अंक तिसरा - प्रवेश तिसरा

मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.


(स्थळ: रामलालचे घर. पात्रे: भगीरथ व शरद)

भगीरथ - अगदी बरोबर आहे. हा लोकभ्रम निबंध, निबंधमालेतील एक अत्युत्कृष्ट म्हणून मानलेला निबंध आहे. ऐक पुढं... (स्वगत) वाचण्याच्या भरात मी काय वाचतो आहे आणि कोणापुढं वाचतो आहे, याचं मला भानच नाही! शास्त्रीबुवांचे कळकळीचे आणि प्रामाणिक हृदयाचे विधवांच्या स्थितीबद्दलचे हे करुणोद्गार मी वेडयासारखा या बालविधवेपुढं वाचीत सुटलो आहे! (उघड) शरद, भाईसाहेब परत येण्याची वेळ झाली. आज आपण फार वेळ वाचीत बसलो, नाही? पुरे करावं नाही, मला वाटतं आता?

शरद - (किंचित हसून) बरं, राहू द्या आता इतकंच आज.

भगीरथ - (स्वगत) हिनं हसून आम्हा पुरुषवर्गाचा चांगलाच उपहास केला म्हणायचा! या चतुर आणखी प्रेमळ मुलीपुढं मनाचे डावपेच मुळी चालतच नाहीत. (उघड) शरद, तुझ्या हसण्याचा अर्थ मी समजलो. माझ्या मनातले विचार तू बरोबर ओळखलेस. शरद, धर्मामुळं म्हण, रूढीमुळं म्हण, पुरुषांच्या स्वार्थबुध्दीमुळं म्हण, पण तुम्हा विधवांची हिंदू समाजात मोठी विटंबना चालली आहे, असं कोणत्याही प्रामाणिक मनुष्याला कबूल करावं लागेल.

शरद - भगीरथ, संसारहानीच्या दु:खाबरोबरच या अपशकुनासारख्या गोष्टीच्या अपमानाचंही तीव्र दु:ख आम्हाला भोगावं लागतं-

(राग- बागेसरी; ताल- त्रिवट. चाल- गोरा गोरा मुख.)
मानभंग दाही । मृतशा हृदया ॥धृ०॥
दग्ध वल्लरी जाळी चंचला अदया ॥१॥
गतपतितांचे जीवन जगती वाया ॥२॥

भगीरथ - अगदी खरं आहे हे. आम्ही पुरुष विधवांच्या बाबतीत अगदी विचारशून्य होऊन त्यांच्याबद्दलच्या वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार होतो, आणि तू सांगितलेल्या दुहेरी दु:खात लोकनिंदेची आणखी भर घालतो. एखादी विधवा सदाचरणी आहे या अगदी सहज रीतीनं शक्य असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवताना आम्हाला आमच्यावर मोठं संकट पडल्यासारखं वाटतं. एखाद्या बालविधवेनं एखाद्याला नुसता रस्ता विचारला तर बघणार्‍याला असंच वाटतं की, ती पापाचाच मार्ग विचारीत आहे! फार काय सांगावं, पाण्यात बुडून असलेल्या बालविधवेला एखाद्यानं हात दिला तर तो तिला बाहेर काढण्याऐवजी नरकात ढकलीत आहे, इतकं मानण्याची आमच्या आर्य मनाची वृत्ती होऊन बसली आहे! आणि बालविधवांनी जितेपणी या नरकयातनांत तळमळत पडून आयुष्य कोणत्या सुखात कंठीत राहावं म्हणून विचारलं, तर पोक्तबुध्दीचे हे धर्मसिंधू लागलीच गंभीरपणानं म्हणतील, की आप्तइष्टांची मुलं खेळवीत बसल्यानं विधवांना जे सात्त्वि समाधान होतं, त्यापुढं वैधव्याच्या यातनांची काय प्रौढी आहे? असं जर असेल तर मी म्हणतो, या विवेकशाली महात्म्यांनी, आपली द्रव्योपार्जनाची लालसा शेजार्‍यांचे रुपये मोजून का भागवू नये? पोटाची खळी भागविण्यासाठी पंचपक्वान्नांकडे धाव घेण्याचं सोडून परक्याच्या पोटात चार घास कोंबून आपलं समाधान हे का करून घेत नाहीत?

(राग- काफी; ताल- त्रिवट; चाल- मोरे नाटके प्रिया.)
सद्गुणा वधोनि हा! दंभ विजय मिरवी महा ॥धृ०॥
मोहपाशमेदना । ज्यांसि अल्पही शक्ती ना । विरतीसी भोगी स्तविती । तोचि; काय विस्मय न हा ॥१॥

शरद - जाऊ द्या- भगीरथ, आपल्या मन:क्षोभानं काय होणार? भगीरथ, आपला बरेच दिवसांचा परिचय आहे, म्हणून तुम्हाला मोकळया मनानं विचारते, आणि तेसुध्दा अलीकडे दादाची स्थिती पाहून माझी आशा सुटत चालली आहे म्हणून विचारते- या मद्यपानाचा मोह सुटणं शक्य असतं का?

भगीरथ - शरद, या प्रश्नाचं अस्तिपक्षानं उत्तर देण्यासाठी, स्वत: माझंच उदाहरण देताना माझ्या मागच्या वर्तनामुळं जो मनाला ओशाळेपणा वाटतो, त्यापेक्षा आत्मस्तुतीच्या कल्पनेचा ओशाळेपणा जास्त वाटतो.

शरद - तुम्हाला पुन्हा कधीही- संकोच कशाला ठेवू? मद्यपानाची पुन्हा आठवणसुध्दा झाली नाही?

भगीरथ - अगदी चुकूनसुध्दा नाही! आणि होणार तरी केव्हा? हल्ली माझा काळ इतका सुखात जातो आहे- एकीकडे भाईसाहेबांच्या सदुपदेशाचा दिनप्रकाश आणि एकीकडे तुझ्या सहवासाची शीतल चंद्रिका-

शरद - शीतल चंद्रिका म्हणजे? (भगीरथ खाली पाहतो.)

भगीरथ - बोलण्याच्या भरात मी एखादा शब्द-

शरद - खरं बोलण्याच्या प्रतिज्ञेवर शपथ घेऊन माझ्यापुढं तुम्ही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे नाही आहात! मीसुध्दा सहज विचारलं, रागानं नव्हे- (रामलाल येतो.)

रामलाल - शरद, आताशा दोन-तीन दिवस सुधाकरनं तुमच्या घरात मद्यपानाचा अड्डा घातला आहे, हे तू मला सांगितलं नाहीस? आता गीता मला भेटली तिनं मला हा प्रकार सांगितला. याबद्दल सुधाकरजवळ गोष्ट काढायला मी गेलो, पण माझ्या सांगण्याचा काहीएक परिणाम झाला नाही. भगीरथ, पद्माकराला आणि बाबासाहेबांना आताच्या आता एक तार कर की असाल तसे निघून या म्हणून. त्यांच्या सांगण्याचा तरी सुधाकरावर काही परिणाम होऊन या भयंकर प्रकाराला आळा बसतो की काय, एवढीच आशा आता उरली आहे. आणखी शरद, याच पावली तू घरी जा आणि गीता तुमच्या घरी गेली आहे, तिला आपल्या घरी ठेवून घे! तळीरामानं आपल्या घरातून तिला हाकलून दिली आहे. तुमच्या इथं तिला राहायचं नसेल तर माझ्याकडे पाठवून दे! जा बरं लवकर, ती बिचारी गरीब उगीच विवंचनेत पडली असेल.

शरद - हो, ही मी निघालेच. (जाते.)

भगीरथ - तार आताच करून येऊ का?

रामलाल - इतकी काही घाई नाही. आणखी थोडया वेळानं केलीस तरी चालेल.

भगीरथ - मग भाईसाहेब, तितक्या वेळात कालचा विषय पुरा करून टाकानात? काल आपलं बोलणं मध्यंतरीच थांबलं. तेव्हापासून माझ्या मनाला सारखी उत्कंठा लागून राहिली आहे. लोककल्याणाचा मार्ग कोणता ते सांगितलं नाहीत-

रामलाल - भगीरथ, लोककल्याणाचा एकच राजमार्ग म्हणून दाखविण्याइतकं हिंदुस्थानचं भावी सौख्य आज एकदेशीय नाही. एकीकडे राजकीय सुधारणा आहेत, एकीकडे सामाजिक सुधारणा आहेत. इकडे धर्म आहे, इकडे उद्योग आहे, इकडे शिक्षण आहे. इकडे स्त्रियांचा प्रश्न आहे. इकडे अस्पृश्यांची बाबत आहे, तर तिकडे जातिभेदाचा गोंधळ आहे. अशा या चमत्कारिक प्रसंगी अमूक एकच मार्ग इतरांच्यापेक्षा चांगला आहे, असं सांगणं मोठं धाडसाचं आहे. परिस्थितीच्या अनुभवाप्रमाणं या विषयावर ज्याचे त्याचे विचार अगदी निरनिराळे झालेले आहेत. हजारो वर्षांच्या ओझ्याखाली तेहतीस कोटी जिवांच्या जडपणानं खालावत चाललेल्या आमच्या भरतभूमीला उचलून धरण्यासाठी जितक्या भिन्नभिन्न प्रकृतींच्या मूर्ती आम्हाला लाभतील तितक्या हव्याच आहेत. लोकहितात पडू पाहणार्‍या विद्यार्थ्याला कायावाचामनसा आधी हा धडा हस्तगत- नाही; अगदी जिवाशी- नेऊन भिडविला पाहिजे. आपल्याहून भिन्न रीतीनं लोकहिताचा प्रयत्न कोणी करीत असलं तर त्याच्याबद्दल सहानुभूती न दाखविणं, दुसर्‍याच्या प्रयत्नाबद्दल अनादर दाखविणं, देशहिताच्या बुध्दीतच स्पर्धा वाढवून एकमेकांना खाली पाडणं, या कारणांमुळे आज आमची जितकी अवनती होत आहे, तितकी दुसर्‍या कोणत्याही कारणामुळं होत नसेल. भगीरथ, मी लोकोत्तरबुध्दीचा एखादा महात्मा नाही; पण शक्य तितक्या शांतपणानं आणि समतोल मनानं सरळ गोष्टी पाहात असल्यामुळे माझे विचार असे होऊ लागले आहेत. राजकीय सुधारणेचे पुरस्कर्ते आपल्या मार्गानं जाताना विधवांच्या दुबळया हृदयाच्या पायघडया तुडवीत जायला मागंपुढं पाहात नाहीत, केवळ सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते विधवांच्या कपाळी कुंकू लावण्यातच इतके रंगून गेलेले आहेत की, आपल्या भारतमातेच्या वैधव्याचा त्यांना विचारच करता येत नाही! आर्यधर्माचा भलता अभिमान धरणारे, आर्यधर्माची विजयपताका अधिकाधिक उंच दिसावी म्हणून धर्माभिमानाच्या भरात तिच्या उभारणीसाठी सहा कोटी माहारामांगांच्या हाडांच्या सांगाडयांची योजना करीत आहेत. नामशुद्रांचे आणि अतिशुद्रांचे वाली म्हणविणारे त्या वर्गाला उच्चपदी नेण्याऐवजी बिचार्‍या ब्राह्मणवर्गाला रसातळी गाडण्याचा अधम प्रयत्न करीत आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रकृती तितकी मतं, आणखी मतं तितके मार्ग, असा प्रकार होऊन आज जबाबदार, आणि बेजबाबदार लोकांना सर्वांनाच बारा वाटा मोकळया होऊन बसल्या आहेत. त्रिसप्तकोटिकंठकृतनिनादकराले जननि इतक्या हाका आरोळयांच्या कल्लोळात तुझ्या नेमक्या हिताचा संदेश आम्हा पामर बाळांना कसा ऐकू जाणार? भगीरथ, व्यापक लोकशिक्षण, सार्वजनिक लोकशिक्षण हा तरी सध्या असा एक मार्ग दिसतो आहे की, जो एकटाच आम्हाला आत्यंतिक हिताला नेऊन पोहोचविणारा नसला, तरी इतर सर्व मार्गांवर आपला प्रकाश पाडणारा आहे खास. भगीरथ आर्यवर्ताच्या उदयोन्मुख भाग्याचा अचूक मार्ग सांगणार्‍या मंत्रद्रष्टा महात्मा अजून अवतरावयाचा आहे. मनुष्यस्वभावाला शोभणार्‍या आतुर आशेनं त्याच्या आगमनाची वाट पाहात बसणं हेच आज तुझ्या माझ्यासारख्या पतितांचं कर्तव्य आहे. सर्वच मार्ग स्वच्छ करून ठेवले म्हणजे त्या महात्म्याचा यांपैकी वाटेल त्या मार्गाने होणारा प्रवास तितका तरी सुखकर होईल. भगीरथ, आज आपल्याला खासगी कामं बरीच पडली आहेत. आणखी ती जरुरीची आहेत. पुढं केव्हा तरी या सार्वजनिक शिक्षणाचा माझ्या दृष्टीनं जो व्यापकतम प्रयत्न वाटतो तो तुला यथाशक्त्या सांगेन. चल भगीरथ, सध्या आपले दुर्दैव सुधाकराच्या व्यसनाशी संलग्न झालं आहे. मी लिहून देतो तेवढी तार पद्माकराला पाठीव. चल लवकर!

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP