आतां, “जो कडूलिंबाच्या झाडाला कुर्हाडीनें (तोडतो), जो त्यावर मध व तूप शिंपडतो व जो त्यांची गंध, फुलें वगैरेंनीं (पूजा करतो), त्या सर्वांनाच तें कडूलिंबाचे झाड कडूं ते कडूंच” (ह्या ठिकाईंही तुल्ययोगितेचा निराळा प्रकार मानायचें कारण नाहीं; पहिल्या प्रकारांतच याचाही समावेश होऊं शकतो); करण या श्लोकांतही कडूपणानें युक्त (विशिष्ट) जो लिंब (वृक्ष), तो स्वत:च, तोडणारा, शिंपडणारा व पूजणारा या तिघांचाही परंरेनें होऊं शकतो. तुल्ययोगितेंत सांगितलेला धर्म,
धर्मीवर साक्षात् राहणाराच असला पाहिजे व तो वृत्तिनियामक संबंधानेंच युक्त असा पाहिजे, असें कांहीं येथें आम्हांला सांगावयाचें नाहीं. (असा कांहीं नियम नाहीं). असा धर्म पाहिजे असा तुल्ययोगितेंत व इतरत्र नियम केला तर, पुढें सांगितल्या जाणार्या कारकदीपक या अलंकारांत (वगैरे), असा धर्म नसल्यामुळें, त्या ठिकाणीं त्यांच्या लक्षणाची अव्याप्ति होईल (म्ह० त्या ठिकाणीं वृत्तिनियामकसंबंधयुक्त धर्म नसल्यानें तो अलंकारच होणार नाहीं.)
येथें अशी (एका शंकाकाराची) एक शंका :--- ‘चन्द्र इव सुन्दरं मुखम्’ या उपमेंत, चंद्र व मुख या दोहोंचा सुन्दरत्व या एकाच धर्माशीं अन्वय होत असल्यानें, तिच्यांत तुल्ययोगितेची अतिव्याप्ति होईल. (म्ह० उपमेला तुल्ययोगिता म्हणावी लागेल). कुणी म्हणतील, “ (असें कसें म्हणतां ?) तुल्ययोगितेंत धर्मी एक तर सर्व प्रकृत अथवा अप्रकृत, असेच पाहिजेत, असें सांगितलें असल्यानें, उपमा ही तुल्ययोगिता कशी होईल ? (उपमेंत तर एक प्रकृत उपमेय व एक अप्रकृत उपमान असलें पाहिजे असा नियम आहे.)” पन यावर शंकाकाराचें म्हणणें असें कीं, “प्रिये विषादं०” या श्लोकांतल्या उत्तरार्धांत, ‘जगाल मानो ह्रदयादमुष्या विलोचनाभ्यामिव वारिधारा.’ (तिच्या मनांतून मान गळला, जशी डोळ्यांतून पाण्याची धारा गळली तसा) असा फरक केला तर, मान व पाण्याची धार या दोन प्रकृत पदार्थांमध्येंच उपमा झाल्याणें, या ठिकाणीं तुल्ययोगिता होऊ लागेल. (कारण, ‘चंद्र इव सुन्दरं मुखम्’ इत्यादि ठिकाणीं ही (एक प्रकृत व एक अप्रकृत यांच्यांत सुन्दरत्व हा एक धर्म असल्यानें) पुढें सांगितल्या जाणार्या दीपकालंकाराची अतिव्याप्ति होईल. (म्ह० उपमेच्या ऐवजीं दीपक होऊं लागेल.) “ ‘साद्दश्य गम्य असतांना,’ असें तुल्ययोगितेला व दीपकाला विशेषण लावावें (म्ह० त्यांची उपमेंत अतिव्याप्ति होणार नाहीं, कारण उपमेंत साद्दश्य वाच्य असतें)”, असेंही तुम्हांला म्हणतां येणार नाहीं; कारण मग,
“चंद्रकिरणाप्रमाणें स्वच्छ पाणी, हंसासारखी कान्ति असलेला चंद्र व उमललेल्या पांढर्या कमळाप्रमाणें मनोहर ह्सं शरदृतूंत असतात.” यांतील, समासांत आलेल्या गम्योपमेंत (साद्दश्यवाचकाचा अभाव असल्यानें,) तो तुल्ययोगिता होऊं लागेल. कुणी म्हणतील, प्रस्तुत श्लोकांत उपमा म्ह० साद्दश्य हें (गम्य अथवा) व्यंग्य नाहीं, पण चंद्रांशुनिर्मला या सबंध समासानेंच उपमा वाच्य झाली आहे, (वैयाकरणांच्या मतें सबंध समसच विशिष्ट अर्थाचा वाचक असतो म्हणून,) असें म्हणा; किंवा चंद्रांशु ह्या पहिल्या पदाची साद्दश्यावर लक्षणा आहे असें म्हणा (एवंच, या श्लोकांत साद्दश्य व्यंग्य नाहीं, तें व्यंग्य असतें तर येथें तुल्ययोगिता आहे असें म्हटलें असतें.) असें मूळ शंकाकाराचा आक्षेपक सूक्ष्म दृष्टीनें पाहू लागला (तर हें उदाहरण सोडून देऊ). तरी सुद्धां, ‘हंसास्तु मानसभुवश्चन्द्रा एव न संशय:’ (मानस सरोवरांत जन्मलेले हंस हे चंद्रच, यांत शंका नाहीं) या रूपकाला तुल्ययोगिता म्हणण्याचा अतिप्रसंग येईल. यावर हंस्तास्तु० या ठिकाणीं, चंद्रपदाची चंद्रसाद्दश्यविशिष्ट या लक्ष्यार्थावर लक्षणा असल्यानें, येथें उपमा (साद्दश्य) व्यंग्य नसून लक्ष्य आहे असेंही आक्षेपकाला म्हणतां येणार नाहीं; कारण (नवीनांच्या मताप्रमाणें) रूपकांत लक्षणाच नसते, अशी मुख्य शंकाकाराशीं शंका, यावर जगन्नाथ पंडित उत्तर देतात :---
तुम्ही म्हणतात तसें नाहीं. (येथें तुल्ययोगितेचा उपमादिकांत अतिप्रसंग नाहीं.) कारण ज्या ठिकाणीं, अप्रकृत अथवा प्रकृत अथवा प्रकृताप्रकृत (म्ह० कांहीं प्रकृत व कांहीं अप्रकृत) अशा धर्मींचा गुणक्रियादिरूप धर्माशीं अन्वय होणें, ह्यांत च चमत्कार असेल म्ह० एकधर्मान्वय याच बाबतींत चमत्कार असेल तेथें, तुल्ययोगिता अथवा दीपक (माना०. पण ज्या ठिकाणीं गुणक्रियादिरूप धर्मानीं उत्पन्न केलेलें साद्दश्य अथवा अभेद हीच चमत्कारी असतील तेथें, साद्दश्य व अभेद हीं उपमा व रूपक ह्या अलंकारांचीं कारणें होतात. (म्ह० जेथें साद्दश्य व अभेद चमत्कारीं, तेथें अनुक्रमें उपमा व रूपक हेच अलंकार होणार.० ‘सुन्दर असून मुख्यार्थाला उपस्कारक असेल तोच अलंकार,’ हें अलंकाराचें लक्षण आम्ही अनेक वेळा पूर्वी सांगितलें आहे. (अर्थात् जेथें एकधर्मान्वय असेल तेथें तुल्ययोगिता व दीपक; व जेथें साद्दश्य व अभेद सुंदर असेल तेथें अनुक्रमें उपमा व रुपक). असें न मानलें तर, तुल्ययोगिता अलंकारांतही साद्दश्य असल्यानें ९मग तें सुंदर नसेना कां ?) त्याला घेऊन, तुल्ययोगितेलाही उपमा म्हणायची वेळ येईल. थोडक्यांत ही चर्चा बस्स झाली. अशा द्दष्टीनें पाहता,
“दधीचि, बली व कर्ण या (तिघांच्या) ठिकाणीं अदातृत्व, व हिमालय, मेरु पर्वत व समुद्र यांच्या ठिकाणीं अघैर्य, (चंचलत्व, अस्थिरत्व) तुला पाहिलें असतां, भासतें.”
ह्यांतील तुल्ययोगिता रसानारूप असून, ती यथासंख्य अलंकारानें उत्थापित आहे.
“हे राजा ! तूं सभेंत दिसलास कीं चंद्र, चंदन व चांदणें हीं उग्र वाटतात; (इतका तूं सौम्य आहेस)’ पण तूं रणांगणावर दिसलास कीं शेष, कालाग्नि व समुद्र हीं सौम्य वाटतात. (इतका तूं भयंकर दिसतोस)”