अंक दुसरा - प्रवेश पहिला

मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.


(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू व सुधाकर.)

सिंधू - वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे का आता बाहेर?

सुधाकर - अगं, जरूरीचं काम असल्याखेरीज का मी असा तातडीनं जात असेन? मला गेलंच पाहिजे आता! आणखी संध्याकाळी माझी फराळासाठी वाट पाहू नका.

सिंधू - मी आल्या दिवसापासून पाहते आहे, नेहमी रात्री फराळाला बाहेर असायचं; एक दोन का तीनच वेळा काय ते फराळाला घरी राहायचं झालं तेवढं! विचारू मी एक? फार दिवस माहेरी राहिले म्हणून रागबीग तर नाहीना आला? तसं असेल तर पदर पसरून भीक मागते.

(राग- मांड-जिल्हा; ताल- दादरा. चाल- कहा मानले.)
स्थिरवा मना । दयाघना । विनतिसी या माना । होई पात्र न रोषा दीना । हृदयी करुणा आणा ॥धृ०॥
जाहला दोष मम करी चुकूनि काही । प्रेमला, क्षमा तरि त्या करा । विनतिसी या माना ॥१॥

सुधाकर - अगं, या सनदेच्या कामासाठी खटपट करायची असते तर चारचौघांकडे जाऊन, तेव्हा हिंडावं लागतं असं सारखं! कुणाच्या तरी घरी फराळाचा होतोच आग्रह. काम सोडून फराळासाठी घरी तर उठून यायचं नाही! रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसावं लागतं आताशा! तेवढयावरून तुझा रागच मला आला आहे हे कसं ठरविलंस?

सिंधू - (रडत) मग बोलणं जरा असं त्रासिकपणाचं होतं, बाळाचं सुध्दा कोडकौतुक पुरविणं होत नाही!

सुधाकर - तुझ्याशी बोलणं मोठं पंचायतीचं काम आहे बुवा! किती वेळा सांगू की, माझं तुझ्यावर अगदी पहिल्यासारखं प्रेम आहे म्हणून! बाळाचं कोडकौतुक मी मनापासून- पण हे सांगायला तरी कशाला हवं! तुझं तुला दिसून येत नाही? बरं, आता रडू नकोस! उद्या मुदत संपून सनद मिळायची आहे- म्हणजे काम संपलंच म्हणायचं. जातो मी आता. उगीच काहीतरी तर्कवितर्क चालवायचे- त्यात स्वत:लाही त्रास आणि दुसर्‍यालाही त्रास! (स्वगत) रामलालनं तार करून एकदम बोलावून आणल्यामुळं हिला नसती काळजी वाटायला लागली आहे! हा रामलाल चांगला इंग्लंडला गेलेला. पण ही लढाई मध्येच मुळावर आल्यामुळं तसाच परतून आला. त्यामुळं ही नसती विवंचना माझ्यामागं लागली आहे. हा असा लपंडावच किती दिवस चालू ठेवायचा? (जातो.)

सिंधू - देवा, आता माझी सारी काळजी तुलाच!

(राग- तिलककामोद, ताल- एकताल. चाल- अब तो लाज.)
प्रणतनाथ! रक्षि कान्त । करि तदीय असुख शांत ॥धृ०॥
अशुभा ज्या योजी दैव । पतिलागी, त्या सदैव । परिणभवी मंगलात ॥१॥

(रामलाल व शरद येतात.)

सिंधू - हे बघितलंस भाई? आताच जाणं झालं. रोजचंच सांगणं- कामासाठी जायचं आहे आणि फराळासाठी वाट पाहू नका!

रामलाल - काय चमत्कार आहे कळत नाही! सनद तूर्त रद्द झालेली आहे. हा पैशाबियशांच्या अडचणीत नाही ना? हो, कदाचित मानी स्वभावामुळे उघड करून नाही बोलायचा कुणाजवळ!

शरद - छे:, ती अडचण मुळीच नाही. दादाची सनद गेली एवढं कळलं मात्र, त्या घटकेपासून वहिनीच्या वडिलांनी, दादा नको नको म्हणून लिही, तरी मोकळया मुठीनं पैसे पाठवायला सुरुवात केली आहे.

सिंधू - नाही रे भाई; पैशाची कसली अडचण? काही तरी वेडंवाकडं आहे- माझं मनच मला सांगत आहे! भाई, आता कसे रे करायचे? (रडू लागते.)

रामलाल - ताई, सिंधूताई, हे काय असं वेडयासारखं? तू चांगली शहाणी धीराची- अन् हे असं करायचं? धीर धर-

(राग- भीमपलासी; ताल- त्रिवट. चाल- बिरजमें धूम मचाई.) सचतुरे, धैर्यसदा सुखधाम । विपदि महा सकल पुरवी काम ॥धृ०॥ निजभजकांच्या विघ्नभंजनी । जणु दुसरे प्रभुनाम ॥१॥

मी एक दोन दिवसांत बारकाईनं चौकशी करून खरं काय आहे ते शोधून काढतो. जा, ही शरद बाळाला बाहेरून घेऊन आली आहे, त्याला नेऊन नीट निजीव; हं डोळे पूस! अगदी हसून खेळून राहिलं पाहिजे- नाही तर आपण नाही पडायचे या कामात! कशाला काही पत्ता नाही आणि उगीच रडत सुटणं म्हणजे काय झालं! जा त्याला घेऊन.

सिंधू - भाई, भाई तू काही म्हण पण-

(राग- जिल्हा मांड, ताल- कवाली. चाल- पिया मनसे.)
दयाछाया घे निवारुनिया, प्रभु मजवरी कोपला ॥धृ०॥
जीवनासि मम आधार गुरु जो । तोहि कसा अजि लोपला ॥१॥

रामलाल - शरद, शरद, जा बेटा. ताईची जरा समजूत घाल जा! तिला उगीच रडू देऊ नकोस! (शरद जाते. रामलाल जाऊ लागतो.) (गीता येते.)

गीता - भाईसाहेब-

रामलाल - कोण? गीता, नव्हे? मला हाक मारली तुम्ही?

गीता - हो! अगदी निलाजरेपणानं हाक मारली! शरदिनीबाईप्रमाणं मलाही आपली मुलगीच म्हणा! भाईसाहेब, बाईसाहेबांचं आत्ताचं बोलणं मी ऐकलं आणि जीव कळवळून आला. अगदी बोलल्याखेरीज राहवेना म्हणून आपली धावत आले बघा, दादासाहेब काय करतात, कुठं जातात, कुणाबरोबर जातात, सारं मला माहीत आहे.

रामलाल - असं! काय-काय-काय करतात सांगा पाहू?

गीता - काय सांगायचं कपाळ! आताशा त्यांनी प्यायला सुरुवात केली आहे- (हळूच) दारू प्यायला!

रामलाल - काय, दारू? (नि:श्वास टाकून) रघुवीर! श्रीहरी!- गीताबाई, तुम्ही खात्रीनं म्हणता?

गीता - अहो, खात्री कसली? डोळयांदेखतच्या गोष्टीसारखी ही गोष्ट मला माहीत आहे! आमच्या घरातल्यांनीचदादासाहेबांना-

रामलाल - थांबा, इथं नका बोलू! सिंधूनं एखादा शब्द ऐकला तर ती आपल्या जिवाचा अनर्थापात करील! तुम्ही जरा बाहेर चला, अंमळ पलीकडे. सगळं माहीत असेल ते मला सांगा- चला. (स्वगत) अरेरे, चांडाळा दुर्दैवा काय केलंस हे?

(राग- बिलावल. ताल- त्रिवट. चाल- सुमरन कर.)
वसुधातलरमणीयसुधाकर । व्यसनधनतिमिरी बुडविसी कैसा? ॥धृ०॥
सृजुनि जया परमेश सुखावे । नाशुनि ह्या, तुजसि मोद नृशंसा! ॥१॥
(जातो. पडदा पडतो.)

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP