ह्या श्लोकांत, मानी स्त्रीचें वर्णन करायचें असल्यानें, ती प्रकृत आहे; अर्थात् तिचे अश्रु व मान हेंही प्रकृतच. त्यांची विगलन ही क्रिया, त्या दोन प्रकृतांचा, कर्त्यांचा, समान धर्म म्हणून, येथें सांगितली आहे; व हीच विगलनक्रिया, डोळे व मन या अपादानांचाही (म्ह० पंचमी विभक्तीनें दाखविल्या जाणार्या अपादान ह्या अर्थाचाही) समानधर्म म्हणून येथें सांगितली आहे. (कर्ता, करण, संप्रदाय, अपादान वगैरे) सर्व कारकांचा क्रियेशीं अन्वय सारखाच होतो. [आतां], अशा रीतीनें, विगलनक्रिया ही ह्या सर्वांना (म्ह० अश्रु, मान, विलोचन व मन याना समान असल्यानें, त्या सर्वांना म्ह० चौघांचें एकमेकांशीं साद्दश्य या ठिकाणीं प्रतीत होतें असें मानायला काय हरकत आहे ? या शंकेला उत्तर :---) अशा रीतीनें या चौघांमध्यें क्रियारूप धर्माचें ऐक्य असलें (म्ह० धर्म एक असला) तरी, अश्रु व मान या कर्त्याच्या जोडीचेच आपापसांत साद्दश्य, आणि विलोचन व मन या जोडीचेंच आपापसांत साद्दश्य येथें सूचित होतें. (या चौघांचेंही एकमेकांत साद्दश्य सूचित होत नाही.) कारण एका क्रियेची ही सर्व, कारकें या सामान्य नात्यानें (सामान्य रूपानें) जरी एक असलीं तरी, या कारकांचें सामान्य कर्तॄत्व व अपादानत्व, विशेष कारकांत पर्यवसित होणें अवश्य आहे. (त्यामुळें कर्तुत्वरूपी विशेष कारक (यापैकीं) अश्रु व मान हें होत असल्यानें, त्यांची जोडी निराळी; व विलोचन व मन हे अपादानकारक होत असल्यानें त्यांची जोडी निराळीं.) बाकीचें पुढें स्पष्ट होईलच.
“पहिलें वय (म्ह० बालपण) संपत चालले असतां, व तारुण्य उदय पावत असतां, त्या सुनयनेच्या वाणीची, द्दष्टीची व विलासांची शोभा वाढू लागली.”
ह्या ठिकाणीं शोभारूपी एक गुणाशी (प्रकृतांचा, वाणी द्दष्टि व व विलास यांचा) अन्वय झाला आहे. वरील श्लोकाच्या उत्तरार्धांत, ‘विलसन्त्यहमहमिकया वाचो गतयश्च विभ्रमाश्च भृशम्’ (वाणी, गति व विलास एकमेकांशी स्पर्धेनेम उत्कर्ष पावू लागतात,) असा फरक केला तर, हें विलसनक्रियारूप एकधर्मान्वयाचें उदाहरण होईल. आणि जर, ‘दधति स्म मधुरिमाणं वाचो गतयश्च विभ्रमाश्च भृशम्’ (वाणी, गती व विलास हीं, गोड, मधुर, झालीं म्ह० यांनीं माधुर्य धारण केलें) असा फरक केला तर, गुणाविशिष्ट क्रियेचें हें उदाहरण होईल. (माधुर्य ह्या गुणानें विशिष्ट, धारणक्रिया या द्दष्टीनें). ह्या ठिकाणीं, केवळ (माधुर्य ह्या गुणानें विशिष्ट, धारणक्रिया या द्दष्टीनें). ह्या ठिकाणीं, केवळ माधुर्य हा गुण घेतला तर त्याचा साक्षात् वाणी गति व विभ्रम, यांच्याशीं संबंधच जुळत नाहीं; व नुसती क्रिया (धारणक्रिया) घेतली तर त्यांत मजा नाहीं.