विना शब्दाच्या (अमक्यावांचून या) अर्थाशीं संबंध म्हणजेच विनोक्ति. (सर्व अलंकारांना सामान्य) सुंदरत्व हें (अलंकाराचें लक्षण येथेंही पूर्वींच्या अलंकारांच्या व्याख्येतून आलें आहे. तें सुंदरत्व एखाद्या वस्तूपासून वियुक्त झालेल्या वस्तूचें रमणीयत्व व अरमणीयत्व या दोन प्रकारांनीं होतें. अरमणीयत्वाचें उदाहरण :---
“संपत्तीनें व निर्दोष विद्येनें आलिंगिलेला माणूस (ही) हरीच्या भक्तिरसावांचून शोभत नाहीं.”
अथवा अरमणीयत्वाचें हें दुसरें उदाहरण :---
“सुंदर काव्यावांचूनचें तोंड, साध्वी स्त्रीवांचूनचें घर, श्रीमंतीवांचूनचें राज्य, अत्यंत रमणीय असत नाहीं. (म्ह० अति वाईट दिसतें.)”
रमणीयत्व या प्रकाराचें उदाहरण :---
“चिखल नसला तरच तलाव शोभतो; दुष्ट माणसें नसलीं तरच सभा शोभते; कर्नकटु अक्षरें नसलीं तरच काव्य शोभतें; आणि विषय नसले तरच मन शोभतें.”
पूर्वीची (वदनं विना इत्यादि) वोनिक्ति शुद्ध विनोक्ति आहे. ही (पङकैर्विना, ही) विनोक्ति दीपकाला अनुकूल म्ह० दीपकाला उपस्कारक आहे.
मिश्रित विनोक्तीचें उदाहरण :---
“रागावांचून म्ह० आसक्तीवांचून ऋषिमुनि शोभतात; पण रत्नें रागावांचून (म्ह० रंगावांचून) शोभतच नाहींत. माणूस कुटिलपणावांचूनच शोभतो, पण अंबाडा (अंबाडयाचे केस) कुटिलपणावांचून (कुरळेपणावांचून) शोभतच नाहीं.”
ह्या ठिकाणीं विनोक्ति, शोभणें या एकाच अर्थाच्या दोन शब्दांनीं होणार्या प्रतिवस्तूपमेला अनुकूल आहे.
==
“शूर लोक घाबरटपणावांचून शोभतात. ज्याप्रमाणें चांगलीं रत्नें त्रास म्ह० डाग (माशी) या दोषावांचूनच शोभतात त्याप्रमाणें, जसें ह्त्ती दानावांचून म्ह० मदावांचून शोभतच नाहींत तसें, राजे दानावांचून शोभतच नाहींत.”
येथें विनोक्ति त्रास व दान ह्यांवरील श्लेषावर आधारलेल्या उपमेला उपकारक आहे.
“ज्याप्रमाणें तालावांचून राग, ज्याप्रमाणें मानावांचून राजा, ज्याप्रमाणें मदावांचून हत्ती (शोभत नाहीं); त्याप्रमाणें ज्ञानावांचून यति शोभत नाहीं.”
पूर्वींच्या उदाहरणांत, विना या अर्थानें युक्त अशा पदार्थाशीं क्रिया, गुण वगैरे साधारण धर्मांचा संबंध (शब्दानें सांगणें) आवश्यक होतें; पण ‘यथा तालं विना’ यांतील उपमेच्या सामर्थ्यानें, तो क्रिया गुण वगैरेंचा धर्मीशीं संबंध सहज प्रतीत होत असल्यानें, (शब्दानें) सांगण्याची जरूर नाहीं.
ही विनोक्ति फक्त विना हा शब्द असला म्हणजेच होते असें कांहीं नाहीं; पण विना ह्या शब्दाच्या अर्थाला सांगणारा (वाचक) कोणताही शब्द आला तरी होते; म्हणून नञ, निर, वि, अन्तरेण, ऋते, रहित, विकल इत्यादि (वांचून या अर्थाच्या) शब्दांपैकीं कोणत्याही शब्दाचा प्रयोग असला तरी विनोक्ति होते.
उदा० :--- “खूप भपकेबाज असूनही मनुष्य गुणावांचूनचा असेल तर, ज्याप्रमाणें, नुसत्या दिसायला सुंदर असलेल्या (पण वास नसलेल्या) फुलांनीं सुशोभित सांवरीचें झाड जसें शोभत नाहीं तसा तो शोभत नाहीं.”