राय शिखिध्वज राणी नाम चुडाला सती करी राज्य ॥
प्रतिपाळिती प्रजेला; धर्मानें चालवीत साम्राज्य ॥१॥
एके दिनीं सहज ये सदनीं ज्ञानी कुणी मुनीराज ॥
सत्कारिलें तयासी; वदला “जी भाग्य आमुचें आज” ॥२॥
“धन्य सुदिन, जन्म सफळ, दर्शन घडलें म्हणोनिया, स्वामी ॥
बोधावें परमार्था स्वरूपाचें ज्ञान; प्रार्थितों आम्हीं” ॥३॥
उपदेशिलें मुनीनें वेद महावाक्य चार दोघांला ॥
झाली पूर्ण चुडाला, राजा परि कोरडाच तो ठेला ॥४॥
पूर्ण समाधानानें, पूर्वीहुनि टवटवीत ती राणी ॥
झाली नक्षत्रासम; आलें तारुण्य तीस वृद्धपणीं ॥५॥
एके रात्रीं राजा तीस विचारी “असें कसें झालें ?”॥
तुज काय प्राप्त झालें ? ज्यानें सगळेंच रूप पालटलें ॥६॥
विषयविरक्ती पूर्वी; तुजला, आतां कसा रुचे विषय ?” ॥
“विषयासि रूप कैचें भिन्न ?” चुडाला वदे, “पतीराय” ॥७॥
“जें जें असे दिसे तें, केवळ परिपूर्ण सच्चिदानंद ॥
नच नामरूप त्यातें कोठुनि मग आणिली विषयब्याद ?” ॥८॥
रज्जू ठायिं असावा सर्प तरी त्यास ये वधायाला ॥
नाहीं तया कशानें मारावें, रूप नाहिं विषयाला ॥९॥
शिपी रजत कसे ये टाकाया ! घेतल्या मिळे काय ? ॥
विषय कसे टाकावे ? तृप्ती भोगांत होतसे काय ? ॥१०॥
ओडंबरिचें लेणें प्राप्त, परी लाभ कोणता होय ॥
कीं चोरानें लुटिलें, हानी होईल ती कशी काय ? ॥११॥
तैसे भोगविषय मज प्राप्त जरी, लाभ काय झाला हो ? ॥
एकसमयि जरि गेले विषय, तरी काय हानि होइल हो ॥१२॥
लाभचि न दिसे तेथें हानी कोठोनि उद्भवे राया ॥
मज आत्मतृप्त केलें गुरुरायें म्हणूनि पालटे काया ॥१३॥
प्रारब्धानें तनु ही सुंदर वा ओखटी बनो कांहीं ॥
मज संबंध तयाचा काय असे ? हर्ष खेद मज नाहीं ॥१४॥
प्रारब्ध-प्राप्त-भोगा भोगित केवळ असंग मी राही ॥
परि नामरूप किंवा विषयाचा स्पर्शही मला नाहीं ॥१५॥
मग हेळसून राजा वदला, स्त्री जात ही असे कपटी ॥
ओठांत शब्द भलता, भाव असोनी दुजाच कीं पोटीं ॥१६॥
तुज कैसें झाले हें स्वरुपाचें ज्ञान ? ब्रह्मसुख केंवी ॥
नच स्पर्शती विषय तुज कैसें, उकलोन स्पष्ट हे दावी ॥१७॥
ब्रह्मज्ञान न सोपें, साध्य कराया युगान्युगें झटती ॥
मुनि हठयोगी; त्यांना ब्रह्मसुखाची न जाहली प्राप्ती ॥१८॥
तुज अल्पायासानें कैसें तें प्राप्त जाहलें राणी ॥
पंचविषय गोडीनें घेसी, तव ही गमे अनृत वाणी ॥१९॥
धि:कारोनि अशापरि राज्ञीला भूप तो निघुन गेला ॥
कर्माची गहन गती, वाटे राणीस भूप हा मुकला ॥२०॥
सर्वच सोडुनि द्यावें, व्हावें मग ब्रह्म घेतला भाव ॥
रायाच्या चित्तानें; कैसें दुर्दैव श्रीगुरो धांव ॥२१॥
मी तृप्त, नाथ माझा झाला नाहीं मनांत ही खंती ॥
नाम चुडाला जरि, तरि रायाची मीच करिन संतृप्ती ॥२२॥
प्रतिदिनि रात्री सांगे रायासी ती विवेक वैराग्य ॥
विश्वास परी नाहीं, रायाचें परम थोर दुर्भाग्य ॥२३॥
“ही मम दासी मजला काय करिल बोध ?” क्षुद्र भाव मनीं ॥
रायाच्या, परि राणी बोध करी त्यास विविध युक्तीनीं ॥२४॥
ऐसें चाले बहु दिन राजासी ज्ञान जाहलें नाहीं ॥
परि वैराग्य उपजलें, सत्संगति परिणती अशी पाही ॥२५॥
एके दिनीं म्हणे तो “वैभव धन संपदा नको राज्य ॥
सेवावें वन वाटे, मिळविन स्वानंद सौख्य-साम्राज्य ॥२६॥
राज्ञीस मनीं झालें सौख्य, असें ऐकुनी पतीवचन ॥
वैराग्य हेंचि कारण ज्ञानासी, तेंचि द्दढ करी ज्ञान ॥२७॥
“झाली तुम्हां उपरति धन्य पतिराज !” ती सती बोले ॥
पूर्वीचें भूप किती, टाकुनि धन संपदा वनीं गेले ॥२८॥
अंतर विरक्त ठेवुनि, वागावें बाह्म लोकरीतीनें ॥
राज्ञी वदे, परि तिला भूप म्हणे “मज वनांतची जाणें ॥२९॥
मज लोकरीत नलगे, कोणाची चाड नाहिं गे मजला ॥
निश्चित वनांत जाणे. सांभाळी राज्य. सांगतो तुजला” ॥३०॥
राजास म्हणे राणी “युक्त नव्हे त्याग हा प्रपंचाचा ॥
पूर्ण विवेकावांचुनि केला तो त्याग काय कामाचा ? ॥३१॥
जोंवरि ह्रदयस्थासी नोळखिलें, जाउनी वना काय ? ॥
आपण अगें देवचि; नोळखिलें, जपतपादि तरि काय ? ॥३२॥
नच बाणली प्रतीती तोंवरि बांधोनिया जटा काय ? ॥
तळमळ मिटली नाहीं वायू भक्षोनि होतसे काय ? ॥३३॥
नाहीं अभेद सुख तो फांसोनी राख होतसे काय ? ॥
नच बाणली अखंडित स्थिति, तोंबरि धूम्रपान करि काय ? ॥३४॥
स्नानानें मोक्ष मिळे; जळचर तीर्थांत थोडके काय ? ॥
वाय़ूभक्षण करितां मोक्ष; अही भक्षितो दुजें काय ? ॥३५॥
पर्णाशनें मिळे जरि मोक्ष, तरी मेष मुक्त सहजींच ! ॥
नैराश्य मोक्ष देई; चातक पक्षास नित निराशाच ! ॥३६॥
एके ठायीं नसणें मोक्ष, तरी मुषक काय एक बिळीं ? ॥
जरि भस्मलेपनानें मुक्ती; खर उकिरडयांत घे लोळी ! ॥३७॥
जरि शुष्क ध्यान देई मोक्ष; नदीतीरिं काय बक थोडे ? ॥
जंव द्दढ झालें नाहीं ज्ञान, उगी कष्टती बहू वेडे ! ॥३८॥
यास्तव अंतर त्यागी होउनियां, प्राप्तभोग जो भोगी ॥
टाकुनि बाह्मात्कारीं त्याग, स्वयंब्रह्म होय तो योगी” ॥३९॥
बोल सतीचे पटले नाहीं, परि ऐकुनी उगी बैसे ॥
रात्रीं निजली राणी पाहुनि, नृपती वनांत जात असे. ॥४०॥
गेला हिमालयासी भेदुन नृप घोर काननीं शिरला ॥
सेरूविवरांत दरीं, बांधुनि गुंफा तिथेंच तो रमला. ॥४१॥
फल पर्ण कंद खाउनि, करिता झाला तृणावरी शयन ॥
संध्या त्रिकाळ करुनी, नियमानें भूप करित जप-ध्यान ॥४२॥
कांता बोध उपेक्षुनि, यापरि बहु काल घालवी तेथें ॥
ज्ञान समाधानाविण वन सेवी; दु:ख काय यापरतें ? ॥४३॥
इकडे राज्ञी उठली, राजा शेजेवरी नसे पाही ॥
धांवाधांव चहुकडे, एकचि गलगा- ‘प्रभू कुठें नाहीं.’ ॥४४॥
राज्ञी वदे प्रधाना ‘गेले हो नाथ काननीं वाटे.’ ॥
धाडा हेर चहुकडे, धांडोळा भूमि सकळ गिरि मोठे ॥४५॥
धाडी प्रधान दूता, ते फिरले जेथ मनुजसंचार, ॥
नच भूपशोध लागे, घेती ते सकळ दूत माघार, ॥४६॥
राणी म्हणे प्रधाना, ‘मीच अतां शोधितें विचारानें ॥,
सांभाळा राज्य तुम्हीं,’ पाचारिन तोंवरी न कीं येणें ॥४७॥
दिधलें प्रधानहातीं राज्य, मनीं ती करी विचारासी ॥
‘नाहीं स्वतंत्र स्त्रीचा देह, वनीं एकटीच जाउं कशी ?’ ॥४८॥
अणिमादीसिद्धीचें अंगीं सामर्थ्य पाहिजे म्हणुन ॥
ज्ञानानें परि पावन मी, करणें योग हेंच मूर्खपण ॥४९॥
पिकल्या शेतीं नांगर, ज्ञानोत्तर तेवि योग अभ्यास ॥
सायुज्यपूर्ण पदवी असुनी, हें भीक मागणें खास, ॥५०॥