( दमयंतीचा महाल . दमयंती मंचकावर पहुडलेली आहे . तिची सखी केशिनी जवळच आहे . )
दमयंती - ( उठून बसत ) सखे केशिनी , आज किनई माझ्या जीवाला चैनच पडत नाही गं ! सारखी हुरहूर लागून राहिली आहे कसली तरी . अन्तरीयात कुठे तरी कुसळ असावं अन् ते पाठीला सारखं टोंचत रहावं , पण सांपडू नये , म्हणजे जशी अस्वस्थता वाटू लागते ना , तसंच काहीसं झालं आहे मला . ह्रदयात कुठे तरी खोल खोल काही तरी खुपल्यासारखं वाटतंय . त्यामुळे अगदी ढसढसा रडावसं -
केशिनी - उगीच काही तरी वाटतं आहे झालं , देवि !
दमयंती - उगीच नाही गं , खरं सांगू ? आज मला एकसारखे अपशकुनहि होताहेत .
केशिनी - अपशकुनांवर कसला विश्वास ठेवता , देवि ?
दमयंती - विश्वास नसला तरी रुखरुख लागतेच की ! अग , आज पुरतं उजाडायच्या आंतच मला जाग आली , तर घुबडाचा भयानक घूत्कारच कानी पडला . आभाळ आल्यामुळे वातावरणहि कसं धुंद होऊन गेलं आहे . त्यामुळे मनाला कसा तो उत्साहच वाटत नाही .
केशिनी - ( एकदम दमयंतीच्या खांद्यावर हात ठेवून ) सखे दमयंती , तूं एखादं गाणं म्हण ना छानसं . मी साथ करते तुला वीणेवर ! मग पाहू कसा उत्साह वाटत नाही तो .
दमयंती - पण गाणं म्हणावसं तरी वाटलं पाहीजे ना ?
केशिनी - तुम्ही सुरवात तर करा !
( केशिनी वीणा छेडायला सुरवात करते . दमयंती आलाप घेऊ लागते . पण ते शोकपूर्णच येतात . )
दमयंती - पहा , आलापसुद्धा कसे खिन्न येताहेत आज .
( दमयंती एक शोकपूर्ण गीत गाते . पण ते पूर्ण व्हायच्या आंतच थांबते . ते गीत असे -
पद ७ -
या जीवनवीणेवरती सखये
मी आळविते भैरवी ॥ध्रु . ॥
असले जीवन वाटे भ्रांति
हुरहुर लागुनि जाते शान्ति ।
तुझ्या नि माझ्या या एकान्ती
वाहते आश्रूंची जान्हवी
मी आळविते भैरवी ॥
( हे गाणे अर्धवटच आळवून दमयंती थांबते व उसासा टाकून म्हणते - )
दमयंती - सखे , गाण्यात सुद्धा नाही गं रमत मन माझं ! एक फार मोठा अपशकुन डांचतो आहे मनात .
केशिनी - कुठला बरं तो अपशकुन ?
दमयंती - सांगण्याचं सुद्धा धैर्य होत नाही गं ! पण सांगतेच . आपल्या प्रासादावरच्या ध्वजावर आज एका मोठया गिधाडाने झडप मारलेली मी पाहिली . स्वतः डोळयांनी पाहिलं .
केशिनी - अगं बाई ! असा अपशकुन खरोखरंच मोठा घातुक !
दमयंती - माझा आपला इकडच्या पराक्रमावर पूर्ण विश्वास म्हणून मी त्याचं काहीच वाटून घेत नाही .
केशिनी - पण बाई , मला वाटतं आपण हा अपशकुन महाराजांच्या कानावर घालावा .
दमयंती - पण सखे , इकडचं दर्शन तरी सबंध दिवसात झालं आहे कुठे ? मग माणसानं सांगावं तरी कसं ? कितीहि आभाळ आलं असून पावसाची झोड उठली असली तरी सूर्यदेवानं अभ्र दूर करुन एकदा पृथ्वीकडे पाहिलं की जसं एकदम प्रसन्न वाटतं , तसंच इकडच्या दर्शनानं मन प्रसन्न झालं असतं . अपशकुनांमुळे मनावर आलेली पटलं नाहीशी होऊन मन कसं आनंदित झालं असतं . पण तेच आज माझ्या दैवी नाही गं ! ( गळा दाटून येतो , हुंदके बाहेर पडू बघतात . ) हाच सर्वात मोठा अपशकुन समजते मी .
केशिनी - बाईसाहेब , उगीच कां मनाला लावून घेता ? काही तरी कामात कामं निघून इकडे यायला फावलं नसेल .
दमयंती - लग्न झाल्यापासून आजपर्यन्त असं कधी घडलं नाही तेंच नेमकं आज अपशकुनांच्या दिवशीच कां घडावं ?
दासी - ( प्रवेशून ) राणीसरकार , नल महाराजांची स्वारी इकडे येत आहे .
दमयंती - ( एकदम डोळे पुसून उभी राहते ) खरंच ? एकदम मन कसं प्रफुल्ल झालं म्हणून सांगू ? जा , जा लवकर , उभी काय राहिलीस ? पाठवून दे त्यांना आंत . एक क्षणाचाहि विलंब लावू नकोस . ( दासी जाते . )
केशिनी - बाईसाहेब जाते मी . आता कसं गाणं सुचतंय बघतेच .
दमयंती - पुरे , पुरे , चावटपणा करु नकोस . अन् चोरुन ऐकू नकोस हो काही !
केशिनी - पाहीन मी काय करायचं ते .
दमयंती - मला नाही असला फाजिलपणा खपणार , सांगून ठेवते .
केशिनी - बरं , बरं ! ( आंत निघून जाते . )
दमयंती - ( पद ८ मांड दादरा )
शोक हरी हा मोही ह्रदया मना ॥ध्रु . ॥
जिंकुनि अपशकुना व्यापुनि मना
प्रीतिबलाने प्रसन्न करी हा ॥१॥
फुलवी मना , डुलवी ह्रदया
नाचवी नयना नलसखा हा ॥२॥
( जरा वेळाने ) हे काय ? अजून इकडची चाहूल सुद्धा कशी लागत नाही ? आणि - हे मी बघतेय काय ? ही मेली दासी एकटीच कशी ? आजचा दिवसच काही तरी विचित्र घटनांनी भरणार आहे कि काय ? ( दासी येते . ) काय गं ? इकडची स्वारी कुठे आहे ?
दासी - राणीसरकार , मी आपणास सांगून बाहेर जाते तों महाराज निघून सुद्धा गेले होते .
दमयंती - ( रागावून ) काय ? निघून सुद्धा गेले होते ? मग आलेच कशाला दारापर्यन्त तरी !
दासी - म्हणून मी पहारेकर्याला विचारलं , तर तो म्हणाला की मी आंत वळते न वळते तोच काही काम आहे असं सांगून महाराज निघून गेले .
केशिनी - ( प्रवेशत ) काय झालं गं ?
दासी - आणखी सांगायचं म्हणजे महाराज फारच दुःखी कष्टी झालेले दिसत होते .
दमयंती - केशिनी , आता मात्र मला निश्चित वाटू लागलंय की आज ना उद्या काही तरी विपरित , अनुचित , दुर्दैवी घटना घडणार ! कल्पनेनंच मन कसं आंतून जळल्यासारखं होतंय ! देवा ! आहे तरी काय तुझ्या मनात ? असं भलतंच संकट पुढे वाढून ठेवणार होतास तर लोकपालांच्या कपटजालातून मार्ग तरी कशाला दाखवलास ?
केशिनी - असं काय वेडयासारखं करायचं बरं ? महाराजांकडे डोळा वर करुन बघण्याचं तरी धैर्य या पृथ्वीतलावर कुणात आहे कां ?
दमयंती - तें खरं गं ! पण -
केशिनी - येवढे पराक्रमी दिक्पाल आणि तो दुरात्मा कलि , हेसुद्धा महाराजांशी लढू शकले नाहीत , असं असतांना तुमचं कुणी काही अशुभ करील , असं मनात तरी कां आणता ?
दमयंती - अगं पण -
केशिनी - शिवाय देवी सरस्वती आपल्या पाठीशी उभी आहे ना ? स्वयंवराच्या वेळी दिक्पालांच्या मायाजालातून सुटायला तिनंच मदत केली होती ना ? मग जर यदा कदाचित् प्रसंग आलाच तर त्यातूनहि पार पडायला देवी तुम्हाला मदत नाही कां करणार ?
दमयंती - बघ . म्हणजे तुलासुद्धा काही तरी घोर प्रसंग ओढवणार असं वाटायला लागलेलं दिसतंय तर ! पण यात कोणाचा हात असावा ? इंद्रादि देवांच्या मनात तर काही नीचपणा पुन्हा आला नसेल ना ?
केशिनी - छे छे , इंद्र तसं मुळीच करणार नाही . असं निदान मला तरी वाटतं .
दमयंती - कशावरुन गं ? मी त्याला वरलं नाही म्हणून तो सूड कशावरुन नाही घेणार ? अहिल्येला अशाच बाबतीत नाही कां भ्रष्ट केलं त्यानं ? पण इंद्रा , लक्ष्यात ठेव , तुझ्या सूडाला मी कदापि बळी पडणार नाही .
केशिनी - पण अहिल्येच्या बाबतीत इंद्रानं तशी प्रतिज्ञाच केली होती . यावेळी त्या चारहि दिक्पालांनी तुम्हा दोघांना सहाय करायचं ठरविलेलं आहे .
दमयंती - ते खरं गं ! पण त्याचा काय नेम धरावा ? देव नाहीत तर दुसरं कोण बरं आमच्या मागे लागणार आहे ? ( विचार करुन ) हं ! एक दृष्ट दिसतो खरा ! तोहि माझ्या स्वयंवराचे वेळी दुखावला गेला आहे .
केशिनी - कोण बाई तो ?
दमयंती - अग , दुसरं कोण ? कलिमहाशय ! कलीच ! कलीच सूड घ्यायला टपला असेल . कारण तो यायच्या आंत मी यांच्या गळयात वरमाला घातली ना !
दासी - ( प्रवेशून ) राणीसरकार , नल महाराजांचे सारथि वार्ष्णेय आले आहेत . काही महत्त्वाची बातमी द्यायची आहे म्हणतात .
दमयंती - जा , त्याला आंत पाठवून दे .
( दासी जाते . वार्ष्णेय प्रवेशतो . )
वार्ष्णेय - देवि - -
( दमयंती वार्ष्णेयाकडे बघते . तो काहीच बोलत नाही . )
दमयंती - वार्ष्णेया , अरे गप कां उभा ? बोल ना ! काय सांगायचं आहे ते लवकर सांगून टाक . ( वार्ष्णेय काहीच बोलत नाही . ) आणि आज असा तूं संकटग्रस्त कां दिसतोस ? काही संकटात पडला आहेस कां ? तसं असेल तर सांग लवकर . शक्य ते मी करीन .
वार्ष्णेय - ( गदगदून ) देवि , काय सांगू ? सगळा घोटाळा झालाय . माझ्यावर तर संकट आलंच आहे , पण सगळया प्रजेवर , सर्वात जास्त तुम्हावर संकट कोसळलंय .
दमयंती - ( एकदम उठून उभी राहात ) काय ? शेवटी सगळे अपशकुन खरे ठरले तर ? धिक्कार असो माझ्या दैवाचा ! वार्ष्णेया , सांग लवकर . आता अधिक अन्त पाहू नकोस . सबंध दिवसभर व्यथा सोसली . आता याहून नाही सहन होत . बोल , बोल , लवकर . कितीहि दूःखद बातमी असो ती ऐकायला मी तयार आहे . मना , हो कठोर , दगडाहून दगड हो आणि ऐक . ( अजूनहि वार्ष्णेय काही बोलत नाही असे पाहून ) वार्ष्णेया , बोलत का नाहीस ? यांच्याविषयी तर बरं वाईट - - सांग सांग , माझं ह्रदय मी आता वज्रासारखं बनवलं आहे . काय सांगायचंय ते सांगून टाक . याहून जास्त वेळ मन हेलावत ठेवू नकोस .
वार्ष्णेय - देवि , मघाशी मला दमनक भेटला होता .
दमयंती - दमनक ? कोण दमनक ? त्याचा या संकटाशी काय संबंध ?
वार्ष्णेय - दमनक ! नेहमी पुष्कर राजांपुढे लांगूलचालन करणारा तो पशू . तो सांगत होता - तो - तो सांगत होता -
दमयंती - काय सांगत होता ? बोल . जीभ अशी चाचरु देऊ नकोस . माझ्या अन्तः करणापेक्षा तुझी जीभच अधिक चांचरते आहे . मग माझं कोमल मन कोठवर तग धरु शकेल ? सांग लवकर त्याची मुक्ताफळं !
वार्ष्णेय - तो सांगत होता की नल महाराज अन् पुष्कर द्यूत खेळणार -
दमयंती - काय ? द्यूत ? द्यूत हे कसं खेळतील ?
वार्ष्णेय - होय राणीसरकार ! महाराज द्यूत खेळणार आहेत , त्यांना खेळणं भाग पडणार आहे . आणि आणि - -
दमयंती - आणि काय ? बोल चटकन् ! म्हणजे हे खेळायला लागायच्या आंत काही उपाय करता येईल .
वार्ष्णेय - आणि त्यात पुष्कर कपटानं नलराजांचं राज्य लुबाडणार .
दमयंती - अगं आई ! हे मी काय ऐकते आहे ? ज्यांच्यावर पाठच्या भावासारखं प्रेम मी केलं आणि यांनी तर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलं , ते पुष्करभाऊजी असं कसं वागतील ?
वार्ष्णेय - यात शंका काय देवि , मी मघाशीच पाहून आलो . खेळ सुरुहि झाला होता आणि नलराज एक एक पण हारायला लागलेले होते .
दमयंती - इतक्यावर वेळ येऊन ठेपली अं ! म्हणजे अखेर सापच पाळला ना आम्ही घरात ? आता काय करायचं ? चल , वार्ष्णेया आपण दोघंहि जाऊ हे खेळताहेत तिथे . अन् पाहू काही उपाय चालतो कां !
वार्ष्णेय - नको , सरकार नको . एखाद्या डिवचलेल्या नागाप्रमाणे पुष्करराज विषारी फुत्कार टाकत आहेत आणि एक एक पण हरतोय तसतसे नलराज अधिक अधिकच संतप्त आणि अस्वस्थ होत चालले आहेत . काही विचार न करता एकामागून एक पण लावत चालले आहेत . तेव्हा विनंती करतो , आता यावेळी तेथे आपण जाऊ नये .
दमयंती - आता नाही जायचे तर केव्हा ? आताच गेलं तर काही उपाय -
वार्ष्णेय - नाही महाराणी , आता काही उपाय नाही . जायचंच असेल तर निषध देश सोडून जायच्या तयारीनंच जावं लागेल . असं निदान मला तरी वाटतं .
दमयंती - कां बरं ? निषध सोडायच्या तयारीनं कां ?
वार्ष्णेय - उघड आहे बाईसाहेब , ज्या अर्थी पुष्करराज निव्वळ सूडबुद्धीनं द्यूत खेळत आहेत , त्या अर्थी त्यांचा जय झाला तर ते तुम्हाला क्षणभरहि येथे राहू देणार नाहीत .
दमयंती - खरं आहे तुझं म्हणणं . पण नक्की नाही सांगता येत . काही झालं तरी यांचे भाऊ आहेत ते . तरीसुद्धा प्रतिकूल तेच घडेल असं गृहित धरुनच आपण तयारी केलेली बरी !
वार्ष्णेय - राणीसरकार , काय ती आज्ञा द्यावी . मी सर्व तयारी करतो . आपण मात्र तत्काळ नलराजांच्या मदतीला जावं . प्रयत्न करणं आपल्या हाती आहे .
दमयंती - केशिनी , तूं लवकर जा . इंद्रसेन आणि इंद्रसेना यांना लगेच इकडे घेऊन ये . ( केशिनी जाते . )
वार्ष्णेय - देवि , मुलांना कशाला बोलाविता ? लहान आहेत ती दोघं अजून , अजाण आहेत . त्यांच्या कानावर असल्या गोष्टी जाऊ देऊ नयेत . मी सांगू नये , वास्तविक , पण मोठयांच्या कलहांचा लहान मुलांच्या मनावर फार परिणाम होतो .
दमयंती - खरंच , वार्ष्णेया , तूं सांगतोस ते अगदी बरोबर आहे . पण आता यावर तोड काय काढायची ? मुलांना सुरक्षित कसं राखायचं ? भाऊजींनी दुष्टपणा केलाच तर त्यांना किती यातना होतील बरं ! त्यांना कुठे तरी देशाबाहेर पाठवून द्यावं . बाबांकडेच पाठवावं हे उत्तम ! नाही तरी आईचा लळा त्यांना आहेच . विदर्भात ते अगदी मजेत दिवस काढतील . पण तिथं पाठवायचं कसं ?
वार्ष्णेय - त्याची कशाला काळजी ? मीच घेऊन जातो . आताच रथ जोडून आणतो .
दमयंती - हो , पण असं एकाएकी निघावं लागल्यानं त्यांना संशय नाही कां यायचा ?
वार्ष्णेय - काही तरी खोटं सांगून मन वळवता येईल त्यांचं . बालमनच ते ! त्यांना आनंदच होईल लांब प्रवास करायचा म्हणून .
दमयंती - हेमलते , अग हेमलते , ( दासी येते . ) लवकर जा आणि मुलांच्या प्रयाणाची तयारी कर . लवकर आटप हं . ( दासी जाते . ) ( वार्ष्णेयास ) आईबाबांनी तुम्हाला बोलावलंय असं सांगते त्यांना म्हणजे अगदी आनंदानं जातील ते .
( चार पांच वर्षांचा इंद्रसेन आणि २ - ३ वर्षांची इंद्रसेना केशिनी बरोबर येता . दमयंती डोळे पुसून हंसतमुख होते . )
दमयंती - बाळा इंद्रसेना , इंद्रसेने , ( दोघांनाहि पोटाशी धरते . ) हे बघा तुम्हाला आजीनं बोलावलंय घरी . जाल ना ?
इंद्रसेन - कशाला गं ?
दमयंती - तुम्ही विदर्भाहून इकडे आल्यला बरेच दिवस झाले ना ? म्हणून आजोबा आणि आजीला बघावसं वाटतंय तुम्हाला . अगदी खूप दिवस राहायच्या तयारीनं जा बरं कां ?
इंद्रसेन - आई , तू पण येणार ना ?
दमयंती - नाही रे बाळ , मला नाही येता यायचं .
इंद्रसेना - मग बाबा ?
दमयंती - त्यांनाहि वेळ नाही तिकडे यायला .
इंद्रसेना - मग आमी पन नाही जाणाल !
दमयंती - असं करु नये बाळ . ( डोळयांमध्ये पाणी तरारते . ) आम्ही एकदा येऊ ना .
इंद्रसेन , इंद्रसेना दोघेहि - अं हं आम्ही दोघंच नाही जाणार .
दमयंती - हे पहा , आजीनी बोलावलंय ना तुम्हाला ? मग तिला ‘ नाही ’ म्हणून सांगणार कां ? मोठया माणसांचं ऐकायचं असतं ना ? आजी - आजोबा तर माझ्याहून मोठे आहेत . त्यांनी सांगितलं म्हणून तर मी तुम्हाला दोघांनाच पाठवते आहे . यांनीहि जायला सांगितलं आहे . मग आमचं ऐकणार नाही कां तुम्ही ? ऐकणार नसाल तर आम्ही बोलणारच नाही तुमच्याशी ! ( हेमलता येऊन तयारी झाल्याचं सांगते . ) बघ , सगळी तयारीहि झाली . जाणार ना आता ?
इंद्रसेना - पण आई , तूं लडतेस कां ?
दमयंती - तुम्ही माझी बाळं ना ? मग आपली बाळं दूर जातांना आईच्या डोळयांत पाणी येणारच की !
इंद्रसेन - आई , आम्ही जाणार म्हणून तुला रडू येत असेल , तर आम्ही नाही जाणार ! आईला कधी दुःख देऊ नये .
दमयंती - बाळ , तुम्ही दोघं गेला नाहीत तरच मला दुःख होईल . शिवाय आजी - आजोबांनाहि वाईट वाटेल . म्हणून जा म्हणते . हे पहा मी डोळे पुसले .
इंद्रसेन - पण आई -
वार्ष्णेय - अंहं , आता काही बोलायचं नाही , बरं कां ? पहा , मी आत्ता रथ आणतो . ( वार्ष्णेय जातो . )
इंद्रसेन - पण आई , तिथं चैन कसं पडणार ? तूं थोडा वेळ दिसली नाहीस तरी आम्हाला काहीतरी व्हायला लागतं .
दमयंती - हात् वेडया , मग गुरुगृही बारा वर्ष कशी काढणार ? तिथे आई भेटणार आहे कां तुला ?
इंद्रसेन - हं . पण आई , बाबा कुठे आहेत गं ?
इंद्रसेना - खलंच की आई , बाबांना सांगितल्याशिवाय कसं जायचं ?
दमयंती - ते आत्ता कसे भेटतील ? राजसभेत गेले आहेत ना ! ( पुन्हा डोळयात पाणी उभे राहते . ) सकाळी तुम्ही झोपला होता तेव्हाच तुमचा निरोप घेऊन गेलेत ते .
इंद्रसेन - बरं तर , पण आई तूं नक्की येशील ना ? अगदी लवकर ?
दमयंती - ( अश्रु वाहू लागतात ) असं रे काय बोलतोस ? मी फसविन कां कधी तुम्हाला ?
इंद्रसेना - बघ आई , पुन्हा लडायला लागलीस . अशानं आमी नाही जाणाल .
दमयंती - अहा गं वेडे , मी रडते होय ? आई कधी रडते कां ?
इंद्रसेना - मग पाणी कसं आलं डोळयात ?
दमयंती - अगं , माझ्या डोळयात एकदम धूळ गेली , म्हणून आलं पाणी ! किती वारं सुटलंय बघ !
इंद्रसेना - थांब , मी फुंकते तुझ्या डोळयात म्हणजे धूळ जाईल निघून .
दमयंती - राहू दे गं ! काही होत नाही धूळ गेली तरी .
इंद्रसेना - आग होते ना ! फुंकते मी , वांक खाली .
( दमयंती खाली वांकते , इंद्रसेना तिच्या डोळयात फुंकते . )
इंद्रसेन : गेलं कि नाही अजून ? नाही तर असं कर . ( अंगरख्याचं एक टोक गोळा करुन तोंडात घालून उष्ण करतो व डोळयाला लावून दाखवतो . ) असं . म्हणजे डोळयात काही गेलं असलं तर ते जातं .
दमयंती - गेलं रे बाबा ,
इंद्रसेन - नाही . तूं असं करच . पहा कसं छान वाटतं .
( दमयंती पदराने तसे करते . )
दमयंती - हं ! गेली धूळ हं डोळयातली . बरं . तो पहा वार्ष्णेय आला . जा पाहू , देवांना नमस्कार करुन या . नेहमी सुखात ठेवा म्हणावं . काय म्हणायचं इंद्रसेने ?
इंद्रसेना - देवा , देवा , सुखी ठेव . ( हात जोडून नमस्कार करते . )
दमयंती - शहाणी आहे माझी बाळी ती . जा आता .
( दोघे एकमेकांचा हात धरुन जातात . )
वार्ष्णेय - ( प्रवेशून ) बाईसाहेब , रथ जोडून आणला आहे .
दमयंती - उत्तम ! मुलंहि तयार आहेत . लवकर घेऊन जा त्यांना .
वार्ष्णेय : होय देवि , नलराजांच्या सारथी मी . पहा किती लवकर परत येतो ते .
दमयंती - परत येतो ? परत कशाला ?
वार्ष्णेय - कशाला म्हणजे ? येथे तुम्ही संकटात असतांना मी खुशाल विदर्भात राहू ? मुलांची काळजी घ्यायला विदर्भराज आहेतच . पण इथं कोण तुमच्या मदतीला ?
दमयंती - खरंच वार्ष्णेया , इथला हा प्रकार बाबांना सांगू नको अगदी . बरं कां ? नाही तर ते उगीच काळजी करीत बसतील . किंवा मदतीला तरी येतील . आणि ते काही यांना पटायचं नाही .
वार्ष्णेय - पण मुलं अचानक कां आली म्हणून विचारलं तर काय सांगायचं ?
दमयंती - मुलांनाच सारखी आठवण येत होती म्हणून सांग . जेवतांना उचकी लागली की आजीनं आठवण काढली असं म्हणायची , असं सांग , म्हणजे झालं .
वार्ष्णेय - पण राजकुमार सांगतील ना की -
दमयंती - ते पाहू पुढचं पुढे . तो विचार आता कशाला ?
इंद्रसेन व इंद्रसेना - ( प्रवेशून ) आई , आलो आम्ही नमस्कार करुन .
दमयंती - शहाणी आहेत माझी बाळं ! जा आता नीट . पण वाटेत भांडूबिंडू नका हं ! आणि तिथंहि कुणाला त्रास द्यायचा नाही . सेवकांशीसुद्धा प्रेमानं वागायचं . अरेरावी , उर्मटपणा मुळीच करायचा नाही . जा आता सांभाळून . वार्ष्णेया , नीट ने हं त्यांना .
( तिघेहि जातात . दमयंती मुग्धपणे बघत उभी राहते . जरा वेळात दोन्ही मुले परततात )
दमयंती - काय रे , काय राहिलं ?
इंद्रसेन - अगं , तुला नमस्कार करायचा राहूनच गेला . तिथपर्यन्त गेल्यावर आठवण झाली म्हणून परत आलो .
( दोघेहि दमयंतीला वांकून नमस्कार करतात . दमयंती त्यांना पोटाशी धरुन कुरवाळते )
दमयंती - असंच सर्वांवर प्रेम करा . तिथं गेल्यावर आजीला , आजोबांना , मामांना नमस्कार करायचा बरं कां ! विसरु नका . जा . सुखानं रहा !
( दोघेहि घुटमळत घुटमळत जातात . दमयंती त्यांचेकडे अश्रुपूर्ण नेत्रांनी पहात राहते . नंतर खिडकीपाशी जाऊन रथाकडे बघत रहाते . )
पद ९चालली मम बाळे पितामहसदना
घेऊनि सोबत जणू मम पंचप्राणा
दाटे गहिंवर्र कंठी हुरहूर लागे मना
सलिलान्ध होऊनि दृष्टि पुत्रसृष्टि दिसेना
धरुनि शिरि वरदहस्त आपुला शंकरा
मार्गी सांभाळ मम बाळां , परमेश्वरा ।
काय वेगात गेला रथ ! क्षितिजापर्यन्त पोचलासुद्धा ! आता कोण माझ्या बाळांना हात लावेल ?
( पडदा . )
अंक २ प्रवेश १ समाप्त