विनोक्ति अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
अलंकारभाष्यकार मात्र, ‘नित्यसम्बन्धानामसंबंधवचनं विनोक्ति:’ (नित्य संबद्ध असलेल्या पदार्थांचा परस्पराशीं संबंध नसल्याचें सांगणें म्ह० विनोक्ति) अशी विनोक्तीची व्याख्या करतात; तेव्हां त्यांच्या मतीं वरील सर्व श्लोक विनोक्तीचीं उदाहरणें होऊं शकत नाहींत. पण (त्यांच्या मतें) विनोक्तीचें हे उदाहरण (खरें) :---
कमळाचे देठ, मंद वारा, चंदन, वाळा, शेवाळ व कमळें हीं सर्व, जिची वियोगामुळें ज्ञानशक्ति नाहींशीं जाली आहे अशा स्त्रीला, थंडपणावांचूनचीं आहेत असें वाटतें (भासतें.)
ह्या ठिकाणीं वरील सर्व पदार्थांत थंडपणा कायमचा असला तरी त्यांच्यांतून तो (थंडपणा) निघून गेला आहे, असें म्हटलें आहे.
अथवा अलंकारभाष्यकारांच्या मताप्रमाणें होणार्या विनोक्तीचें ह दुसरें उदाहरण :---
“चंद्राची शोभा थंडपणावांचून, दिवा प्रभेवांचून, व मालतीच्या फुलांचा झुबका सुगंधावांचून, उठून दिसत नाहीं.”
दुसर्या कोणत्यातरी अलंकाराच्या मिश्रणानेंच ह्या अलंकाराचें ह्रद्यत्व प्रकट होतें, स्वतंत्रपणें हा तितकासा सुंदर दिसत नाहीं; तेव्हां या अलंकाराचा निराळेपणाही ठसठशीत वाटत नाहीं (अस्पष्ट वाटतो), असेंही कुणी म्हणतात.
आतां विनोक्ति ध्वनीचें उदाहरण हें :---
“ज्या डोळ्य़ांनीं तुझा हा अत्यंत रमणीय देह न्याहाळला नाहीं ते डोळे मोठे विशाल असले तरी त्यांचें काय फळ (काय उपयोग) ? हे गंगे ! ज्या कानावर तुझ्या लाटांच्या नाचण्यानें होणारा खळखळ आवाज पडला नाहीं (कानांत गेला नाहीं), त्या कानांना धि:कार असो.”
येथें तुझ्या दर्शनावांचून डोळ्याचें व तुझ्या लाटांच्या खळखळाट न ऐकल्यानें कानांचें अरमणीयत्व, फलाविषयींचा प्रश्न व श्लोकांतील (न्यक्कार) धिक्कार हा अर्थ यांनीं सूचित केलें आहे. (म्हणून हा विनोक्तिध्वनि). हा विनोक्तिध्वनि, (कवीच्या गंगेविषयींच्या भक्तीला म्ह०) भावध्वनीला अनुग्राहक असला (म्ह० उपस्कारक असला) तरी त्याचा ध्वनित्व हा व्यवहार कायमच राहतो. नाहींतर (म्ह० विनोक्तीचें ध्वनित्व न मानलें तर आणि त्याला गुणीभूतव्यंग्य मानलें तर) दोन ध्वनींपैकी एक ध्वनि अनुग्राह्य व दुसरा अनुग्राहक असे एकत्र आल्यास त्यानें होणारा अनुग्राहकत्वरूप जो ध्वनिसंकराचा प्रकार तो, नाहींसा होण्याची वेळ येईल. (आणि असा ध्वनिसंकर तर सर्वांनीं मान्य केला आहे.) म्हणूनच :---
“जिनें चंद्रबिंब (कधींही) पाहिलें नाहीं, त्या सूर्यविकासी कमलिनीचा जन्म फुकटच गेला (म्हणायचा); आणि ज्या चंद्रानें त्या कमलिनीचा जन्म फुकटच गेला (म्हणायचा); आणि ज्या चंद्रानें त्या कमलिनीला विकसित (कधींही) केली नाहीं, त्याची उत्पत्तीही वायाच गेली (म्हणायची).”
ह्या एका कवीच्या पद्यांत विनोक्तिध्वनीच आहे. (बाकींच्या विनोक्तीहून या विनोक्तीचा) फरक एवढाच कीं, यांतील दोन्ही विनोक्ति परस्परावर अवलंबून आहेत; (म्ह० चंद्रावांचून कमलिनी व्यर्थ व कमलिनी वांचून चंद्र व्यर्थ अशा दोन विनोक्ति या श्लोकांत एकमेकीवर अवलंबून आहेत.)
येथें रसगंगाधरांतील विनोक्ति प्रकरण संपलें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP