पूर्वींच्या श्लोकांत म्ह० ‘तस्मिन् मणिव्रात’ ह्या श्लोकांत लिंग व लिंगी (म्ह० हेतु व साध्य) हीं शुद्ध स्वरूपाचीं होतीं. पण ह्या प्रस्तुत श्लोकांत हेतु व साध्य हीं दोन्हीं रूपकावर उभारलेलीं आहेत, हा या दोन श्लोकांती अनुमानांत फरक. पण या दोन्हीही ठिकाणीं, कवीनें अनुमान आपल्या प्रतिभेनें कल्पिलें आहे हें स्पष्टच आहे. ज्या ठिकाणीं, हेतु व साध्य हीं असतात त्या अनुमानांत, ‘मन्ये, ‘मन्ये, शंके, अवैमि, जानें’ इ० शब्द अनुमितिवाचक असतात असें समजावें; व ज्या ठिकाणीं साद्दश्य वगैरे निमित्तें सांगितलीं असतील, त्या ठिकाणीं वरील मन्ये, शंके वगैरे शब्द उत्प्रेक्षावाचक असतात असें समजावें. असें असल्यानें :---
‘ज्याचा मोठा उत्सव चाललेला आहे असा हा मदनाचा प्रधान (म्ह० वसंत ऋतु) येत आहे असें मला वाटतें; कारण कीं, अहो ! हा कोकिळ आपल्या डोळ्यांचा चमत्कार दाखवीत आहे. (डोळ्यांत. लाल रंगाची चमत्कृति धारण करीत आहें.)’
ह्या श्लोकांत अनुमानच आहे, उत्प्रेक्षा नाहीं, (कारण उपमान व व उपमेय यांचें साद्दश्य दाखविणारें साधारणधर्मरूपी निमित्त येथें नाहीं; उलट वसंत येत आहे या अनुमानाला कारण, कोकिळेच्या डोळ्यातला लाल रंग हा हेतु, येथें सांगितला आहे.)
ह्या ठिकाणीं हें ध्यानांत ठेवावें कीं, मन्ये इ. अनुमानवाचक शब्द श्लोकांत येतील त्या ठिकाणीं अनुमान वाच्य असतें, उदाहरण, वर दिलेले श्लोक. पण मन्ये वगैरे शब्दांऐवजीं वक्ति कथयति इ० लक्षणिक शब्द आल्यास, त्या ठिकाणीं अनुमान वाच्य नसून लक्ष्य आहे, सें समजावें. उदाहरणार्थ, ‘कोका: सशोका:०’ हा श्लोक. या दोहोंपैकीं कोणताही शब्द नसल्यास व साध्याचे बळावर अनुमिति होत असेल त्या ठिकाणीं, अनुमान प्रतीयमान अथवा गम्य आहे असें समजावें. उदाहरणार्थ, वरील ‘अम्लायन्०’ ह्या श्लोकांत “तदभावी तव देव संप्रति महोमार्तण्डबिम्बोदय:” असा चौथा चरण घातला तर, त्या ठिकाणीं प्रतीयमान अनुमान होईल; आणि ज्या ठिकाणीं साध्याचाही उल्लेख नसेल व केवळ हेतूच्या निर्देसावरून साध्य सूचित होत असेल त्या ठिकाणीं, अनुमानध्वनि होतो (असें समजावें.)
उदाहरणार्थ :--
“या तलावांत, भुंगे चोहोंकडे मंजुळ गुंजारव करीत आहेत; भोंवतीं फिरून समोर धावत आहेत; (आणि) मागेंपुढें जातयेत आहेत.’
ह्या ठिकाणीं शरद्ऋतूचा प्रारंभ हें साध्य असून त्याच्या अनुमानाचा ध्वनि आहे.
अशा रीतीनें वाच्य, लक्ष्य, आक्षिप्त (ध्वन्यमान) अशी अनुमानाची व्यवस्था, पूर्वीं दिलेल्या अनुमितीचे करत तें अनुमान या मताप्रमाणें (म्ह० अनुमानाची ही व्याख्या हें मत मानल्यास) जुळत नाहीं. कारण जाणलें जाणारें लिंग म्ह० हेतु हें अनुमितीचें कारण आहे, या मताप्रमाणें अनुमान फक्त वाच्यच असतें, असें मानण्याचा प्रसंग येईल.) याचे उलट, लिंगाचें ज्ञान हेंच अनुमानाचें कारण, हें मत मानल्यास, ज्ञान हें वाच्यही व लक्ष्यही नसल्यामुळें, वाच्य व लक्ष्य अनुमान नसतेंच, असें म्हणण्याचा प्रसंग येईल. म्हणून अनुमिति म्हणजेच अनुमान, असेंत म्हणावें. अनुमानाचें हें लक्षण स्वीकारल्यस (ज्या ठिकाणीं अनुमितिवाचक शब्द वाक्यांत आले असतील त्याठिकाणीं) वाच्य अनुमान, (ज्या ठिकाणीं वक्ति कययति इ० इब्द आले असतील त्या ठिकाणीं) लक्ष्य अनुमान, (ज्या ठिकाणीं साध्यानें अनुमिति आक्षिप्त असेल त्या ठिकाणीं) प्रतीयमान अथवा गम्य अनुमान. व (ज्या ठिकाणीं लिंगावरून साध्य सूचित होत असेल त्या ठिकाणीं) व्यंग्य अनुमान, अशी चार प्रकारची अनुमिति खुशाल होऊं शकते. ल्युट या प्रत्ययाचा करण या अर्थी ज्याप्रमाणें उपयोग होतो. (उदा० अनुमीयते अनेन इति अनुमानं ह्या ठिकाणीं ल्युट प्रत्यय करण ह्या अर्थीं वापरलेला आहे.) त्याचप्रमाणें भाव ह्या अर्थीं पण ल्युट प्रत्यय (बिनधोक) वापरला जातो. (तेव्हां अनुमित होणें म्हणजेच अनुमान असें नि:शंकपणें मानावें.)
येथें रसंगाधरांतील अनुमान प्रकरण संपलें.