स्त्रीधन - तुळस

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

आपलें सौभाग्य अखंड टिकावें, आपल्याला चांगला नवरा मिळावा, आपल्या मुलाबाळांचें आयुष्य उदंड व्हावें, आपलें घर खातेंपितें व्हावें, घरांत लक्ष्मी नांदावी आणि एकट्या तुळशीला केलेला नमस्कार चुकल्या देवांना पोचावा, या भोळ्या भावनेनें बायका तुळशीची पूजा नित्य नियमानें करीत असतात.
रोज सकाळीं उठावें, अंगण झाडून काढावें, सडा शिंपावा, रांगोळी घालावी आणि स्नान करून तुळशीला पाणी घालीत तिची पूजा करावी, असा बहुतेक प्रत्येक सामान्य स्त्रीचा रोजचा अगदीं ठरलेला कार्यक्रम असतो त्यांत खंड म्हणून सहसा नाहीं ! तुळशीची मंजिरी डोळ्याला लावायची आणि तिच्या पानावरून खालीं ओघळणारें पाणी प्यावयाचें, या शुभ गोष्टी मानून बायका आवर्जून त्यांचा वापर करीत असतात.
एखादी मुलगी तुळशीला पाणी घालायला लागली म्हणजे मग वडीलधारी बाई गंमतीनें पुटपुटते, 'मेला कुठं बसलाय कुणाला माहीत ? चांगल्या पायानं येऊं दे मजी बास !' जणुं उत्तम नवरा मिळवावा एवढाच तुळशीपूजेमागचा त्या मुलीचा हेतु असतो !
संत बहिणाबाईनें या तुळशी महात्म्याची थोरवी अशी गाइली आहे
जेथ आहे तुलसीचें पान
तेथ वसे नारायण
म्हणजे तिच्यासारख्या विचारी बाईला देखील तुळशीचें पान आहे तिथें नारायणाचें, परमेश्वरचें, अस्तित्व असल्याची जाणीव झाली ! मग सामान्य बाईला तसें वाटलें तर नवल नाहीं !
तुळशीची रोजची पूजा करतांना खेडोंपाडींच्या बायका मोठ्या भक्तिभावानें म्हणतात-
"गेलीवती तुळशीपशीं, तितं हुता ऋषीकेशी, आनीक माजा नमस्कार पोचूंदे देवा पांडुरंगाशीं."
इथें तुळशीच्या ठिकाणीं भगवान् श्रीकृष्णाचें वास्तव्य या बायकांना आढळलें आणि म्हणून त्यांनीं कृष्णाचाच नवा अवतार घेतलेल्या विठ्ठलाला त्याच्या करवीं नमस्कार धाडण्याचें धाडस केलें आहे !
"कुंकूंवान, कुंकूंपान कुंकवाचं नेसनं. अर्धांगी बसनं. सून स्वभावती लेक कमलावती, माजा नमस्कार ईश्वर पार्वती."
या ठिकाणीं सुनालेकींच्या चांगुलपणाबरोबरच सौभाग्याच्या लेण्याचा-कुंकवाचा अभिमानानें उल्लेख आला असून, अशा वैभवामध्यें असलेल्या माझा नमस्कार शंकरपार्वतीला असूं दे असा विश्वास व्यक्त केलेला आहे. भोळ्या मनानें प्रकट केलेला हा विश्वास जुन्या काळांतील सुखी एकत्र कुटुंबाचा आणि पतिव्रत्याचा अभिमान बाळगणार्‍या स्त्रीचा नमुना म्हणून पहाण्यासारखा आहे.
"तुळशी ग बाळ, तुजं अमृताचं जाळं, रामानं आनली, लक्षुमनानी लावली, सीताबाईनं जोपा केली, सोन्याचा करंड, रुप्याचं झांकण आनीक माजी सेवा तुला बाई केली कृष्णार्पण."
या पूजेमध्यें तुळशीची आत्मकथा व तिच्या बद्दलचा भोळा भाव प्रकट केलेला आहे. पतिव्रता सीतामाईच्या रामानें तुळशीला आणली, लक्ष्मणानें लावली व सीतेनें तिला वाढविली. एवढी तिची थोरवी आणि पावित्र्य आहे, अशी इथें आलेली कल्पना तुळशीचें माहात्म्य केवढें मोठें आहे तें सांगते आहे. तुळस म्हणजे जणुं अमृताचें जाळें ही इथें सांगितलेली भावना मोठी ह्रद्य आहे. अमृत म्हणजे मेलेल्याला जिवंत करणारी पवित्र वस्तु. त्याचें वास्तव्य तुळशीच्या ठिकाणीं म्हणजे तीहि परम पवित्र !
सोन्याच्या करंड्याची या गीतांत आलेली माहिती वैभवाबरोबरच सौभाग्याचाहि उल्लेख करीत आहे. त्याचप्रमाणें या ठिकाणीं शेवटीं आपली सेवा कृष्णाला-भगवान नारायणाला-अर्पण केली असें जें म्हटलें आहे, त्यावरूनहि तुळशीचें माहात्म्य अधिक गौरविलें गेलें आहे, यांत शंका नाहीं.
तुळशी बाईला            कोन न्हाई नातं गोतं
काळ्या मातीवर            हिचीं उगवलीं रोपं
तुळशी ग बाई            नको हिंडूं रानींवनीं
पैस ग माजा वाडा            जागा देतें ब्रींदावनीं
तुळशीला कोणीं नात्यागोत्याचें नसल्या कारणानें तिनें रानींवनीं न फिरतां आणि वाटेल तिथें पाय रोवून न बसतां माझ्या ऐसपैस अशा मोठ्या वाड्यांतील वृंदावनांत तिनें रहावें, अशी विनंति या गीतांत तुळशीला कुणीं तरी केली आहे !
तुळशीचें झाड हें काळ्या मातीत कुठेंहि उगवतें अशी त्याची असलेली ख्याति देखील इथें प्रकट झाली आहे.
तुळशीला आपल्या घरच्या वृंदावनांत रहाण्याची केलेली इथली विनंति फारच चित्तवेधक तशीच आपुलकीचीहि आहे.
तुळशीची सेवा            कोण करीतो जनांत
                    पुत्र मागीतो मनांत
तुळशीची सेवा            कोन करीतो दुपारीं
                    सका पुत्राचा भिकारी
या ओव्यांमध्यें 'मला पुत्र होऊं दे' म्हणून तुळशीकडे मागणी करून तिची पूजा करणार्‍या पुरुष भक्ताची इच्छा व्यक्त झाली आहे. बायका मंडळी तुळशीची पूजा नेहमी सकाळीं करीत असतात, परंतु पुरुषांनीं दुपारच्या वेळीं ती केल्यानें इथें निराळा भाव प्रकट झालेला आहे !
सकाळीं उठूनी            तोंड पाहिलं एकीचं
दारीं वृंदावन                झाड तुळशी सखीचं
सकाळच्या प्रहरीं उठल्याबरोबर दारीं असलेल्या वृंदावनांतील तुळशीबाईंचें दर्शन प्रथम घडलें असल्याची हकीकत ही ओवी सांगते आहे. तुळशीला इथें मैत्रिण म्हटलें असून बायका खरोखरच अतिशय गोडीगुलाबीनें व जिव्हाळ्यानें तिच्याशी वागतांना दिसून येतात. सकाळीं ज्याचें तोंड पहावयाचें त्याच्या दर्शनाप्रमाणें दिवस जातो, अशी आपली एक भोळी समजूत आहे. त्यामुळें चांगलें माणूसच प्रथम भेटावें म्हणून माणसाची मोठी धडपड चाललेली असते. म्हणून सर्वांत प्रथम तुळशीचें दर्शन घडल्यानें आनंद झाल्याची गोष्ट इथें सूचित केली आहे.
तुळशीला घाली पाणी        हात पुरना नेणतीचा
लाडकी मैना बाई            जोडा मागें प्रीतीचा
तुळशीला घाली पाणी        ह्या ग तुळशीला आलं गोंड
लाडक्या भैनाईला            पतिव्रताला राज दंडं
तुळशीला घाली पाणी        तुळस वाड्याच्यावर गेली
माज्या ग लाडकीनं            पतिवर्तानं जोपा केली
तुळशीला घाली पाणी        तिथं सोन्याची चंबू झारी
आंगुळीला गेले का ग        देव मारुती बरमचारी
तुळशीला घाली पाणी        हात पुरना ब्रिंदावनीं
ताईता बंधु राया            बांध पायरी सरावनीं
तुळशीला घाली पाणी        तुळस झालीया झपायीळ
माजा ग बाळराज            पाणी घालीतो गोपाईळ
तुळशीला घाली पाणी        बाई तुळशी खालीं झरा
बया माज्या मालणीचा        पतिवर्ताचा नेम खरा
तुळशीला पाणी घातले असतांना कोणाचें भाग्य कसें उजळतें याची मोठी सुंदर हकीकत या गीतांत आलेली आहे.
लहानग्या बाळीचा तुळशीला पाणी घालायला हात पुरेना तेव्हां देवानें मनांत राग न धरतां तिला चांगला नवरा मिळवून द्यावा, अशी इथें केलेली सूचना मोठी देखणी आहे. त्याचप्रमाणें हा हात पुरावा म्हणून भावाला श्रावणांत तुळशी वृंदावनाला पायर्‍या बांधायला केलेली विनंति देखील विशेष आपुलकीची व भक्तिभावानें प्रेरित झालेली आहे.
तुळशीच्या झाडाखाली पाण्याचा झरा निर्माण होण्याचें कारण म्हणून आईनें पातिव्रत्याची नित्यनियमानें तुळशीला पाणी घालून केलेली जोपासना, ही इथें व्यक्त झालेली कल्पना ह्रदयंगम आहे. त्याचबरोबर तुळशीला पाणी घातल्याकारणानें पतिव्रतेला शोभा येणें व तिच्यावर खूष होऊन तुळस वाढीला लागणें अशी इथें सांगितलेली कल्पनाहि विशेष अभिनव व श्रद्धाळू आहे.
रोज पाणी घालून तुळशीचें खोड तुळीसारखें व्हावयाचें व त्यामुळें बहिणीचें घरावर माळी (माडी) बांधावयाची सूचना पुढें यावयाची, अशी या गीतांत आलेली कल्पना मोठी गमतीची आहे.
मारुतीसारख्या ब्रह्मचार्‍याने देखील सोन्याची चंबू झारी घेऊन तुळशीला पाणी घातलें, अशी माहिती देतांना इथें निष्काम भक्तीनें वाढणारें तुळशीमाहात्म्य सांगितलेलें आहे. त्याच प्रमाणें मुलानें पाणी घातलें तरीहि तुळस झपाट्यानें वाढल्याचें सांगतांन, तुळशी-पूजा ही स्त्रियांच्या प्रमाणेंच पुरुषांनाहि प्रिय असल्याची खूणगांठ उकलून दाखविलेली आहे.
तुळशी बाईची ग            कुनीं मस्करी बाई केली
देवा माज्या गोविंदानं        तिची मंजूळा हालवीली
तुळशीची मंजिरी हालली तेव्हां गोविंदानें (कृष्णानें) तिची थट्टा मस्करी केली असली पाहिजे, असा तुळशीबद्दलचा विनोदी उल्लेख इथें आलेला आहे. देवादिकांना मानवी रूप देऊन मनांतील भाव व्यक्त करण्याचा हा प्रकार लोकगीतांत वारंवार आलेला दिसून येतो.
ती ग माजी ग ओवी पहिली    बाई तुळशीला घाली ओटा
त्या ग तुळशीचं नांव घेतां        बाई पाप पळाल चारी वाटां
ती ग माजी ग ओवी दुसरी    बाई तुळशीला घाली आळं
त्या ग तुळशीचं नांव घेतां        बाई पाप पळालं रानोमाळ
ती ग माजी ग ओवी तिसरी    बाई तुळशीचं लावी रोप
त्या ग तुळशीचं नांव घेतां        बाई पाप पळालं आपोआप
ती ग माजी ग ओवी चवथी    बाई तुळशीला घाली पाणी        
त्या ग तुळशीचं नांव घेतां        बाई झाली पातकाची धनी
ती ग माजी ग ओवी पांचवी    बाई तुळशीला लावी कुंकूं
त्या ग तुळशीचं नांव घेतां        आला वैकुंठीचा नायकू
ती ग माजी ग ओवी सहावी    बाई तुळशीला लावी बुक्का
सावलींत ग तिच्या बाई        झोप घेतो ग माझा तुका
ती ग माजी ग ओवी सातवी    नित तुळशीला दावी बोणं
त्या ग तुळशीचं नांव घेतां        धनदौलतेला काय उणं
तुळशीमाई एवढी पवित्र कीं तिचें नांव घेतांक्षणीं पापाचा नायनाट होतो आणि माणूस पुण्यशील होतो अशी चित्तवेधक माहिती या गीतांनीं दिलेली आहे. हा श्रद्धेचा विशेष भाग आहे. त्या श्रद्धेमुळें निर्माण झालेल्या निष्ठेचें हें फळ आहे.
तुळशीचें रोप लावणें, तिला आळे तयार करणें, तिचा ओटा बांधणें इत्यादि या क्रिया करीत असतांना पापाची हाकालपट्टी कशी होते हें त्या त्या क्रियेनुसार वेग दाखवीत आविष्कृत केल्यानें ही श्रद्धा इथें ह्रदयस्पर्शी झालेली आहे. प्रत्यक्ष तुळस ही माणसाच्या पापाची धनीण होते अशी इथें आलेली भावना या श्रद्धेवर चढलेला यशस्वी कळस आहे !
कुंकू लावल्यानें तुळशीबाईमध्यें वैकुंठीच्या नायकाचें स्वरूप दिसूं लागतें अशी या गीतांत आलेली कल्पनाहि विशेष अद्‌भुत चमत्कार दाखविणारी व ह्रद्य झाली आहे.
तुळशीला बुक्का लावल्यामुळें तिच्या ठायीं तुकोबाराय झोप घेत असल्याची इथें सांगितलेली कल्पना माणसाच्या मनांत तुळशी माहात्म्याची भव्यता आणखी निर्माण करीत आहे.
तुळशीला नैवेद्य ( बोणें ) दिल्या कारणानें घरांत धनसंपत्तीला कांहीहि उणें नसल्याचा इथें व्यक्त झालेला मनाचा मोठेपणा भोळ्या भाबड्या भक्तीचा द्योतक आहे.
ओळीनें सात ओव्या गात तुळशीची केलेली ही भावनात्मक पूजा मोठी ह्रदयंगम तर आहेच, पण प्रामाणिकपणानें देवाजवळ व्यक्त झालेली खाजगी भावना किती उच्च कोटीची असूं शकते, याची निदर्शक म्हणूनहि पहाण्यासारखी आहे.
पहिली माझी ओवी            रामाला गाइली
विष्णूच्या पदावरी            लक्ष तुळस वाहिली
पहिली माझी ओवी            पहिला माझा नेम
पोथी वाचीतो ग            सखा तुळशीखालीं राम
तुळशीला घाली पाणी        मागं फिरून मारुतीला
सावळ्या बाळराजा            दुरडी बेलाची म्हादेवाला
सकाळच्या ग पारीं            दार उघडीतें नीट
तुळशीकडेनं माजी वाट        राम वाचीतो हरीपाठ
तुळशीच्या पूजेमुळें इतर देवादिकांच्या सहवासांत तिचें असलेलें स्थान भोळ्या मनाला कसें दिसूं शकतें, याचा या गीतांनीं एक आदर्श नमुना दाखविलेला आहे. त्याचबरोबर तिला घेऊन इतर देवांचीहि पूजा करणें कसें शक्य होतें अगर ती कशी केली जातें, हेंहि यावरून दिसून येईल.
तुळशीची पूजा या प्रकारें लोकगीतांचें माध्यम पत्करून आमच्या खेडूत स्त्रियांनी आज कितीक वर्षे केलेली आहे. या पूजेचे असे आणखीहि कांहीं प्रकार असूं शकतील. पण सर्व प्रकार अशाच श्रद्धेनें नटलेले व भोळ्या भावनेनें माखलेले असणार.
एकाच ठिकाणीं सर्व देवादिकांचे दर्शन घडविणार्‍या तुळशीदेवीची ही दुनिया आणि कर्तबगारी सामान्य मनाला विलक्षण भुरळ पाडणारी आहे. त्याचप्रमाणें सुशिक्षित विचारी मनालाहि मानसशास्त्राच्या दृष्टीनें अभ्यासपूर्वक विचार करायला लावणारी आहे, यांत शंका नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP