सार अलंकार - लक्षण ३
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
खरें म्हणजे ‘गुण व स्वरूप यांच्या योगानें, पूर्वीं पूर्वींपेक्षां पुढच्या पुढच्याचें वैशिष्टय (उत्कर्ष) असणें म्हणजे सार’ असें सारालंकाराचें लक्षण करणें योग्य होईल. आतां हा अलंकार कुठें शृंखलेवर आधारलेला असतो; अशा वेळीं तो अनेकविषयक असतो; तर कुठें स्वतंत्र असतो; (अशा वेळीं तो एकविषयक असतो,) असें म्ह्टलें म्हणजे सगळे ठाकठीक बसतें.
अशा रीतीनें शृंखलेवर आधारलेल्या प्रत्येक अलंकारांत, एक विशेष प्रकारचा निराळा चमत्कार अनुभवानें सिद्ध होत असल्यानें, ते सर्व अलंकार निरालेच मानले पाहिजेत; व त्या सर्व अलंकारांना शृंखला ही विरोध, अभेद, साधर्म्य वगैरेप्रमाणें केवळ अनुप्राणक (म्ह० मदत करणारी) असते, असें मानणेंच योग्य आहे. ती स्वतंत्र अलंकार आहे, असें मानणें योग्य नाहीं. ती इतरांची अनुप्राणक असूनही स्वतंत्र अलंकार आहे, असें मानलें तर, अभेद वगैरेंनाही (निराळे) स्वतंत्र अलंकार मानण्याचा प्रसंग येईल.
पूर्णा लुप्ता वगैरेमध्यें उपमेहून निराळा असा चमत्कार नसतो; पण त्या सर्वांत उपमेचा एकच चमत्कार (विच्छित्ति) असतो, असा आलंकारिकांचा सिद्धांत आहे.
“पण काय हो ! विच्छित्ति (चमत्कार) हा प्रकार तरी काय आहे ?” (यावर उत्तर -) सांगतों (ऐका) :--- अलंकारांचा एकमेकांहून विच्छेद म्ह० भेद असण्याला कारण असणारी, व जन्यतासंबंधानें काव्यांत राहणारी जी कवीची प्रतिभा तिला विच्छित्ति म्हणावें. किंवा त्या प्रतिभेनें उत्पन्न केलेली जी चमत्कारिता तिला विच्छित्ति म्हणावें
येथें रसगंगाधरांतील सार प्रकरण समाप्त झालें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP