आतां अलंकारसर्वस्वकारांनीं म्हटलें आहे कीं, “-‘ एतावति प्रपंचे ’ या श्लोकांत अनन्वयध्वनि असणारच, नाहींतर अलंकारध्वनीचा विषयच नाहींसा केल्यासारखें होईल. ” पण, हें त्यांचें म्हणणें चुकीचें आहे. अनन्वयालंकाराचें स्वरूप, आम्ही असें सांगितलें आहे:- “ उपमानाचा निषेध हें ज्यांतील फळ आहे व ज्यांतील उपमान व उपमेय एकच असतें, असें जें सादृश्य, तो अनन्वय. ” आतां प्रस्तुत श्लोकांत अनन्वयाचें हें स्वरूप बाधित झालें आहे; कारण कीं, नायिकेचें डावें अंग व उजवें अंग हे दोन पदार्थ अगदीं निराळे आहेत, असें आम्ही मागें म्हटलेंच आहे.
आतां नायिकेच्या बाबतींत उपमानाचा निबेध या श्लोकांत जरी व्यड्रय असला तरी, उपमान आणि उपमेय ज्यांत एक आहे, असें जें सादृश्य तें अनन्वयाचें स्वरूप असतें; त्या स्वरूपाचा या श्लोकांत प्रत्ययच येत नाहीं. ज्या ज्या ठिकाणीं निरुपमत्वाची प्रतीति होते, त्या सर्व ठिकाणीं प्रथम, उपमान व उपमेय ज्यांत एक आहे अशा सादृश्याची प्रतीति झालीच पाहिजे असा कांही नियम नाहीं. जेथें निरुपमत्व असतें तेथें, उपमेय व उपमान ज्यांत एकच आहे, असें सादृश्य असतेंच-या तुमच्या नियमाचा, कल्पितोपमा, यद्यर्थातिशयोक्ति व पुढें येणारा असमालंकारध्वनि या तिघांतही भंग झाला आहे. म्हणून, प्रस्तुत श्लोकांत अनन्वय अलंकाराचा लेश-सुद्धां नाहीं.
आतां अप्पयदीक्षितांनी जें म्हटलें आहे कीं-“ हे कृष्णा, आज तूं घरीं आल्यामुळें मला जो आनंद झाला आहे, तसा पुढें केव्हांतरी, तुझ्या येण्यानेंच मात्र होईल. ’
या श्लोकांत आपल्या घरी आलेल्या कृष्णाला उद्देशून बोललेले विदुराचें वाक्य आहे. व त्यांत ‘ तुझ्या येण्यानें मला होणारा आनंद पुष्कळ काळ लोटल्यानंतर पुन्हा तुझ्या येण्यानेंच होणार्या आनंदासारखा असेल, ( दुसर्या कशानेंही होणार्या आनंदासारखा नसेल ). ’ या विशिष्ट तर्हेच्या उक्तीनें ‘ तुझ्या येण्यानें होणारा आनंद तुझ्या पुन्हां येण्यानें होणार्या आनंदासारखाच आहे. दुसर्या कोणात्याही आनंदासारखा नाहीं ’ हा अर्थ सूचित केला गेला आहे. ” अप्पयदीक्षितांचें हें म्हणणें चुकीचें आहे. या तुझ्या येण्यानें होणारा आनंद, दुसर्या केव्हांतरी तुझ्या येण्यानें होणार्या आनंदासारखा आहे, असा वरील श्लोकातून निघणार्या अर्थाचा प्रत्यय ( ज्ञान ) सर्व लोकांना पटण्यासारखाच आहे. त्यामुळें, श्रीकृष्णाच्या येण्याने होणारा जो सामान्य आनंद त्याचे दोन भाग-आतां होणारा आनंद, व पुढे होणारा आनंद, ( असे जे दोन आनंद ) यांमध्ये सादृश्य असणें मुळींच गैर नाहीं. आणि म्हणूनच या दोन आनंदांमधील सादृश्याचा परस्पराशीं अनन्वय होत असल्यानें अनन्वयाचा योगार्थ ( या श्लोकांत ) जुळतच नाहीं, आणि म्हणून याला अनन्वय म्हणणें योग्य होणार नाहीं, “ स्वत:च्या ठिकाणीं स्वत:च्या सादृश्याचा अन्वय होत नसल्यामुळें, याला अनन्वय म्हणावें ” असें उपमाप्रकरणांत तुम्ही स्वत:च म्हटलें आहे. या श्लोकांतील, विशेष प्रकारचा आनंद हें उपमेय आहे, ह्या विशेष प्रकारच्या आनंदाचें, त्याच्यासारख्या दुसर्या आनंदाशीं सादृश्य होउ शकणार नाहीं असें मुळींच नाहीं. आतां श्रीकृष्णाच्या येण्यानें होणारा जो सामान्य स्वरूपाचा आनंद तो या श्लोकांत सांगितलेल्या दोन विशिष्ट आनंद-रूपी अवयवांचा अवयवी आहे. ( म्हणजे या सामान्य आनंदाच्या पोटांत, हे दोन विशिष्ट आनंद येऊ शकतात. ) हा सामान्य, अवयवी असलेल्या आनंदाचें येथें अनुपमेयत्व सूचित होत असलें तरी, हा आनंद येथें उपमेय नाहीं. या बाबतींत हा श्लोक पूर्वी येऊन गेलेल्या ‘ एतावति प्रपंचे ’ या रत्नाकराच्या श्लोकासारखाच आहे. आतां ( दीक्षितांच्या तर्फे केणी अशी कल्पना केली कीं ) वरील श्लोकांतील ‘ श्रीकृष्णाच्या येण्यानें होणारा विशिष्ट आनंद दुसर्या विशिष्ट आनंदासारखाच आहे, ‘ ही उपमा, अवयवी असलेल्या आनंदाचें निरुपमत्व सूचित करते, ही गोष्ट स्पष्ट असली तरी , ( म्ह० अशी वस्तुस्थिति असली तरी ) त्या निरुपमत्वाच्या व्यंजनेपूर्वी मध्येच अवयवी सामान्य आनंद स्वत:च्यासारखा आहे अशी स्वसादृश्याची प्रतीति होते. ” पण ही स्वसादृश्याची कल्पना करणें, सह्लदयांच्या ह्लदयाला पटण्यासारखीं नाहीं. “ रत्नाकरांनी सांगितलेले जे अनन्वयाचे तीन प्रकार, त्यांपैकींच ( उपमेयाच्या एका अंशाचें दुसर्या अंशाशीं होणारें सादृश्य हा जो अनन्वयाचा प्रकार ) हा एक प्रकार आहे ” असेंही म्हणणें बरोबर नाहीं. कारण, अनन्वय अलंकाराच्या या प्रकाराचे आम्ही मागेंच खंडन केलें आहे. तेव्हां तो प्रकार तुम्हांला, या ठिकाणीं, सांगतां येणारच नाहीं. आणि शिवाय, तुम्ही स्वत:च्या अनन्वयाच्या प्रकरणांत, रत्नाकरानें सांगितलेल्या अनन्वयाच्या तीन प्रकारांचें प्रतिपादन केलेलें नाहीं.
पण खालील श्लोक अनन्वयध्वनीचें उदाहरण म्हणून देता देईल: -
“ कोकिळांना विचारून पाहिलें; भोंवतालच्या सर्व वृक्षांना न्याहाळून पाहिलें; तरी हे आम्रवृक्षा, भुंग्याला तुझें भेदपूर्वक सादृश्य ( साधर्म्य ) या जगांत कुठेंही आढळलें नाही. ”
या श्लोकांत ‘ भेदपूर्वक सादृश्य ’ म्हटल्यानें, अभेदपूर्वक, अनन्वय अलंकारांत असलेलें सादृश्य भ्रमराला पहायला मिळालें, अशा अर्थाच अनन्वयालंकराचा ध्वनि या श्लोकांत आहे.
अथवा अनन्वयालंकारध्वनीचें हें दुसरें उदाहरण-“ हे भागीरथी, पर्वतावरून खालीं वाहत येणार्या नद्यांपैकीं कोणती नदी शंकराच्या जटेवर आरूढ होऊन बसली आहे तें सांग बरें. आणि दुसर्या कोणत्या नदीनें श्री विष्णूच्या चरनकमलाचें प्रक्षलन केलें आहे बरें; तसे कोणत्या ही नदीनें केलें असतें, तर हे गंगामाई, कवींनीं त्या नदीशीं तुझी थोडी तरी तुलना केली असती. ”
या श्लोकांत, तुझ्याहून निराळ्या असणार्या कोणत्या नदीनें श्री विष्णूचे पाय पाण्यांनी धुतले ? जर धुतले असते तर त्या दुसर्या नदीशीं कवींनी तुझी थोडीशी तरी तुलना केली असती, असा अर्थ आहे; व त्या अर्थानें, “ पण पाण्यानें श्री विष्णूचे पाय धुणार्या तुझ्याशीं मात्र तुझीच तुलना करता येते. ” असा अर्थ सूचित होतो; व तो अनन्वयरूप असून त्याचें पर्यवसान श्री गंगानदीचें निरुपमत्व दाखविण्यांत होतें. असा हा अनन्वय अलंकार या श्लोकांतील ‘ इतर ’ या पदाच्या माहात्म्यानें सूचित झाला आहे.
येथे रसगंगाधरांतील अनन्वय अलंकाराचें प्रकरण समाप्त झालें.