इष्ट सिद्धीकरतां, तें इष्ट इच्छिणार्याकडून केलें जात असलेलें इष्टाच्या विरुद्ध आचरण, म्हणजे विचित्रालंकार. (मुळांतील) विपरीत म्ह० प्रतिकूल (अथवा विरुद्ध.)
‘बंधापासून सुटका व्हावी म्हणून यज्ञ वगैरे मर्मांचे पाश गळ्यांत अडकवून घेतात (अथवा, तयार करतात.) अंत:करणाला शांति मिळावी म्हणून, ऋषिमुनींच्या शेकडो मतांची खूप खूप चिंता (म्ह० विचार) करतात. पापरूपी समुद्राच्या पैलतीराला जाण्याच्या इच्छेनेम, तीर्थांत बुडी मारतात; संसाराच्या भ्रांतीनें घेरलेले लोक अशारीतीनें सर्व चुकीचें वागतात.
या श्लोकांतील पहिल्या चरणांतील विचित्रालंकार रूपकावर आधारलेला आहे; कारण यज्ञादि कर्में करणें हीं पाश आहेत, असें जोंपर्यंत सिद्ध झालें नाहीं, तोपर्यंत बंधापासून सुटण्याच्या विरुद्ध क्रिया हे लोक करतात, याची (या विधानाची) संगत लावतां येणार नाहीं. दुसर्या चरणांतील विचित्र मात्र शुद्ध आहे. कारण शांतीचे बाबतींत चिंता ही स्वरूपत:च विरुद्ध असते.
पण (वरील विचित्र अलंकाराच्या लक्षणांत) इष्ट सिद्धीकरतां, तें इष्ट इच्छिणारानें, इष्टविरुद्ध (विपरीत) आचरण केल्यानें, त्याचा भ्रांतिष्टपणा जसा सूचित होतो, तसा तो स्वत:सिद्ध इष्टाकरतां, ते इष्ट इच्छिणारानें, त्या इष्टाला अनुकूल भासणारें आचरण केल्यानें (भ्रांतिष्टपणा) व्यक्त होत असेल, आणि या प्रकारालाही विचित्र अलंकार म्हणतां येत असेल तर, आणि त्याकरतां, या (नव्या प्रकारच्या) विचित्र अलंकाराला जुळेल असें वरील लक्षणांत, ‘विपरीत’ या पदाऐवजीं ‘अननुकूल’ हें पद घालतां येत असेल तर, (या नव्या विचित्र अलंकारांचें) उदाहरण म्हणून खालील श्लोक देतां येईल :---
“त्रैलोक्यांत पसरणार्या ज्याच्या तेजानें सर्व जग प्रकाशित होतें; सर्व जनांच्या ह्र्दयांतील ‘मी व हा’ या ज्ञानाला जो आधार आहे; त्या स्वत:च्या ह्रदयांत वसत असलेल्या विष्णूला न जाणणारे लोक, त्याच्याविषयीं इतरांच्याजवळ शोध करतात; हा या लोकांचा, शिव शिव ! केवढा बरें अन्याय ? या अन्यायाचें कोण वर्णन करू शकेल ?”