धर्म ह्नणे, ' रे संजय ! मी सिद्ध, न सिद्ध जनक, सामातें,
जाणोनि सर्व, दाटुनि दूषिसि तूं साधुजन कसा मातें ? ॥१॥
निंद्य स्वधर्मविच्युत, मी तरि युद्धासि सिद्ध उत्साहें, ।
धर्मन्यायानुसरण पावाया योग्य काय कुत्सा हें ? ॥२॥
सदनुमतें क्षिति अर्पुनि सत्पुत्नकरीं निवे दिलीप, तिला ।
शोचू नयेचि सुज्ञें, जैसी कन्या निवेदिली पतिला ॥३॥
जरि हे न सोडवावी द्यूतजिता द्रौपदी तसी महि म्या, ।
तरि भरतकुलगुरुच्या लागेना बोल काय गा ! महिम्या ?॥४॥
होइन निंद्य दहांत, न सोडवितां श्रीस संजया ! परिस, ।
कुलजा यशचि, न विधिसहि बहुमर्त हरिनाभिकंज यापरिस ॥५॥
हरि कुरुकुलहित इच्छी, तोकाचें नित्य माय जेंवि हित, ।
करिन तसेंचि प्रभु हा सर्वज्ञ कथील काय जें विहित ' ॥६॥
श्रीकृष्ण म्हणे, ' सूता ! सर्वात गृहस्थधर्म सन्मत रे ! ।
या आश्रमांत सर्व स्वपराचे सफल करुनि जन्म तरे ॥७॥
कर्म कसें टाकावें ? जी अमृत मुखांत मायसी ओती ।
ती सद्विद्यो, कर्मत्याग न करितांची, फलवती होती ॥८॥
दूषील कोण वर्णाश्रमनिरता भरतसत्तमा राया ? ।
योग्यचि हा साधु सकल रक्षाया, सर्व मत्त माराया ॥९॥
दस्युदमन हा मुख्य क्षत्रियधर्म, प्रमाण थोरांस, ।
यास्तव मारावें या प्रभुनें दुर्योधनादि चोरांस ॥१०॥
हे अधिक काय ? दुर्बल ते रात्नौ घालिती दरवडा जे, ।
लुटिलें धन दुःख नसें परि हदयी बहु कुवादरव डाजे ॥११॥
स्तेन भले न स्त्रीचा नग्न करिति हरुनि साबले काय, ।
नव्हतों सभेंत आह्मी ह्नणुनि लुटायासि फावलें काय ? ॥१२॥
जा, सांग, त्वद्वदनें ऐकावें हेंचि वाक्य अंधानें, ।
आहेत सिद्ध पांडव सेवाया प्राण बाणसंधानें ॥१३॥
देतां विभाग करितिल पांडव धृतराष्ट्रदास्य दास तसे, ।
नाही तरि खल मर्दुनि हास्य, मज असें भविष्य भासतसे ' ॥१४॥
संजय निघे, तयाला धर्म ह्नणे, ' आयका, यश तगावें, ।
द्या पांच ग्राम, न दे दासाला राय काय शत गावें ? ॥१५॥
ताताला भीष्माला सांगावी पाय धरुनि मन्नमनें, ।
जोडुनि हस्त ह्नणावें साम करावेंचि सुप्रसन्नमनें ॥१६॥
आचार्य द्रोण कृप प्रार्थूनि, प्रथम कथुनि मन्नमना, ।
ह्नण साम भलतसें मज बहुमत, दुकळांत जेंवि अन्न मन ॥१७॥
सांग कनिष्ठपित्यातें बंधुविरोधासि चित्त भी माजें, ।
करवा साम भलतसे देइल हरि इष्ट वित्त भीमा जें ॥१८॥
कर्णासि वद सख्याला आवर, विजयासि आवरील हरी, ।
समयी प्रवृत्ति आवरि थोर, जसा सिंधु आवरी लहरी ॥१९॥
सांग नृपासहि हें की साम शुचि, तयांत नांव रायाचें, ।
सुगति वरायाचेंचि न, कर्म उचित यातना बरायाचें ॥२०॥
गांधारीस ह्नणावें पंचोत्तरशत असोत तनय, शतें ।
तृप्ति नसोचि तुज, करी जेणें गातील साधुजन यश तें ॥२१॥
माझ्या सुयोधनादि भ्रात्यांच्या बायकासि कळवावें, ।
कीं स्वहितार्थ तुह्मी तरि एकांती कांतचित्त वळवावें ' ॥२२॥
ऐसें अजातरिपुमुख शशिमंडल अमृत तेवि वाचिक वी ।
तें बहु असोचि, विस्तरवदग्रंथ प्राकृती न वाचि कवी ॥२३॥