आतां कुवलयानंदकारांनीं “हे राजा ! उच्चाटन (हत्ती वगैरे उंच वाहनावर बसून हिंडायला) मिळावें या इच्छेनें, तुझा आश्रय करून, ह्या ठिकाणीं मी फार दिवस राहिलों; आणि तेंच उच्चाटन [(१) उंच वाहनावरून हिंडणें व (२) हकालपट्टी हे दोन्हीही अर्थ येथें घ्यावें]. तुम्ही मला आज मिळवून दिलें (फार चांगली गोष्ट झाली !) (एवंच काय कीं) मोठयांची केलेली सेवा फुकट जात नाहीं.”
हें समालंकाराचें उदाहरण देऊन, “या ठिकाणीं असलेल्या व्याजस्तुति अलंकारांत जर स्तुतीनें निंदेची अभिव्यक्ति झालेली सांगायची असेल तर, विषम अलंकार होईल; तथापि व्याजस्तुतींतल्या प्राथमिक स्तुतिरूप वाच्यार्थाच्या वेळीं समालंकार होतो, तो मात्र दूर करतां येणार नाहीं,” असें म्हटलें आहे. पण या उदाहरणामध्यें ‘माम् उच्चाटनं लम्भयसें’ या प्रयोगांत लभ धातूच्या प्रयोजकाच्या प्रयोगांत दोन कर्में आलीं आहेत तीं कशीं काय ? ‘गतिबुद्धि०’ इत्यादि पाणिनिसूत्राचा (पा. १।४।५२) प्राचीन वैय्याकरणाच्या रीतीनें ‘नियमविधिपर अर्थ करावा,’ हा पक्ष स्वीकारल्यास, लभ् धातूच्या प्रयोज्यकर्त्याला कर्म करतां येणार नाहीं. आतां :---
‘परत्वामुळें, अंतरंगत्वामुळें व उपजीव्य होत असल्यामुळें, प्रयोज्याला कर्तृत्व मानणें भाग आहे व ‘गतिबुद्धि०’ इत्यादि सूत्राला अपूर्वविधिपर मानणें हेंच योग्य होईल.’ या नवीन वैय्याकरणांच्या पद्धतीप्रमाणें, ‘गतिबुद्धि०’ या सूत्राचा, अपूर्व विधि मानून अर्थ प्राधान्य सोडून देऊन पूर्व क्रियेचें प्राधान्य स्वीकारल्यानें, येथे कर्मत्वाची प्राप्तीच नाहीं. म्हणून वरील ठिकाणीं ‘उच्चाटनं मया लम्भयसे’ असाच शुद्ध प्रयोग असायला पाहिजे. असें असूनही तरी करून लभ धातूला गत्यर्थक मानायचें असेल, व त्याप्रमाणें श्लोकांतील ‘मां लम्भयसे’ हा प्रयोग योग्य आहे असें म्हणायचें असेल तरीसुद्धां, “व्याजस्तुतीच्या प्राथमिक कक्षेंत समालंकाराचें निवारण करतां येणार नाहीं.” या (दीक्षितांच्या) लिहिण्यानें, दुसर्या कक्षेंत विषमालंकार असायला हरकत नाहीं, असें जें सूचित केलें आहे, तें मात्र चुकीचें आहे, कारण या श्लोकांत हकालपट्टी करणें ह्या उलटया अर्थाचा निंदेत शेवट होत असल्यानें व ति निंदा व्याजस्तुतीचा विषय होत असल्यानें, येथें व्याजस्तुतीनें विषमाचा बाध होणेंच योग्य आहे. तुम्ही म्हणाला, ‘याच्या उलट कां नाहीं होणार ? (म्हणजे विषमानेम व्याजस्तुतीचा बाध कां नाहीं होणार ?)’ याला उत्तर हेंच कीं, संपूर्ण चमत्काराला व्याजस्तुतींतच वाव असल्यानें, तिचा तुम्ही सुद्धां, लोप करूं शकणार नाहीं.