“प्रस्तुत वाक्यार्थाचे उपमान वगैरे घटक व साधारणधर्म यांचा अप्रस्तुत वाक्यार्थाचे उपमेय वगैरे घटक व साधारणधर्म यांच्याशीं बिंबप्रतिबिबभाव असल्यास द्दष्टांत (अलंकार).”
(काव्यप्रकाशकारांनीं) म्हटलेंच आहे :--- ‘द्दष्टान्त: पुनरेतेषां सर्वेषां प्रतिबिम्बनम ।’ (पमानाचा उपमेयाशीं, त्यांच्या विशेषणांचा विशेषणांशीं, धर्मांचा धर्माशीं, अशारीतीनें सर्वांचा सर्वांशीं बिंबप्रतिबिंतभाव होणें, हा द्दष्टांत.) उदाहरण :---
“सज्जन पुरुष, कुणीही त्याला (असें कर म्हणून) सांगितलें नसलें तरी, आपल्या हितकारक आचरणानें सर्व जगाला अत्यंत आनंद देतो; (आणि) चंद्र आपल्या उज्ज्वल किरणांनीं, चंद्रविकासी कमलांच्या समूहाला विकसित करतो, तें तरी त्याची कुणी आरधना केली म्हणून का ? सांगा बरें ?”
येथे आनंद व विकास ह्या दोन क्रियांचा सुद्धां, (म्ह० बाकीच्या उपमान, त्याचीं विशेषणें वगैरेंचा बिंबप्रतिबिंबभाव तर आहेच. पण वरील क्रियारूपी धर्माचा सुद्धां) बिंबप्रतिबिंबभाव आहे.
या द्दष्टांताचा प्रतिवस्तूपमा अलंकाराहून फरक एवढाच कीं, प्रतिवस्तूपमेंत मात्र धर्म प्रतिबिंबित नसतो; (म्ह० तेथें एकच साधारणधर्म असतो व तो दोन भिन्न शब्दांनीं सांगितला असला तरी एकरूपच असतो.) केवळ एक शुद्ध साधारणधर्म या रूपानें तो असतो; पण येथें द्दष्टांतांत तो धर्म प्रतिबिंबित असतो. (दोन निराळे धर्म असून त्यांतून एक धर्म तयार होतो).
आतां या बाबतींत विमर्शिनीकारांनीं, “प्रतिवस्तूपमेंत अप्रस्तुत अर्थ जो सांगितला जातो, तो त्याच्याशीं प्रस्तु अर्थाचें साद्दश्य सूचित करण्याकरतां; पण द्दष्टांतांत अप्रस्तुत अर्थ जो सांगितला जातो तो अशा प्रकारचा अर्थ दुसरीकडे आहे असें सांगून किंवा दाखवून त्यानें प्रकृत अर्थाची जॊ प्रतीति होते तिचें मात्र स्पष्टीकरण करण्याकरतांच; त्या प्रकृत अर्थाचें अप्रकृत अर्थाशीं साद्दश्य सूचित व्हावें म्हणून नव्हे. म्हणून प्रतिवस्तूपमेंत साद्दश्याची प्रतीति होते, व द्दष्टांत अलंकारांत साद्दश्याची प्रतीति होत नाहीं हा या दोघांत फरक,” असें जें म्हटलें आहे, तें चूक आहे; कारण प्रकृत व अप्रकृत अर्थ सांगणें या बाबतींत या दोन्हीही अलंकारांत कांहीं एक फरक नसल्यानें, एकांत (म्ह० प्रतिवस्तूपमेंत) साद्दश्याचा प्रत्यय असतो, व दुसर्यांत (म्ह द्दष्टांतांत) तो नसतो, हें म्हणणें म्हणजे नुसते हुकूम सोडण्यासारखेंच आहे. (वस्स. असेंच म्हटलें पाहिजे असें फर्मान काढण्यासारखेंच आहे, यांत युक्ति कांहींच नाहीं.) शिवाय (तुमच्या) उलट म्हणणेंही (म्ह० द्दष्टांतांत साद्दश्यप्रत्यय असतो, व प्रतिवस्तूपमेंत नसतो असें म्हणणेंही) सोपें आहे. आणी खरे म्हणजे ‘अशा प्रकारचा अर्थ दुसरीकडेही आहे’ हें जें प्रकृत अर्थाचें स्पष्टीकरण करणें म्हणून तुम्हीं सांगितलें आहे, (म्ह० अप्रकृत अर्थाचें द्वारां प्रकृताचा स्पष्टीकरण) त्याचेंच (त्या स्पष्टीकरणाचेंच) दुसरें नांव साद्दश्य ! (म्ह० स्पष्टीकरण याचाच अर्थ साद्दश्य, साद्दश्य निराळें तें काय असतें ?)
(अशारीतीनें प्रकृत व अप्रकृत अर्थांत साद्दश्य असतें) म्हणून तर उत्तम कवींअनीं निर्माण केलेल्या (द्दष्टांतालंकाराच्या) बहुतेक उदाहरणांमध्यें, प्रकृत वाक्यार्थाचे जे घटक त्यांच्या प्रकृतीला (मूळ प्रत्ययरहित शब्दाला) प्रत्ययाला व अर्थाला अनुरूप प्रकृति, प्रत्यय व अर्थ यांनीं घटित असा अप्रकृत वाक्यार्थ, योजलेला दिसतो. “तर मग तुम्ही (म्ह० जगन्नाथानें) सांगितलेला या दोन अलंकारांतला फरक सुद्धां या दोघांना निराळे अलंकार करूं शकणार नाहीं; कारण ‘साद्दश्य सूचित होणें’ या सामान्य लक्षणांत हे दोन्हींही अलंकार बसत असल्यामुळें, उपमेच्या पोटभेदाप्रमाणें हे दोन अलंकार, एकाच अलंकाराचे दोन पोटभेद होऊ लगतील.” असेंही तुम्हाला (विमर्शिनीकारांना) म्हणतां येणार नाहीं; करण तुम्हांलाही याच न्यायानें, दीपक व तुल्ययोगिता यांना एकाच अलंकाराचे दोन पोटभेद मानण्याची वेळ येईल. ‘(मग त्यांत काय बिघडलें ?) आम्हांला हा प्रसंग इष्टच आहे,’ असें म्हणत असाल तर, येथें (आम्हालाही) ही इष्टापत्ति आहे असें समजा. खरें म्हणत असाल तर, येथें (आम्हालाही) ही इष्टापत्ति आहे असें समजा. खरें म्हणजे हेंही म्हणणें चूक आहे, कारण असें म्हणणें म्हणजे प्राचीनांनीं केलेल्या अलंकाराच्या विभागाला आपणच (म्ह० तुम्हीच) खिळखिळें करून टाकल्यासारखे होईल; आणि शिवाय औपम्य (प्रतीति) हें सामान्य लक्षण मानल्यास तें अनेक अलंकारांत असल्यानें त्या सर्वांना उपमेचे पोटभेद मानण्याची आपत्ति येऊन, सर्व आलंकारिकांच्या सिद्धांताचा भंग होण्याचा प्रसंग येईल, “अब्धिर्लङधित एव०’ या मरारिकवीच्या पद्यांत, ‘जाणणें हा एकच धर्म जरी सांगितलेला असला तरी, त्यावर ह्या (श्लोकांतील दोन वाक्यार्थांचे परस्पर) साद्दश्य अवलंबून आहे, असा कवीचा अभिप्राय नाहीं. त्या अब्धिलंघन (समुद्राच्या पैलतीरावर जाणें) वगैरे धर्माशीं दिव्य वाणीची उपासना वगैरेचें प्रतिबिंबन आहे.