पण अप्पय दीक्षितांनीं केलेलें हें लक्षण व त्याचें विवेचन योग्य नाहीं, कारण कीं रूपकवाक्यामध्यें विषयीचें ज्ञान वर्णिलेलें नसतें (पण) तें ज्ञान त्या रूपक वाक्यापासून उत्पन्न होतें. यावर कदाचित् अप्पय दीक्षितांच्या वतीनें असें म्हणण्यांत येईल कीं, “ ‘आरोप्यमाणानुभव:’ येथपर्यंत भ्रांतीचें लक्षण समजा व त्या पुढील, भ्रांतिमान् अलंकाराचें लक्षण समजा; आणि या भ्रांतीच्या लक्षणाची रूपकांत अतिव्याप्ति होऊं नये म्हणून, ‘ज्यांचें स्वरूप झाकलें गेलें आहे’ हें विशेषण विषयाला दिलें गेलें आहे.”
पण हें म्हणणें चुकीचें आहे. कारण भ्रांतीच्या लक्षणांत, भ्रांति हा एक अनुभव आहे, असें तिचें स्वरूप तुम्ही वर्णिलें आहे. तेव्हा ज्यांतील अभेद अनुभविला जात असतो अशा रूपक अलंकाराला हें तुमचें भ्रांतीचें लक्षण कधींहि लागूं पडणार नाहीं. यावर स्वत:चा ग्रंथ सुसंगत करण्याकरतां तुम्ही असें म्हणाल कीं, रूपकालंकारांतील रूपक या शद्बाचा अर्थ रूपकाचें ज्ञान असा आम्ही समजतों, तरीसुद्धां, ‘मरकत मणिमेदिनीधरो वा’ इत्यादि संदेहाच्या उदाहरणांत, त्यांतील संदेह, विषयाच्या विशिष्ट धर्माचा बोध करीत नसल्यानें, तुमच्या भ्रांतीचें लक्षण अति व्याप्त होण्याचा प्रसंग येईल. इतकेंच नव्हेतर, ‘कमलमिति चंचरीका: चंद्र इति चकोरा: त्वन्मुखमनुधावन्ति !’ (तुझ्या मुखाला कमल समजून भुंगे, व चंद्र समजून चकोर, धावत आहेत.) या अनेकभ्रांतिरूप उल्लेखालंकारांत तुमच्या भ्रांतीच्या लक्षणाची अतिब्याप्ति होणारच. तुम्ही म्हणाल, ‘या ठिकाणचा उल्लेखालंकार, भ्रांतीशीं मिश्रित आहे, असें माना,’ पण असें मानलें तरी, तुमच्या भ्रांतीचें लक्षण उल्लेखांत अतिव्याप्त होण्याचा दोष तुम्हांला टाळतां येणार नाहीं. (एका भांडयांत) कांहीं भाग दुधाचा व कांहीं भाग पाण्याचा असला तरी, दुधाचें लक्षण करतांना त्याची पाण्याच्या भागाशीं अतिव्याप्ति होऊं देणें योग्य होणार नाहीं.
याशिवाय अप्पय्य दीक्षितांनीं निरनिराळ्या ग्रहीत्यांना होणार्या उत्तरोत्तर भ्रांतीचें उदाहरण म्हणून, खालील उदाहरण दिलें आहे :---
“तुझ्या शत्रूंच्या सुंदर स्त्रियाच्या, कलशाप्रमाणें असणार्या स्तनांचें त्या मंजरी आहेत असे समजून गुंजारव करणार्या भ्रमरांनीं चुंबन घेतलें; त्या भुंग्यांच्या भयानें त्या आपले हात इतस्तत: लीलेनें हालवूं लागल्या असतां. त्या हातांना कोवळी पालवी समजून त्यावर पोपट चोंच मारूं लागले. त्य अपोपटांना उडवून लावण्याकरतां, त्या स्त्रिया मोठयानें आवाज करीत असतां, हा कोकिळांचा आवाज आहे असें समजून, अनेक कावळ्यांनीं त्यांच्यावर झडप घातली. हे चोल देशाच्या नृपश्रेष्ठा, अशारीतीनें तुझ्या शत्रुस्त्रियांना अरण्याचा सुद्धा आसरा मिळाला नाहीं.”
आतां ह्या उदाहरणविषयीं विचार करूं या :--- ह्या श्लोकांतील पहिल्या ओळींत, स्तनाचें मंजरीशीं जें साद्दश्य वर्णिलें आहे, तें कविसंकेताला धरून नाहीं. तें तसें असतें तर त्या साद्दश्यामुळें भुंग्यांना होणार्या भ्रांतीचें वर्णन करतां आलें असतें. पण साद्दश्यदोषाहून अन्य दोषानें उत्पन्न झालेल्या भ्रांतीला, अलंकार म्हणतां येत नाहीं. असें वर आम्ही नुकतेच सांगितलें आहे. (अर्थात येथें भ्रांति हा अलंकार होणारच नाहीं). शिवाय, एकदां, विषय जे स्तन त्यांच्यावर केलेलें कलशाचें रूपक घेतल्यावर, पुन्हां त्यांच्यावर मंजरीच्या भ्रांतिरूप दुसर्या भ्रांतिमान, अलंकाराचें वर्णन करणें हे सह्रदयांना उद्वेग उत्पन्न करणारेंच आहे. ‘साद्दश्यमूलक एका अलंकारानें युक्त असलेल्या वाक्यावर, साद्दश्यमूलक दुसरा अलंकार कधींही शोभत नाहीं.’ उदाहरणार्थ :--- ‘तुझें मुखकमल आम्ही चंद्रासारखें मानतों’ (ह्या वाक्यांत त्याप्रमाणें एका अलंकारावर दुसरा अलंकार सांगणें शोभत नाहीं.) असें आम्ही पूर्वींच सांगितलें आहे. उलट ह्या ठिकाणीं स्तनावर केलेल्या रूपकानें, स्तनाच्या, मंजरीशीं असलेल्या साद्दश्याला अगदीं दाबून टाकलें आहे.