिच्या एका जनानी पहेलीला द्याल जवाब ? ( जगन्नाथपंडित मानेनें होकार देतात. )
कलिया : ( नृत्य घ अभिनय यांसह सवाल टाकते-- )
बिलगतो हाच नारींच्या सदा कमरेस ऐटींत ।
तयांशीं गोड इष्काची करी गुलगूल हा बात ॥
आणि त्या घालती याच्या गळ्याच्या भोंवतीं हात ।
कोण हा थोर नशिबाचा असे या दोन दुनियेंत ?
( श्रोते वाहवा करतात. )
जगन्नाथ : वाहवा ! सुंदर ! सुंदरच आहे ही पहेली. आणि ती शाहजादीसाहिबांच्या दासीनं टाकलेली ! खुष झालों आहें मी या सवालावर. ‘ गुणा: पूजास्थानं गुणिषु; नच लिंगं, नच वय; ’ । सहेली, ही घे बक्षिसी. ( मनगटांतील रत्नजडित सुवर्ण--पट्टक तिच्या हातीं देतात. )
मन्सूरखां : सरकार, तुम्ही इथं असतांना हे कंगाल दख्खनी शायर बक्षिसी देणार ? तुमची बेअदबी आहे ही !
जमनलाल : नवाबजादे, खर्या रसिकाचं मन कुठंहि गुण पाहिला. कीं हें असंच उचंबळून येतं. कधींकधीं दिलदारीला नाहीं राहात स्थळकाळाचं भान ! दिलदारी बेहिशेबी असते ।
मन्सूरखां : ही दिलदारी नाहीं; दिलदारीचा देखावा आहे. सवालाला जवाब सुचत नाहीं., तो टाळण्याची युक्ति आहे ही.
जगन्नाथ : ( उपहासानं-- ) बरोबर ओळखलं मन्सूरखांनीं, हा सवाल आहे फारच कठीण ! मन्सूरखांच कदाचित जबाब देऊं शकतील ! हं, मन्सूरखां, आपणच द्या जवाब.
मन्सूरखां : अं ?. हम औरतोंके सवालोको जबाब नही दिया करते !
जगन्नाथ : वाहवा ! हे शायरे आलम तर नाहीं म्हणतात. ठीक आहे. मग आम्ही प्रयत्न करून पाहातों ! यांचा सवाल असा आहे--
बिलगतो हाच नारींच्या सदा कमरेस ऐटींत ।
तयांशीं गोड इष्काची करी गुलगूल हा बात ।
आणि त्या घालती याच्य गळ्याच्या भोंवतीं हात ।
कोण हा थोर नशिबाचा, असे या दीन दुनियेंत ?
अहो, उत्तर एकच-- ‘घट पाण्याचा तो तर चावट ! ’
( सर्वजण वाहवा करतात. )
शाहजादी : वाहवा, शायरे दख्खन, साहबेकलाम ! आपण ही पहेली तर बराबर ओळखली. पण ती मुष्कील नव्हतीच. आतां मी एक सवाल तुम्हांला टाकतें, त्याचा जवाब तुम्ही बराबर दिलांत, तर ही लवंगिका तुम्हांलाच उस्ताद करून तुमच्या पायाशीं शायरीचे धडे गिरवील !
जगन्नाथ : याहून मोठं भाग्य तें कोणंत ? आपल्यासारखी शिष्या लाभणं, हें राजकविपद लाभण्याहून मला मोलाचं वाटेल. पण तें जाऊं द्या, आपला सवाल तर सांगा.
[ इतक्यांत शाहजहान व दाराशुकोह मागील दरवाजांत येऊन उभे राहिले आहेत. रंगभूमीवरील पात्रांचें त्यांच्याकडे लक्ष नाहीं. ]
शाहजादी :
“ असे एक ऐरसाल जुगारी ॥ध्रु०॥
परी तया दे दुनिया मान !
कोण बरें हा ?” हें मज सांगुन
दावा पंडित तुम्ही हुशारी !
जगन्नाथ : ‘ सर्वश्रेष्ठ जुगारी कोण ?’ हाच ना आपला सवाल ? अहो, सर्वांत मोठा जुगारी जगन्नाथच !
मन्सूरखां : हाः हाः हाः !
जमनलाल : काय, तुम्ही जुगारी ?
जगन्नाथ : मी नव्हे, हा जगन्नाथ नव्हे, ( आकाशाकडे बोट दाखवून-- ) तो जगन्नाथ ! जगाचा स्वामी. जगाचा नाथ !--
श्रेष्ठ जुगारी तो परमेश्वर ॥ध्रु०॥
नक्षत्रांचे करुनी फांसे
जगदंबेसह जगतपटावर
तुम्हां--आम्हां करुन सोंगटया
जुगार खेळे तो विश्वंभर !
[ गीत संपतांच ‘ वाहवा ’ ची धूम उठते, ‘ वाहवा ’ चालू असतांनाच शाहजहान दाराशुकोह्सह प्रवेश करतो. ]
शाहजहान : सुभानअल्ला ! खूब, बहोत खूब !
[ सर्वजण किंचित स्तिमित होतात. अदबीनें उभे राहातात. ]
मन्सूरखां : ( लाचारीनें मुजरा करून-- ) कुसूर माफ सरकार, कुसूर माफ. आपण आलांत पण दिसलांत नाहींत, म्हणून खडी ताजीम द्यायची राहिली !
शाहजादी : अब्बाजान, माफ कीजीये, मी त्या शायरीच्या शानदार दरियांत, शब्दां--शब्दांच्या ल्हरीवर झुलत होतें, डुलत होतें, तरंगत होतें ! माझं लक्षच नव्हतं, बेअदबीची सर्वांनाच माफी असावी अब्बाजान !
शाहजहान : इसमें बेअदबी काहेकी ? आम्ही इथं आलों, ते भालदार--चोपदारांच्या ललार्या, खडी ताजीम, दरबारी मुजरे यांच्यासाठीं नाहीं, उलट त्यांना कंटाळलेला दिल तुम्हां तरुणांच्या रसील्या मैफलींत रंगून जावा म्हणून आलों. शहेनशाह म्हणून मुजरे घेण्यासाठीं नव्हे, तर बुलंद शायरीला मुजरे करण्यासाठीं ! या मैफलीचे बादशाह हे शायर आहेत आणि आम्ही त्यांची रयत आहोंत ! दरबारांत आम्ही राजे, लेकिन या मैफलींत जगन्नाथ पंडित राजे !. त्यांची ती मस्त मुलायम शायरी ऐकत आम्ही थोडा वेळ दाराआड चुपचाप खडे होतों, विचार केला, कीं मैफलीची रंगत आपल्या येण्यानं मोडूं नये, ओहो, क्या मीठी शायरी है और क्या सीरी कलाम है ! बुलबुलांचे तराणेहि कधीं कोणाला इतके दिवाणे करणार नाहींत ! ( सर्वांकडे बघत ) बैठीये, बैठीये, खडे क्यों हो ? बैठिये. पंडितजी तशरीफ रखिये.
शाहजादी : अब्बाजान, या मजेच्या वेळीं शरबत नको का ?
शहाजहान : हां हां, क्यों नहीं ?
[ कलिया इतरांना, व शाहजादी दारा--शाहजहान--जगन्नाथाराय यांना शरबताचे पेले देऊन त्यांत शरबत ओतते, ]
शाहजादी : लीजिये अब्बाजान ! लीजिये भाईजान ! घ्या जगन्नाथराय !
शाहजहान : नहीं, आम्ही नाहीं आधीं घेणार ! जगन्नाथरायांनीं या अंगूरीची शान उतरविणारी शायरीची उंची शराव परत एकदां या मैफलीला दिली पाहिजे, तिचा मान आधीं. क्यों साहबे आलम , क्या खियाल है ?
दारा : हां, आपका कहेना बोलकुल ठीक है. जगन्नाथरायांनीं कांहीं शायरी सुनावलीच पाहिजे,
मस्सूरखां : ( मध्येंत तोंड खूपसून ) बिलकुल ठीक, बिलकुल ठीक, उमेदबार शायरांना शाबासकी देण्याची ही दिलदारी शहेनशहांना शोभूनच दिसते !
जगन्नाथ : तेवढया आग्रहाचं कारणच नाहीं, आपणांसारख्या रसिकांसाठींच परमेश्वरानं कलांना जन्मास घातलं आहे. फर्माइये जहाँपन्हा !
शाहजहान : साहेब आलम , आपण जगन्नाथरायांपाशीं संस्कृत पढतां, शिवाय, आपल्या शिफारशीनं हे दिल्ली--दिल्ली--दरबारांत आले; तेव्हां आपणच आधीं फर्माइश करावी.
दारा : जशी आपली मजीं ( विचार करीत इकडे तिकडे पाहातो, तोंच नजर पखवाजाकडे जाते. ) पंडितजी, मघाशीं आपण जो जवाव दिला, त्याला या पखवाजियानें सुंदर साथ दिली. जणूं तुमच्या प्रत्येक ओळीला पखवाज ‘वाहवा’ ‘ वाहवा’ ची दाद देत होता ! तेव्हां या पखवाजाच्या बोलांवरच एखादं सुंदर कवित्व सुनवा.
शाहजहान : वा: ! आपकी फर्माइश तो खूब रही, पखवाजिये, जरा पखावजके बोल निकालो.
[ पखवाजिया बोल काढतो--‘ धिक तान, धिक तान. धिक. तान. धिगेतान. ]
जगन्नाथ : ठीक आहे, ऐका हा पखवाज काय म्हणतों तें--
पखावज सितमगग्के मैफिल में बोले --
“ यहाँ हुस्नकी तेज तलवार चाले ।
वो नादान बुझदिल न याँ पाँव डाले
जो जान कुर्बान करना न जाने ! ॥
( ‘ वाहवा‘ ’वाहवा’ची धूम उठते )
दारा : लेकिन पंडितजी, ही महफिल कतक करणारांची नाहीं !
जगन्नाथ : ठीक ठीक, ही मैफल संगदिल सुंदरींची नाहीं; कतलबाजांची नाहीं; सज्जनांची आहे ! तर मग ऐका --
मृदंगोऽवदत धीर--गंभीर घौषै:
पुराणे--कुराणे च रामे--रहीमे ।
यदीयांतरे वर्तते भेदभाव:
धिक तान धिक तान, धिक, तान. धिगेतान ! ॥
दारा : वाहवा पंडितजी, आपण धार्मिक भेदभावांचा धिक्कार करून ऐक्यभावाचा जो पुकार केलांत, तो ऐकून आम्ही खुप झालों, आपणांस काय बक्षिसी आम्हीं द्यावी ?
जगन्नाथ : साहबे आलम , जर हा पुकार आपल्याल खरोखरच आवडला असेल तर --
शाहजहान : बेशक बेशक ! क्या दिलकश शायरी है !
दारा : म्हणूनच खुल्या दिलानं बक्षिसी मागा.
जगन्नाथ : मल स्वत:ला कांहींच नको; पण आमच्या वाराणशीच्या लोकांची एक अर्जी जहाँपन्हांकदून मंजूर करून घ्यावी सरकार.
दारा : काय अर्जी आहे ?
जनन्नाथ: वाराणशीला जे यात्रेकरू येतात, त्यांच्यावर सरकारांनीं जो कर बसविला आहे, तो रद्द व्हावा अशी मागणी आहे. हुजुर, आपल्या राज्याला कोटयवधि आश्रफीचं धनधान्य जी गंगामाई देते, सर्व धर्मांची रयत जिच्या पाण्यावर पिढयान पिढया वाढली आहे, अशा त्या पुण्यमयी भागीरथीच्या पूजनाला येणार्या गरीब यात्रेकरूंवरचा हा अन्याय्य कर आपण उठवावा, एवढीच विनंती आहे. ती जहाँपन्हांनीं मंजूर केली, कीं.
शाहजहान : मंजूर, मंजूर, शिफारिशकी जरुरतही क्य है ? आपकी दरखास्त कुबूल. लेकिन एक शर्त है !
जगन्नाथ : कोणती शर्त खुदावंद ?
शाहजहान : तमाम मैफलीला आतां उंचींतली उंची शायरीची शराब आपण पाजली पाहिजे !
शाहजादी : बिलकुल सही, अब्बाजान, !. जगन्नाथराय, फिरून एकदां, तुमचे मीठे मीठे बोल, बुलंद शायरीचे शरीबी कुंभ घेऊन, असे छम छम छम छम नाचत येऊं द्या ! ( सुरई घेऊन ठुमकत चालते व थांबते. )
जगन्नाथ : अवश्य अवश्य, आज गंगामाईच्या एका ऋणांतून मुक्त झाल्यानं मीहि खुपींत आहें, फर्माइये जहाँपन्हा !
शाहजहान : ( इकडे तिकडे पाहात-- ) जगन्नाथराय, ही माझी मानलेली बेटी लवंगिका, सुरई घेऊन अशी सहज उभी राहिली आहे ! किती सुंदर दिसत आहे ! हिच्यावरच ‘ फिलबदी ’ शेर सुनवा.
मन्सूरखां : ( मध्यें तोंड खुपसून-- ) ‘ फिलबदी शेर ’ म्हणजे तुमचं तें शीघ्रकवित्व बरं का शेरेदख्खन !
जगन्नाथ : ( मन्सूरखांकडे दुर्लक्ष करून ) जहाँपन्हा ! मस्तकावर सुरई घेऊन उभ्या असलेल्या शाहजादीचं वर्णन करायला तिच्यासरखीच मोहक--मुलायम वाणी कोठून आणूं ? हैं गौर गुलाबी लावण्य ! हें मुसमुसतं मादक तारुण्य ! हे आनितंब रुळणारे केश कुरळे कुरळे कुरळे; हे स्वप्नाळू डोळे गहिरे काळे काळे ! हे मेंहदी लावलेले नाजुक नाजुक हात. आणि हे कुंदकळ्यांसारखे सुंदर सुंदर दांत ! ही भुंवायांच्या धनुष्याची कमान; लालचुटुक जिवणी लहान; आणि छातीवर गोलघुमटाची शान ! अशा या राजकन्येला पाहून मनांत अनेक रम्य कल्पना येतात. असं वाटतं, असं वाटतं कीं --
मदनाची मंजिरी ॥धृ०॥
साजिरी । उषाच हंसरी ॥
चंद्रिकाच कोंवळी । काय कांतिमान भालीं ।
रुप--औवनानें बहरली बाग वसंतांतली ! ॥
रसिक मनोहारिणी घटीं या रसिक--चित्त भरुनी-- ।
कुरंग--नयना कुठें आजला गज--गमना चालली ? ॥.
उरोज कुंभापरी रम्य हा कुंभ शोभतो शिरीं ।
सुधा--कुंभ घेउनी येइ का रंभा वसुधातलीं ? ॥.
[ सर्वजण अतिशय तारीफ करतात. ]
शाहजहान : वाहवा , वाहवा ! स्वूब ! आपकी दिलकश शायरी हमे बेहद्द--पसंद आयी. आपल्या प्रतिभेचं गगनचुंबी उड्डाण नि चमक पाहून अस्मानांत तळपणांर सुरैया--नक्षत्र देखील अचंब्यांत पडेल ! दिल्ली--दरबारांतील आपल्या शायरीच्या हंसर्या कळ्यांपुढें, इराणच्या शाही बागेंत फुललेले गुलाबहि शरमिंदे बनतील !
शाहशादी : बिलकुल सच ! अब्बाजान, ह्यांची शायरी म्हणजे झेलमकांठचा रंगीबेरंगी महकदार फुलांचा गालिचा आहे गालिचा !
शाहजहान : आम्ही तुम्हांला ‘ पंडितराज--राजतिलक ’ अशी किताबत बहाल करतों !
जगन्नाथ : ( वांकून मुजरा करीत ) याहून मोठा सन्मान तो कोणता ? जहाँपन्हा, आपल्या गुणग्राहकतेला उपमा नाहीं, दिलदारील सीमा नाहीं !
शाहजहान : ती दिलदारी नुसती सुकी किताबत देऊन तुमचा सन्मान करणार नाहीं, तिजबरोबर तुम्ही म्हणाल तें बक्षीस देण्यास आम्ही तयार आहोंत. मागा, मन चाहेल तें मोठं बक्षीस मागा, पण तें स्वत:साठीं मागा ! नाहींतर नेहमींप्रमाणें इतरांसाठीं कांहीं मागाल ! ये हमें पसंद नही. पंडितराज, फर्माइये, फर्माइये.
[ जगन्नाथराय विचारमग्न होतात, शाहजादी त्यांच्याकडे तिरप्या नजरेनं पाहाते. दोघांची द्दष्टाद्दष्ट होते. तरीहि ते स्तब्धच राहातात. ]
जमनलाल : पंडितराज--राजतिलक, खामोश कां ? मागा, कांहींतरी भरघोस मागा,
मन्सूरखां : आज तुमचं सातां जन्माचं दख्खनी दारिद्य फिटलं ! जगन्नाथ--कुसूर माफ, कुसूर माफ--पंडितराज--राजतिलक जगन्नाथ ! मागा, कांहींहि मागा, वर्षभराचे पोषाख करून मागा !
जमनलाल : जहागीर मागा अथवा रत्नजडित शिरपेंच मागा.
शाहजहान : ( विचारमग्र जगन्नाथरायांना- ) कहिये, आपकी क्या तमन्ना है ? रथ ? अंमारी ? घोडे हाथी ? ( जगन्नाथपंडित कांहींच उत्तर देत नाहींत. )
शाहजहान : सोना ? चांदी ? हिरे? मोती ?
जगन्नाथ : नको जहाँपन्हा, यांच्याविषयीं मला आसक्ति नाहीं.
मन्सूरखां : बडी ताज्जूबकी बात है !
[ शाहजादी जगन्नाथांकडे एक साभिलाष कटाक्ष टाकते. )
दारा : ( जगन्नाथरायांना ) मागा, काय वाटेल तें मागा, जहाँपन्हांची दानशुरता आपल्याला माहीत. आहे ना ? दिलदारी नि दानत याद आहे ना ?
जगनाथ : याद आहे. यापूर्वींच अनुभवली आहे.
शाहजहान : तो फिर आप चाहते क्या हैं ? अगर चाहते हों तो एक सूबा हम आपको दे देंगे.
जगन्नाथ : पण जहाँपन्हां, मला तें कांहींहि नको,. लक्ष्मीच्या छनछनाटांत माझं मन रमत नाहीं.
दारा : फिर आपको क्या चाहिये ? तुमची मागणी तरी काय आहे ?
जगन्नाथ : माझी मागणी एवढीच आहे, कीं--पण नकोच ! “कोऽर्थीं गतो गौरवम ?”
शाद्दजहान : कहिये. रूके क्यों ? कहो, क्या चाहते हो ?
जगन्नाथ : ( शाहजादीकंडे चोरटा कटाक्ष टाकून ) जहाँपन्हां, चंद्रिकेच्या दर्शनानं धुंद झालेल्या सागराची जी मागणी असते, दीपकळीच्या लावण्यानं बेहोष झालेल्या पतंगाची जी मागणी असूं शकते, तीच माझी मागणी आहे !
शाहजहान : मतलब ?
जगन्नाथ :
मागणी हीच राजेश्वरा ॥ध्र०॥
उरोजवंती सरोज--वदना
कुरंग--नयना ललित--कोमला
घालो कंठीं मंगल--माला.
[ जगन्नाथराय जरा अड्खळतात. पुढील शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडत नाहींत. ]
शाहजहान : रूक् क्यों गये ? शरमानेकी कोई जरुरत नहीं ? एखादी खुबसूरत कंचनी मागण्याचा आपला इरादा दिसतो ! ठीक है, तुमच्या जवानीला, तुमच्या रसिक शायरीच्या तबियतीला आणि मस्ताना वृत्तीला साजेशीच मागणी ठरेल ती ! कहिये, आपके दिलकी बात पूरी कहिये.
जगन्नाथ : ( संकोच सोडून ) ‘ घालों कंठीं मंगल माला लवंगिका मधुरा !
( सारी मैफल स्तंभित होते. )
शाहजहान : क्या ? मेरी बेटी ?.
[ दोन्ही हातांनीं डोकं घट्ट धरून मंचकावर बसतो. नंतर हळूहळू डोकं वर करीत शून्य नजरेनं समोर बघतो. सारी मैफल उत्तराच्या अपेक्षेनं त्याच्याकडे पाहाते; पण त्याच्या मुखांतून उत्तर बाहेर पडत नाहीं. ]
पडदा पडतो