वरील श्लोकांत, अस्तित्वांत नसलेल्या उपमानाची कल्पन केली असल्यानें, येथें दुसरें सत्य उपमानच नाहीं, असा अर्थ होतो; व म्हणून या श्लोकांत, दुसर्या सदृश पदार्थाचा निरास केला आहे, अशी प्रतीति होते, ( पण येथें, तेंच उपमेय व तेंच उपमान असें नसल्यानें, अनन्वय नाहीं. )
माझ्या पीयूषलहरी ( अथवा अमृतलहरी ) या, गंगेची स्तुति असणार्या काण्यांत आलेलें अनन्वयाचें उदाहरण हें-
“ ज्यांनीं लहान लहान अनेक पातकें केलीं आहेत; पण त्यानंतर लागलीच ज्यांच्या मनाला पश्चात्ताप झाला आहे, अशा लोकांचा उद्धार करणारीं अनेक तीर्थें या त्रिभुवनात आहेत. पण, प्रायश्चित्तांच्या टप्पाच्या बाहेर ज्यांचें भयंकर आचरण आहे अशा लोकांचा स्वीकार करण्याकरता हे जननी तुझ्यासारखी तूंच विजयशालिनी आहेत. ”
अथवा हें, अनन्वय अलंकाराचें दुसरें उदाहरण-
“ या विशाल संसारांत पुण्यकारक तीर्थें कितीतरी आहेत; पण खरा विचार केला असतां, देवी गंगा ही गंगेसारखीच. ” ( तिला दुसरी तोड नाही. )
या दोहोंपैकीं पहिल्या श्लोकांत, अनुगामी धर्म वाच्य आहे. पण दुसर्या श्लोकांत तो व्यंग्य आहे, हा या दोहोंतील फरक. या श्लोकांतील ‘ तु ’ हा शब्द गंगेचा इतर तीर्थांहून निराळेपणा दाखवून, त्या निराळे-पणाला कारण असणारा, भगवान वासुदेवाशीं तादात्म्य असणें हा जो तिचा ( गंगेचा ) धर्म, त्याला सूचित करतो. या दोन्हीही श्लोकांत, गंगेविषयीं कवीला वाटणार्या भक्तीचा उत्कर्ष होत असल्यानें, येथील अनन्वय, अलंकार आहे.
या अनन्वय अलंकारांतील धर्म, बिंबप्रतिबिंबभाव पावलेला असा, कधींच नसतो. कारण, तो तसा असेल तर, अमुक एक धर्मानें विशिष्ट असलेल्या स्वत:चा त्या धर्मासारख्या दुसर्या धर्मानें युक्त असलेल्या स्वत:शीं अन्वय होण्याला कांहींच हरकत राहणार नाहीं. आणि तसा अन्वय झाल्यास, दुसर्या सदृश पदार्थाचा व्यवच्छेद प्रतीत होत नसल्यानें, अशा ठिकाणीं, अनन्वय अलंकार होणारच नाहीं.
हा अनन्वय अलंकार पूर्ण व लुप्त असा प्रथम दोन प्रकारचा असतो. पूर्ण अनन्वय अलंकाराचे, उपमेप्रमाणें, सहाही प्रकार संभवतात.
उदाहरणार्थ-
“ गंगेप्रमाणें गंगा रमणीय आहे; गंगेप्रमाणें गंगा पवित्र आहे; श्रीहरीप्रमाणें श्रीहरी आपला बंधु आहे; हरीप्रमाणें हरी श्रेष्ठ आहे; गुरु-प्रमाणें गुरु, आराधना करण्यास योग्य आहे; गुरुप्रमाणें गुरुची श्रेष्ठता आहे. ”