‘वर सांगितलेली शृंखला, तिच्यांतील संबंध, (उत्तरोत्तर) उत्कृष्ट व अपकृष्ट अशा स्वरूपाचा असेल तर, (ती) सार अलंकार.’
या अलंकाराचे दोन प्रकार :--- (१) पूर्वींपूर्वींच्यापेक्षां पुढचा पुढचा पदार्थ उत्कृष्ट असणें, व पूर्वींपूर्वीपेक्षां पुढचा पुढचा पदार्थ अपकृष्ट असणें, उदाहरण :---
‘या जगांत, चेतन प्राणी श्रेष्ठा; त्यांत विद्वान श्रेष्ठ; त्यांत सज्जन श्रेष्ठ; त्यांत निस्पृह सज्जन शेष्ठ; आणि त्यांत वासनारहित असे सज्जन धन्य होत.’
या अलंकाराला एक विषय असणें व अनेक विषय असणें, या द्दष्टीनें, पुन्हां दोन प्रकारचा मानतात. या अलंकाराचा विषय एकच पदार्था असेल तर, अवस्था वगैरेचा भेद मानणें आवश्यक होतें; कारण एकाच पदार्थांतील उत्कर्ष अथवा अपकर्ष, हा ‘अवस्थादि’ भेदावरच अवलंबून असतो. एकच वस्तूच्या अनेक अवस्था वगैरेचा फरक, मानल्यावांचून कोणतीही वस्तु स्वत:पेक्षां कमी अथवा अधिक होऊच शकत नाहीं.
==
एक विषय असून उत्तरोत्तर उत्कर्ष असलेल्या सारालंकाराचें उदाहरण हें :---
‘सहज लीलेनें लिंबाची शोभा मागें टाकून, व सुंदर सोन्याच्या घडयालाही खालीं पाहायला लावून, तुझे स्तन, हे नीलकमलाप्रमाणें डोळे असणार्या सुंदरी ! आतां सोन्याच्या पर्वताशीं (मेरू पर्वताशीं) स्पर्धा करीत आहेत.”
ह्या ठिकाणीं, पहिल्या पहिल्या अवस्थेनें युक्त स्तनापेक्षां, पुढच्या पुढच्या अवस्थेनें युक्त अशा त्याच स्तनांचा उत्कर्ष सांगितला असल्यामुळें, एकविषयक सारालंकार आहे. आतां कोणी म्हणतील कीं, ‘या ठिकाणीं, स्तनाचे परिमाण निरनिराळे वेळीं निरनिराळे असल्यामुळें, त्यांच्यांत द्रव्यभेदही मानणें (म्ह० त्यांना हे निराळे स्तन आहेत असें मानणें), शक्य आहे;’ तरीपण, या सर्व निरनिराळ्या परिमाणांच्या स्तनांमध्यें स्तनत्व हा एकच धर्म असल्यानें, त्या सर्व स्तनांत, अभेदाचा आश्रय करून, एकविषयत्व आहे, असें म्हणणें ही शक्य आहे. “या ठिकाणीं, एकाच आश्रयात क्रमानें अनेक आधेयांनीं (म्ह० पदार्थांनीं) राहणें हा, पुढें सांगण्यांत येणारा पर्याय अलंकार प्रतीत होतो.” असें म्हणत असाल तर, तो पर्यायही येथें असायका आमची हरकत नाहीं. पण पर्यायानें, पूर्वींपूर्वीपेक्षां पुढचे पुढचे पदार्थ उत्कृष्ट असणें हा जो सारालंकार तो काढून टाकणें मात्र शक्य नाहीं.