श्री उमाहेमावती व्रत - माहात्म्य

उमा हेमावती व्रत मनोभावे केल्याने संपत्ती आणि संतती प्राप्त होते.


नमामि उमाहेमावती । सर्व सौभाग्यदायिनी भगवति ॥
सर्वदा सा मम गृहे । भूयात सदा निश्चला ॥
ॐ श्री उमाहेमावती दैव्ये नमः । ॐ श्री गणेशाय नमः ॥
ॐ नमो हेरंबा गणनायका । मंगलमूर्ति सिद्धिविनायका ॥
गौरीनंदन मयुरेश्वरा । तुला माझे नमन ॥१॥
वंदन करतो श्री सरस्वती । विद्यादायिनी वीणावती ॥
विश्वजननी ब्रह्मकुमारी । कृपा करी मजवरी ॥२॥
सद् गुरुला त्रिवार शरण । गुरु मिलिंद माधवाचे स्मरण ॥
मातृपितृ देवतांचे स्तवन । मनोभावे आदरे ॥३॥
कुलदेवतेच मनीं चिंतन । ग्राम, स्थान, वास्तु देवतांचे ध्यान ॥
पंचमहाभूते आणि नवग्रहांचे पूजन । करितो अलंकार भारती ॥४॥
उमाहेमावतीचे व्रत महान । केल्यानें माता होई प्रसन्न ॥
लाभे सुखवैभव धन । मनोरथ करी पूर्ण ॥५॥
उमाहेमावतीचे माहात्म्य । श्रवण पठण करावे नित्य ॥
आणि भक्तिभावे करावे पूजन । कल्याण व्हावे म्हणूनि ॥६॥
व्यासवाल्मिकी ऋषिमुनीजन । साधुसंत आणि विष्णुभगवान ॥
मनी सर्वांना आठवून । हे माहात्म्य रचिले ॥७॥
जिच्या कृपेची अगाध शक्ति । पराशक्ति ती उमाहेमावती ॥
आदिमायेची आद्य प्रकृति । जगन्माता भगवती ॥८॥
शक्तितत्वाचे श्रेष्‍ठ स्वरुप । चैतन्य आनंदाचे स्फूर्ति रुप ॥
देई जय, सुख, धन अमाप । ब्रह्मशक्ति ती जननी ॥९॥
ललिता तू उमाहेमावती । घेतलेस अवतार किती ॥
इंद्रादिसुरगण तुज ध्याती । ऐसी तुझी किर्ती ॥१०॥
पराशक्ति तूं ब्रह्मशक्ति । श्रृतिस्मृतीत तुझी स्तुती ॥
विश्वाची तूं अधिष्‍ठात्री । मंगल मांगल्ये माते ॥११॥
देवांना गर्व झाला फार । माऊलीने घेतला अवतार ॥
देवांसमोर झाली ती प्रगट । उमाहेमावती बनून ॥१२॥
पाहुनि महामाया मातेचा चमत्कार । शरण जाऊनि केला जयजयकार ॥
तुज ऐसी देवी नाही त्रिभुवनी । प्रार्थिले भावे देवांनी ॥१३॥
शंकराने अमरत्वाचा वर दिला । भंडासूर मातुनि उन्मत्त झाला ॥
पृथ्वीवर त्याने धुमाकुळ घातला । पिडिले सर्वांना ॥१४॥
भंडासूर बलाढय निर्दय क्रूर । भयंकर महादुष्‍ट निष्‍ठूर ॥
नष्‍ट करुं लागला सारे सुंदर। जाहला हाहाःकार ॥१५॥
देवांनाहि अतिशय छळलें । धर्मावर संकट कोसळलें ॥
तिन्हीं लोक उध्वस्त केले । अधर्मी असूराने ॥१६॥
असह्य झाला दैत्याचा अत्त्याचार । सकल देव बनले चिंतातुर ॥
पराशक्तिनें घेतला अवतार । ललिता देवीचा ॥१७॥
देवी गेली दैत्यावर धाऊन । केले त्याचे त्वेषाने निर्दालन ॥
अरिष्‍ट केले निवारण । रक्षण केले सर्वांचे ॥१८॥
कैवारी मातेचे कामेश्वरी रुप । तेजःपुंज सुकोमल दिव्य ॥
पराशक्तिचे माहात्म्य अलौकिक । काय वर्णावे ? ॥१९॥
पराशक्तिची सत्ता त्रिजगती । ललितादेवी आदिमाया आद्यशक्ति ॥
ब्रह्ममयी परब्रह्मस्वरुपिणी । तिला साष्‍टांग प्राणिपात ॥२०॥
भक्तवत्सल मातेची करावी भक्ति । घरांत नांदेल सदा सुखशांति ॥
संतति संपत्तिची होईल प्राप्‍ती । लाभेल सत्किर्ती ॥२१॥
पराशक्तिच्या दुसर्‍या अवताराची । कथा सांगतो तिच्या शक्तिची ॥
सर्वश्रेष्‍ठ देवी उमाहेमावतीची । सर्वमान्य तिची श्रेष्‍ठता ॥२२॥
माते तुझी लिला अगम्य अगाध । सर्व देवदैवते तुझ्या आधिन ॥
तूं ज्यांना होशील सदैव प्रसन्न । स्थिरचर दौलत देसी ॥२३॥
दानव सामना करण्यास आले । देव त्यांच्यावर तुटून पडले॥।
घनघोर महायुद्ध सुरु झाले । देवांचे कांही चालेना ॥२४॥
शौर्यशाली ब्रह्मशक्तिच्या कृपेमुळे । जयाचे पारडे देवांकडे झुकले ॥
दानव पराभूत होऊनि पळू लागले । सैरावैरा घाबरुनी ॥२५॥
जयामुळे देवांना आनंद झाला । विजयोत्सव साजरा केला ॥
आम्ही पराक्रमानें यश मिळविले । गर्वाने सांगितले ॥२६॥
हा विजय होता पराशक्तिचा । म्हणजेच त्या ब्रह्मशक्तिचा ॥
पण देव गेले ते विसरुन । विजयाच्या अहंकाराने ॥२७॥
हा विजय आपल्याच शक्तिचा । विक्रमी प्रतापी सामर्थ्याचा ॥
अभिमान त्यांना स्वपराक्रमाचा । बोलले देव घमेंडीत ॥२८॥
ब्रह्मदेवाला नाही ते आवडले । त्याने यक्ष रुप धारण केले ॥
देवांसमोर ते प्रगट झाले । गर्वहरण करण्यांस ॥२९॥
यक्षाला पहाताच अकस्मात देव झाले आश्चर्यचकीत ॥
तर्क करु लागले मनांत । हा कोण, कुठला ? ॥३०॥
अग्नि चौकशीस पुढे गेला । तेव्हा पुढयांत अग्निच्या टाकली ॥
गवताची काडी वाळलेली । यक्षाने झटदिशी ॥३१॥
ती जाळता आली नाही । प्रचंड प्रयत्‍न करुनही ॥
खजील होऊनि परतला अग्नि । यक्ष हसला तत्क्षणी ॥३२॥
नंतर धाडले वायुला इंद्रानें । त्यालाहि ती हालविता आली नाहीं ॥
तेव्हां क्रोधायमान बनुनी । इंद्र पुढे सरसावला ॥३३॥
यक्ष गुप्‍त झाला त्याच ठिकाणीं । प्रगटली उमाहेमावती विश्वव्यापिनी ॥
पुष्पवृष्‍टी झाली दिशादिशातुनी । चमत्कार झाला ॥३४॥
लीन झाले मातेच्या चरणीं । इंद्र वायु अग्नि सुरगणहि ॥
जननीचे दिव्य तेज पाहुनी । संतोषलें मनीं ॥३५॥
मातेने देवांना स्पष्‍टपणे सांगितले । तुमचे किती सामर्थ्य हे मी पाहिले ॥
अग्नि, वायु यांचे कसे हसे झाले । तुम्हांलाहि ते कळले ॥३६॥
विश्वात जे जे घडते । त्यामागे माझीच शक्ति असते ।
म्हणून माझे रुप उमाहेमावतीचे । ध्यांनात ठेवावे ॥३७॥
माझ्या रुपाचे शुक्रवारी करतील जे गुणगान । ते बनतील शक्तिमान सर्व सुखसंपन्न ॥
त्यांच्यावर विजयालक्ष्मीची कृपा होऊन । मिळेल ऐश्वर्य धन ॥३८॥
भक्तांवर मी अखंड छाया धरीन । त्यांचे इच्छित पूर्ण करीन ॥
त्यांना यश जय संपदा देईन । सदैव रक्षीन ॥३९॥
ऐकूनी देवीचे अमृत वचन । देवांनी केले मातेचे पूजन ॥
आशिर्वाद दिला प्रसन्न होऊन । आनंदाने देवाना ॥४०॥
उमाहेमावतीचे व्रत जे करती । मातेचे कृपाछत्र तया लाभती ॥
आनंद, सुख, समृद्धि प्राप्‍त होती । करावी तिची भक्ति ॥४१॥
उमाहेमावतीभक्तांवर दया करी । संकट निवारुनी सुखी करी ॥
म्हणून मातेचे व्रत करावे शुक्रवारी । हा वार लक्ष्मीचा ॥४२॥
शक्तिपूजनाचा हा वार । शुक्रवार असे मैत्रवार ॥
या दिवशी उपासना करावी. देवी भक्तांनी ॥४३॥
वैभवलक्ष्मी, संतोषी, उमाहेमावती । यांचे व्रत करावे शुक्रवारी ॥
उन्नती, उत्कर्षाचा लाभासाठीं । श्रद्धेने भक्तजनानीं ॥४४॥
या व्रताने लक्ष्मी घरी येते । सुखशांति धनसंपत्ती लाभते ॥
दिर्घायुषी संतती होते । मनासारखे घडते ॥४५॥
उमाहेमावतीचे व्रत शुक्रवारी । मनोभावे जी सुवासिनी करी ॥
तिचे सौभाग्यरक्षण होई । सौभाग्यसंवर्धनहि ॥४६॥
श्रीमंती घरी आल्यावर । मातून-गर्व करु नये ॥
माउलीला विसरु नये । माहात्म्य हे वाचावे ॥४७॥
ठेवावे चित्त शांत । रहावे शुद्ध व्रतस्थ ॥
दर शुक्रवारी चैत्रात । अथवा अन्य मासात ॥४८॥
उमाहेमावतीचे प्रतिक म्हणून । महालक्ष्मीची तसबिर ठेऊन ॥
आणि घटाचे करावे पूजन । व्रताच्या दिवशी ॥४९॥
कलशात एक सुपारी टाकून । तो भरावा पाण्याने पूर्ण ॥
आंब्याचा पांच पानांचा टाळ । ठेवावा कलशांत ॥५०॥
त्यावर ठेवावे ताम्हन । ठेवावे त्यात तांदूळ पसरुन ॥
स्वस्तिक पिंजरीने काढावे । त्या तांदळांवर ॥५१॥
नारळ ठेवावा त्यावरी । अथवा एक सुपारी ॥
कलश मांडावा पाटावरी । काढावी रांगोळी सभोवती ॥५२॥
भगिनीनी डाव्या मनगटाभोवती । पुरुषांनी तो उजव्या हाती ॥
लाल रंगाचा दोरा गुंडाळावा । पूजाविधी संपेपर्यंत ॥५३॥
"श्री उमाहेमावती देव्यै नमः म्हणून । पंचोपचारे करावे पूजन ॥
दूध चणे गुळ ठेऊन । महानैवेद्य दाखवावा ॥५४॥
माहात्म्य आणि कथा वाचावी । मातेची आरती म्हणावी ॥
भक्तिभावे प्रार्थना करावी । इच्छा मनीची सांगावी ॥५५॥
ललितापंचमीच्या आठ व्रतांचे । हे व्रत केल्यानें पुण्य लाभते ॥
देवी मातेचे घरी वास्तव्य होते । इच्छापूर्ती होतसे ॥५६॥
लग्नार्थी कुमारीकांनी । उमाहेमावतीचे स्मरण करुनी ॥
निरंजन समोर पेटवून । हे माहात्म्य वाचावे ॥५७॥
मातेच्या कृपाप्रसादानें । लग्नाचा योग येईल जुळून ॥
नांदू लागेल सासरी सुखानें । अलंकार भारती म्हणे ॥५८॥
धनधान्यवृद्धि, ऐश्वर्यवृद्धि । व्यापार्‍यांची होते व्यापारवृद्धि ॥
विद्यार्थ्यांची होई प्रगती । अभ्यास चांगला केल्यास ॥५९॥
मातेचा महानैवेद्य कालवून । शेतकर्‍यानें शेतात शिपडल्यास ॥
भरपूर पिकाचे उत्पन्न लाभेल । मातेच्या आशिर्वादे ॥६०॥
जीवनात सुखानंद येईल । आर्थिक प्राप्‍ती वाढेल ॥
कामगार नोकरवर्गाची । हे व्रत केल्यानें ॥६१॥
शुक्र ग्रह अनिष्‍ठ असल्यासहि । दैत्यगुरु तो प्रसन्न करावयासी ॥
सर्व सुखे इच्छित मिळावयासी । उमाहेमावती व्रत करावे ॥६२॥
एका सुवासिनीला बोलावून । खणानारळानें तिची ओटी भरून ॥
उमाहेमावती माता समजून । नमस्कार करावा ॥६३॥
व्रताचे उद्यापन केल्यावरहि । पुढे प्रत्येक शुक्रवारी ॥
उमाहेमावती ही पोथी । नित्यनेमे वाचावी ॥६४॥
उमाहेमावतीचे गुणगान । मातेच्या व्रताचे महिमान ॥
अलंकार भारतीनें केले कथन । तिच्याच इच्छेनें ॥६५॥
तूं महामाया जगन्माते । विविधरुपे विराजते ॥
कामेश्वरी ललिता देवते । श्री लक्ष्मी नमोऽस्तुते ॥६६॥
विश्वाकार विश्वरुपणी । त्रैलोक्याची तु जननी ॥
मागणे माझे तुझ्या चरणी घडो तुझीच भक्ति ॥६७॥
कृपा करावी एकच माते । मी तुझे लेकरु जाईन जिथे ॥
तूं असावीस उभी तिथे । माझ्या संरक्षणास ॥६८॥
परमेश्वरी दानशील जनवंदिते । तूं आहेस लक्ष्मी रुप देवते ॥
प्रसन्न होऊन ऐश्वर्य दे आम्हांते । करुणामयी माते ॥६९॥
तूं देवांची ज्ञानलक्ष्मी । मानवांची धनलक्ष्मी ॥
रांजांची प्रतापलक्ष्मी । श्रद्धालक्ष्मी भक्तांची ॥७०॥
साधकांची वैराग्यलक्ष्मी । सिद्धांची शांतिलक्ष्मी ॥
संतांची आनंदलक्ष्मी । अनेकांची आराध्यदेवता ॥७१॥
तूंच त्र्यंबकागौरी ब्रह्माणी । वरदायिनी सर्वसिद्धि प्रदायिनी ॥
कमलजा सिंधुजा पदम्‌मालिनी । तुझी नांवे अनंत ॥७२॥
तुजला ध्याती जे ध्यानी त्यांचा भाग्योदय करिसी । तुझा आदर जे करती त्यांना प्रसन्नता देसी ॥
माया ममतेनें भक्तांच्या हांकेला धाऊनीया जासी । अघटीत तुझ्या लिला ॥७३॥
उमाहेमावती मनी आठवा । हा ग्रंथ आदरे पठण करा ॥
माता इष्‍ट कामना पूर्ण करील । श्रीमंती येईल ॥७४॥
या ग्रंथाचे जे करतील श्रवण पठण । उमाहेमावतीचे त्यांना वरदान ॥
ते बनतील कीर्तीमान धनवान । म्हणे अलंकार भारती ॥७५॥
असो.शालिवाहन शके १९१५ वर्षी । चैत्र मासी शुक्ल पक्षी ॥
शनिवार विनायक चतुर्थी । ग्रंथ पूर्ण झाला हा ॥७६॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
शुभं भवतु ( कवि-अलंकार भारती ) कृत उमाहेमावती व्रतमाहात्म्य संपूर्ण ॥ॐ॥

ॐ श्री उमाहेमावती देव्यै नमः ।
ॐ र्‍हीं. श्रीलक्ष्मीभ्यो नमः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP