( स्थळ - बिभीतक वृक्षाजवळील रान . )
कलि - आज हा कलि धन्य झाला ! म्हटल्याप्रमाणे नलाला पदच्युत तर केला . देवांनी नलाला दिलेले आशिर्वाद मी आज फोल केले . आणि देवांना न जुमानणार्या पुष्कराला राज्यावर बसविलं . थोडक्यात नलाचा सूड उगविला , देवांचा पराभव केला . तरीहि अजून मला विश्रांती घेता यायची नाही . राज्यवियोगाप्रमाणेच पत्नीवियोग आणि पृथ्वीवियोग यांच्या दुःखानं नलाचं अन्तः करण करपवून टाकायचंय मला . तेवढं केलं की मगच विश्रांति . बरं , पण अजून हे दोघं कां नाही आले ? वास्तविक नल द्यूतस्थानातून बाहेर पडल्याबरोबर त्यांनी इकडे यायला हवं होतं . ( पाहून ) आलाच वाटतं चार्वाक . पण द्वापर दिसत नाही बरोबर . ( चार्वाक प्रवेशतो . ) हं ! काय चार्वाका ठीक आहे ?
चार्वाक - होय महाराज , आपल्या कृपेनं सारं ठीक आहे ?
कलि - अरे पण तूं एकटाच कसा ? द्वापर कुठे आहे ?
चार्वाक - द्वापर ना ? तो पडला पुष्कराचा मित्र ! आणि पुष्कर तर आता राजा झालाय . मग तो कशाला आता येतो आहे इकडे लवकर ! चानचैनीत रमला असेल झालं .
कलि - अरे , उगीच असं वेडयासारखं बोलू नकोस . तो बघ , द्वापर इकडेच येतोय .
चार्वाक - आहा ! काय पण ऐटीत चालतो आहे ? जसं काही यानंच पुष्करला विजय मिळवून दिला .
कलि - शुक् ! बोलू नको . ऐकेल ना तो !
द्वापर - ( प्रवेशून ) ऐकल्याशिवाय राहिलोय काय ? काय रे चार्वाका , मी नाही तर काय तूं विजय मिळवून दिलास ?
चार्वाक - मग कोणी तूं ?
द्वापर - नाही तर काय ? एकोणीस दान कोणी मिळवून दिलं ? फांसा कुणी उभा केला ? तूं ?
चार्वाक - अरे जा ! सुरवातीपासून मी पुष्करला सहाय करत होतो . तुला कुठे अक्कल सुचली ती ? सांगकाम्या तूं ! कलिमहाराजांनी पाठवलं तेव्हा आलास तूं .
द्वापर : आता गप बसतोस कां -
चार्वाक - गप कशाला बसूं ? तुझ्या धमक्या माझ्यापुढे नाही चालायच्या . येवढा शहाणा होतास तर राजवाडयात प्रवेश मिळवायचं कां नाही सुचलं तुला ? या चार्वाकानं प्रथम राजवाडयात प्रवेश मिळवून पुष्करशी जवळिक साधली . समजलं ? द्वापराने नव्हे . कलिराजांनी सांगितले तेव्हा कुठे टाळक्यात उतरलं तुझ्या .
द्वापर - चार्वाका ,
कलि - ए मूर्खांनो , तुम्हा दोघांनाहि अकला नाहीत हेच खरं . अरे , आपसात काय भांडत बसलात ? दुहीतच नाशाचं बीज असतं हे विसरलात वाटतं ? या नल - पुष्कराचं उदाहरण काय शिकवतं ? विचार करा . ते दोघे भाऊ एक होते तोपर्यन्त तुम्हाला - तुम्हालाच कां मला सुद्धा निषधात प्रवेश मिळत नव्हता . पण पुष्करच्या मनात किंचित् विकल्प आल्याबरोबर या कलीने डाव साधला अन् नलाचा नाश झाला . वेळप्रसंगी पुष्करचाहि नाश होईल . तेव्हा तुम्हाला इतकंच सांगायचे की करता - करविता कलि आहे . तुम्ही नुसते नाममात्र ! तुम्हा दोघांचीहि मदत मला झाली आहे . त्याचं योग्य पारितोषिक मी अवश्य देईन - दोघांनाहि . काळजी करु नका . पण भांडत बसलात तर मात्र कल्याण राहील बाजूला , नाश मात्र होईल दोघांचाहि .
( दोघेहि कलीचे पाय धरतात . )
द्वापर - महाराज , आमच्या हातून नकळत चूक झाली . क्षमा करा .
चार्वाक - महाराज , आपला मोठेपणा नलाच्या बाबतीत दिसला असूनहि आम्ही ओळखला नाही म्हणून आम्ही आपले शतशः अपराधी आहोत . आता विनंती येवढीच की त्याबद्दल शासन मात्र करु नका .
दोघेहि एकदम - आम्ही पुन्हा केव्हाहि भांडणार नाही अशी आपल्या पायाची शपथ घेतो .
कलि - ( दोघांनाहि उठवून ) उठा , वेडयांनो उठा . गुण्यागोविंदाने वागा . सांगायचं येवढंच की बरेच वेळा यश मिळाल्याबरोबर यश मिळवणारे आपसात भांडतात आणि नाश पावतात . तेव्हा तुम्ही तरी शहाणपणाने वागा . भांडू नका .
द्वापर - नाही महाराज , अशी चूक पुन्हा आमच्याकडून होणार नाही .
कलि - बरं जाऊ द्या . विसरा सगळं . पुढे काय करायचं ते ऐका . इतक्यावरच काही थांबलेलं नाही . नलाला पुरता नागवणार आहे मी . हां , बरी कल्पना सुचली . पहा आता त्याला अक्षरशः नागवतो . चार्वाका , जा , पळ लवकर आणि त्या फांशांना माझा निरोप सांग की तुम्ही सुवर्ण पक्ष्यांची रुपें घेऊन नलाच्या मागोमाग अरण्यात जा आणि मुद्दाम त्याच्या दृष्टीस पडा . आणि त्यानं तुम्हाला पकडण्यासाठी आपलं एकुलतं एक वस्त्र तुमच्या अंगावर टाकलं की ते घेऊन इकडे या . जा , चार्वाका , न चुकता हा निरोप सांग .
चार्वाक - पण महाराज , नल आपलं वस्त्र त्यांचेवर टाकेलच याची काय खात्री ?
कलि - त्याची काळजी तूं नको करु . मी नलाच्या शरीरात वास्तव्य करुन आहे , हे विसरु नकोस . सर्व काही घडवून आणायला मी समर्थ आहे . बरं , जा लवकर . वेळ दवडू नकोस .
चार्वाक - जशी आपली आज्ञा . ( चार्वाक जातो . )
द्वापर - महाराज , मला काही कामगिरी ?
कलि - सांगतो , जरा दमानं घे . पुष्कर आता तुझा मित्र झालाच आहे आणि तूं सांगितलेलं सारं काही तो ऐकतो ; होय ना ?
द्वापर - होय महाराज , पण त्याचं काय ?
कलि - त्याचे काय म्हणून काय विचारतोस ? तूं पुष्करच्या मनात भरवून द्यायचं दूष्टपणे वागायला . कारण आता माझं काही पुष्करवर लक्ष्य राहीलसं नाही . मी माझं सर्व लक्ष्य आता नलावर केंद्रित करणार आहे . पुष्करवर माझी नजर न राहिल्यामुळे होईल काय की नलाविषयी त्याच्या मनात पुन्हा प्रेम किंवा कींव उत्पन्न होईल . त्याचा काय नेम ? काही झालं तरी एका रक्ताचे आहेत ते . तेव्हा तूं वेळोवेळी मत्सराग्नीमध्ये तेल ओतत रहायचं . येवढंच तुझं काम . नीट कर म्हणजे झालं .
द्वापर - ठीक आहे , महाराज . इतका द्वेषाग्नि भडकावतो की पुष्कर नुसता आंतल्या आंत जळत राहिला पाहीजे . पहाच माझी कर्तबगारी ! महाराज पहिल्या प्रथम मी पुष्करला काय सांगीन सांगू ?
कलि - सांग बरं प्रिय शिष्या !
द्वापर - दवंडी पिटायला सांगतो पुष्करला की नलाला कोणीहि कोणच्याहि प्रकारे मदत करायची नाही . जर कुणी मदत केलीच तर त्याला सरळ सुळावर चढवायचं .
कलि - शाब्बास रे पट्ठ्या ! उत्तम कल्पना . मला एकदम पसंत आहे . नाही तरी साधा नमस्कारसुद्धा करीत नाहीत लोक नलाला . त्यांना पुष्करची भीतीच वाटते . आणि त्यात ही दवंडी . मग काही विचारायलाच नको .
द्वापर - शिवाय नलाच्या दुःखावर डागण्या देण्यासारखंहि होईल या दवंडीमुळे .
कलि - ( पाहून ) तो आलाच बघ चार्वाक . आता मी तुम्हाला माझ्या पुढल्या कार्याची रुपरेषा सांगतो . ( चार्वाक येऊन कलीला प्रणिपात करतो . ) काय रे चार्वाका , सांगितलास कां निरोप नीट ?
चार्वाक - होय सरकार ! ‘ सांगितल्याबरहुकुम काम करतो , आपण काळजी करु नका ’ , असं ते फांसे म्हणाले .
कलि - बरं तर , ऐका आता पुढे मी काय करणार ते . तुम्हाला म्हणून सांगतो पण जर कुठे अवाक्षरहि तुमच्या तोंडून निघालं तर माझ्याशी गांठ आहे हे विसरु नका .
द्वापर - महाराज , आजपर्यन्त आम्ही आपल्या योजना कुठे बोललो आहो का ? मग असा अविश्वास कां दाखविता ?
कलि - अविश्वास नाही , पण आपली आठवण दिली . तर ऐका . प्रथम फांशांचं काम सुरळित होईल याची व्यवस्था करतो . म्हणजे नलाला नागविण्याची माझी प्रतिज्ञा शब्दशः पुरी होईल . माझ्या प्रतिज्ञेचा दुसरा भाग म्हणजे पत्नीवियोग . तो मी याच अरण्यात घडवून आणतो कि नाही ते पहा . नलाचं मन मी असं बनवितो की आपण काही तरी चांगली गोष्ट करतो आहो या भावनेनेच तो दमयंतीचा त्याग करेल . पाहाच माझी करामत !
चार्वाक - आणि पृथ्वीशी वियोग ?
कलि - ते पाहू पुढे . मला एकदा माझ्या मनासारखं त्याला छळून घेऊ दे . मग करु त्याचा वसुंधरेशी वियोग . पृथ्वीलासुद्धा आपली पत्नी मानतो नाही कां ? या कलीने असले छप्पन्न राजे पाहिले आहेत . आणि वाटेलाहि लावले आहेत . बरं जा , आता तुम्ही आपापल्या कामाला लागा . तुमचं पारितोषिक योग्य वेळी तुम्हाला मिळेल .
( दोघेही जातात . कलि हंसत हंसत त्यांच्याकडे पाहात राहतो . )
( पडदा पडतो )
अंक ३ प्रवेश पहिला समाप्त .