विभावना अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
या शंकेवर आमचें उत्तर :---
प्रस्तुत उदाहरणांत, दारण या शब्दाचा मुख्य अर्थ चिरफाड करणें हाच आहे. पण त्या शब्दाचा ‘काम वगैरेंनीं उत्पन्न होणारी विशिष्टा पीडा’ हा गौण अर्थ (ही) होऊं शकतो. या दोन - गौण व मुख्य दारण क्रियांचा साद्दश्यमूलक अभेदाध्यवसायरूप अतिशय करून या दोन क्रियांमधील भेदाचा संपूर्ण लोप केला असतां, चिरफाड करण्याचें कारण (साधन) जें शस्त्र, तें कामपीडेचें उत्पादक कारणही होऊं शकते. तेव्हां तें शस्त्र ह्या ठिकाणीं नसल्यानें व त्याच्या कार्याशीं (म्ह० चिरफाडीशीं) अभिन्न म्हणून मानलें गेलेलें जें विशिष्ट कामपीडारूपी कार्य, तें ह्या श्लोकांत सांगितलें असल्यानें, (कारणाच्या अभावीं कार्याची उत्पत्ति झाली या द्दष्टीनें, म्हणजे शस्त्राच्या अभावीं कामपीडेची उत्पत्ति झाली या द्दष्टीनें) येथें विभावना अलंकार होण्यास हरकत नाहीं. याचप्रमाणें या अलंकारांत, सगळीकडे कार्य ह्या अंशांत अभेदाध्यवसायरूप अतिशयोक्ति मदत मरणारी म्हणून असतेच. त्या अतिशयोक्तीनें, दूध वगैरे आटवून त्याचे दोन गोळे केले, आणि नंतर ते एक केले (म्ह० एकत्र केले) म्हणजे जसे (ते दोन असूनही) एकजीव होतात, त्याप्रमाणें वस्तुत: सारख्या अशा दोन वस्तूंना एकत्र केल्यानें त्याचें ऐक्य होते. आतां त्या एकजीव होणार्या दोन सारख्या वस्तूपैकीं एकीच्या म्ह० पहिल्या अवयवरूप वतूच्या कारणाचा (म्ह० कार्याच्या प्रधान कारणाचा) अभाव ज्या ठिकाणीं राहतो. त्याच ठिकाणीं दुसरी वस्तु म्ह० गौण कार्यरूपी अवयव घेऊन हा विभावना अलंकार शेवटीं बसवितां येतो.
या अलंकारांत कार्यरूपी अंश (उदा० विदारणक्रियारूपी अंश) कारणाच्या (उदा० शस्त्राच्या) अभावरूप विरोधी पदार्थानें बाधितच असतो. तो कार्यांश ह्या अलंकारांत कारणाभावरूपी विरोधी पदार्थाचा स्वत: बाध करीत नाहीं; कारण ह्या ठिकाणीं कार्याचा अंश कल्पित असतो, व कारणाचा अभाव स्वभावसिद्ध असतो, (त्यामुळें कल्पित कार्यांशानें, सत्य जो कारणाचा अभाव, त्याचा बाध होणें येथें शक्यच नसतें.) म्हणूनच तो बाधित झालेला कार्यांश दुसर्या एका कार्याचें रूप घेऊन शेवटीं प्रकट होतो. अशारीतीनें या अलंकारांत कार्यांश व कारणांश हे तुल्यबल नसल्यामुळें म्हणजे (कारणाभावापेक्षां कार्यांश दुर्बल असल्यामुळें) दोन सारख्या बळाच्या विरोधी पदार्थांव्र उभारलेल्या विरोध अलंकाराहून या अलंकाराचा निराळेपणा स्पष्टच आहे. म्हटलेंच आहे कीं, “कारणाचा निषेध केल्याच्या योगानें, कार्याची उत्पत्ति विभावना अलंकारांत, बाधित झालेली दिसते. पण विरोधांत (म्ह० विरोधालंकारांत) सारख्या तोलाचे दोन विरोधी पदार्थ परस्परांचा बाध करतात.” वर अतिशयोक्ति ही विभावनेला मदत करणारी असते असें सांगितलें; पण ती अतिशयोक्ति सगळ्याच विभावनेंत मद्तनीस म्हणून येते असें मात्र नाहीं. (तर कुठें कुठें येते). उदाहरण :--- ‘निर्माण करण्याच्या साधनावांचून (म्ह० चित्राकरतां भिंत नसतांनाही) जगदरूपी चित्र काढणार्या कलानिपुण अशा शंकराला आम्ही नमस्कार करतों.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP