उत्थान समाधीचें लक्षण ऐसें, तुला समजलें कीं ॥
अभ्यासें खल वृत्ती, बाणें अपरोक्ष द्दढ तुला शेखीं ॥२०१॥
स्वताच संशय उठती अंतरि, त्या बोलती स्वतोत्थान ॥
परता उत्थान घडे, विविध निरूपण विवाद ऐकून ॥२०२॥
उत्थान स्व पर होतां बिघडे तानेंच कीं समाधान ॥
वृत्ती अभ्यास करीं, द्दढतर होईल तैं तुझें ज्ञान ॥२०३॥
औषध खलितां, ज्यापरि अधिकाधिक गुण तयामधें येई ॥
वृत्तीखल अभ्यासें, द्दढ होइल ज्ञान संशयो जाई ॥२०४॥
अभ्यास कठिण नाहीं, त्यासी एकांत काळ वेळ नको ॥
ध्यान नको आसन जप, चंचल मन आवरूं तयास नको ॥२०५॥
स्मरण सदा मात्र असो “मिथ्या जग जीव, सत्य मी आत्मा” ॥
विस्मरण होउं नेदी, येइल अभ्यास हाच तव कामा ॥२०६॥
अपरोक्ष ज्ञान झालें तरि, जगविक्षेप होइना नाश ॥
मिथ्या परि, सत्यत्वें होई आपणास हा जगद्भास ॥२०७॥
बरवें, वाइट, उत्तम, मध्यम हें द्वैत नामरूपाचें ॥
जग सत्यत्वें स्फुरतें, द्वैताचें भान काय कामाचें ॥२०८॥
जें जें दिसे सकळ तें मिथ्या, माझ्यांत द्दश्य काहि नसे ॥
“मी सत्यब्रह्म आत्मा” द्दश्य दिसे तोंच आठवी ऐसें ॥२०९॥
अंत्यज दिसतांच जसें ‘ब्राह्मण मी’ ब्राह्मणासि हें वाटे ॥
तैं “मी सत्य” स्मरावे द्दश्य दिसे तोंच समज तें खोटें ॥२१०॥
होता गृहस्थ, झाला सन्यासी, आठवे तया वनिता ॥
स्मरतो त्याच क्षणी ‘मी त्यागी’ मज काय सुत अतां कांता ॥२११॥
त्यापरि ज्ञानी पुरुषें संग दिसे तोंच “मी असंग असें”
जागे होतां अठवण, झोंपवरी लावणे स्वतास पिसें ॥२१२॥
चिरकाल ध्यास ऐसा स्वप्नींही तेंच त्यास ये स्मरण ॥
स्वप्नीं स्वप्नहि देखे मिथ्या, आत्माच सत्य मी जाण ॥२१३॥
ऐसा वृत्तीचा खल होता, विश्वाभिमान स्थूलाचा ॥
निमतो; परि सूक्ष्मपणें तैजस राही, करी निपट त्याचा ॥२१४॥
स्थूलाभिमान गेला तरि, पूर्वीं सारखेंच देहाचें ॥
वर्तन चाले, उठते सूक्ष्म मनीं द्वैत, हर्ष खेदाचें ॥२१५॥
कुंकुम जातां निटिलीं डाग उरे, सुतक ज्यापरी मरतां ॥
त्यापरि बुट बुट चित्तीं तैजस अभिमान, स्थूलही जातां ॥२१६॥
होता पुण्य बरे, जरि पाप घडे, वाटते मनी खंती ॥
आपण कर्ता नसुनी, घेई कर्तृत्व तो बळें चित्तीं ॥२१७॥
मृगजलवत जग मिथ्या कळुनीहि, त्यास देइ सत्यपण ॥
ऐसे तैजस लक्षण, जेणें संकोच ज्ञनिया जाण ॥२१८॥
तैजस अभिमानाचें व्हावें जरि वाटतें निसंतान ॥
अभ्यास करी बापा, जेणें होईल तुज समाधान ॥२१९॥
हें तो कार्य गुणाचें, त्याचा तुजशीं नसेच संबंध ॥
सविकल्प विकल्पाचें स्फुरणें तुज काय, देशि कां दाद ॥२२०॥
बुद्धी उठो निमो कीं, चित्त करो चिंतनास, तुज काय ॥
कार्य अहंकार करी अपुलें, तरि त्यांत काय तव जाय ॥२२१॥
वृत्तीचा साक्षी तूं, धर्म तयाचे कशास शिरि घ्यावें ॥
वृत्ती उठो मुरो, मज वृत्तीचा स्पर्शही न, समजावें ॥२२२॥
बरवे अथवा वाइट धर्म जयाचे तयास, तुज काय ॥
नाना तरंग उठती पृष्ठीं, जलहानि करिति ते काय ? ॥२२३॥
यापरि अभ्यासानें, तैजस अभिमान तो गळून पडे ॥
प्राज्ञाभिमान राही; तोही अभ्यास करुनिया मोडे ॥२२४॥
प्राज्ञाभिमान लक्षण कळलें म्हणजेच टाकितां येई ॥
वृत्ती-अभाव साक्षी, तोचि असे प्राज्ञ समजुनी घेई ॥२२५॥
वृत्ती लयकालीं हा लयसाक्षी, अनुभवास स्वसुखाचा ॥
घेई, यास्तव त्रिपुटीं; अनुभव, अनुभाव्य, भाविता साचा ॥२२६॥
कळणें स्वानुभवाचें, तें आहे ज्ञान, त्यामुळें दोन ॥
ज्ञाता, ज्ञेय उपजलें; यापरि त्रिपुटीच होय उत्पन्न ॥२२७॥
ऐशापरी त्रिपुटिचा नाश न तों, बाणलें न स्वज्ञान ॥
ज्ञाता भिन्न पडोनी विस्मरणें, हेंचि मूल अज्ञान ॥२२८॥
ज्ञानाज्ञानाविरहित असतां तूं, त्यांतुनि कसा ज्ञाता ॥
भिन्न पडोनी, झालें ज्ञान कसें, ज्ञेय काय तुज ताता ॥२२९॥
ज्ञाता कधीं न झाला, दोरीवर सर्प केधवा आला ॥
ज्ञाताच नसे, मग तें ज्ञेय कुठिल, ज्ञान होय कोणाला ॥२३०॥
यापरि अभ्यास करी, त्रिपुटीचा द्वैत नाश हो तेणें ॥
विज्ञानांत समाप्ति ज्ञानाची, पूर्ण यापरी होणें ॥२३१॥
कुम्भक म्हणे तसेंची अभ्यासी, पातली नृपा शांती ॥
ज्ञप्ती मात्र उरे मग, ज्ञानाविण प्राप्त होय निजतृप्ती ॥२३२॥
आनंदले उभयतां, झालें तुज आज पूर्ण विज्ञान ॥
कुंभक म्हणे नृपाळा ऐकू दे तेंच तव मुखांतून ॥२३३॥
वंदुनि गुरुचरणासीं भूप वदे, सांगतों स्थिति स्वामी ॥
आत्माच एक आहे, भेद कुठेही नसे परंधामी ॥२३४॥
अज्ञानचि नसे, मग कोठुन विक्षेप वा अहंकार ॥
संकल्प विकल्पाचें नांव नसे बंध मोक्षही चार ॥२३५॥
आत्मा नवा न आला, आधीचें संचलें जसेंच तसें ॥
भ्रम तो मुळांत नाहीं, मग ज्ञानें नाशिलें भ्रमा कैसें ॥२३६॥
मी जाण आपणांतचि, अनुभव मजला मला कसा काय ॥
“मी पावलो मला” हें बोलूं जातां न लाज ये काय ॥२३७॥
कर्तव्य काहि नुरलें, नाहीं सज पुण्य पाप तें कांहीं ॥
विधि वा निषेध नाहीं, जन्ममरण कोठुनी मला पाही ॥२३८॥
जावो अथवा, राहो देह चिरंजीव, संशयो मिटला ॥
“मज धन्य धन्य केलें,” म्हणुनी नृप तो पदावरी पडला ॥२३९॥
आलिंगुनी तयासी, “कार्य तुझें जाहलें नृपा आज” ॥
कुंभक वदला, “आम्हीं झालों उत्तीर्ण संपलें काज” ॥२४०॥
संचारार्थ निघालां काय गुरो काज संपलें म्हणुनी ॥
अंतर पायास पडे, कंठु कसे दिवस एकटाच वनीं ॥२४१॥
इच्छा एकच उरली, चरणांवरि देह हा विसर्जावा ॥
तोंवरि येथ रहावें दीनासी हा प्रसाद अर्पावा ॥२४२॥
कुम्भक मग गहिंवरला अश्वासन घे म्हणें नृपा आतां ॥
जाऊ कुठें न आम्ही, पुत्रकलत्रादि तूंच मम भर्ता ॥२४३॥
परमानंद नृपासी झाला गुंफेंत उभयतां रमले ॥
बहुदिन एके ठायी आसन शयनादि सर्वही चाले ॥२४४॥
एके दिनीं चुडाला कुंभक रूपें विचार करि ऐसा ॥
विज्ञान मुखें बोले राजा, पाहूं कृतींत तो कैसा ॥२४५॥
यापरि भाव धरोनी, केला आरंभ त्यास छळण्यासी ॥
इच्छाबळें सुर सकल इंद्रादिक आणिलेच गुंफेसी ॥२४६॥
इंद्राकरवीं लालुच स्वर्गसुखाची नृपास दाखविली ॥
परि ढळला नच नृपती, आली सुर मंडळी तशी गेली ॥२४७॥
मग दिव्य विमानातें सिद्धिबलें निर्मुनी म्हणे राया ॥
आतां चल जाऊं या, पाहूं नवखंड द्वीपसप्त सख्या ॥२४८॥
नृपती बरें म्हणाला, त्या कुंभक बैसवी विमानांत ॥
भूवरि स्वर्गीं नेई पाताळीं पुण्य पापलोकांत ॥२४९॥
दाखविलें या परिनें राया, आब्रम्हस्तंबपर्यंत ॥
अधमोत्तम भाव असा स्फुरला नम तिळहि भूपचित्तांत ॥२५०॥