हें ध्वनिकारांनीं आक्षेपध्वनीचें उदाहरण म्हणून दिलेलें पद्य ते, ‘आम्हाला संमत असलेल्या आक्षेपाचा ध्वनि यांत नसल्यानें, आक्षेप ध्वनीचें, उदाहरण होऊच शकत नाहीं,’ असें जें अलंकारसर्वस्वकारांनीं, प्रमाणावाचून म्हटलें आहे, त्याचें खंडन झालें. कारण फक्त आभासरूप निषेधालाच आक्षेप अलंकार म्हणावें, अशीं कांहीं कुठें वेदाची आज्ञा नाहीं, किंवा प्राचीन आचार्यांचीही तशी आज्ञा नाहीं. बरें, असें म्हणण्याला कांहीं प्रमाणही नाहीं. ते असतें तर, ध्वनिकारांचें म्हणणें न मानतां तुमच्या म्हणण्यावर आम्ही विश्वास ठेवला असता. पण, याच्या उलट म्हणणेंच योग्य होईल. (म्हणजे ध्वनिकारांचें म्हणणें योग्य असून उलट तुमचेंच म्हणणें अयोग्य आहे असें म्हणतां येईल.) ध्वनिकारांनीं आलंकारिकांच्या मार्गाची योग्य व्यवस्था केली आहे, (तेव्हां तुमच्यापेक्षां त्यांचेंच म्हणणें आम्हाला जास्त विश्वासाई वाटतें.) प्राचीन आलंकारिकांच्या वचनाखेरीज दुसरे एखादे, ‘आक्षेप वगैरे शब्दांचा योग्य अर्थ काय’ हें ठरविण्याला प्रमाण म्हणून, या साहित्यशास्त्रांत सांगता येणार नाहीं. या शास्त्रांत प्राचीन आचार्यांच्या वचनाहून इतरांना प्रमाण मानल्यास सगळेंच तिरपगडें होण्याचा प्रसंग येईल. आतां,
‘हे राज - श्रेष्ठा ! आम्ही कांहीं (शत्रु) राजाचा निरोप घेऊन येणारे नाहीं; सारें जग ज्याचें कुटुंब आहे अशा तुझा, कोणीही आम्हांला शत्रु दिसत नाहीं !’ हा श्लोक अलंकरसर्वस्वकारांच्या मतानें होणार्या आक्षेपाचें उदाहरण म्हणून देऊन त्यावर कुवलयानंदकारांनी असें म्हटलें आहे :---
‘या ठिकाणीं (ख्ररोखरीचे) निरोप घेऊन येणारे लोक ‘आम्ही निरोपे नाही’ असें स्वत: म्हणत असल्यानें, त्यांचा हा नकार(म्हणजे निषेध) जुळत नाहीं. त्यामुळें त्या निषेधाचें ‘समेट घडवून आणण्याचे वेळीं योग्य असणारें मुत्सद्दी लपंडावाचें जें बोलणें तें सोडून खरें ओलणारे आम्ही आहों ’ या अर्थात पर्यवसान होऊन, तो निषेध ‘सर्व जगाचें पालन करणार्या तुम्ही, कोणाकडेही शत्रु या नात्यानेम बघू नये, तर सर्व राजांना सेवक म्हणून संरक्षण द्यावें’ या विशेष अर्थाचें सूचन करतो.’
वरील (कुवलयानंदकारांचें) म्हणणें चुकीचें आहे. कारण तुम्ही वर सांगितलेल्या विशेष अर्थाला येथील निषेध सूचित करू शकत नाहीं. ‘आम्ही राजाचे निरोपे नाहीं’ एवढें म्हटल्यानें “तुम्ही शत्रू या नात्यानेम कुणाकडेही बघू नये, तर सर्व राजांना सेवक समजून त्यांचें रक्षण करावें.” या विशेष अर्थाचे सूचन होत नाहीं. जर कशानें सूचन होत असेल तर तें, ‘तुम्ही जगतकुटुंबी आहां’ इत्यादि उत्तरार्धानेंच. केवळ निषेधाच्या सामर्थ्यानें खेचून आणलेला जो विशेष अर्थ असेल त्याचाच (म्ह० त्याच अर्थाचा) निषेध हा आक्षेप करतो, असें म्हणणें योग्य आहे. दुसर्याच विशेष अर्थाचा आक्षेप करतो, असें म्हणणें योग्य आहे. दुसर्याच विशेष अर्थाचा आक्षेप हा निषेध करतो, असें म्हणणें योग्य नाहीं. कारण, राजाच्या निरोपे लोकांनीं ‘आम्ही राजाचे निषेध करणें ही गोष्ट बाधित असल्यानें, ‘राजाचे निरोपे’ या शब्दावर लक्षणा करून, त्याचा, राजाच्या निरोप्यामध्यें नेहमीं आढळत असणारा लपंडावाचें बोलणें बोलण्याचा जो धर्म त्यानें युक्त, असा लक्ष्यार्थ हातीं येतो; व या लक्षणेचें प्रयोजन, वरील धर्माचा निषेध केला असतां, आम्ही सत्यवक्ते आहों अथवा आमचें वचन सत्य आहे, अशी प्रतीती हें. यालाच, विशेषाचा आक्षेप करणें म्हणतात. (म्हणजे, लक्षणेच्या योगानें हातीं येणारें जें प्रयोजन तोच या ठिकाणीं आक्षेप अलंकारानें सूचित होणारा विशेष अर्थ.) अशी वस्तुस्थिति असतांना, ‘तुम्ही शत्रु या नात्यानें कोणाकदेही बघू नये हा आमचा विशेष अर्थ या ठिकाणीं आहे,’ असें तुम्ही कां बरें म्हणतां ? आतां तुम्हांला वर सांगितलेल्या ‘आम्ही राजाचे निरोपे नाहीं’ या वाक्यामुळें होणार्या निषेधावरून, ‘राजसंदेशहारिण:’ यांतील राजा या शाब्दावर लक्षणा करून, त्याचा ‘शत्रू (राजा)’ हा अर्थ घ्यायचा असेल व त्यावरून, ‘आम्ही शत्रु राजचे निरोपे नाहीं’ याचा अर्थ ‘आम्ही शत्रूचेम निरोपे नाहीं’ असा अर्थ घ्यायचा असेल, याचा अर्थ ‘आम्ही शत्रूचें निरोपे नाहीं’ असा अर्थ घ्यायचा असेल, व त्या अर्थावरून, आमचे राजे तुझे शत्रु असूच शकत नाहींत, म्हणून त्यांचे (म्ह० त्या आमच्या धनी राजांचे) सेवक समजून तूं पालन करणें योग्य आहे, हा विशेष अर्थानंतरच्या तिसर्या कक्षेंत सूचित होणारा “आमचे धनी तुझे शत्रूच नाहींत” हा निषेध ह्या ठिकाणीं आक्षेप अलंकार होतो; हें मान्य करा; आणि मग तुम्ही वर सांगितलेला (“आम्ही राजाचे निरोपे नाहींत” असा प्रस्तुत श्लोकांतल्या शब्दावरून होणारा) निषेध, या ठिकाणीं आक्षेपाचा उत्थापक नाहीं, हें कबूल करा. (तुमच्या म्हणण्याप्रमाणें) विशेष अर्थाचा उत्थापक जो निषेध त्यालाही परंपरेनें तुम्ही आक्षेप अलंकार मानण्याचा आग्रह धरीत असाल, तरी सुद्धां, “समेटाच्या वेळीं योग्य असलेल्या लपंडावाच्या बोलण्याला सोडून देऊन, वरील निषेध सत्यवादित्वावर पर्यवसान पावतो.” हें तुमचें बोलणें धडधडीत असंगत आहे. केवळ यर्थाथवादित्वावर पर्यवसित होणार्या निषेधानें तुम्ही वर सांगितलेला विशेष अर्थाचा (म्ह० आमच्या धनी राजाचे भृत्य म्हणून पालन करा या, अर्थाचा) आक्षेप करणें शक्य नाहीं. विशेष अर्थाचा म्ह० उत्तरार्धाने ज्याचा आक्षेप केला आहे त्याचा परिपोष करणे येवढेंच तुमच्या निषेधाला शक्य आहे. एवंच, ज्या ठिकाणीं तुम्ही निषेधाचे पर्यवसान सांगितले आहे, तोच विशेष अर्थ, त्या निषेधानें आक्षिप्त होऊं शकतो. दुसरा विशेष अर्थ त्या निषेधानें सूचित होऊं शकत नाहीं.
अशी वस्तुस्थिति असल्यामुळेंच, ‘बालक नाहं दूती०’ या श्लोकांत ‘मी दूती नाहीं’ या म्हणण्यानें दूती असणें या अर्थाचा निषेध होऊन ‘मी खरें बोलणारी आहे’ असा विशेष अर्थ त्या निषेधानें सूचित होतो.” असें जें अलंकारसर्वस्वकारांनीं म्हटलें आहे, तें बरोबर जुळतें.
येथें रसगंगाधरांतील आक्षेप प्रकरण संपलें.