‘हे तपस्वी कौसिका १ (विश्वामित्रा !) तुझी रामचंद्राला नेण्याची इच्छा असल्यास खुशाल ने, त्यांत विकल्प कशाला ? हे रानांतले प्राणीसुद्धां त्याच्या सतत दर्शनाच्या पुण्यानें धन्य होवोत.’
ह्या ठिकाणीं पुत्रस्नेहानें व्याकुळ झालेल्या दशरथाच्या वाक्यनें, ‘खुशाल ने,’ हा विधि होत असला तरि तो बाधित होतो व त्याचें ‘नेऊ नकोस,’ या निषेधांत पर्यवसान होतें; आणि मग तो निषेध, ‘जर तूं याला नेलेस तर निश्चित माझा प्राण जाईल,’ या अर्थाला सूचित करतो; म्हणून हा आक्षेप विधीच्या आभासरूप आहे. हीं ह्या शेवटच्या मतानें होणारीं आक्षेपांची उदाहरणें, या मताच्या द्दष्टीनें, प्राचीनांचीं उदाहरणेंहीं आक्षेपांचीं उदाहरणें, या मताच्या द्दष्टीनें, प्राचीनांचीं उदाहरणेंहीं आक्षेपाचीं उदाहरणेंच नव्हेत. अशा रीतीनें होणार्या या शेवटच्या मता प्रमाणें पहिल्या मतानें सिद्ध होणारा आक्षेप, मुळीं आक्षेपच नव्हे; तो फक्त सांगितलेल्या अर्थाचा निषेधच आहे. कारण ह्या ठिकाणीं निषेध आभासरूपच नाहीं, तर तो खरोखरीचा च निषेध आहे, असा ह्या शेवटच्या मताचा आशय.
पण इतरांच्या मतें कोणताही निषेध हा आक्षेप अलंकार होतो. वरील आक्षेपांत, इतर अलंकारांच्या सामान्य लक्षणांत येणार्या चमत्कारित्वाप्रमाणेंच चमत्कारित्व समजावें; आणि तें चमत्कारित्व व्यंग्यार्थ असतांनाच संभवत असल्यानें, सर्व प्रकारचा व्यंग्ययुक्त निषेध हा आक्षेप अलंकारच म्हणावा. या आक्षेपांत, (१) उपमेयानें केलेल्या उपमानाच्या निरर्थकपणाचा, (२) दुसर्या पक्षाचा आश्रय केल्यानें होणारी प्राचीन (म्ह० पहिल्या) पक्षाची निरर्थकता (३) कांहीं एक विशेष अर्थ सांगण्याकरतां केलेल्या उत्क्त व वक्ष्यमाण कथनांची निरर्थकता व(४) नुकत्याच वर सांगितलेल्या “निषेधाचा व विधीचा आभास” या दोन प्रकारांचा, (अशा या सर्व प्रकारांचा) समावेश होतो असें या इत्र लोकांचें म्हणणें.
आतां या इतर लोकांच्या मतानुसारच आक्षेप अलंकाराच्या ध्वनीचें उदाहरण देतों :---
‘तुला खास निर्माण क्रण्याकरता ज्यानें चंरालही निर्माण केलें, त्या जुन्यापुराण्या महामुनीचे (ब्रम्हादेवाचें) पांडित्य आम्ही काय सांगावें ?”
ह्या ठिकाणीं ज्यांच्या मतीं ‘उपमानाची निरर्थकता सांगणें म्हणजे आक्षेप’ असें असेल त्यांच्या मतीं, “तूं असतांना चंद्राची काय जरूर ?” एवढा भाग घेऊन वरील श्लोकांत आक्षेपध्वनि होतो; व ज्यांच्या मतीं ‘केवळ निषेध म्हणजे आक्षेप अलंकार’ त्यांच्या मतीं, ‘वृद्ध ब्रम्हादेवांत अक्कल नाहीं’ एवढा अंश घेऊन, वरील श्लोकांत आक्षेपध्वनि होतो. येथें शंका अशीं कीं, ‘त्याच्या पांडित्याला काय सांगावें ?’ या शब्दांनीं पांडित्य सांगणें याचा बाध होऊन, त्याचें ‘अक्कल नसणें’ या अर्थांत पर्यवसान होत असल्यानें, पाडिंत्य हा अर्थ श्लोकांत जवळ जवळ वाच्यच झाला आहे. मग येथें आक्षेपध्वनि कसा ? याला उत्तर हें कीं, यांत कांहीं बिघडले नाहीं. कारण, ‘तुला उत्पन्न करणार्या ब्रम्हादेवानें तुला उत्तम रीतीनें निर्माण करतां यावें एवढयाकरतां प्रथम, सुंदर अक्षर यावें म्हणून ज्याप्रमाणें प्रथम धुळाक्षरें काढतात त्याप्रमाणें, चंद्राला निर्माण केलें; तेव्हां या द्दष्टीनें त्याच्या पांडित्याची गोष्ट काय सांगावी ?” असा या श्लोकाचा अर्थ केल्यास ब्रम्हादेवाच्या पांडित्याचा अर्थ अबाधित राहून त्यावरच वाच्यार्थाची विश्रांती होते. नंतर ‘पुराणस्य’ वगैरे शब्दांच्या अर्थाचा विचार करतां वरील वाच्यार्थाचें, ‘पांडित्याचा अभाव’ व ‘चंद्राची निरर्थकता’ या अर्थांत निश्चित पर्यवसान होते. म्हणून, या ठिकाणीं ध्वनि निर्बाधरीतीनें आहे. पण ज्यांच्या मतीं आभासरूप निषेधच आक्षेप अलंकार होतो, त्यांच्या मतीं वरील श्लोकांत आक्षेपध्वनि नसून खालील श्लोकांत तो आहे :---
‘तुला सर्व लोक गुरु म्हणोत, कवीच ते; (ते काय पाहिजे त्या बाता ठोकणार) मी मात्र त्याचा अर्थ एवढाच करतो कीं, तू त्या (देवगुरु) बृहस्पतीच्या समान दर्जाचा आहेस.
ह्या ठिकाणच्या कवीच्या वाक्यांत, ‘मी कवि नाहीं’ हा सूचित निषेध बाधित झाल्यानें आभासरूप झाला; व मग त्याचें ‘मी खरें बोलतो.’ या अर्थांत पर्यवसान होऊन, उत्तरार्धांतल्या अर्थाच्या ‘खरेपणा’ या विशेषाचें तो (निषेध) सूचन करतो. अशारीतीनें, आपापल्या रुचीला पटणारे अथवा संमत होणारे असे आक्षेप अलंकाराचें अनेक भेद असल्यामुळें त्याचें ध्वनीही निरनिराळेच होणार. अशी वस्तुस्थिति असल्यानें, ‘जो पाण्याच्या घडयांनीं महासागराचें माप (मर्यादा) जाणण्यास समर्थ असेल, तोच हयग्रीवाचे (विष्णूच्या एका अवताराचें) सर्व गुण सांगू शकेल’