१. श्रीउमाहेमावतीचे व्रत करणार्यांनी घरातील जागा स्वच्छ करावी. रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. उमा हेमावती देवीचे प्रतीक म्हणून लक्ष्मीची तसबिर ठेवावी. तांब्याचा कलश पाणी भरून ठेवावा. कलशाच्या तोंडावर पाच पानांचा आंब्याचा टाळ ठेवावा. त्यावर ताम्हन ठेवावे. त्यात तांदूळ पसरुन त्यावर पिंजरीने स्वस्तिक काढावे. त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी देवीकडे करुन तो ठेवावा. विड्याची पाने उताणी व डेख देवीकडे करुन पाटावर ठेवावी. त्यावर सुपारी ठेवावी. समई डाव्या बाजुस व तुपाचा दिवा (निरंजन) उजव्या बाजुस ठेवावा. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी.
२. सुवासिनीनी डाव्या हाताच्या मनगटाभोवती व पुरुषांनी उजव्या हाताच्या मनगटाभोवती लाल रंगाचा पाच पदरी दोरा गुंडाळावा. प्रत्येक वेळी नवीन नवीन आणू नये.
३. श्री उमाहेमावती देवीचे ध्यान करावे. उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन ताम्हनात सोडावे. गणपती पूजन करावे. पाणी भरलेल्या कलशाला गंध अक्षता लावलेले फुल चिकटवावे. श्री लक्ष्मीच्या तसबिरीवर तुलशीपत्राने पाणी शिंपडावे. गंध, हळदीकुंकू, कुंकू लावून लाल केलेल्या अक्षता वाहाव्या. लाल रंगाची फुले वाहावी. कुंकू लावलेले कापसाचे वस्त्र वाहावे. हळद, कुंकू, काजळ, मणिमंगलसूत्र, बांगड्या अर्पण कराव्या. नमस्कार करावा. निरांजन ओवाळावे. अगरबत्ती, धूप, कापूर पेटवून ओवाळावा. हातात फुल व अक्षता घेऊन ती पुन्हा लक्ष्मीच्या तसबिरीवर व कलशावर वाहावी. दोन विड्याची पाने, त्यावर सुपारी व दक्षिणा देवीसमोर ठेऊन त्यावर पाणी सोडावे. उजव्या हाताने ताम्हनात पाणी सोडून देवीला नमस्कार करावा. चणे, गूळ यांचा नैवेद्य दाखवावा.
४. श्री उमाहेमावतीची व्रतकथा, माहात्म्य वाचावे. 'ॐ महालक्ष्मीश्च विद्महे सर्वसिद्धिश्च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥' हा देवी गायत्री मंत्र म्हणावा.
प्रदक्षिणा घालावी. स्वतःभोवती उजवीकडून फिरावे. प्रदक्षिणा करताना हात जोडलेले असावेत.
श्री उमाहेमावती देवीला साष्टांग नमस्कार करावा. प्रार्थना करावी - माते, आमचे सहपरिवार रक्षण करावे. आमची संकटे दूर करावीत. आम्हाला धनधान्य, आरोग्य, संतती, सुख, यश समाधान लाभो. अशीच आनंदाने आमच्या हातून सेवा करून घ्यावी. माते, आमच्यावर तुमची कृपादृष्टी असू द्यावी. नंतर आपल्या मनातील इच्छा मातेला सांगावी. मागणे मागावे. आरत्या म्हणाव्यात.
५. हरभर्याची डाळ गूळ घालून शिजवलेल्या पुरणाच्या करंजासह वरणभात भाजीचा महानैवेद्य दाखवावा. ३ पळ्या पाणी अर्पण करावे. फुलाला गंधाक्षता लावून ते देवीला अर्पण करावे. नमस्कार करावा. शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही आंबट वस्तु, कोकम, लिंबू, दही, ताक वगैरे जिन्नस जेवणात वापरु नये. स्वतः खाऊ नयेत किंवा दुसर्यास खाऊ घालू नये. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. रात्रौ कुटुंबियासमवेत मिष्टान्न भोजन करावे. उपवास झेपत नसेल तर करु नये.
पूजेचे विसर्जन दुसर्या दिवशी करावे. देवीवर वाहिलेली फुले काढून उत्तरेकडे ठेवावीत. प्रतिके थोडी हालवावी. नारळ, सुपार्या, फुलोरा वाहत्या पाण्यात सोडावा.
६. श्री उमाहेमावती देवी हे लक्ष्मीचेच रुप आहे. तिने अनेक अवतार घेतले आहेत. मातेचा महिमा अगाध आहे. ज्या घरात श्री उमाहेमावती देवीची भक्ति चालते, पूजा आरती होते तिथेच लक्ष्मी निवास करते. त्या घरातील माणसांना ती सुखी करते. ऐश्वर्य वैभव प्राप्त करून देते. शुक्रवार हा शक्तिपूजनाचा वार आहे. शुक्रवार हा श्रीलक्ष्मीचा दिवस आहे.
श्री उमाहेमावतीचे व्रत, उपासना करण्याचा हा दिवस आहे. तेजस्वी व आल्हादकारक अशा शुक्र ग्रहाला प्रसन्न करून घेण्याचा हा दिवस आहे.
हिमकुंदमृणालाभं, दैत्यानां परमं गुरुम् ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं, भार्गवं प्रणमाम्यहम् ॥
हा शुक्राचा मंत्र श्री हेमावतीच्या व्रतपूजा करताना म्हणावा व मागणे मागावे -
हे मृगनंदन शुक्रा, भार्गवा लोकसुंदरा, सर्वशास्त्रप्रवक्ता, तारामंडळमध्यक्षा, दैत्यगुरु, भृगुपुत्रा महीप्रिया, अश्वारुढ मनोव्रजा तुला मी शरण आलो आहे. तू माझ्यावर कृपा कर. मला धनसंपदा प्राप्त करुन दे. माझे मनोरथ पूर्ण होऊ दे. हेच माझे मागणे आहे.
नाट्यकला, नृत्यगायनादि व्यवसाय करणार्यांनीहि शुक्राचा हा मंत्र आपल्या उत्कर्षासाठी म्हणावा. फळ मिळेल.