(स्थळ - सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर व तळीराम.)
सुधाकर - (स्वगत) चोवीस तास झाले, मस्तकावर नुसते घणाचे घाव बसताहेत! काही सुचत नाही, काही नाही.
(राग- तिलंग; ताल-आडा-चौताल. चाल- रघुबिरके चरन.)
जड बधिर हृदय शिर, भयकर मतिसंकर । तनुदहनहि खर ॥धृ०॥
नारकहुताशन । दाह का घोर । जळी वा प्रलयकर- । रविकिरणनिकर ॥१॥
(मेजावर डोके ठेवून पडतो.)
तळीराम - (येऊन) दादासाहेब!
सुधाकर - तळीराम, मला काही सुचेनासं झालं आहे.
तळीराम - दादासाहेब, अशा आपत्ती या संसारात यायच्याच!
सुधाकर - तळीराम, अशा आपत्तींची मी पर्वा करतो असं का तुला वाटतं! मला ही अपमानाची आपत्ती सहन होत नाही! हलकटांनी हेटाळणी करावी, लब्धप्रतिष्ठितांनी छी: थू करावी, आपल्या वै-यांनी समाधानानं हसावं! तळीराम, माँ कुबेराची संपत्ती लाथेनं झुगारून दिली असती, आणखी पुन्हा हातानं ओढून आणली असती! पण या अपमानाच्या जाचण्या सहन होत नाहीत.
तळीराम - उद्या चार दिवसांनी या गोष्टीचा विसर पडून-
सुधाकर - विसर? ती गोष्टच विसर! प्राण जाईपर्यंत या सर्पदंशाच्या वेदना चालू राहाणार! नाही रे ... नुसती आग भडकून तळमळ चालली आहे! आत्महत्या ही नामर्दपणाची गोष्ट म्हणून म्हणतात... शिवाय आत्महत्येनं मी देहरूपानं सिंधूला अंतरेन ... तिच्या त्या दु:खाची कल्पना तर ... तळीराम शरीराचा नाश केल्यावाचून मरणाची जोड देणारं एखादं विष नाही का?
तळीराम - असं विष नाही, पण असं एक अमृत मात्र आहे! दादासाहेब, मी तेवढयासाठीच आलो आहे. तुम्ही चारचौघांच्या समजुती उराशी धरून बसणारे नाही आहात- स्वतंत्र बाण्याचे आहात! नुसत्या बोभाटयानं तुम्ही भिणार नाही, म्हणून तुमच्याशी बोलण्याचा मी धीर करतो. या तुमच्या दु:खाचा थोडा तरी विसर पडावा अशी तुमची इच्छा असेल तर त्याला इलाज आहे! तुम्ही रागावणार नाही? सांगू मी तो इलाज?
सुधाकर - सांग, काय वाटेल तो इलाज सांग!
तळीराम - तुम्ही थोडी दारू घेऊन स्वस्थ पडून राहा.
सुधाकर - काय दारू? तळीराम-
तळीराम - हो दारूच! इतकं दचकण्याचं काही कारण नाही! व्यसन म्हणून दारू अति भयंकर आणि निंद्य आहे हे मलाही कबूल आहे. पण आपणाला ती केवळ औषधाकरता म्हणून घ्यायची आहे आणि तीसुध्दा अगदी किती अगदी थोडी! एवढीशी घेतल्याने सवय लागेल अशी नादानपणाची धास्ती आपल्याला वाटायचं काही कारण नाही.
सुधाकर - छे: छे:, सवय वगैरेचा बागूलबोवा मला मुळीच पटत नाही! लौकिकदृष्टयासुध्दा माझं सर्वसाक्षी मन मला साक्ष देत राहील की, हे काही मी चैनीखातर करीत नाही. सिंधू, रामलाल, यांची समजूत- जाऊ देत- जरा आराम खात्रीनं वाटेल ना?
तळीराम - अगदी खात्रीनं.
सुधाकर - मग आण- मी काही अशा दुबळया मनाचा नाही की, मला तिची सवय लागेल. सर्वांची समजूत मला घालता येईल, पण माझी स्वत:ची समजूत मला मात्र या वेळी घालता येत नाही. चल, आण कुठं आहे ती? या यमयातना घडीभर तरी विसरण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे.
तळीराम - मी घेऊनच आलो आहे बरोबर- ही घ्या. (पेला भरू लागतो.)
सुधाकर - अरे, उगीच जास्त मात्र भरू नकोस.
तळीराम - छे, छे, अगदी थोडी! ही एवढीच- फक्त- एकच प्याला! (सुधाकर पिऊ लागतो. पडदा पडतो.)
अंक पहिला समाप्त.