स्त्रीजीवन - सुखदुःखाचे अनुभव

मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.


सासरी सासुरवास
माहेरी माहेरवास
सत्तेचा परी घास
सासर्‍यास ॥१॥

सासरचे बोल
कडू कारल्याचा पाला
गोड बोलून दिली मला
बाप्पाजींनी ॥२॥

सासरचे बोल
जसे कारल्याचे वेल
गोड कधी का होईल
काही केल्या ॥३॥

सासरचे बोल
जशा रेशमाच्या गाठी
सैल कर माझ्यासाठी
भाईराया ॥४॥

सासरचे बोल जशा
रेशमाच्या गाठी
माने बसल्या न सुटती
काही केल्या ॥५॥

सासरचे बोल
जसा वळचणीचा वासा
लागतो ठसाठसा
येता जाता ॥६॥

सासरचे बोल
जसे पाण्याचे शिंतोडे
पाहावे माझ्याकडे
भाईराया ॥७॥

सासरचे बोल
कडू काडेकिराईत
जरी नाही गिळवत
गोड मानी ॥८॥

सासरचे बोल
कडू विष्याचे गं प्याले
तुझ्यासाठी गोड केले
मायबाई ॥९॥

सासरचे बोल
जसे निवडुंगाचे घोस
जातीवंताच्या मुली सोस
उषाताई ॥१०॥

सासरचे बोल
जसे मिरियांचे घोस
शीलवंताच्या गं लेकी
तू सारे सुख सोस ॥११॥

सासरचे बोल
भाऊ ऐकतो चोरोनी
नेत्र आले गं भरोनी
भाईरायाचे ॥१२॥

दीर बोलती दीरपणी
नणंदा बोलती टाकूनी
वाग पायरी राखूनी
उषाताई ॥१३॥

सासूचा सासुरवास
नणंदाबाईची जाचणी
कशी कोमेजून गेली
माझी शुक्राची चांदणी ॥१४॥

सासूचा सासुरवास
रडवी पदोपदी
लेक थोराची बोलेना
कोणाशी परी कधी ॥१५॥

बापे दिल्या लेकी
कामाच्या खळाळ्याला
हिरवी लवंग मसाल्याला
चला कुटू ॥१६॥

बापे दिल्या लेकी
वाटेवरच्या गोसाव्याला
पालखीत बैसायाला
दैव तिचे ॥१७॥

बापे दिल्या लेकी
नाही पाहिले घरदार
पाहणार परमेश्वर
दुसरे कोण ॥१८॥

बापे दिल्या लेकी
नाही पाहिले धनबीन
एक पाहिले निधान
कुंकवाला ॥१९॥

बापे दिल्या लेकी
आपण बसले सुखे ओटी
मायेला चिंता मोठी
वागण्याची ॥२०॥

माझे ग मायबाई
नको करु माझा घोर
रत्न दिलेस तू थोर
लेकीहाती ॥२१॥

बाप्पाजी हो बाप्पा
मी तुमच्या पोटीची
मला कोणत्या गोष्टीची
चिंता नाही ॥२२॥

बाप्पाजी हो बाप्पा
आम्ही तुमच्या की पोटा
लेकासारखाच वाटा
आम्हा द्यावा ॥२३॥

चंदनासारखी
देह मी झीजवीन
लेक तुमची म्हणवीन
बाप्पाराया ॥२४॥

चंदनासारखी
देह घालीन करवती
तुमच्या नावासाठी
बाप्पाजी हो ॥२५॥

इवलाही बोल
मला लागू न देईल
लेक तुमची म्हणवीन
बाप्पाराया ॥२६॥

माझे ग मायबाई
नका करु माझी चिंता
दिलीस भाग्यवंता
लेक तुझी ॥२७॥

सासुरवाशिणीचे
तोंड का कोमेजले
कोण कडू हो बोलले
उषाताईला ॥२८॥

भूक लागे माझ्या पोटा
वरवंटा देत्ये गाठी
तुमच्या नावासाठी
बाप्पाजी हो ॥२९॥

लेकीचा हा जन्म
देव घालून चुकला
बैल घाण्याला जुंपला
जन्मवेरी ॥३०॥

स्त्रियांचा हा जन्म
नको घालू सख्या हरी
परक्याची ताबेदारी
जन्मवेरी ॥३१॥

स्त्रियांचा हा जन्म
नको घालू सख्या हरी
रात्र ना दिवस
परक्याची ताबेदारी ॥३२॥

सासुरवाशिणी
तू गं वाड्यातला बैल
कधी रिकामी होशील
उषाताई ॥३३॥

नाचण्याचा कोंडा
नाही कशाच्या काजाकामा
मुलगीचा जन्म रामा
देऊ नये ॥३४॥

सकाळी उठून
काय म्या काम केले
वृंदावन सारवीले
तुळशीचे ॥३५॥

सकाळी उठून
काम सडा - सारवण
दाराशी राहती उभे
देव सूर्यनारायण ॥३६॥

सकाळी उठून
लागल्ये कामाला
पवित्र नाव घ्यावे
गोविंदाचे ॥३७॥

सकाळी उठून
लागल्ये कामाला
माझा निरोप रामाला
नमस्कार ॥३८॥

सकाळी उठून
मुख पाहावे गायीचे
दारी तुळशींमाईचे
वृंदावन ॥३९॥

सकाळी उठून
देवापुढे सारवीले
रांगोळीने काढीयेले
रामनाम ॥४०॥

सकाळी उठून
सडा घालू गोमूत्राचा
माझ्या गं कंथाचा
वाडा आहे पवित्राचा ॥४१॥

सकाळी उठून
काम करित्ये घाईघाई
माझ्या गं दारावरनं
मंदिराची वाट जाई ॥४२॥

सकाळी उठून
सूर्याला हात जोडी
कपाळी रेघ ओढी
कुंकवाची ॥४३॥

सकाळी उठून
कामधंद्याला लागल्ये
सूर्याला विसरल्ये
नमस्कार ॥४४॥

सकाळी उठून
सूर्याला नमस्कार
मग करिते संसार
उषाताई ॥४५॥

मला शिकवीले
बयाबाई माउलीने
असे उभे राहू नये
परक्याच्या साउलीने ॥४६॥

मी ग शिकलेली
बयाबाईच्या शाळेला
काम आपुले करावे
सदा वेळच्या वेळेला ॥४७॥

माळ्याने मळ्यात
पेरीले उगवले
माय ग माउलीने
शिकवीले कामा आले ॥४८॥

मला शिकवीले
बाप्पाजी ज्ञानवंता
भरल्या पाणवठा
जाऊ नये ॥४९॥

मला शिकवीले
माय त्या माउलीने
परक्याच्या साउलीने
जाऊ नये ॥५०॥

दळण सडण
नित्य माझे गं खेळणं
माझ्या मायेने वळण
लावीयेले ॥५१॥

दळण मी दळी
माझ्या बाह्या लोखंडाच्या
माय ग माउलीने
मुळया चारिल्या वेखंडाच्या ॥५२॥

दळण सडण
नित्या माझे ग खेळणं
दूर पाणी याला जाणं
अवघड ॥५३॥

दळण दळताना
अंगाच्या झाल्या गंगा
माय गं माउलीने
मला चारिल्या लवंगा ॥५४॥

दळण दळावे
जसा चंदन खिसावा
माउलीला गं पुसावे
कसा परदेश कंठावा ॥५५॥

नाकीच्या नथीला
नको लावू टीकफूल
आपण गृहस्थाच्या मुली
उषाताई ॥५६॥

परके पुरुषाचा
नये घेऊ कातचुना
आपण गृहस्थाच्या सुना
वैनीबाई ॥५७॥

परके पुरुषाशी
नये बोलू एकाएकी
आपण गृहस्थाच्या लेकी
उषाताई ॥५८॥

किती मी सांगू तुला
एवढा पदर घे अंगावर
परक्या ग पुरुषाची
नजर असते दूरवर ॥५९॥

किती तू नटशील
एवढे नटून काय होते
रुप सुंदर कोठे साजे
उषाताई ॥६०॥

सोनाराच्या साळे
खुट्टू खुट्टू वाजे
नवा बिंदीपट्टा साजे
वैनीबाईला ॥६१॥

पायात तोरडया
नवी नवरी कोणाची
सखा शाळे जातो त्याची
गोविंदबाळाची ॥६२॥

हातीच्या पाटल्या
मागे पुढे सारी
बोटांना जागा करी
उषाताई ॥६३॥

हाती गोट पाटल्या
हातरीच्या वांकी
आपण गृहस्थाच्या लेकी
उषाताई ॥६४॥

आले हो वैराळ
बसू घालावा कांबळा
चुडा भरावा जांभळा
उषाताईला ॥६५॥

आले हो वैराळ
बसू घालावी घोंगडी
चुडा भर नागमोडी
सूनबाई ॥६६॥

आले आले पटवेकरी
पटवाया काही नाही
पटव सूनबाई
तुझ्या पेट्या ॥६७॥

आले आले पटवेकरी
पटवाया काय देऊ
बाजूबंदा गोंडे लावू
सूनबाईच्या ॥६८॥

आले आले पटवेकरी
नको घेऊ मुली छंद
पटव बाजूबंद
सूनबाई ॥६९॥

आले आले पटवेकरी
नको घेऊ मुली चाळा
पटव तुझ्या माळा
उषाताई ॥७०॥

माझ्या अंगणात
सासूबाईंचा ठेवारेवा
सीतेसारख्या आम्ही जावा
चौघीजणी ॥७१॥

गोटपाटल्यांच्या
या मुली गं कोणाच्या
माझ्या ग मायबाईच्या
लेकीसुना ॥७२॥

घराची घरस्थिती काय
काय पाहशी परक्या
लेकीसुना त्या सारख्या
माझ्या घरी ॥७३॥

लेकी - सुना घेऊन
नको बसू तू अंगणी
दृष्ट लागेल म्हणूनी
अक्काबाई ॥७४॥

माझ्या दारावरनं
हत्ती गेले एकदोन
पालखीत लेकसून
मायबाईची ॥७५॥

माझ्या अक्काबाईची
वडील सून कोण
कारल्याची खूण
शांताबाई ॥७६॥

सासूबाई तुम्ही
एक हो बरे केले
कपाळीचे कुंकू
रत्न माझ्या हाती दिले ॥७७॥

सासूचा सासुरवास
सारा मनात गिळीते
कंथाशी हासते
उषाताई ॥७८॥

माझे सारे दुःख
मी गं मनात ठेवीन
कंथाला पाहून
गोड गोड मी हसेन ॥७९॥

होवो माझे काही
मला नाही त्याची पर्वा
माझा कंथ गं राहावा
आनंदात ॥८०॥

होवो माझे काही
मला नाही त्याची चिंता
मिळू दे गं माझ्या कंथा
समाधान ॥८१॥

होवो माझे काही
मला नाही त्याचे दुःख
माझ्या कुंकवाला
मिळू दे ग परी सुख ॥८२॥

आतून जळते
मनात रडते
परी वरुन हासते
उषाताई ॥८३॥

पावसावाचून
पीक नाही जमिनीला
कंथा गं वाचून
सुख नाही कामिनीला ॥८४॥

पावसावाचून
कसा भरारेल मळा
कंथा गं वाचून
कामिनीला नाही कळा ॥८५॥

सुनेला सासुरवास
नको करु माझे आई
आपल्या घरी चाफा
परक्याची आली जाई ॥८६॥

सुनेला सासुरवास
नको करु माझे गंगा
आपल्या घरी चाफा
परक्याची आली रंभा ॥८७॥

जावयाची जात
जसा पेटार्‍याचा नग
त्याच्या मर्जीने तू वाग
उषाताई ॥८८॥

जावयाची जात
जात खायाची जायाची
पुत्राची गं बोली
अस्थि गंगेला न्यायाची ॥८९॥

जावई देइल मान
जाऊन बैसेल लोकांत
आपला गं पुत्र
पाणी घालीत तोंडात ॥९०॥

जावयाची जात
माजोरी मस्तवाल
आता मी उषाताई
तुझ्यासाठी आल्ये काल ॥९१॥

जावयाची जात
रागीट तामसी
त्याच्या मर्जीने वागसी
उषाताई ॥९२॥

भ्रताराचा राग
जसा विस्तव इंगळ
त्याची मर्जी तू सांभाळ
उषाताई ॥९३॥

देवाच्या देऊळी
नंदीला घाली माळ
मागते तान्हेबाळ
उषाताई ॥९४॥

शिवाची केली पूजा
नंदीला कोरा शेला
पुत्रासाठी नवस केला
उषाताईने ॥९५॥

देवाच्या देवळी
पुत्राची फळ - वाटी
शालूची कर ओटी
उषाताई ॥९६॥

वडाच्या झाडाखाली
सदा प्रदक्षिणा घालते
तान्हेबाळाला मागते
उषाताई ॥९७॥

तिन्ही गं त्रिकाळ
पूजा करिते गायीची
आस तान्ह्या गं बाळाची
उषाताईला ॥९८॥

देवाच्या देऊळी
सहज गेल्ये होत्ये काल
प्रसाद दिला मला
दोन मोती एक लाल ॥९९॥

देवाच्या देऊळी
सहज गेल्ये गाभार्‍यात
प्रसाद दिला मला
दोन मोती अंगार्‍यात ॥१००॥

देवाच्या देऊळी
उभी मी केव्हाची
वाट बघते ब्राह्मणाची
पूजेसाठी ॥१०१॥

अश्वत्थाचा पार
कुणी झीजवीला
पुत्रासाठी नवस केला
उषाताईने ॥१०२॥

पिंपळा प्रदक्षिणा
कोण घालीते एकली
आहे पुत्राची भुकेली
उषाताई ॥१०३॥

नवस मी केला
अंबाबाईला पाळणा
पुत्र होऊ दे खेळणा
उषाताईला ॥१०४॥

देवाच्या देऊळी
पुत्रांचे पर्वत
एक द्यावा हो त्वरित
उषाताईला ॥१०५॥

नारायण देवाजीचा
झाडीत होत्ये जामदारखाना
सापडला मोतीदाणा
गोपूबाळ ॥१०६॥

नारायण देवाजीचा
झाडीत होत्ये पलंगपोस
सापडला मोतीघोस
गोपूबाळ ॥१०७॥

लाखावरी सावकार
तुझ्या माडीला आरसे
पोटी नाही पुत्रफळ
झाले द्रव्याचे कोळसे ॥१०८॥

लाखावरी सावकार
तुझ्या ओसरी दिवा जळे
पोटी नाही पुत्रफळ
तुझ्या ओटीवर कोण खेळे ॥१०९॥

वाजंत्री वाजती
कोणत्या आळीला
ताईबाई सावळीला
न्हाण आले ॥११०॥

देवाच्या देऊळी
मोकळया केसांची
न्हालेल्या दिवसांची
उषाताई ॥१११॥

पहिल्याने न्हाण
न्हाण आले ते आजोळी
मखराला जाळी
मोतियांची ॥११२॥

पहिल्याने न्हाण
हिरव्या साडीवरी
मखर माडीवरी
घालतात ॥११३॥

पहिल्या न्हाणाची
सासू करीतसे हौस
सखे मखरी तू बैस
उषाताई ॥११४॥

पिवळे पातळ
साळ्याला सांगितले
न्हाण आले आईकले
उषाताईला ॥११५॥

केळी कंडारल्या
तेथे का गं उभी
पहिल्या न्हाणाजोगी
उषाताई ॥११६॥

पहिले न्हाण आले
आले ते सासरा
केळी धाडिल्या उशिरा
मखराला ॥११७॥

पहिल्याने न्हाण
आले हासता खेळता
मखर गुंफिता
रात्र झाली ॥११८॥

पहिल्याने गर्भार
हिरवा शालू घेऊ
बागेमध्ये नेऊ
उषाताईला ॥११९॥

पहिल्याने गर्भार
नारळी हिचे पोट
डाळिंबी नेस चीट
उषाताई ॥१२०॥

पहिल्याने गर्भार
आली माहेराला
आनंद मनी झाला
मायबापा ॥१२१॥

पहिल्याने गर्भार
औषधे ठेवा घरी
बाळी आहे सुकुमारी
उषाताई ॥१२२॥

हिरव्या खणासाठी
रुपया सारीला
चोळी गर्भार नारीला
उषाताईला ॥१२३॥

पहिल्याने गर्भार
कंथ पुशितो आडभिंती
तुला महिने झाले किती
उषाताई ॥१२४॥

पहिल्याने गर्भार
कंथ पुशितो गोठ्यात
हिरवे डाळिंब ओटीत
उषाताईच्या ॥१२५॥

गरभार नारी
गर्भच्छाया तोंडावरी
हिरवी चोळी दंडावरी
उषाताईच्या ॥१२६॥

गरभार नारी
उकाडा होतो भारी
झोपाळा बांधा दारी
अप्पाराया ॥१२७॥

पहिल्याने गर्भार
डोहाळे धाड मला
माझ्या बागेचे पेरु तुला
उषाताई ॥१२८॥

तीनशे साठ पाट
काढिले कारणाला
तुझ्या डोहाळ जेवणाला
उषाताई ॥१२९॥

डोहाळे तुला होती
सांगून धाद मला
बागेची लिंबे तुला
पाठवीन ॥१३०॥

आंबे आले पाडा
चिंचाबाई कधी येशी
डोहाळे पुरवीशी
उषाताईचे ॥१३१॥

आंबे आले पाडा
पहिल्या पिकाचे
डोहाळे लेकाचे
उषाताईला ॥१३२॥

बांगड्या भर रे कासारा
हिरवा कारला
तुला नववा गं लागला
उषाताई ॥१३३॥

बांगड्या भर रे कासारा
बांगडी हिरवी दुधार
पहिल्याने गर्भार
उषाताई ॥१३४॥

सोनसळे गहू
ठेवीले कारणाला
डोहाळे जेवणाला
उषाताईच्या ॥१३५॥

हिरव्या खणाची
मला गरज लागली
गर्भिणी ऐकिली
उषाताई ॥१३६॥

रुपया मोडला
हिरव्या खणाला
तुझ्या डोहाळेजेवणाला
उषाताई ॥१३७॥

आणावी घोंगडी
आणावे कांबळ
येईल माझी बाळ
बाळंतपणा ॥१३८॥

बाज करा नीट
करा साफसूफ खोली
येईल माझी बाळी
बाळंतपणा ॥१३९॥

पहिल्याने गर्भार
नको भिऊ तू जिवाला
तुझी काळजी देवाला
उषाताई ॥१४०॥

पहिल्याने गर्भार
का गं नारी चिंताक्रांत
उद्या होशील पुत्रवंत
उषाताई ॥१४१॥

पळी पंचपात्री
कुठे जातोस ब्राह्मणा
पुत्र झाला यजमाना
दादारायांना ॥१४२॥

पुत्र झाला म्हणून
दादाराया खोता
दणका केला मोठा
सोहळ्याचा ॥१४३॥

पुत्र झाला म्हणती
आम्हा कळले बावीवरी
साखर गावावरी
वाटीयेली ॥१४४॥

पुत्र झाला म्हणती
आम्हा साखर नाही आली
पुत्र नाही कन्या झाली
उषाताईला ॥१४५॥

जोशाला बोलवा
आधी पंचांग बघावे
जातक करावे
तान्हेबाळाचे ॥१४६॥

पाचवी सहावी
करावी आधी पूजा
नको दृष्ट माझ्या
तान्हेबाळा ॥१४७॥

नातू झाला म्हणून
वाटतात पेढे
नातवासाठी वेडे
लोक होती ॥१४८॥

बाळंतिणी बाई
नको येऊ दारा
लागेल तुला वारा
दक्षिणेचा ॥१४९॥

बाळ बाळंतीण
आहेत खुशाल
उषाताईच्या पतीला
भाईराया पत्र घाल ॥१५०॥

चला सखियांनो
हळदी कुंकवाला
माझ्या ग उषाताईला
भाग्याचा पुत्र झाला ॥१५१॥

सोळा सोमवार
केले सतरावा उजवा
रत्नाच्या पालखी
माझ्या बाळाला नीजवा ॥१५२॥

मला हौस मोठी
ताईबाईला पुत्र व्हावा
बाळंतवीडा न्यावा
कडीतोडे ॥१५३॥

मला हौस मोठी
ताईबाईला पुत्री व्हावी
बाळंतवीड्यावरी
जरीची कुंची न्यावी ॥१५४॥

तुम्हा घरी गं कारणे
आम्हा घरी ग बारसं
माझं येणं होतं कसं
शांताबाई ॥१५५॥

देवाघरचे बाळ
आले आकार घेऊन
त्याला ठेवू नाव
सखी पालखी घालून ॥१५६॥

देवाघरचे बाळ
आले सगुण साकार
नाव ठेवा मनोहर
उषाताई ॥१५७॥

सवाष्णींची दाटी
बाळ पालखी घालती
रामकृष्णाच्या म्हणती
पाळण्यांना ॥१५८॥

पालखी घालून
सखीया झोके देती
पाळणे गोड गाती
आंदुळता ॥१५९॥

माझे घर मोठे
केर लोटता लोटेना
सभा बैसली उठेना
गोपू बाळाची ॥१६०॥

माझे घर मोठे
हंडेघंगाळांचे
वडील मामंजींचे
नाव मोठे ॥१६१॥

माझे घर मोठे
धुराचा कोंडमार
कोमेजली सुकुमार
उषाताई ॥१६२॥

माझे घर मोठे
हिंडती दारी गडी
भरली मोठी माडी
पाहुण्यांनी ॥१६३॥

माझे घर मोठे
पन्नास बाहालांचे
पाहुण्याउण्यांचे
वावरण ॥१६४॥

माझे घर मोठे
पन्नास येती जाती
हाती रुपयांची वाटी
गोपू बाळाच्या ॥१६५॥

मोठेमोठे लोक
उठून उभे राहती
लोडाशी जागा देती
माझ्या बाळा ॥१६६॥

मोठे मोठे लोक
सामोरे येतात
स्वागत करितात
माझ्या बाळाचे ॥१६७॥

मोठ मोठे लोक
सरकारे अडविले
एक्या शब्दे सोडविले
माझ्या बाळे ॥१६८॥

कचेरीच्या पुढे
हिरवा कंदील डोलतो
नवा साहेब बोलतो
माझा बाळ ॥१६९॥

कचेरीच्या पुढे
हिरवा कंदील कोणाचा
नवा साहेब पुण्याचा
माझा बाळ ॥१७०॥

कचेरीच्या पुढे
काय गुलाबा तुझी हवा
वास घेणारे गेले गावा
दादाराया ॥१७१॥

बारा बैल वाहाती
एवढा कोण शेती
चार गावाची ग खोती
गोपू बाळाची ॥१७२॥

बारा गं बैलांची
दावण आली घरा
निजला जागा करा
गोपूबाळ ॥१७३॥

बारा बैल वाहाती
बाप्पाजींच्या नांगराला
जिरेसाळ डोंगराला
पेरियेली ॥१७४॥

आवाज मोठा आला
मोठा गाडा घडघडला
खोतीचा गल्ला आला
बाप्पाजींचा ॥१७५॥

बाप्पाजी काकाजी
करा भाताचा व्यापार
मोत्यांचा चंद्रहार
द्यावा मज ॥१७६॥

नाचण्यांनो तुम्ही
कोंकणीचे राजे
त्याने भाई माझे
सावकार ॥१७७॥

नाचण्यांनो तुम्ही
कोंकणीचे गहू
अंतर नका देऊ
भाईरायाला ॥१७८॥

सभेमध्ये ग बसले
उंच पगडी लहानथोर
सभेमध्ये माझे दीर
शोभतात ॥१७९॥

पशाने पायली
सवाईची दिढी झाली
कंठी छातीला भीडली
दादारायांच्या ॥१८०॥

पिकलेला अननस
हिरवा त्याचा देठ
खोतांना आली भेट
अप्पारायांना ॥१८१॥

पाटील पट्टी करी
येतील सचणीला
हिरवी शाल खोतिणीला
अक्काबाई ॥१८२॥

माझ्या ओटीवरी
खोतापाटलांची दाटी
तुमच्या नावासाठी
बाप्पाजी हो ॥१८३॥

हातीच्या अंगठया
कशाने झिजल्या
राशी मोहरांच्या मोजिल्या
गोपूबाळाने ॥१८४॥

माझ्या ओटीवर
चांदीचे गडवे पेले
मैत्र तुझे पाणी प्याले
गोपूबाळा ॥१८५॥

माझ्या ओटीवर
सतरंज्या लोळती
मैत्र तुझे रे खेळती
गोपूबाळा ॥१८६॥

माझ्या ओटीवर
कशाचा केर झाला
जाई मोडून तुरा केला
भाईरायाला ॥१८७॥

माझ्या ओटीवर
कागदाचा केर
लिहिणार सुभेदार
मामाराया ॥१८८॥

माझ्या ओटीवर
कागद किती पाहू
लिहिणार माझे भाऊ
कारभारी ॥१८९॥

अंगात सदरा कोट
पायात कुलपी बूट
तुझ्या चालण्याची ऐट
गोपूबाळा ॥१९०॥

लहानसा कारकून
साहेबाच्या डावीकडे
पहिल्या पगाराचे तोडे
उषाताईला ॥१९१॥

लहानसा कारकून
साहेबांपुढे उभा
तुमच्या स्वारीजोगा
गोपूबाळ ॥१९२॥

लहानसा कारकून
साहेबाला आवडला
पगार वाढविला
गोपूबाळाचा ॥१९३॥

लहानसा कारकून
साहेबाची खुशी
पहिल्या पगाराची ठुशी
उषाताईला ॥१९४॥

लहानसा कारकून
बैसे साहेबाच्या कडे
पहिल्या पगाराचे पेढे
वाटीयले ॥१९५॥

माझ्या अंगणात
बैसलासे हिरा
सखे तुझा ग नवरा
उषाताई ॥१९६॥

कचेरीच्या पुढे
आवळीचे झाड
सावळा सुभेदार
गोपूबाळ ॥१९७॥

दळणीची पाटी
अखंड जात्यावरी
अन्नछत्र तुझ्या घरी
गोपूबाळा ॥१९८॥

कारागिरी टोपी
आली दारावरी
गोपूबाळा पारावरी
मोल करी ॥१९९॥

शेरभर सोने
लेखणीच्या टाका
हिशेब देतो बापा
गोपूबाळ ॥२००॥

मंदिरी सप्ताह
भागवत चाले
बाप्पाजी तेथे गेले
ऐकावया ॥२०१॥

मंदिरी सप्ताह
झालासे आरंभ
मामंजी त्यात दंग
ऐकावया ॥२०२॥

हरदास आले
पुण्याचे वाईचे
अलोट लोकांचे
जाती थवे ॥२०३॥

आले हरदास
राजधानीहून
ऐकाया कीर्तन
संत जाती ॥२०४॥

संत आले गावा
दर्शना चला जाऊ
घरी नका कंथा राहू
सखी सांगे ॥२०५॥

संत आले गावा
चला त्यांची करु सेवा
हेत माझा पुरवावा
एवढा की ॥२०६॥

दागिना मागत्ये
म्हणून म्हणता वेडी
कोण माझी हौस फेडी
तुम्हावीण ॥२०७॥

काळी चंद्रकळा
घेऊन मला द्यावी
हौस माझी पुरवावी
तुम्ही कंथा ॥२०८॥

काळी चंद्रकळा
शोभेल गोर्‍या अंगा
म्हणाल आली रंभा
स्वर्गातून ॥२०९॥

नको हो पैठणी
नको मला शालू शेले
भाळ असो भरलेले
कुंकवाने ॥२१०॥

नको मला बिंदी
नको तो चंद्रहार
पुरे एक अलंकार
मंगळसूत्र ॥२११॥

दागिना मागत्ये
एक आज तुम्हांपाशी
जन्मोजन्मी ठेवा
दासीला या पायापाशी ॥२१२॥

दागिना मागत्ये
कंथा नाही म्हणू नका
पत्नी प्रेमाची भुकेली
नको तिला पैसा रुका ॥२१३॥

दागिना मागत्ये
परस्त्रीला माना माता
कंथा आपण साधू या
संसारात परमार्था ॥२१४॥

देशील रे देवा
देशील ते थोडे
मी मागते रोकडे
हळदीकुंकू ॥२१५॥

पुतळ्यांची माळ
पडते चिर्‍यांवरी
कंथाच्या राज्यावरी
उषाताई ॥२१६॥

आयुष्य मी चिंती
सासुबाईच्या हो नीरी
माझ्या कुंकवाची चिरी
जन्मवेरी ॥२१७॥

देई देवा मज
देशील तितुके पुरे
अक्षय माझे चुडे
जन्मवेरी ॥२१८॥

देई देवा मज
संततीला सोने
विश्रांतीला बाळ तान्हे
मांडीवरी ॥२१९॥

देई देवा मज
हळदीचे तेज
कुंकवाचे राज्य
जन्मवेरी ॥२२०॥

देवाच्या देऊळी
उभी मी जागत्ये
आयुष्य मागत्ये
चुडेयांना ॥२२१॥

माझे हे की चुडे
वज्री घडवीले
साक्ष ठेवियेले
चंद्रसूर्य ॥२२२॥

माझे हे की चुडे
बत्तीस बंदांचे
तेतीस कोटी देवाजींचे
आशीर्वाद ॥२२३॥

चुडेयांच्या बळे
न भी कवणाला
लंकेच्या रावणाला
देईन जाप ॥२२४॥

माझे चुडेयांचे
सोने आहे सुरतेचे
वडिल्यांच्या पालखीचे
दादारायांच्या ॥२२५॥

माझे चुडेयांचे
सोने बरफीची वडी
पारख्यांना शालजोडी
बाप्पाजींना ॥२२६॥

सासुरवाशिणीचे
तोंड दिसे हसतमुख
तिला भ्रताराचे सुख
उषाताईला ॥२२७॥

गळ्यात मंगळसूत्र
गळा दिसे तालेदार
कंथ तुझा सुभेदार
उषाताई ॥२२८॥

काळी गळेसरी
देवाने मला दिली
भूषणासाठी केली
सोनियाची ॥२२९॥

आमच्या वैनीबाई
गंगाबाई कोठे गेल्या
उन्हाने कोमेजल्या
जाईजुई ॥२३०॥

भोळा की भ्रतार
माझ्या उषा ग बाईचा
तिने पिंपळ दारीचा
पूजीयेला ॥२३१॥

शेजी देई फूल
सखी घाली ना केसांत
आपुल्या कंथाच्या
नेऊन देतसे हातात ॥२३२॥

शेजी देई फुल
सजवाया वेणी
नेऊन देतसे
निज कंथाला कामिनी ॥२३३॥

कंथ गं रुसला
कशाने समजवावा
हाताने विडा द्यावा
उषाताई ॥२३४॥

भ्रताराचा राग
दुधासारखा उतू गेला
हसुनी शांत केला
उषाताईने ॥२३५॥

तोंडात तोंड घाली
राघूची लाल चोच
आवडीची मैना तूच
उषाताई ॥२३६॥

तोंडात तोंड घाली
उषाबाई चेडी
आली राघवाची उडी
दादारायांची ॥२३७॥

दादाराया घोड्यावर
वयनीबाई माडीवरी
तेथून खुणा करी
विड्यासाठी ॥२३८॥

तांबडे पागोटे
बांधितो सोडितो
राणीला खुणावितो
दादाराया ॥२३९॥

माडीखाली माडी
माडीखाली झरा
तेथे तोंड धुतो हिरा
उषाताईचा ॥२४०॥

माडीखाली माडी
माडीला चंदन ताटल्या
तबकी तुझ्या पाटल्या
उषाताई ॥२४१॥

माडीखाली माडी
माडीखाली शिडी
पुतळी आहे जाडी
उषाताईची ॥२४२॥

भ्रताराची सेवा
काय करिता चुकली
पाया पडता देखली
उषाताई ॥२४३॥

भ्रताराची सेवा
करावी आदराने
पाय पुशी पदराने
उषाताई ॥२४४॥

भ्रतार पुसतो
कोठे गेली प्रियसखी
मागे उभी हसतमुखी
उषाताई ॥२४५॥

भ्रतार पुसतो
कोठे गेली राणी राधा
हसत मुख सदा
उषाताईचे ॥२४६॥

कंथ विचारितो
राणी वल्लभा कोठे गेली
नंदादीपा तेल घाली
उषाताई ॥२४७॥

कंथाची ग खूण
दोहींच्या मधून
देत्ये सुपारी शोधून
उषाताई ॥२४८॥

चिकणी सुपारी
तुझ्या कंथाला आवड
दिवा घेऊन निवड
उषाताई ॥२४९॥

चिकणी सुपारी
दादारायांना लागली
वारा घालता भागली
उषाताई ॥२५०॥

पाचपानी खाई विडा
त्याची बत्तीशी रंगली
त्याची सुरत चांगली
गोपूबाळाची ॥२५१॥

पाचपानी खाई विडा
डेखापासून लावी चुना
बापापरीस लेक शहाणा
गोपूबाळ ॥२५२॥

रात्रीची चांदणी
जाते कापुराला
विडा देत्ये चतुराला
उषाताई ॥२५३॥

दिवाणाशी जाता
वैरी पाहती तोंडाकडे
माझ्या गं कंथाच्या
विड्याला रंग चढे ॥२५४॥

टिचकी वाजवितो
खिडकी उघडितो
राणीला खुणवितो
गोपूबाळ ॥२५५॥

काळी चंद्रकळा
ठेवून ठेवून नेसावी
कुंकवाची चिरी
माझ्या जन्माला असावी ॥२५६॥

काळी चंद्रकळा
ठेवून ठेवून नेसावी
सार्‍या जन्माला असावी
मायबाई ॥२५७॥

काळी चंद्रकळा
पदरी मोतीजाळी
नेसली सायंकाळी
उषाताई ॥२५८॥

काळी चंद्रकळा
कण्हेरी काठाची
बुधवार पेठेची
आणियेली ॥२५९॥

काळी चंद्रकळा
पदरी रामबाण
नेसली सूर्यपान
उषाताई ॥२६०॥

काळी चंद्रकळा
जशी काजळाची वडी
त्याची आज घडी मोडी
उषाताई ॥२६१॥

काळी चंद्रकळा
ठेवून ठेवून नेसावी
सार्‍या जन्माला पुरवावी
उषाताई ॥२६२॥

काळी चंद्रकळा
नेसता लागे मऊ
भूषणाजोगे भाऊ
राज्यधर ॥२६३॥

काळी चंद्रकळा
कशी नेसू मी एकटी
माझी बहीण धाकुटी
आहे घरी ॥२६४॥

काळी चंद्रकळा
धुऊन धुऊन विटली
नाही हौस ग फीटली
उषाताईची ॥२६५॥

काळी चंद्रकळा
धुऊन धुऊन झाला कचरा
रुपये दिले साडेसतरा
काकारायांनी ॥२६७॥

काळी चंद्रकळा
ठेवीली भुईवरी
रुसली आईवरी
उषाताई ॥२६८॥

काळी चंद्रकळा
ठेविली बाकावरी
रुसली काकावरी
उषाताई ॥२६९॥

काळी चंद्रकळा
ठेवीली दारावरी
रुसली दिरावरी
उषाताई ॥२७०॥

काळी चंद्रकळा
ठेविली जात्यावरी
रुसली आत्यावरी
उषाताई ॥२७१॥

काळी चंद्रकळा
ठेवली खुंटीवरी
रुसली कंथावरी
उषाताई ॥२७२॥

काळी चंद्रकला
ठेवली मापावरी
रुसली बापावरी
उषाताई ॥२७३॥

काळी चंद्रकळा
दोन्ही पदरी रामसीता
नेसली पतिव्रता
उषाताई ॥२७४॥

काळी चंद्रकळा
जसे काजळाचे बोट
घेणाराचे मन मोठं
दादारायांचे ॥२७५॥

काळी चंद्रकळा
जसे रात्रीचे गगन
घेणाराचे मोठे मन
दादारायांचे ॥२७६॥

मला हौस मोठी
जरीच्या पातळाची
पेठ धुंडिली सातार्‍याची
मामारायांनी ॥२७७॥

मला हौस मोठी
गोटापुढे गं तोड्याची
काळी चंद्रकळा
चोळी धोतरजोड्याची ॥२७८॥

गोटपाटल्याची
घडण सातार्‍याची
लाडकी भ्रताराची
उषाताई ॥२७९॥

हाती गोटपाटल्या
मागे पुढे सारी
तापत्या चोळीवरी
बाजूबंद ॥२८०॥

हाती कांकणपाटल्या
जवे दोरे गजरे गोट
सुभेदारिणी तुझा थाट
उषाताई ॥२८१॥

काशीदाची चोळी
अंगी झाली तंग
सखी चवळीची शेंग
उषाताई ॥२८२॥

मोठे मोठे डोळे
हरिणीबाईचे
तसे तुझ्या रे आईचे
गोपुबाळा ॥२८३॥

ठुशाटीकांखाली
सरीबाई तू दोराची
राणी जहागीरदाराची
उषाताई ॥२८४॥

जोडव्या झणत्कार
बिरवल्यांना बारा ठसे
चालताना रुप दिसे
उषाताईचे ॥२८५॥

कशी द्याची चोळी
अंगी की फाटली
सखी सासर्‍या भेटली
उषाताई ॥२८६॥

ठुशापेट्यांखाली
कंठीचे झाले पाणी
मागते तन्मणी
उषाताई ॥२८७॥

ठुशापेट्यांखाली
कंठ्याचे झाले जाळे
मागते तायतळे
उषाताई ॥२८८॥

उठा उठा जाऊबाई
दिवा लावावा तुपाचा
दारी पलंग रुप्याचा
भावोजींचा ॥२८९॥

उठा उठा जाऊबाई
दारी उजाडले
आपल्याला वाण आले
हळदीकुंकू ॥२९०॥

उठा उठा जाऊबाई
रथाचे धरु चाक
शंभरी करु आंख
चुडेयांना ॥२९१॥

उठा उठा जाऊबाई
रथाची धरु दोरी
शंभरी करु पुरी
चुडेयांना ॥२९२॥

सहांच्या पंगतीला
पितांबराचे झळाळ
तूप वाढते वेल्हाळ
उषाताई ॥२९३॥

सहांच्या पंगतीला
कशाला हव्या तिघी
आपण वाढू दोघी
उषाताई ॥२९४॥

सहांच्या पंगतीला
नको भिऊ परातीला
येते तुझ्या संगतीला
उषाताई ॥२९५॥

माझ्या दारावरनं
कोण गेला झपाट्याने
कुसंबी पागोट्याचा
अप्पाराया ॥२९६॥

माझ्या दारावरनं
कोण गेली पातळाची
गळा माळ पुतळ्यांची
उषाताई ॥२९७॥

माझ्या दारावरनं
मुलांचा मेळा गेला
त्यात मी ओळखीला
गोपूबाळ ॥२९८॥

माझ्या दारावरनं
हळदी कुंकवाचा नंदी गेला
खडा मारुन उभा केला
भाईरायांनी ॥२९९॥

पुतळयांची माळ
गोपूबाळाच्या नारीला
सून शोभते गौरीला
अक्काबाईला ॥३००॥

हात भरले अंगठीने
कान भरले कुडक्यांनी
शृंगार केला चुलत्यांनी
उषाताईला ॥३०१॥

मागील दारी आंबा
पुढील दारी चिंच
माडी बांधा उंच
दादाराया ॥३०२॥

दादाराया घर बांधी
वैनीबाई तो बोलेना
तेथे उपाय चालेना
काही केल्या ॥३०३॥

दादाराया घर बांधी
आपुल्या हिंमती
वाडा शोभतो श्रीमंती
थाटमाटे ॥३०४॥

दादाराया घर बांधी
आपुल्या हिंमती
किती पारवे घुमती
माडीवरी ॥३०५॥

माडीवरती माडी
माडीला दहा दारे
बैसुनी घेती वारे
वैनीबाई ॥३०६॥

माडीवरती माडी
माडीला चंदनशिडी
पुतळी केस झाडी
उषाताई ॥३०७॥

माडीवरती माडी
माडीला तक्तपोशी
तबकी तुझी ठुशी
उषाताई ॥३०८॥

मामाराया माडी बांधी
सुतारांना दिला चहा
माडीचा बेत पाहा
वैनीबाई ॥३०९॥

हौशाने हौस केली
जाई लावल्या जिन्यामध्ये
फुले पडती मेण्यामध्ये
देवाजीच्या ॥३१०॥

हौशाने हौस केली
फुले लाविली जिन्यात
फुले पडती ताम्हनात
बाप्पाजींच्या ॥३११॥

हौशाने हौस केली
फुले लाविली दारात
फुले पडती हातात
उषाताईच्या ॥३१२॥

हजाराचा घोडा
त्याला पन्नासाची झूल
वर बसणार
जणू गुलाबाचे फूल ॥३१३॥

हजाराचा घोडा
त्याला विसांचा चाबूक
वर बसणार
फुलावाणी ग नाजूक ॥३१४॥

धुणे धुई रे परीटा
लिंबे घे ताजी ताजी
धोतरजोडा अमदाबादी
गोपाबाळाचा ॥३१५॥

धुणे धुई रे परीटा
धुण्याला काय तोटा
माझ्या गं आप्पारायांचा
रुपयांनी भरला ओटा ॥३१६॥

धुणे धुवी रे परीटा
लिंबू साबण लावी त्याला
नेसणारा भाऊ माझा
अप्पाराया ॥३१७॥

धुणे धुई रे परीटा
इस्तरीची घडी कर
नेसणार सावकार
गोपूबाळ ॥३१८॥

कानीचे कुडूक
हालती वार्‍याने
बोलते तोर्‍याने
उषाताई ॥३१९॥

कानीचे कुडूक
हालती लुटुलुटु
बोलते चुटुचुटु
उषाताई ॥३२०॥

पायी सांखळ्या तोरड्या
पाय भरले चिखलात
लेकी दिल्या कोकणात
बाप्पाजींनी ॥३२१॥

चंद्रहार ग तुटला
टिकल्या झाल्या खोलीभर
पदराने गोळा कर
उषाताई ॥३२२॥

तिन्हीसांजा झाल्या
आले लक्षुमीचे धनी
दिवे लावा खणोखणी
झगमगीत ॥३२३॥

तिन्ही सांजा झाल्या
लक्ष्मीचा डामडौल
बाळराजासाठी
गवळ्याचा वाडा खोल ॥३२४॥

तिन्हीसांजा झाल्या
दिव्यांची जलदी करा
लक्षुमी आली घरा
मोत्यांनी ओटी भरा ॥३२५॥

तिन्हीसांजा झाल्या
दिवा ओसरीबाईला
सोड वासरे गायीला
गोपूबाळा ॥३२६॥

तिन्हीसांजा झाल्या
दिवा लावू कोठे कोठे
चिरेबंदी वाडे मोठे
बाप्पाजींचे ॥३२७॥

तिन्हीसांजा झाल्या
कामाची झाली घाई
गोवारी आणी गायी
रानातून ॥३२८॥

तिन्हीसांजा झाल्या
घालू चुलीत विस्तव
आधी बाळाला निजव
उषाताई ॥३२९॥

तिन्हीसांजा झाल्या
दिवा राईबाई
गवळी बांधी गायी
मथुरेचा ॥३३०॥

तिन्हीसांजा झाल्या
दिव्याला भरवण
वाचिती रामायण
दादाराया ॥३३१॥

तिन्हीसांजा झाल्या
दिवे लावू कोठे कोठे
चौसोपी वाडे मोठे
बाप्पाजींचे ॥३३२॥

लक्षुमीबाई आली
तिन्ही सांजाच्या भरात
कुंकवाचा पुडा
साक्ष ठेवील घरात ॥३३३॥

लक्षुमीबाई आली
तांब्याने दूध घाली
बाळा राजसाच्या
घराला मानवली ॥३३४॥

तिन्हीसांजा झाल्या
गुरांच्या गोंधळी
लक्षुमी पूजिली
तांदुळांनी ॥३३५॥

देणे देवाजीचे
मनुष्याने काय द्यावे
माझ्या गं बाळाला
लक्षुमीचे साह्य व्हावे ॥३३६॥

लक्षुमीबाई आली
शेताचा बांध चढे
हाती गोफण पाया पडे
गोपूबाळ ॥३३७॥

लक्षुमी की आली
पांगळ्या पायांची
बाळाजवळ बोली केली
कधी नाही मी जायाची ॥३३८॥

लक्षुमी चंचळ
हिंडते बाजार
धरिते पदर
गोपूबाळाचा ॥३३९॥

लक्षुमी चंचळ
घर शोधता भागली
माझ्या घरात राहिली
दादारायांच्या ॥३४०॥

लक्षुमी की आली
बैसली ती बाजे
माझे घर तिला साजे
खरोखर ॥३४१॥

लक्षुमी की आली
आली मागील दाराने
धाकट्या बाळाने
बोलविले ॥३४२॥

लक्षुमी की आली
बाळाच्या पायगुणा
भाईरायाच्या शांतपणा
मानवली ॥३४३॥

लक्षुमी की आली
हाती मोहरांचे ताट
पुशी कचेरीची वाट
गोपूबाळाच्या ॥३४४॥

लक्षुमी की आली
आलेली जाऊ नको
धरला पदर सोडू नको
गोपूबाळाचा ॥३४५॥

लक्षुमी की आली
शेताच्या बांधावरी
शेत्या म्हणून हाका मारी
गोपूबालाला ॥३४६॥

वाटेवरलं शेत
जशी हळद लोटली
कोठे लक्षुमी भेटली
गोपूबाळा ॥३४७॥

वाटेवरलं शेत
नका खुडू त्याची पात
धनी आहे हो रागीट
दादाराया ॥३४८॥

वाटेवरलं शेत
नको मोडू त्याची काडी
येते सावकारा गाडी
गोपूबाळाला ॥३४९॥

वाटेवरला आंबा
कोणी ओळंबीला
सखा सासुरवाडी गेला
गोपूबाळ ॥३५०॥

वाटेवरलं घर
आल्या गेल्या गूळपाणी
वडिलाची सून शहाणी
उषाताई ॥३५१॥

वाटेवरलं घर
आल्या गेल्या ताकभात
वडिलांचे नाव राख
गोपूबाळ ॥३५२॥

वाटेवरलं घर
आल्यागेल्याचे माहेर
मिळे मीठ नी भाकर
सर्व लोका ॥३५३॥

भावोजी हो दिरा
माझ्या मनीचे एक करा
दारी बाग पेरा
द्राक्षियांची ॥३५४॥

भावोजी हो दिरा
सांगत होत्ये नानापरी
स्वस्त झाल्या राजापुरी
चंद्रकळा ॥३५५॥

भावोजी दिरांनी
आणिली केतके
मी मागत्ये कौतुके
भावजयी ॥३५६॥

भावोजी हो दिरा
माझ्या मनीचे सांगते
तुमच्यापाशी मी मागत्ये
कुडीजोड ॥३५७॥

भावोजी हो दिरा
माझ्या मनीचे जाणावे
माझ्या वेणीतले आणावे
गंगावन ॥३५८॥

काय मी पुण्य केले
भावासारखा हो दीर
कमळा रघुवीर
पूजियेला ॥३५९॥

काय मी पुण्य केले
बहिणीसारखी नणंद
कमळा गोविंद
पूजियेला ॥३६०॥

काय मी पुण्य केले
आईपरी सासूबाई
कमळी अंबाबाई
पूजेयिली ॥३६१॥

काय मी पुण्य केले
बापासारखा सासरा
कमळी हरिहरा
पूजेयेले ॥३६२॥

काय मी पुण्य केले
बापासारखा सासरा
कमळी सोमेश्वरा
पूजेयेले ॥३६३॥

काय मी पुण्य केले
बापासारखा सासरा
सरीखाली ग दुसरा
चंद्रहार ॥३६४॥

मामंजी सासूबाई
तुम्ही तुळशीची झाडे
आम्ही तुमच्या उजेडे
राज्य करु ॥३६५॥

मामंजी सासूबाई
तुम्ही तुळशीची मुळे
आम्ही परक्याची बाळे
सांभाळा हो ॥३६६॥

लक्षुमी लक्षुमी
हाका मारितो सासरा
तुझ्या कामाचा पसारा
वैनीबाई ॥३६७॥

लक्षुमी लक्षुमी
हाका मारी दीर
काढ ओसरीचा केर
वैनीबाई ॥३६८॥

ब्राह्मण जेवती
उत्तम झाला पाक
पवित्र तुमचा हात
सासूबाई ॥३६९॥

मामंजी म्हणती
धन्य ग सूनबाई
कुळाला कळा येई
तुझ्या गुणे ॥३७०॥

मामंजी म्हणती
धन्य ग सूनबाई
नातू दिला लवलाही
मांडीवरी ॥३७१॥

मामंजी म्हणती
सून ही गुणाची
होती राशी हो पुण्याची
माझ्या बाळाची ॥३७२॥

मामंजी म्हणती
सूनबाई जेव आधी
वाढतो पोटामधी
कुळतंतू ॥३७३॥

मामंजी म्हातारे
रागाने होती लाल
जाईल कोणा जवळ
विस्तवाच्या ॥३७४॥

माहेरा आलीस
नको करु कामधंदा
तुझ्या सांग पुरवीन छंदा
तान्हेबाळी ॥३७५॥

माहेरा आलीस
नको करु काम काही
आता विसावा तू घेई
उषाताई ॥३७६॥

माहेरा आलीस
आता बाळे हास - खेळ
सुखाने नेई वेळ
उषाताई ॥३७७॥

माहेरा आलीस
काय तुझ्यासाठी करु
पिकला आंबा चिरु
उषाताई ॥३७८॥

माहेरा आलीस
सांग तुला देऊ काय
खाई दुधावरची साय
तान्हेबाळा ॥३७९॥

माहेरा आलीस
नीज आता नको उठू
करी बाळे गुरंगुटी
उषाताई ॥३८०॥

माहेरा आलीस
किती गेली स सुकोनी
किती आलीस दिसांनी
तान्हेबाळे ॥३८१॥

माहेरा आलीस
राहावे चार मास
येऊ दे थोडे मास
अंगावरी ॥३८२॥

माहेरी आलीस
तुला सखी काय देऊ
बैंगणी खण घेऊं
उषाताईला ॥३८३॥

दिवाळसणाला
जावई घरी आला
सल्ल्यांचा जोड दिला
बाप्पाजींनी ॥३८४॥

दिवाळसणाला
जावयाला आणा
सखीच्या समाधाना
उषाताईच्या ॥३८५॥

पाहुण्याला पाहुणचार
मेहुण्या मेजवानी
कंथ तुझा समाधानी
उषाताई ॥३८६॥

पाहुण्या पाहुणचार
मेहुण्या बुंदी - लाडू
एक पंक्ती दोघी वाढू
वन्संबाई ॥३८७॥

सावळ्या मेहुण्याचा
पलंग पितळेचा
वर ठसा पुतळीचा
उषाताईचा ॥३८८॥

पाहुण्या पाहूणचार
मेहुण्या बुंदी - लाडू
नका माझी आस मोडू
वैनीबाई ॥३८९॥

माझ्या माहेराला
जशी कोकुळीची वजा
कारभारी मामा तुझा
तान्हेबाळा ॥३९०॥

माझ्या माहेराला
ताटवाट्यांची चळती
जेऊन उठले
माझे भाऊ तुझे पती ॥३९१॥

माझ्या माहेराला
राही सदा उघडे दार
आल्या गेल्या पाहुणचार
होत असे ॥३९२॥

माझ्या माहेराला
नकार नाही कोणा
आला गेला पाहुणा
नित्य आहे ॥३९३॥

माझ्या माहेराची
सांगू मी किती कीर्ती
लाज वाटे सखी
कशी सांगू माझ्या ओठी ॥३९४॥

माझ्या माहेराला
केवढी आंबराई
आंब्यांना तोटा नाही
कधी काळी ॥३९५॥

माझ्या माहेराला
नारळी पोफळी
त्यांची छाया ग दाटली
अंगणात ॥३९६॥

माझ्या माहेराला
नाही कोणा सासुरवास
सूना लेकीच्यापरीस
वागविती ॥३९७॥

पाऊसपाण्याची
धरणीमाय वाट पाहे
तशी मला आस आहे
माहेराची ॥३९८॥

दिवस मावळला
कर्दळी आड झाला
मला माघारा ना आला
माहेरीचा ॥३९९॥

माझ्या माहेराला
डोलते मोठी बाग
वाटेल ते तू माग
वैनीबाई ॥४००॥

माहेरी जाईन
बसेन अंगणी
जशा लवती कामिनी
भावजया ॥४०१॥

अंगणात खेळे
दणाणली माझी आळी
लेकुरवाळी आली
माहेराला ॥४०२॥

जेवण मी जेवी
भाजीभाकरीचे
मायेच्या हातीचे
गोड लागे ॥४०३॥

जेवण मी जेवी
जेवण जेवते पोळीचे
पाणी माहेरच्या गावीचे
गोड लागे ॥४०४॥

माहेरच्या वाटे
मऊ गार हरिक दाटे
सासरल्या वाटे
टोचती कुचकुच काटे ॥४०५॥

जाईन माहेरी
बसेन खांबापाशी
धाकट्या भावापाशी
गुज बोलू ॥४०६॥

जाईन माहेरी
बाप्पाजींच्या घरा
घुसळीन डेरा
अमृताचा ॥४०७॥

जाईन माहेरी
पदर घेईन पुरता
सभे बैसला चुलता
काकाराया ॥४०८॥

जाईन माहेरी
पदर घेईन दोन्ही भुजा
वडिलांपरीस धाक तुझा
काकाराया ॥४०९॥

जाईन माहेरी
बैसेन बाजेवरी
विसावा तुझे घरी
माउलीये ॥४१०॥

जाईन माहेरी
बैसेन मी खाटे
विसावा तुझे घरी
माहेरास ॥४११॥

मजला माघारी
तुजला का न ये
जोडीने जाऊ सये
माहेराला ॥४१२॥

मजला माघारी
मदनाचे घोडे
सदनाचे पुढे
गोपूबाळ ॥४१३॥

काळी चंद्रकळा
धुऊन धुऊन विटली
नाही हौस फिटली
माहेराची ॥४१४॥

दळण मी दळी
हळदीवीण फिक्के
मायेवीण सख्खे
कोणी नाही ॥४१५॥

बाप्पाजींच्या गं बहिणी
नको बोलू तुझे माझे
एक माहेर तुझे माझे
आत्याबाई ॥४१६॥

माहेरीचा देव
कशाने ओळखावा
निशाणी मोती लावा
सोमेश्वराच्या ॥४१७॥

माहेरीचा देव
तुझा माझा एक
पूजा बांधू समाईक
आत्याबाई ॥४१८॥

बाप तो ईश्वर
मायबाई काशी
नंदी आहे पायांपाशी
भाईराया ॥४१९॥

आजोळच्या ओटीवरी
आजीबाई बसे
घराला शोभा दिसे
मामारायांच्या ॥४२०॥

बारीक दळणाच्या
सभेमध्ये गेल्या गोष्टी
घरीची रीत मोठी
मायबाईच्या ॥४२१॥

बारीक दळणाची
भाकरी चवघडी
आठवण घडीघडी
मायबाईची ॥४२२॥

मामेयाच्या घरी
भाची मी पाहुणी
समया लावुनी
थाट केला ॥४२३॥

मामा की हो पुसे
भाची केवढीशी झाली
चुनाडी रंगविली
कमळाबाईला ॥४२४॥

साखरेचा पुडा
मुंग्यांनी फोडीला
तुझ्या मामाने धाडीला
तान्हेबाळा ॥४२५॥

मोगर्‍या फुलांनी
भरले देवघर
पूजीले रघुवीर
बाप्पाजींनी ॥४२६॥

गुलाबाची फुले
शंकर बाळाच्या ओंजळी
त्याची तुला पुष्पांजळी
गणेराया ॥४२७॥

देवांचा देव्हारा
फुलांनी भरला
मंत्रांनी पूजीला
बाप्पाजींनी ॥४२८॥

काशीतले कागद
आले लखोट्याने
वाचीले घोड्यावरी
चंदुबाळाने ॥४२९॥

मामेयाचे घरी
आले उडाउडी
वाचीले घोड्यावरी
मामारायांनी ॥४३०॥

मामेयाचे घरी
भाचे कारभारी
शेले जरतारी
पांघुरती ॥४३१॥

मामेयाचे घरी
भाचे कारकून
वस्त्रे घ्या पारखून
मधुबाळाला ॥४३२॥

बहिणीचे बाळ
मला म्हणे मावशीबाई
उचलुन कडे घेई
लीलाताई ॥४३३॥

शेजारिणीबाई
तुला शेजार चांगला
नाही मला आठवला
मायबाप ॥४३४॥

शेजारिणीबाई
एका दारी दोघी वागू
माझी मैना तुझा राघू
खेळतील ॥४३५॥

शेजारिणीबाई
धन्य तुझ्या शेजारिणी
सय नाही माहेराची
बारा वर्से ॥४३६॥

शेजारिणीबाई
माझी वेणी हो घालावी
आईच्या हातांची
आठवण मज द्यावी ॥४३७॥

शेजीच्या घरी गेल्या
शेजी बोलली रागाने
कोवळे मन माझे
नेत्र भरले पाण्याने ॥४३८॥

शेजीच्या घरी गेल्ये
जाऊ नये जाणे आले
तिच्या बोलण्याने
मन माझे दुखविले ॥४३९॥

शेजीने दिली भाजी
दिली अंगणात
काढी भांडणात
वारंवार ॥४४०॥

शेजरिणीबाई
गर्वाने दाटली
पाने केळीची फाटली
वारियाने ॥४४१॥

शेजारिणीबाई
नको करु गर्व फार
रोज गं बघत्ये
दिव्याखाली अंधकार ॥४४२॥

शेजारिणीबाई
चल जाऊ नदीवर
धुण्याची धुऊ मोट
करु मोकळे अंतर ॥४४३॥

शेजारिणीबाई
तुमचे झाले उपकार
कसे फेडू सांगा
मनी ठेवावा आभार ॥४४४॥

शेजारिणीबाई
घरी का आज सुने
दूर ग देशा गेले
माझे सौभाग्याचे सोने ॥४४५॥

शेजारिणीबाई
आज कसली केली भाजी
आज कसली भाजी
स्वारी गेली स्वारीमाजी ॥४४६॥

शेजीच्या घरी गेल्ये
तिला आला होता ताठा
दुःखाचा माझा वाटा
दैव माझे ॥४४७॥

शेजीच्या घरी गेल्ये
शेजीला झाला गर्व
पराड्मुख होती सर्व
अभागिया ॥४४८॥

शेजारिणीबाई
नको हो मला हसू
येतील तुझ्या आसू
लोचनांना ॥४४९॥

शेजारिणीबाई
गर्वाचे घर खाली
गोष्ट ही कधी काळी
विसरु नको ॥४५०॥

शेजीचे बोलणे
सदा उरफाटे
बोचती माझ्या काटे
काळजाला ॥४५१॥

शेजीचे बोलणे
झोंबले ह्रदया
शेजीला दयामाया
नाही ठावी ॥४५२॥

शेजारिणीबाई
मनी अढी धरु नका
पुन्हा गोड होऊ
एकमेका देऊ सुखा ॥४५३॥

शेजारिणीबाई
माझेच चुकले
आता धरिते पाऊले
सोड राग ॥४५४॥

संक्रांतीचा तिळगूळ
चला देऊ घेऊ
शेजी प्रेमे आपण राहू
सार्‍याजणी ॥४५५॥

तीळ घे गूळ घे
विसर मागील भांडण
शेजी आता हे अंगण
तुझे माझे ॥४५६॥

तीळ घे गूळ घे
आपण विसरु मागचे
शेजी नवीन प्रीतीचे
नाते जोडू ॥४५७॥

तीळ घे गूळ घे
आता विसर मागील
शेजी प्रेमाचे पाऊल
दोघी टाकू ॥४५८॥

माझ्या अंगणात
शेजीचे पाच पुत्र
त्यात माझे मंगळसूत्र
वैनीबाई ॥४५९॥

प्रेमाचा ओलावा
पाहून जवळ गेली
तहान नाही हो भागली
शेजीबाई ॥४६०॥

मैत्रिणीकडे गेल्ये
मैत्रिणीला गर्व भारी
पायांनी पाट सारी
बसावया ॥४६१॥

मैत्रिणीकडे गेल्ये
मैत्रिणीच्या दारा कडी
तिच्या मनामध्ये अढी
राहिलीसे ॥४६२॥

प्रेमाच्या नात्याशी
राहील कशी अढी
चंद्राशी नाही कधी
अंधकार ॥४६३॥

जीवाला माझ्या जड
सांगू मी कोणापाशी
सखी राही दूरदेशी
शांताताई ॥४६४॥

जीवाला माझ्या जड
नका सांगू एकाएकी
घाबरी होईल सखी
शांताताई ॥४६५॥

जीवाला माझ्या जड
नका सांगू मैत्रीणीस
पडले धरणीस
शांताताई ॥४६६॥

जीवाला माझ्या जड
नका सांगू वाटे
सखी गहिवरे दाटे
शांताताई ॥४६७॥

जीवीची मैत्रीण
पडली दूर स्थळी
दृष्टीला नाही पडली
बारा वरसं ॥४६८॥

माझ्या गं मैत्रिणी
आहेत देशादेशी
आषाढी एकादशी
भेटी झाल्या ॥४६९॥

आपण मैत्रिणी
जाऊ ग बारा वाटे
जसे नशिबाचे काटे
फुटतील ॥४७०॥

आपण मैत्रिणी
पुन्हा भेटी कधी
आठवू मनामधी
एकीमेकी ॥४७१॥

वारियांच्या संगे
आपण पाठवू निरोप
पोचेल आपोआप
मैत्रिणीला ॥४७२॥

आपण मैत्रिणी
मनात आठवू
पत्रे ती पाठवू
वार्‍यावरी ॥४७३॥

जिवीची मैत्रीण
देवा खुशाल ठेवावी
सुखात नांदावी
सासर्‍याला ॥४७४॥

माझ्या आयुष्याची
दोरी आहे बळकट
सखी मला कधी भेट
देईल हो ॥४७५॥

माझ्या गं मैत्रिणी
आहेत दहाबारा
एक दिली सुभेदारा
शांताताई ॥४७६॥

माझ्या ग मैत्रिणी
आहेत दोघीतीघी
त्यात माझ्या मनाजोगी
मनुबाई ॥४७७॥

माझ्या गं मैत्रिणी
आहेत वीसतीस
एकीला द्यावा खीस
खोबर्‍याचा ॥४७८॥

माझ्या गं मैत्रिणी
आहेत गोर्‍यागोर्‍या
कपाळी लाल चिर्‍या
कुंकवाच्या ॥४७९॥

माझ्या गं मैत्रिणी
आहेत शंभर
त्यात पहिला नंबर
कमळाताईच ॥४८०॥

माझ्या गं मैत्रिणी
आहेत सात आठ
एकीला द्यावा पाट
बसावया ॥४८१॥

माझ्या गं मैत्रिणी
आहेत किती पाहा
किती देऊ चहा
सांगा तुम्ही ॥४८२॥

गोंडियांची वेणी
मोगर्‍या दाटली
सखी सासर्‍या भेटली
मैनाताई ॥४८३॥

मैत्रिणींच्या मेळ्यामध्ये
चांगली कोण दिसे
हिरवा जी शालू नेसे
शांताबाई ॥४८४॥

मैत्रिणींचा मेळा
वेशी खोळंबला
शृंगार नाही झाला
अजुनी माझा ॥४८५॥

तुझा माझा मैत्रपणा
मैत्रपणा काय देऊ
एका ताटी दोघी जेऊ
मनूबाई ॥४८६॥

तुझा माझा मैत्रपणा
एका घागरीतले पाणी
नको कपट धरु मनी
शांताताई ॥४८७॥

तुझा माझा मैत्रपणा
मैत्रपणा काय देऊ
एक लवंग दोघी खाऊ
मनुबाई ॥४८८॥

तुझा माझा मैत्रपणा
मैत्रपणा काय देऊ
एका घोटे पाणी पिऊ
मनूबाई ॥४८९॥

माझ्या गं मैत्रिणी
साधुसंतांच्या बायका
त्यांच्या मुखीचे आयका
रामनाम ॥४९०॥

मैत्रिणीकडे गेल्ये
मैत्रीण गुंतली कामात
हार गुंफीते रामाला
तुळशीबागेच्या ॥४९१॥

मिळाल्या भेटल्या
गुजाच्या गुजकरणी
लहानपणीच्या मैत्रिणी
ताई माई ॥४९२॥

आपण गूज बोलू
कशाला हवा दिवा
आहे चांदण्याचा हवा
शांताताई ॥४९३॥

तिन्हीसांजा झाल्या
दिव्यातील वात डोले
सखी माझी गोष्ट बोले
ह्रदयातील ॥४९४॥

आपण मैत्रिणी
ये गं बोलू गूज
सुखदुःख तुझं माझं
शांताताई ॥४९५॥

किती ग वरसांनी
भेटलो दोघीजणी
साठले किती मनी
बोलू आता ॥४९६॥

काय तू पुससी
पळसा तीन पाने
संसारी समाधाने
नांदू सखी ॥४९७॥

कधी रागावती
बोलती कधी गोड
मैत्रिणी अशी खोड
कंथा माझ्या ॥४९८॥

रुप ना लावण्य
एक नाही गुण अंगी
संसार त्याच्या संगी
करणे दैवी ॥४९९॥

रुप ना लावण्य
नाही धन ग संपदा
चुरिते परी पदा
उषाताई ॥५००॥

रुप ना लावण्य
सोडीना कधी माडी
करितो नासाडी
जीवनाची ॥५०१॥

रात्र ना दिवस
चंदन वेलीला
विळखा देऊन राहिला
नाग जेवी ॥५०२॥

कधी उजळे पुनव
कधी काळी गं अवस
मैत्रिणी काय सांगू
मिळे सुधा मिळे वीख ॥५०३॥

कधी फुले ग वसंत
तुझी सखी तेव्हा खुले
कधी वैशाख वणवा
हरणी तुझी होरपळे ॥५०४॥

मैत्रिणी काय सांगू
गोड मी करुनी घेत्ये
दिवस रोज नेत्ये
मोजूनीया ॥५०५॥

काय विचारीशी
होते धूसपूस
मैत्रिणी येते घूस
घरा कधी ॥५०६॥

आधणाचे पाणी
त्यात भात शिजविते
रुसवे फुगवे
त्यात सुख पिकविते ॥५०७॥

आधणाचे पाणी
ओतिते विसावण
पतीच्या रागात
मिसळते प्रेमगुण ॥५०८॥

दूध वर येता
पाणियाने खाली जाई
कंथाचा ग राग सखी
हसण्याने नष्ट होई ॥५०९॥

कंथ रागावता सखी
हळू हसून बघत्ये
क्रोधी मुद्रा मोहावते
क्षणामाजी ॥५१०॥

शत गं जन्मांची
पुण्याई आली फळा
माझ्या कुंकवाची कळा
सूर्या सारी ॥५११॥

लाखात एखादा
तसा सखा माझा पती
अनुरक्त परी व्रती
भाग्य माझे ॥५१२॥

पुरविती हौस
मैत्रिणी विचारुन
आम्ही गं नांदतो
दोघे हसून खेळून ॥५१३॥

काय विचारिशी
कधी ना सखी तंटा
जीवेभावे ओवाळीन
प्रेमरंगा माझ्या कंथा ॥५१४॥

काय विचारिशी
आहे हो खरी सुखी
तुझ्या गळ्याची शपथ
कसे खोटे बोलू सखी ॥५१५॥

समुद्राच्या काठी सखी
मोती पोवळ्याच्या वेली
दैवाची उणीव
कडू वेल हाती आली ॥५१६॥

जीवाली देत्ये जीव
जीव देऊ पाहिला
पाण्यात पाषाण
अंती कोरडा राहीला ॥५१७॥

फोडीले चंदन
त्याच्या केल्या बारा फोडी
स्त्रियांची जात वेडी
पुरुषांना माया थोडी ॥५१८॥

सेवेला करित्ये
झटून झिजून
चीज त्याचे करी कोण
मैत्रिणी गे ॥५१९॥

हसेना बोलेना
कोणी सासरी गं मशी
मैत्रिणी जीवासी
कंटाळल्ये ॥५२०॥

गळा घालू गळा
ये ग रडू पोटभरी
पुन्हा जायाचे सासरी
चारा दिशी ॥५२१॥

नको गं रडू गडे
होईल सारे भले
अवसेचे काळे
कोठे राहे ॥५२२॥

नको रडू गडे
होईल तुला सुख
प्रार्थीन गजमुख
तुझ्यासाठी ॥५२३॥

नको रडू गडे
होईल सखी भले
चिखली कमळे
फुलतात ॥५२४॥

नको रडू गडे
जरी वरुन पाषाण
झिरपे आतून
फुटतील ॥५२५॥

मैत्रिणी भेटती
हसती रडती
फिरुन दूर जाती
संसारात ॥५२६॥

मैत्रिणी भेटती
जीवाचे बोलती
फिरुन दूर जाती
संसारात ॥५२७॥

पुत्रनिधनाचे
दुःख दारुण कठीण
बरे त्याहून मरण
माये वाटे ॥५२८॥

अपत्याचा लाभ
त्याहून नाही सुख
आणि त्याचा ग वियोग
त्याच्याहून नाही दुःख ॥५२९॥

नको ग बाळे रडू
किती तू रडशील
पुन्हा ग फुलतील
फुले दारी ॥५३०॥

नको नको रडू
डोळे झाले लाल
होईल पुन्हा बाळ
सावळीये ॥५३१॥

नको नको रडू
धर गे मनी धीर
शोभेल पुन्हा घर
माझ्या बाळे ॥५३२॥

नको नको रडू
रडे आपुले आवर
हा सेल तुझे घर
तान्हेबाळे ॥५३३॥

पुरे हो रडणे
धीर ना सखी सांडी
शोभेल पुन्हा मांडी
तान्हेबाळाने ॥५३४॥

नको नको रडू
पुन्हा कळी गं फुलेल
पुन्हा पाळणा हलेल
तुझ्या घरी ॥५३५॥

नको नको रडू
बघ तू माझ्याकडे
आवरी बाळ रडे
विवेकाने ॥५३६॥

आंबे मोहरती
सारे कुठे गं फळती
फळती तितुके ना पिकती
किती सांगू ॥५३७॥

दूर गं देशीचा
वारा येतो संथ
सुखी आहे तुझा कंथ
मनूबाई ॥५३८॥

निरोप मी धाडी
गोपूबाळाच्या आईला
माझ्या उषाबाईला
सांभाळावी ॥५३९॥

निरोप मी धाडी
शंकरपंतांना कानी सांगा
आठ दिवसांची रजा मागा
उषाताईला ॥५४०॥

सूर्याच्या समोर
माझ्या अक्काबाईचे घर
ओसरीला दार
चंदनाचे ॥५४१॥

जीव माझा गेला
चोळी पातळ दांडीवरी
जीव गेला मांडीवरी
भाईरायाच्या ॥५४२॥

राखी राखी देवा
दिव्यातला दीपक
माझ्या भाईरायाचा एक
गोपूबाळ ॥५४३॥

राखी राखी देवा
दिव्याची की ज्योत
माझ्या भाईरायाची लेक
उषाताई ॥५४४॥

नेसा माझ्या वैनीबाई
हिरवा शालू कमळाचा
कडे पुत्र जावळाचा
चंदूबाळ ॥५४५॥

काय सांगू बाई
भाईरायाचा खोली माचा
किल्ल्या कुलपाचा
दरवाजा ॥५४६॥

सोंगट्या खेळताना
फासे आले हारी
मामा तुझे रे कैवारी
गोपूबाळा ॥५४७॥

देवाचे देऊळी
रुद्रजप पारायण
कंथा तुझा नारायण
उषाताई ॥५४८॥

नाकीची ग नथ
पडली ताकात
मामारायांच्या धाकात
मामीबाई ॥५४९॥

माझ्या घरी गं पाहुणा
मांडा करीन साईचा
आला माझा मामाराया
भाऊ माझ्या गं आईचा ॥५५०॥

माझ्या घरी गं पाहुणी
करीन करंजी सायीची
आली माझी मावशीबाई
बहीण माझ्या गं आईची ॥५५१॥

एका छत्रीखाली
मामाभाचे चौघेजण
धाकुट्याला लिंबलोण
मधुबाळाला ॥५५२॥

धाडा माघारी पाहुणा
साखर - साईचा
भाऊ माझ्या हो आईचा
मामाराया ॥५५३॥

चल शिंगीबाई
तुझी चाल पाणेयाची
वर स्वारी तान्हेयाची
मधुबाळाची ॥५५४॥

नदीपलीकडे
शालूच्या त्या कोण
लेक माझी तुझी सून
सखी दोघ्या ॥५५५॥

पाया पडू आला
भावजयांचा घोळका
त्यात धाकुटी ओळखा
अप्पारायाची ॥५५६॥

पाया पडू आली
आशीर्वाद काय देऊ
जन्मसावित्री पुत्र होऊ
उषाताईला ॥५५७॥

पाया पडू आली
आशीर्वाद काय द्यावा
अक्षयी चुडा व्हावा
उषाताईचा ॥५५८॥

पाया पाडू आली
भाचेसून माझी
राजसा राणी तुझी
गोपूबाळा ॥५५९॥

माझ्या अंगणात
चांदीचे फुलपात्र
संध्येला झाली रात्र
बाप्पाजींच्या ॥५६०॥

मला हौस मोठी
ताईबाईला आणावी
नवी पालखी विणावी
रेशमाची ॥५६१॥

उठा उठा वैनीबाई
दारी उजाडले
आपुल्याला वाण आले
हळदीकुंकू ॥५६२॥

माझ्या दारावरुन
बेलाच्या पाट्या जाती
शंकराची भक्ती मोठी
बाप्पाजींना ॥५६३॥

माझ्या दारावरुन
कोण गेली सवाशीण
काजळकुंकू बाळंतीण
मामीबाई ॥५६४॥

हाती गोटतोडे
मागे पुढे सारित होत्ये
भावांना वाढीत होत्ये
पंचामृत ॥५६५॥

जीवाला देते जीव
प्राणाला होते राजी
सखी माय बहीण तुझी
गोपूबाळा ॥५६६॥

शेवंती फुलली
फुलली पाकळी
निघाला आजोळी
गोपूबाळ ॥५६७॥

मामाच्या रे घरा
नको जाऊ कामावीण
येऊ दे बोलावणं
गोपूबाळा ॥५६८॥

मामाच्या रे घरा
नको जाऊ लडालडा
येऊ दे गाडीघोडा
गोपूबाळा ॥५६९॥

चंदन चंदन
चंदनाची बारा नावे
उंची चंदन मला द्यावे
भाईराया ॥५७०॥

माझ्या अंगणात
कोण बैसली दुलाबाई
वडिलांची वाट पाही
सुधाबाई ॥५७१॥

लगीनसराई
कापडाची महागाई
नेस माझा वैनीबाई
पीतांबर ॥५७२॥

सासूचा सासुरवास
नणंदा तुम्ही हळू बोला
माझा दमून भागून
कंथ बाहेरुनी आला ॥५७३॥

उठा उठा जाऊबाई
दिवे लावा गच्चीवरी
भावोजी हत्तीवरी
घरी आले ॥५७४॥

गावातल्या गावात
उषाताईचे सासरे
गाडीला जुंपिली वासरे
दादारायाने ॥५७५॥

गावातल्या गावात
किती घेशी बोलावणी
अभिमानाच्या बहिणी
उषाताई ॥५७६॥

आधी मूळ धाडा
लांबच्या अक्काबाईला
जवळच्या सखुबाईला
दांडी डोल्या ॥५७७॥

माझ्या घरी ग पाहुणी
जिलबी केली ग साईची
बहीण माझ्या ग आईची
मावशीबाई ॥५७८॥

खाऊ मी धाडीला
बत्तासा रेवडीचा
भाचा माझ्या आवडीचा
मोरुबाळ ॥५७९॥

नदीपलीकडे
कोण ग दिसतं
हाती तांब्याची परात
मावशीबाई ॥५८०॥

गोपूबाळ वसंत बाळ
हे दोघे जोडीचे
शेले चुनाडीचे
पांघुरले ॥५८१॥

शंकर बाळ मोरु बाळ
हे दोघे जोडीचे
माझ्या आवडीचे
दोन हिरे ॥५८२॥

शंकर बाळ मधू बाळ
हे दोघे गडी गडी
जशी भीमार्जुनाची जोडी
घरामध्ये ॥५८३॥

एका छत्रीखाली
कोण ग चालती
मामेयाच्या संगे
भाचे बाहेर निघती ॥५८४॥

गंगूबाई रंगूबाई
या दोघी मावश्याभाच्या
डोकीवरील कुंच्या
रेशमाच्या ॥५८५॥

धाकटी वैनी मोठी वैनी
भांडती कडाकडा
मध्ये साखरेचा खडा
गोपूबाळ ॥५८६॥

धाकटी वैनी मोठी वैनी
जावांचा गं जोडा
कोथिंबीरी चुडा
भरियेला ॥५८७॥

भांडशी भांड गड्या
तुझ्या तोंडाची जाते वाफ
भल्या बापाची मी लेक
नेदी जाप ॥५८८॥

शेजारी भांडतो
करितो हमरी तुमरी
बोले ना उषाताई
थोरामोठ्याची ग नारी ॥५८९॥

सारखरेचे लाडू
वाटेच्या पाहुण्यांना
श्रीधरपंत मेहुण्यांना
एकादशी ॥५९०॥

सावळे मेहुण्यांना
समई नाही दिली
चंद्रज्योत उभा केली
शांताताई ॥५९१॥

मनोहरपंत मेहुणे
आपल्या आईचे बालक
दिली पुतळा ठळक
कमळाताई ॥५९२॥

हाती दौतलेखणी
कलमदानी गोंडे
कारकून हिंडे
बाप्पाजींचा ॥५९३॥

माझे ओटीवर
बुकांचे की ओझे
वकील नाव तुझे
अप्पाराया ॥५९४॥

चौसोपी माझे घर
कितीदा काढू केर
माझे भाग्यवंत दीर
घरी आले ॥५९५॥

माझा नव्हे कोणी
माझ्या बहिणीबाळेचा
हिरा मोहनमाळेचा
गोपूबाळ ॥५९६॥

माझा नव्हे कोणी
माझ्या बहिणीचा होशी
मला मावशी म्हणशी
चंदूबाळ ॥५९७॥

माझ्या गं घरात
सदा येती आप्त इष्ट
माझ्या घराचे अभीष्ट
चिंतितात ॥५९८॥

नदीपलीकडे
कोणाच्या मोर्‍या गायी
आजोबा आजीबाई
दान देती ॥५९९॥

नदीपलीकडे
कोणाची वासरे
तेथे तुझे गं सासरे
उषाताई ॥६००॥

चिठी बरोबर
आंबे द्या पाठवून
त्यात ठेवावे लिहून
उषाताईला ॥६०१॥

लेकी झाल्या लोकी
सुना झाल्या लेकी
हातीचे काम घेती
मायबाईच्या ॥६०२॥

लेकी झाल्या लेकुरवाळ्या
सुनांना आली न्हाणे
दैवाची देते वाणे
अक्काबाई ॥६०३॥

नातवंडे पंतवंडे
भरली ओसरी
दैवाची बैसली
आजीबाई ॥६०४॥

नातवंडांची आजी
पंतवंडांना दूध पाजी
दैवाची आहे माझी
आजीबाई ॥६०५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP