अंक तिसरा - प्रवेश तिसरा

गडकर्‍यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.


[अण्णासाहेब, यशोदाबाई, मधुकर, वेणू, माधव, अण्णासाहेब आजार्‍यासारखे उठून बसले आहेत.]

अण्णाः (कण्ह्त) आई आई, शेवटीं प्रकृतीचें मान या थरावर येऊन पोंचलें ! तरी मी रोज एकेकाच्या कानींकपाळीं ओरडत होतों कीं बाबा रे खाण्यापिण्याचा नीट बंदोबस्त ठेवा, सध्यां दिवस बरे नाहींत.
वेणू: अण्णा, खाण्यापिण्याचा काय संबंध या दुखण्याशीं ? हें वार्‍यासारखें दुखणें !
अण्णाः खुळी पोरकुठली ? खाण्यापिण्यानें तर सारें होतें. वाग्भटानेंच रडून, ठेवलें आहे ना कीं “सर्वेषामेव रोगाणां निदानं कुपिता मला:” एरवीं माणसाला कांहीं व्हावयाचें नाहीं. हीं तुमचीं पक्वानें शेवटीं मला मात्र नडलीं !
वेणूः अशीं पक्वान्नें तरी कोणतीं केलीं ? येऊन जाऊन कधींमधीं सणासुदीला घरांत कांहीं गोडधोड झालें असेल ! तेवढेंच ? पण तेवढयानें हें दुखणें आलें असें कसें म्हणतां अण्णा? दुखण्याचा आणि खाण्यापिण्याचा काय संबंध ?
मधुकर: आणखी अण्णा, या दुखण्याला सुद्धां आतां इतकें भिण्याचें कारण नाहीं. कारण एक तर तुम्हांला आज पांच दिवस झाले. ज्या अर्थीं या पांच दिवसांतहि या दुखण्यानें उग्र स्वरूप धारण केलें नाहीं, त्या अर्थीं हा अगदीं माइल्ड टाइपचा अटँक असला पाहिजे.
माधव: अरेरे, मधु काय बोलतोस. हें ? अरे रोगांतसुद्धां भेद पाडतोस ! हा लहान, हा मोठा असें कधीं मनांतसुद्धां आणूं नये. “नोच्चार्थो विफलोऽपि दूषणपदं दूष्यस्तु कामो लघु: !”
यशोदा: माधवा, तूं गप बैस पाहूं ! राहूं दे तें तुझें पुराण ! मेल्यांनो, आजारी माणसाच्या जवळ असें बडबडतांना थोडा विचार करावा !
अण्णा: अगदीं खरें ! मला वात झाल्यासारखें वाटत आहे ! खूप मोठयांदां ओरडावेसें आहे. अग, माधवा, मधु, काय करूं ? मला भ्रम झाल्यासारखें वाटायला लागलें आहे ! आ ! आ ! (आंग टाकून अंथरुणावरपडतो. सर्व धरतात.)
मधुः (स्वगत) तुम्हांलाच काय, अण्णा, इथें सर्वांनाच भ्रम झाला आहे !
यशोदाः (पदराचा अंगारा सोडून) अंबाबाई, आतां तूं आमची पाठराखी आहेस, मला क्षमा कर! आई, तुझा गोंधळ या दुखण्यांतून उठल्याबरोबर मी घालीन ग ! (दुसरी मंडळी तोंडांत औषध घालतात.)
अण्णाः (एकदम उसळून) माझी आई, कां उगीच गोंधळ घातला आहेस ! तुझी अंबाबाई कशाला पाहिजे इथें ! हा बघ मी उठून बसलों ! मला कांहीं होत नाहीं आतां ! घाल गोंधळ पांहू कसा घालतेस तो ! (उठून बसतात.)
यशोदा: आई अंबाबाई (असें म्हणून हातावर अंगारा घेऊन चोंहोकडे फुंकतें.)
अण्णाः कां ग ? घाल कीं गोंधळ ! म्हणे गोंधळ घालीन ! घाल गोंधळ !
यशोदाः मधु, माधवा, अरें बाबांनो जा रे कुणी तरी त्या पिलंभटाला तरी घेऊन या ! मला कांहीं हें चांगलें चिन्ह दिसत नाहीं ! हा गोंधळ; गोंधळ बरें हा ! तेव्हांच म्हटलें मी; कीं दिवसगत लावू नका ! पण माझें ऐकतें कोण ?
अण्णा: अग, कां उगीच गोंधळ घालते आहेस ?
यशोदाः पाहिलेंस वेणू, आतां म्हणत होते कीं गोंधळ घाल ! जा बाई देवीपुढेंचा थोडा अंगारा तरी घेऊन ये ! जा !
वेणूः अग बाई, अण्णांना आतां बरें वाटत आहे !
अण्णा: काय बरें वाटतंय ! हा गोंधळ चालला आहे तो मला बरा वाटतो आहे ?
यशोदा: अग पोरी, जा. उगीच बोलत उभी राहूं नकोस ! अरे मधु, माधवा तुम्हांला त्या पिलंभटाला मी बोलवायला सांगितलें आहे ना ? मग असें तोंडाकडे काय पहात उभे राहिलां आहांत ?
अण्णा: ए, माझ्याकडे पाहा पाहूं तूं जरा आतां ! तूं काय चालविलें आहेस हें ? तुझ्या या गोंधळानें मात्रमाझें डोकें ठिकाणावरराहील असें कांहीं मला वाटत नाहीं ! आतां तू जरबडबड केलीस किंवा त्या अंबाबाईचें नांव काढलेंस तरपहा !
यशोदा: (कपाळाला हात लावून मट्टदिशीं बसते.) अग बाई, तरी मला वाटलेंच होतें. आईचें नांव सुद्धां नकोसें वाटूं लागलें हें काहीं ठीक लक्षण नाहीं ! आतां काय करूं ? ए मधु, माधवा, जा (केविलवाणी होते.)
अण्णाः कशाला. ए मधु, माधवा,
यशोदाः (त्याच्या कानांत सांगते) बाबानो तुमांला आतां माझी शपथ आहे येथें थांबाल तर, अरे त्यांची प्रकृति अशी झालेली आहे, आणि माधवा तूं हसतोस काय असा ?
माधवाः अग आई, “ वादे वादे जायते तत्त्वबोध:” अग, हा वाद म्हणजे सर्व विषयांचें मंथन ! यांतून जें सारनिघेल त्याचेंच एक तत्त्व तयारहोईल आणि पुढें तेंच जगाच्या उपयोगी पडेल !
मधुः दादा, एखाद्या डॉक्टराला घेऊन येतों ! तुं प्रथमचल पाहूं माझ्याबरोबर! (त्याला आपल्याबरोबरघेऊन जावयाला निघतो. अण्णा मोठमोठयानें मधु, माधवा म्हणून ओरडतात. यशोदा त्यांना जा जा म्हणून सांगत असते. असा कांहीं वेळ गोंधळ चालतो. नंतरदोघेही जातात.)
अण्णा: आतां काय सांगूं तुला ? अग, मला खरोखरीच आतां बरें वाटत आहे.
यशोदा: एकदां बरें वाटतें आहे म्हणायचें आणि पांचच मिनिटांनीं एकदमउसळायचें !
अण्णा: अग, आतां माझी प्रकृति चांगली आहे; पण त्याला कारण तुझी अंबाबाई नसून त्या पिलंभटानें आज सकाळीं हिमालयांतील एका महान भिषग्वर्याचें औषध आणून दिलेंन् त्याचा हा परिणामआहे, समजलीस ? आणि हेंच मी मघांपासून सांगणारहोतों. पण माझें ऐकतें कोण ? इथून तिथून सारा एकच गोंधळ !
यशोदाः कुणाच्या हाताला का होईना, यश मिळालें म्हणजे झालें ! कुणाच्या रूपानें देवी उभी राहील कुणी सांगावें ? आणी म्हणूनच मी त्या पोरीला अंगारा आणायला पाठविली. मीं आज सकाळीं त्या पिलंभटाचा देव खेळविला.
अण्णा: अग तुझें हें देव खेळविणें पुरे करपांहू आतां. असे खेळखंडोबा करून रोग का कुठें बरे व्हाय्चे असतात. हे अंगारें. धुपारे, (वेणू अंगारा आणते.)
यशोदाः (तिच्या हातांतून अंगारा घेऊन त्यांच्या कपाळाला लावते व चोहींकडे फुंकते.)
अण्णा: कां ग तूं देवाला असें पोरासारखें ग कां खेळवीत असतेस ? इतकीं वर्षें मी आपलें रोज ऐकतों आहें, आज अमक्याचा देव खेळविला. उद्यां तमक्याचा देव खेळविला, आज अमक्यानें अंगारा दिला, उद्यां तमक्यानें मंतरलेला ताईत दिला अशा एक ना दोन, त्या देवाचें हें असें खेळणें करून तूं या वयांत जो हा पोरखेळ चालविला आहेस, त्या तुला आतां काय म्हणावें तेंच समजत नाहीं. बरें. मी नशीब समजतों कीं तुला लिहावयाला, वाचावयाला येत नाहीं. नाहीं तरया अलिकडच्या सिद्ध मांत्रिकाच्या आणि ताइतांच्या जाहिरातींनीं आमचें घर म्हणजे एक मोफत वाचनालय तूं बनविलें असतेंस, आणि ताइतांच्या तोडग्यांनीं आपल्या या घराला धर्मशाळेची कळा आणली असतीस !
यशोदा: वेणू, पाहिलास मघाच्या बोलण्याला आणि आतांच्या बोलण्याला कांहीं तरी मेल ! अह सारा त्या पिलंभटाच्या अंगार्‍याचा प्रभाव बरें ! बरेंच सांगतें असें बोलूं नये. त्या पिलंभटाचे गुरु आतां आले आहेत येथें. त्यांनीं आज सकाळीं हा अंगारा देऊन मला किती तरी चांगल्या गोष्टी सांगितल्या ! हो, त्यानें आणखी आपल्या गुरुच्या पडताळ्याची एक गोष्ट संगितली आहे; तिचा जरआपल्याला प्रत्यय आला म्हणजे माग तरी आपण माझ्या या देवीवरविश्वास ठेवाल ना ?
अण्णा: म्हणजे त्या पिलंभटाच्या गुरूकडून का आलेला हा अंगारा आहे ? अग, त्यांचेंच तरऔषध मी आज सकाळपासून सुरु केलें आहे. त्यांच्या त्या हिमालयांतील वनस्पतींनीं तरमाझ्या प्रकृतींत हा एकदमआज असा फरक पडका आहे. नाहीं तरअशा प्लेगसारख्या भयंकररोगानें पछाडलेला रोगी कधीं जगायची आशाच करायला नको !
यशोदाः खरें ना पण हें ! आपला सुद्धां त्यांच्यावरविश्वास आहे ना ! मग कां बरें उगाच मघाशीं त्या अंगार्‍याला आपण नांवें ठेविलींत ?
अण्णा: अग, पण हा गुण त्यांच्या औषधांचा असेल !
यशोदा: त्यांनीं पडताळा पहाण्यासाठीं आणखी असें सांगितलें आहे कीं तुमच्या मुलीचें पहिलें लग्न मोडेल आणखी
अण्णा: आणखी काय ?
यशोदाः आणखी तिचा एका महाविद्वान पुरुषाशीं लग्नाचा योग आहे आणि ही गोष्ट या चारदिवसांत घडून येईल.
अण्णा: आश्चर्य आहे ! बाकी त्याच्या सांगळ्याप्रमाणें तो जरी विद्वान असल आणखी त्याला वैद्यकाची माहिती नसली तरमी पोरीला तिथे मुळींच देणारनाहीं. बरें, तो माधव त्या पिलंभटाला आणायला गेला होता, तो तिकडेच रंगला वाटतें. (माधव येतो.)
माधव: अहाहा, काय तें तेज, काय ती मुखमंडलावरची शोभा ! अण्णा, काय सांगूं तुम्हांला, आज माझा आनंद अनावरझाला !
अण्णा: तुझा आनंद अनावरझाला आहे. पण माझा राग आतां अनावरझाला आहे. काय रे हें ! अरे तुला त्या पिलंभटाला बोलवायला धाडलें होतें ना ?
माधवा: अहाहा ! धन्य तो पिलंभट, धन्य तें त्याचें घर! आणि त्रिवारधन्य तो त्याचे सद्‌गुरु. अण्णा, तुमचा राग तरमाझा आनंद ! केवढा भेद ! मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ! वा रे वा ! कशाला राग. कशाला लोभ !
यशोदाः बाळ, तुला आनंद व्हायला झालें तरी काय ? त्या पिलंभटाच्या गुरुनें कांहीं चमत्कारकेलान् का ?
माधव: चमत्कार! काय सांगूं चमत्कर? मी गेल्यावरपहातों तों त्या योगींद्राची समाधी लागलेली ! त्या स्थितींतच मीं त्यांच्या चरणावरमस्तक ठेवलें, तों ते एकेक सूत्रवाक्य बोलूं लागले. खरेंच आहे. “परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां ! धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगेयुगे” काय ती गंभीरवाणी ! अण्णा, आई, आज तुमचा माधव तुम्हांला निराळा दिसत असेल. त्यांनीं माझ्या मस्तकावरहात ठेवला, तोंडावरून हात फिरविला मात्र, तों एकाएकीं मी हें जग सोडून
या शो दा: काय झालें बाळ ?
अण्णा: काय झालें माधव, तूं एकाएकीं असा गहिंवरून कां आलास ?
माधव: अहाहा ! तें चिन्मय स्वरूप, तो आनंद, तें घ्यान, “ब्रह्मानंदीं लागली टाळी, कोण देहातें सांभाळी ! तेथें कोण देहातें सांभाळी.” ज्या वेळीं चिकित्सक बुद्धि नष्ट पावून. जिज्ञासा जिथें संपते तिथेंच असे उद्नारबाहेरपडतात ! “ कोण देहातं सांभाळी, तेथें कोण देहातें सांभाळी.” (जोरानें टाळ्या पिटूं लागतो. अण्णा गोंधळांत पडतात. कांहीं वेळानें अंथरुणावरजाऊन पडतात.)
यशोदाः अग बाई ! पुन्हां असें कशानें झालें ! अरे माधवा, जा बाबा त्या गुरुमहराजांना तरी इकडे घेऊन ये !
माधव: इकडे तिकडे हा भेदच आतां राहिला नाहीं ! अहाहा ! काय ती मूर्ति, काय तें रूप, काय तें चेहेर्‍यावरचें तेज ! अहं ब्रह्मास्मि (घ्यान लावतो.)
यशोदाः अगबाई, आतां करूं तरी काय ? हे इकडे निपचित, याची इकडे समाधी ! अग वेणू, यमू, अग, कुणी तरी इकडे या ! (त्या दोघी येतात.) बाई, जा तो अंगारा तरी घेऊन ये. आणि तो मधु कुणीकडे गेला ? त्या पिलंभटाकडे कुणाला तरी धाड पाहूं ! (पिलंभट येतो.)
पिलंभट: धाडतां कशाला बाईसाहेब, माझ्या गुरुमहाराजांनीं अंतर्शनानें हें सर्व ताडलें आहे. आतां इतक्यांत ते इकडे येतील. मधुकरही त्यांचेबरोबरआहेत ! श्रीमारुतीला तुम्ही अकरा अभिषेकांचा नवस बोला. इतक्यांत गुण !
यशोदा: (देवाला नमस्कारकरून मनांत कांहीं पुटपुटते व पुन्हा नमस्कारकरते.)
[मधुकरबैरागी वेषांतल्या वसंताला घेऊन येतो.]
वसंत: भजन
भजन विना एक जल गयो जिवना ॥धृओ॥
पर्वत सुन्ना एक विरछ सुना, विरछ सुना एक पात विना ॥१॥
माधव: अहाहा, हे चित्स्वरूप, महन्‌मंगल मायावतारी
वसंत: (माधवाचे मस्तकावरहात ठेवून त्यास) सावध हो बाळा, सावध हो. अशी वारंवारसमाधी लावून त्या चिरशक्तीला वारंवारत्रास का देतोस ? अशानें वारंवारदर्शन दुर्लभ होईल. (सर्व मंडळी त्यांच्या पायांवरडोकें ठेवतात. माधव सावध होऊन त्याचे पाय धरतो.)
माधव: गुरुमहाराज
पिलंभट: माधवराव, थोडे थांबा, अगोदारअण्णासाहेबांच्या प्रकृतीकडे आपल्याला लक्ष पोचविलें पाहिजे. (त्याला अण्णांच्या पलंगाजवळ नेतात. तो त्यांची नाडी पाहून थोडें दूध आणावयाला सांगतो. दूध घेतल्यावरते सावध होतात.)
अण्णा: स्वामीमहाराज (असें म्हणून उठावयाला लागतात. माधव, मधु, पिलंभट भक्तजनांसारखे आपसरून बसतात.)
वसंत: महाराज, आपल्याला क्षीणताआलेली आहे. आपण ही तसदी घेऊं नका ! रोगाचें असें आहे कीं त्याला नेहमी विश्रांतीची आवश्यकताअसते. त्याला उगीच छेडणें चांगलें नाहीं. बरें. सकाळीं दिलेलें औषध यांना किती वेळा दिलेंत ?
यशोदा: चारवेळ. (तो परीक्षेला सुरुवात करतो.)
अण्णा: त्याच्यापासून मला थोडें घेरी आल्यासारखें वाटतें !
पिलंभट: योजनाच तशी आहे !
अण्णा: ओकारी होईल असें वाटतें !
पिलंभट: योजनाच तशी आहे !
यशोदा: घटकेंत घामयेतो तरघटकेंत थंडी वाजल्यासारखें होतें !
पिलंभट: खरें ना पण ? योजनाच तशी आहे !
यशोदाः मध्येंच भ्रमझाल्यासारखें करतात !
वसंत: सांग, योजनाच तशी आहे म्हणून !
अण्णा: एकदां खूप मोठयानें ओरडावेंसें वाटतें !
पिलंभट: योजनाचा तशी आहे !
अण्णा: घटकेंत अगदीं शांत पडावेंसें वाटतें !
वसंतः योजनाच तशी आहे !
मधुकर: अशी योजना करण्याचें कारण गुरुमहाराज ! (हंसतो.)
वसंत: त्याचें कारन असें कीं, उष्ण आणि शीत असे दोन प्रकारनेहमीं प्रकृतींत असतात. त्यांपैकीं एकाला कधीं छेडूं नये, एकदां याला, एकदां त्याला असें दोघांनाही छेडून प्रकृतीला आपल्या ताब्यांत आणायची आणि मग ज्याच्यावरस्वारव्हायचें असेल त्याच्यावरयोजना करायची म्हणजे दुसर्‍याचा कांहीं अंमल चालत नाहीं.
अण्णा: अहाहा, काय हें ज्ञान,  काय ही योजना, काय ही विकित्या !
वसंत: असें पहा तुम्हीं निसर्गाला सोडून नेहमीं वर्तन करतां. त्यामुळें अशा रोगांना थारा मिळतो ! दिवस, रात्र, उन्हाळा, थंडी, आग, पाणी, स्त्री, पुरुष या योजनाच मुळीं निसर्गसिद्ध आहेत; परंतु तुमचेमवर्तन मात्रनेहमीं नियमब्राह्य, आतां याच माधवरावांचें उदाहरण पहा, हा तरुण पुरुष, स्त्रीला सोडून-जाऊं द्या एकंदरींत काय कीं निसर्गाच्या विरुद्ध वर्तन कधीं करुं नये. निसर्गाला नेहमीं प्रसन्न ठेवलें पाहिजे. (सर्व भक्तिभवानें डोलतात.)
मधुकर: पण गुरुमहाराज, आपण तरआजपर्यंत कडकडीत ब्रह्मचर्यांत
पिलंभट: (मधुकराला दाबतो.) अहो मधुकर
वसंत: अरे थांब पिलंभट, अहो मधुकर, आम्हीही पण कांहीं दिवसांनीं या आश्रमाचा त्याग करून तुमच्या आश्रमांत येणार आहों. कारण आम्हांला तशी आज्ञा आहे. ज्याच्या आज्ञेनें आमचा जन्मझाला, ज्याच्या आज्ञेनें आम्ही आजपर्यंत या ज्ञानपर्वतावर आरूढ झालों. त्याच्याच आज्ञेंनें या जगाच्या रहाटीकडे लक्ष देऊन आम्हांला वर्तन केलें पाहिजे.
माधव: योग्यच आहे. “ यत्रनार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्रदेवता:”
वसंत: मग तुमचें वर्तन असें कां ? राहूं द्या आतां हा विषय ! महाराज, आज मी आपल्या प्रकृतीचें निदान करून एक वनस्पती देतों. तिचें तीन वेळ पोटांत सेवन करा व पायाला लावण्याला एका वेलीचा रस देतों तो लावा. उद्यां सकाळीं आपली कांहीं तक्रारराहणारनाहीं. पिलंभट, मातोश्रींना तो अंगारा देऊन तो अष्ट दिशांनीं नीट फुंकरायला सांग. (अण्णा मधुकराच्या कानांत कांहीं सांगतो. मधुकर तबकांतून कांहीं रुपये आणून त्यांच्यापुढें ठेवतो. वसंत तिकडे पहातसुद्धां नाहीं.)
माधव: मी दर्शनासाठीं केव्हां येऊं ?
वसंत: तुम्ही स्नान करून शुचिर्मूत अंत:करणाने आज सायंकाळीं आमचेकडे या म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांचा आम्ही उलगडा करूं. (सर्वजण पायांवर डोकीं ठेवतात.)
पिलंभट: महाराज, हे (असे म्हणून रुपायांचें ताट त्याच्यापुढें करतो.)
वसंत: (उसळून) अरे, तूं इतके दिवस आमच्या संगतींत घालवून पुन्हां आम्हांला या मोहांत फसविण्याचा प्रयत्न करतोस ? तें तूं घे. नाहीं तरतिकडे टाकून दे. आम्हांला काय करायचें आहे ? (पिलंभट खूप होतो, जय गुरु महाराज की जय म्हणून सर्वजण ओरडतात. वसंत पूर्ववत् भजन करीत जातो.)

N/A

References : N/A
Last Updated : December 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP