‘अनुमितीचें असाधारण करण (म्हणजेच) अनुमान.’ अनुमिति म्हणजे जी अनुमितित्व धर्मानें युक्त ती. ‘अनुमितित्व हा, मी अनुमान करीत आहे, हें मानसप्रत्यक्ष ज्ञान ज्याला विषय करतें असा, एक जाति - विशेश (म्हणजे एक विशेष प्रकारची जाति). हा जातिविशेष या मानसप्रत्यक्षाला विषय होतो. अथाव, व्याप्तीनें युक्त असलेला हेतु हा पक्षाचा एक धर्म आहे, अशा निश्चयापासून उत्पन्न होणारें जें ज्ञान, त्यालाही अनुमिति म्हणावें. आतां त्या अनुमितीचें असाधारण कारण, व्याप्तिविशिष्ट लिंगज्ञान (निश्चयरूपी ज्ञान) असतें, असें कांहींचें म्हणणें; तर व्याप्यत्वानें निश्चित होणारें जें लिंग तें (च) अनुमितीचें असाधारण कारण, असें दुसरे कांहीं म्हणतात.
हें सामान्यत: (म्ह० इतर दर्शनानांही साधारण असें) अनुमानाचें स्वरूप सांगितलें. आतां हेंच अनुमान, कविप्रतिभेनें कल्पिलेलें असून त्यांत जेव्हां चमत्कारिता असेल, तेव्हांच त्याला काव्यातील अनुमानालंकार म्हणावें
उदा० ‘रत्नांच्या समूहानें ज्यांतील अंधकार (पार) नाहींसा झाला आहे व म्हणूनच रात्रीचा लोप करण्यास जें समर्थ आहे (म्ह० ज्यांत, रात्र केव्हां सुरू होते हें त्यांतील झगझगीत प्रकाशामुळें कळत नाहीं.) अश अया नगरांत, नुकतेंच प्रियेपासून वियुक्त झालेले अतएव शोकाकुल झालेले चक्रवाक पक्षी, नित्य, दिवस संपल्याचें जाहीर करतात.’
या ठिकाणीं कथयन्ति याचा अर्थ, स्पष्ट बोध करून देतात, असा होतो. हा बोध अर्थातच ह्या ठिकाणीं अनुमितिरूप असून, चक्रवाकाच्या ज्या वियोगरूप हेतूचा (साध्याशीं) व्याप्यत्वसंबंध आहे, (म्ह० ज्या ज्या ठिकाणीं हा हेतु असतो त्या त्या ठिकाणीं साध्य असतें.) त्या हेतूच्या निश्चित ज्ञानरूपी कारणानें ती अनुमिति उत्पन्न होते. या श्लोकांत एक विशिष्ट प्रकारचा अंधकार, रत्नानें नाहींसा होतो. तरीपण या विशिष्ट अंधकाराचा अभाव सामान्य अंधकाराच्या अभावाशीं येथें अभिन्न मानलेला आहे. व त्यामुळें रात्रीचा लोप करण्यास हें शहर दक्ष आहे, या विधानाची सिद्धि झालेली आहे. त्यामुळें दिवस केव्हां संपला हें समजत नाहीं, आणि म्हणून दिवस संपला या साध्याचें अनुमान येथें केलें आहे. अशा रीतीनें हें अनुमान कविप्रतिभेनें कल्पिलेलें आहे (म्हणून हा अलंकार). या श्लोकांत पुढें येणारा उन्मीलित अलंकार आहे, असें समजूं नये; कारण तेथेंही अनुमानालंकारच आहे असें आम्ही पुढें सिद्ध करणारच आहों. अथवा (अनुमानाचें) हें (दुसरें) उदाहरण :---
‘हे राजा ! ज्या अर्थीं शत्रूरूपी चंद्रविकासी कमळें सुकून गेलीं आहेत; (ज्या अर्थी) दारिद्यरूपी अंधकाराचा समूह त्वरित नष्ट झाला आहे (ज्या अर्थी) अंधकाराम्त वावरणारे प्राणी (घुबडें वगैरे) दूर पळून गेळे आहेत; (ज्या अर्थी) सन्मार्गाचा प्रसार झाला आहे व (ज्या अर्थी) सज्जनरूपी कमळें विकसित होत आहेत, त्या अर्थीं, मला वाटतें, तुझा पराक्रमरुपी सूर्य आतां उगवण्याच्या बेतांत आहे.