विदुरानुमतें कुंती गंगातीरी सुताकडे गेली, ।
न कळत तदुत्तरीयच्छायेंत उगीच ती सती ठेली ॥१॥
कर्णाचा नियम असा ब्रह्मजप करीत निश्चळ रहावें, ।
तापेल पृष्ठ तोंवरि रविचें मंडळ निरंतर पहावें ॥२॥
नियमांती कुंतीतें पाहूनि ह्नणे धरुनि राग मनी, ।
' राधेये आधिरथि मी तुज नमितों, काय कार्य आगमनी ? ' ॥३॥
कुंती कर्णासि ह्नणे, ' वत्सा ! कौतेय तूं, न राधेय; ।
' राधे ' यथेष्ट ह्नण, परि कर्णा ! कर्णासि फार बाधे ' य '. ॥४॥
मुग्धत्वे त्यजुनि तुला चुकल्यें, आतां स्वबंधु रक्षावे, ।
साधो ! धर्मज्ञें त्वां अनुज स्वतनुजसमान लक्षावे ॥५॥
ज्येष्ठ श्रेष्ठ प्रेष्ठ प्रभु तूं, देतिल तुला पद भ्राते, ।
' जी जी ' ह्नणतिल, चरणी वाहतिल धना यशा अदर्भ्राते ॥६॥
सेवाचें शेळींचे की रसिके धेनुचे रसवराज्य ? ।
त्यां सर्व अनुभवाचें भ्रात्यांसह हें यशः प्रसव राज्य ॥७॥
सोडुनि सूतसुयोधनपक्षातें झडझडोनि बा ! निघ रे ! ।
विधरो दायादाचें बळ मन, ढेंकुळ जसें जळी विधरे ॥८॥
तूं आत्मासा, पंचप्राण तसे बंधु सत्य, बापा ! हें, ।
नांदा एकत्न, नको द्वेष करुं, मजकडेचि बा ! पाहें ॥९॥
बा ! कर्णा ! तूं अर्जुन रामजनार्दनसमान साजाल, ।
हंस तसें साधूंच्या सोडोनि तुह्मी न मानसा जाल ' ॥१०॥
कुंतीवचोवसानी सूर्यापासुनि असी निघे वाणी, ।
' सत्य पृथोक्ति, गुरुवचननिरता सुखकीर्तिची नसे वाणी ' ॥११॥
कर्ण ह्नणे, ' सन्माता तोकी सुख व्हावया असु खरचिती ।
किंवा नेत्रें झांकुनि, व्हाया सुख आपणा, असुख रचिती ? ॥१२॥
माझा घात पुरवला तुज, त्यांचा मात्र घात पुरवेना !।
काय असें अघ ? विटलें कां त्वन्मन मज ? जसें स्वपुर वेना ॥१३॥
न ह्नणेल काय माता ' व्हावा लोकांत आत्मज न नीच ?।
रक्षील, धर्म रक्षुनि, जी ती भलतीहि आत्मजननीच ॥१४॥
अरिहि न करिल असें त्वां केलें, कां नख न लाविलें जननी ? ।
जन नीच मज न ह्नणते, परि काय करील नियतिला जननी ॥१५॥
कृष्णे जसी यशोदा त्यजिली, तसि न त्यजीन राधा मी, ।
ती यातना न नरकी होय कृतघ्ना न जी नरा धामी ॥१६॥
वसु जेंवि वासवाच्या, माझ्या सानुज सुयोधन मनातें ।
रंजावितो, मज करिती सर्व तदाश्रितसुयोध नमनातें ॥१७॥
अर्जुनवधप्रतिज्ञा केली ती कसि दहांत सोडावी ? ।
तोडावी कुरुपतिची प्रीति कसी म्यां ? अकीर्ति जोडावी ? ॥१८॥
ह्नणतील प्रकट सकल लोक मज त्वन्मतानुगा ' भ्याला ' ।
यावें कर्पूराच्या काय मषीगर्भसाम्य गाभ्याला ? ॥१९॥
मारीन अर्जुनासचि समरी, धर्मादिकां न चवघां मी, ।
करिच्या मदी अलिसे जी बहु, तीहि मिळेल काय चव घामी ? ॥२०॥
ह्नणतों मीच, नतजननमरण हरी, परम सुख करी नवधा ।
यदभक्ति, तत्सख्याच्या प्रभु कवण ह्नणेल मी करीन वधा ? ॥२१॥
जा, मागली स, कल्पद्रुमसश्रितकाम कां न पुरतील ? ।
स्वस्थ रहा, पांच तुझे सुत सार्जुन की सकर्ण उरतील ' ॥२२॥
कुंती ह्नणे, ' अभयवर आत्मा, आह्मी जडें असों देहें, ।
बहु तुजपुढें न वदवे, यश जोडी, स्मरण बा ! असों दे हें ' ॥२३॥
आलिगुनि कर्णातें भिजवुनियां अश्रुनी पृथा परते, ।
चित्ती ह्नणे, सखे जे होती, फिरतांची विधि, वृथा पर ते ' ॥२४॥